।। अध्याय पहिला ।।

।। श्रीगणेशाय नमः ।।
।। श्रीरूक्मिणीपांडुरंगाभ्यां नमः ।।
।। श्रीगुरुदत्तात्रेयाय नमः ।।
।। श्रीपादवल्लभाय नमः ।।
।। श्रीनृसिंहसरस्वत्यै नमः ।।
।। श्रीभवानीशंकराभ्यां नमः ।।

हे अखिलब्रह्मांड व्यापका। हे चराचरउत्पादका। हे त्रिभुवनसंरक्षका। सच्चिदानंदा तुज नमो
।।१।।

तूंच अवघे होऊन। जग केलेंस निर्माण। प्रत्येक वस्तू शोधून। पहातां दिससी तूंच कीं
।।२।।

एवंच या जगाठायीं। तुजविण कांहींच नाहीं। प्रत्यया येशी ठायीं ठायीं। जग मुळींच दिसेना
।।३।।

परि कौतुकेंकरून। तुझें जें झालें स्फुरण । त्या स्फुरणालागून। जग म्हणती देवदेवा
।।४।।

स्फुरण जें कां झालें। तें जग नांव पावलें। तें स्फुरण जया झालें। तो तूं एक आद्य कीं
।।५।।

आतां हे विघ्नहरा। शिवतनया लंबोदरा। हे हैमवतीकुमारा। गजवक्त्रा गणपते
।।६।।

हें गुरुचरित्रसारामृत। रचितों हा मी जो ग्रंथ। तो तव कृपेनें समस्त । सिद्धी पावो विघ्नहरा
।।७।।

तुझें करितां नामस्मरण। वाचे म्हणतां गजानन। अखिल विघ्नांचे निर्मूलन। होतें ऐसें बुध बोलती
।।८।।

त्या सज्जन संप्रदायेंकरून। मीं तुमचे वंदिले चरण। प्रसीद मज लागुन । ग्रंथ रसाळ वदवी हा
।।९।।

आतां आदिमाया सरस्वती। जी ब्रह्मांडाची आद्यशक्ति। जी कविजनांची वरदमूर्ति। शारदांबा नांव जिचें
।।१०।।

त्या हंसवाहिनीकारण। सर्वदा असो माझे नमन। जिव्हाग्रीं बैसे येऊन । दासगणूच्या बया तूं
।।११।।

हे भीमतट-विहारा। पांडुरंगा रूक्मिणीवरा। देवाधिदेवा उदारा। भक्तवत्सला संतप्रिया
।।१२।।

तूंच श्रीगुरु होऊन। भजनीं लाविले भक्तजन। नाम जरी असले भिन्न। परि दत्त तूंचि पांडुरंगा
।।१३।।

त्या दत्तअवताराच्या लीला। मी वर्णितों रे विठ्ठला। पाहून गुरुचरित्राला । त्यातें सहाय्य करावें
।।१४।।

आतां भवभयांतक भवानीपति। अंकी ज्याच्या हैमवती। जो पंचतुंड पशुपति। नीलकंठ गंगाधर
।।१५।।

ज्याचें नांव सदाशिव। जो भक्तांचे वारी अशिव। तो मायबाप उमाधव। कृपा करो मजवरी
।।१६।।

आतां कोल्हापुरनिवासिनी। जी माझी कुलस्वामिनी। तिच्या माथा ठेऊनी चरणीं। आशीर्वाद मागतों
।।१७।।

आतां कश्यपादि ऋषीधर। वशिष्ट भृगु पाराशर। ज्याच्या कुलीं वैश्वानर। तो मी शांडिल्य वंदितों
।।१८।।

आतां व्यास वाल्मीक कविवरा। मी आदरें जोडी करां। हे श्रीशंकराचार्यगुरुवरा। सहाय्य माझें करा हो
।।१९।।

आतां संतसम्राट कवीश्वर। निवृत्ति छात्र ज्ञानेश्वर। समर्थ स्वामी देहूकर। तुकारामा वंदितों मी
।।२०।।

ज्यांची कृपा झालिया। वेळ न ग्रंथ शेवटा जाया। कांहीं न जगीं अशक्य त्या। करणें संताकारणें
।।२१।।

संत अवघ्या जगाचे। सद्गुरू आहेत साचे। संत वाटाडे मोक्षाचे। श्रीविठ्ठलाचे कंठमणी
।।२२।।

त्या अखिल संतांसी। नमन माझें आदरेसी। दासगणूच्या शिरासी । ठेवा वेगें वरदहस्त
।।२३।।

आतां यावनीकुलसंभूत। शिर्डीकर साईनाथ। त्यांच्या दिव्यचरणांप्रत । नमन माझें हे असो
।। २४।।

आतां वामनशास्त्री सद्गुरू। जे माझे कल्पतरू । तयांच्या दिव्य चरणां करूं। अनन्येसी नमन हे
।।२५।।

आतां श्रोते सावधान। गुरुचरित्राचें सार गहन। कथितों मी तुम्हां कारण। अवधान द्या या कथेतें
।।२६।।

गुरुचरित्र हा एक ऊस। हा ग्रंथ त्याचा रस। तो श्रवणद्वारें प्राशिल्यास। कार्य तुमचे होय कीं
।।२७।।

आपस्तंबशाखेचा। द्विज कौंडिण्य गोत्रीचा। साखरें उपनांवाचा। सायंदेव असे कीं
।।२८।।

त्याचा पुत्र नागनाथ। देवराव त्याचा सुत। त्याच्यापुढे विख्यात। गंगाधर जाहला
।। २९।।

त्या गंगाधराकारण। कश्यप गोत्रीं अश्वलायन। चौंडेश्वर नामाभिधान। होते जया पुरुषार्ते
।।३०।।

त्याची चंपा नामें कन्यका। दिली गंगाधरासी देखा। त्यापासून पुत्र निका। झाला सरस्वतीगंगाधर
।।३१।।

ज्या सरस्वतीगंगाधरें। गुरुचरित्र रचिलें आदरें। महदुपकार झालें खरें। जयाचे या महाराष्ट्री
।।३२।।

यानें गुरुचरित्र ग्रंथ केला। संत महंता पसंत पडला । त्या सरस्वतीगंगाधराला। नमन दासगणूचें
।।३३।।

स्वामी नृसिंहसरस्वती। ज्याच्या कुलीची ध्येयमूर्ति। त्यांनीं सरस्वतीगंगाधराप्रति। ऐशी आज्ञा केली असे
।। ३४।।

तूं गुरुचरित्राचा विस्तार। करावा कीं झडकर। ज्यायोगें उपकार। तुझे होतील जगावरी
।।३५।।

तें सरस्वतीगंगाधरें। वचन मानिलें आदरें । त्याचेंच सार हैं खरें। हें न माझ्या कल्पनेचें
।।३६।।

कर्नाटकाच्या आरंभासी। भीमा अमरजा संगमासी। राहिले प्रत्यक्ष ज्ञानराशी। स्वामीं नृसिंह सरस्वती
।।३७।।

जे नृसिंहसरस्वती। साक्षात् होते त्रैमूर्ति। थवेच्या थवे लोटती। दर्शनार्थ जनांचे
।।३८।।

तें गाणगापूर सामान्य ग्राम। परि झालें वैकुंठधाम। जेथें पावले विश्राम। गृहस्थ संन्यासी ब्रह्मचारी
।।३९।।

त्या नृसिंहसरस्वतीला। वंदण्या शिष्य निघाला। नामधारक नाम ज्याला। मिळते झाले विबुध हो
।।४०।।

त्या नामधारकालागून। तळमळ लागली रात्रंदिन। कधीं सद्गुरूचरण। पाहीन मी या डोळ्यानें
।।४१।।

ऐसें असतां एके दिनीं। एक सिद्ध येऊनी। दर्शन देता झाला स्वप्नीं। नामधारकाकारणें
।।४२।।

त्या सिद्धाचें स्वरूप। नामधारक ना विसरे अल्प। सदा मुखें करी जप। श्रीगुरुचे नामाचा
।।४३।।

मार्गी चालतां प्रत्यक्ष दिसले। जे स्वप्नीं होते पाहिले। नामधारकें घातलें। दंडवत त्या अष्टांगेसी
।।४४।।

दाटून आला गहिंवर। पायांवरी ठेविले शिर । नामधारक जोडून कर। सिद्धास पुसू लागला
।।४५।।

महाराज आपण कोठले कोण। हैं सांगावें मजलागून। आपुले स्वप्नीं दर्शन। होते मजला जाहले
।।४६।।

तेच मी आज तुम्हासीं। प्रत्यक्ष पाहिलें ज्ञानराशी। आतां तरणोपाय सांगा मशी। मी अनन्य भावें शरण आलों
।।४७।।

पूर्व सुकृत कांही होतें। म्हणून पाहिले तुम्हांतें। आतां या अर्भकातें। स्वामी परते लोटूं नका
।।४८।।

सिद्ध म्हणाले त्यावर। आम्ही तीर्थवासी निरंतर । स्वर्गों पाताळीं मृत्युलोकांवर। भ्रमण आमुचें होतसे
।।४९।।

आमुचे गुरु विख्यात । नृसिंहसरस्वती श्रीदत्त । जे राहिले सांप्रत । भीमाअमरजासंगमासी
।।५०।।

त्यांची कृपा ज्याचेवरी। जाहली तो सर्वतोपरी। सुखसंपदा भोगून अखेरी। निर्वाणपदा पावतसे
।।५१।।

ज्याच्या कृपेचा महिमा। अतर्व्य आहे निगमागमा। तो मी तुज शिष्योत्तमा। सांगो केवी एक्यामुखें
।।५२।।

ज्याचे मन सद्रुचरणीं। वसे विश्वासयुक्त होऊनी। त्याच्यापुढें जोडिती पाणि। ब्रह्मा विष्णू महेश्वर
।।५३।।

ऐसा गुरुकृपेचा। महिमा आहे अगाध साचा। तो वर्णावया वेद वाचा। थकेल बापा निःसंशय
।।५४।।

तूंच आजपर्यंत। भटकत फिरलासी सर्वत्र । त्याचे कारण हेंचि सत्य। गुरुकृपा ना संपादिली
।।५५।।

जे जे कोणी सद्गुरूला। शरण गेले जगतीतलां । त्यांचा त्यांचा नाहीं झाला। मनोभंग केव्हांही
।।५६।।

ऐसे ऐकतां सिद्धवचन। नामधारक विनवी कर जोडून। सदुरूंचें महिमान। कां हैं वाढलें जगामध्यें
।।५७।।

ब्रह्मा विष्णु महेश्वर। यांहून श्रेष्ठ कां गुरुवर। मानावे मी साचार। हेंच कांही कळेना
।।५८।।

सिद्ध म्हणती त्यावरी। प्रश्न केलासी अतिकुसरी। सच्चिदानंद भूमीवरी। एक श्रीगुरु जाण पां
।।५९।।

असंख्य दीप लाविले। परी सूर्यापुढें ओस पडले। येथें अवांतर देव भले । दीपासमान जाणिजे
।।६०।।

ब्रह्मा विष्णु महेश्वर। हे आद्य देव साचार। उत्पत्ति पालन संहार। कर्ते हेच जगाचे
।।६१।।

हे तिन्हीं देव एकेठायी। मिळून झाले दत्त पाही। म्हणून सद्गुरूसम सोय नाहीं। ब्रह्मतत्व जाणावया
।।६२।।

उत्पन्न कर्ता सद्गुरू । पालन कर्ता सद्गुरू। संहार कर्ता सगुरू। म्हणजे अवघा सद्गुरुच
।। ६३।।

म्हणून सद्गुरुसमान। सोय नाहीं आणिक आन। नामधारका जाई शरण। अनन्यभावें सद्गुरुसी
।।६४।।

मूळ ब्रह्मा चतुरानन । त्याच्या श्वासापासून। वेद झाले निर्माण । ऋक् यजुः साम पहा
।।६५।।

वेदापासून पुराणें। अष्टादश रचलीं व्यासानें। ब्रह्मवाक्यें आदरानें। केली ग्रथित तया ग्रंथीं
।।६६।।

पाहतां तो व्यासमुनी। प्रत्यक्ष अवतरला चक्रपाणि। ज्याच्या बोधापासूनी। ऋषि पावले निर्वाणा
।।६७।।

त्या पुराणाचें सार। मी सांगेन सत्वर । ब्रह्मदेवासी जोडून कर। कलियुग पुसू लागले
।।६८।।

तें तो विधाता। कलीस जाहला सांगता। वटपत्रीं भगवान् असतां । इच्छा त्यासी उदेली
।।६९।।

त्यानें नाभीपासून । कमल केलें निर्माण। ज्या कमलीं चतुरानन। कमलोद्भव जन्मला
।।७०।।

अभिमान कमलोद्धवा झाला। मी सर्वशक्ति आहे भला। परि जों पाहिलें विष्णूला। तो घेतली माघार
।।७१।।

आणि केला निश्चय। मजहुन हा श्रेष्ठ होय। म्हणून धरिलें आदरें पाय। ब्रह्मदेवें विष्णूचें
।।७२।।

विष्णु म्हणती विधात्यासी। त्वां रचावें सृष्टीसी। आधीं करूनी तपासी । म्हणजे सर्व साधेल
।।७३।।

ऐसें म्हणून वेद दिधले। ब्रह्मदेवाकारणें भले । ब्रह्मवैवर्तकाचें कथियेलें । सार व्यास होऊनी
।।७४।।

वैवर्तक पुराणांत। कथा आहे विख्यात। मरीचादि ऋषि समस्त । ब्रह्मदेवें निर्मिलें
।।७५।।

तैसे स्वेदज अंडज। जारण आणि उद्भिज्ज। निर्मिता झाला ब्रह्मा सहज । निसर्गाच्या सहाय्यानें
।।७६।।

कृत त्रेता द्वापार। तैसें कलियुग साचार। निर्माण करून अखेर। आज्ञा भूमीस जाया केली
।।७७।।

प्रथमतः कृतयुगासी। सांगितलें जावयासी। तूं धरून सत्पथासी। मृत्यूलोकीं वर्तावें
।।७८।।

त्रेतायुगीं यज्ञयाग। होऊन गेले सर्वत्र चांग। त्रेतायुगाचा हाच योग। मग द्वापारा बोलाविलें
।।७९।।

द्वापाराचें लक्षण। पापपुण्य समसमान। श्रोते याच्या मागून। चौथें दुर्धर कलियुग
।।८०।।

ब्रह्मदेवापुढारी। जेव्हां कलियुग आले सत्वरी। तैं ते ओरडे नानापरी। शिश्न जिव्हा धरोनिया
।।८१।।

असत्याचा बाजार। कलियुगीं सर्वत्र साचार। त्या कलियुगाचा प्रकार। कोठवरी वर्णावा
।।८२।।

बकासारखे संन्यासी। दुष्ट चढती वैभवासी। भाव आला दांभिकांसी। संतांसी कोणी पुसेना
।।८३।।

चोर जार शिरजोर। यांचा होई जयजयकार । स्वार्थदृष्टीनें अंतर। व्यापिलें ऐसे राजे ते
।।८४।।

ऐसें जरी कलियुग। परि सोय येथें आहे चांग। क्षणामाजीं श्रीरंग। आपुलासा होतसे
।।८५।।

कृत त्रेता द्वापारातें। मानवी आयुष्य बहुत होतें। आले कलीचे वाट्यातें। शंभर वर्षे विबुध हो
।।८६।।

हल्लीं तितुकीहि मुदत । न पडे पार निश्चित। बहुतेक अल्पवयांत । यमसदना पहाती
।।८७।।

याचें हेंच कारण। कीं हे सदुरूस न जाती शरण। जे जे कोणी श्रीगुरुचरण। वंदिती त्या हा बाधक नसे
।।८८।।

कली म्हणे ब्राह्मयासी। मी न छळावें गुरुभक्तासी। ऐसे सदुरू कोण मशी। असती ते निरोपा
।।८९।।

ब्रह्मा सांगे त्यावर। ब्रह्मा-विष्णु-महेश्वर। गणपती आणि वैश्वानर। त्यांसी सद्गुरू म्हणावें
।।९०।।

सेवा मातापितयाची। गुरुसेवेसमान साची । पुत्रानें जनकजननीची। सेवा करणें हाच धर्म
।।९१।।

सद्गुरू जे का असती। ते शास्त्रमार्गे वर्तती। म्हणून तें पावती। सद्गुरूच्या पदातें
।।९२।।

अवघ्या सत्यमार्गाकारण। सदुरू हा वाटाड्या पूर्ण। तयाची कांस धरून। साधकानें चालणें
।।९३।।

म्हणजे ऐहिक पारमार्थिक। तयाकारणें लाभेल सुख। अखेर जें निर्वाण एक। त्याही स्थला पावेल तो
।।९४।।

बा रे अवांतर देवाचा। जरी कोप झाला साचा। तरी कृपाप्रसाद सद्गुरूचा। तयालागीं निवारीत
।।९५।।

परि सदुरूच्या कोपाकारण। कोणीहि न करी हरण। ऐसें सदुरूचें महिमान। ब्रह्मा बोले निजमुखें
।।९६।।

ये विषयीचीं एक कथा। सांगतो मी तुज आतां। पूर्वी वेदधर्म नामें होता। आंगिरसाचिये आश्रमांत
।।९७।।

हा आंगिरस आश्रम। श्री गोदातटीं अति उत्तम। जो सज्जनाचें विश्रामधाम। होऊनिया राहिलासे
।।९८।।

त्या आश्रमाचे शेजारी। या वेदधर्माची वस्ती खरी। जो वेदधर्म निर्धारी। पैलपुत्र द्विज असें
।।९९।।

या वेदधर्माचा। संदीपक नामें शिष्य साचा। होता भाविक सद्वर्तनाचा । सर्व शिष्यांमाझारी
।।१००।।

असो अवघे शिष्य जमवून। वेदधर्म सांगे जाण। माझ्या पापाचें क्षालन। करणें आहे मजप्रती
।।१०१।।

जे जे करें दोष घडती। ते ते जाऊनी महातीर्थी। क्षालन करावें निश्चिती। मार्ग पुढला साधावया
।।१०२।।

यासाठीं मज घेऊन। चला वाराणशी कारण। एकवीस वर्षे जान्हवी स्नान। करणे आहे मजप्रती
।।१०३।।

कुष्ठ भरले माझ्या शरीरीं । यातनाहि होतात भारी । म्हणून मज बरोबरी । कोण येतो तुमच्यांतून
।।१०४।।

ऐसे वेदधर्माचें। वचन संदीपकें ऐकले साचें। आणि धरिलें सद्गुरूचें। चरण परमभक्तीनें
।।१०५।।

आणि ऐसें बोलला। चला महाराज काशीला। मी आपुल्या पातकाला। भोगण्यासी तयार असे
।।१०६।।

ऐसी ऐकून शिष्यवाणी। वेदधर्म बोलला मधुर वचनीं । ज्याचे पाप त्यांनीं। भोगलेच पाहिजे
।।१०७।।

तूं खराच गुरुभक्त। चाल माझ्या समवेत । मात्र मज सांभाळण्याप्रत। कष्ट होतील बहु तुला
।।१०८।।

परी त्याची खंती न करी । फल त्याचें तव करीं । येईल जाण निर्धारी । ऐसे म्हणून निघाले
।।१०९।।

वाराणशी क्षेत्रांत। कंबलेश्वर स्थान सत्य। हे गुरुशिष्य राहिले तेंथ। भागीरथी तटातें
।।११०।।

अवघ्या क्षेत्रसमूहांत। वाराणशी विख्यात । देवाधिदेव विश्वनाथ। जे ठायीं रमला असे
।।१११।।

वेदधर्मासी कुष्ठ भरले। अपस्मारादि रोग उठले। शरीर किड्यांनी व्यापिलें। पू रक्ताचे पाट वाहती
।।११२।।

दुर्गंधी ती थोर सुटली। परी संदीपकाची बुद्धि न चळली। विश्वनाथ मानून केली। सेवा त्यानें वेदधर्माची
।।११३।।

संदीपक भिक्षा मागत। गुरुसी आणून घालित। गुरु दुरूत्तरें ताडीत। वरचेवरी तयाला
।।११४।।

आज भिक्षा कमी आणली। यांत पक्वान्न नाहीं मुळीं। माशा वारण्या कां रे केली। अवहेलना सांग मज
।।११५।।

परि न देई प्रत्युत्तर। वरचेवर ठेवी शिर। ऐसा तयाचा भाव स्थिर । म्हणून विश्वनाथ प्रगटले
।।११६।।

विश्वनाथ बोले संदीपका। गुरुभक्त तवसारखा। मी देखिला नाहीं निका। या त्रिभुवनांत
।।११७।।

मर्जी असल्या तव गुरुची। मी व्याधी हरीन साची । म्हणजे तुझ्या मागची। पीडा ही टळेल
।।११८।।

संदीपक बोले त्यावर। आपण देतसा अमोघ वर। परि तो घेण्या साचार। आज्ञा न माझ्या सद्गुरूची
।।११९।।

ऐसें शिवा बोलला। तो वृत्तांत गुरुसी निवेदिला। तैं वेदधर्म म्हणे तयाला। मदर्थ शिवा शिणवू नको
।।१२०।।

भोग माझ्या शरीराचा। भोगणें आहे मज साचा। मला वाटते सेवेचा। आला तुला कंटाळा
।।१२१।।

म्हणून गेला शिवाकडे। आणि घातले त्या सांकडे। माझ्या पापाचे फळ रोकडे। मीच भोगणें धर्म हा
।।१२२।।

जें कांहीं गुरु बोलले। तें शिवास निवेदिलें । तेणें शिव चकित झाले । त्यानें कथिलें विष्णूसी
।।१२३।।

वाराणसी क्षेत्रांत। गुरुशिष्य एक आहेत। शिष्य परब्रह्म मानीत। आपल्या गुरुकारणें
।।१२४।।

मी वर द्याया सिद्ध झालो। परी यश न लाधलो। ऐसें कौतुक पाहून आलो। तुम्हांलागीं सांगावया
।।१२५।।

असो विष्णू एके दिवशी। आले संदीपकापाशीं। तुझ्या पाहून गुरुभक्तीसीं। वर द्याया आलो तुज
।।१२६।।

संदीपक बोले त्यावर। मी न तुमचा भक्त साचार। माझा देव हा गुरुवर। यालाच मी जाणतो
।।१२७।।

गुरुवाचूंनी एकही। मजलागी दैवत नाही। तें ऐकून शेषशायी। ऐसे बोलते जहाले
।।१२८।।

अरे सेवा कोणतीही। केलीस तरी माझी पाही। म्हणून मागे लवलाही। वर बापा मजकारणें
।।१२९।।

ऐसे ऐकतां ईशवचन। संदीपक म्हणे कर जोडून। अलोट गुरुभक्ती मजकारण। द्यावी शीघ्र नारायणा
।।१३०।।

तथास्तु विष्णु बोले। तें सर्व वेदधर्मां श्रुत जहाले। त्यानें आपलें ठायीं केले। आश्चर्य संदीपकाचें
।।१३१।।

खराच संदीपक गुरुभक्त। सांभाळिले मजप्रत। न मानिता यत्किंचित । दुर्गंधीचा कंटाळा
।।१३२।।

ऐसें बोलुनी शय्येवरी। वेदधर्म उठला सत्वरीं। आणि संदीपकाचे शिरावरी। ठेवितां झाला वरदहस्त
।।१३३।।

तुझें सत्व पहावया। व्याधी धरली शरीरा ठायां। बाकी व्याधीयुक्त माझी काया। नाहीं खचित शिष्योत्तमा
।।१३४।।

हें पहा कुष्ठ गेलें। शरीर कांचनसम झालें । तें संदीपकें पाहिलें। आणि घातला नमस्कार
।।१३५।।

वेदधर्मानें शिष्याप्रति । वर दिधला ऐशा रितीं। जे तुझी गुरुभक्ति। गातील ते तरतील
।।१३६।।

उभयतां गेले उद्धरून। ऐसें गुरुभक्तीचें महिमान। भावें ऐका श्रोतेजन। गुरुभक्ती ना पोरचेष्टा
।।१३७।।

सिद्ध म्हणे नामधारकासी। जे जे आराधिती सद्गुरूसी । त्यांच्या पापराशी। भस्म होती तत्काळ
।।१३८।।

गुरुभक्ती करून। संतती संपत्ति लाधे जाण। चारी पुरूषार्थ साधून। अखेर जाय मुक्तीते
।।१३९।।

या प्रीत्यर्थ तुज कथा। सांगतो मी एक आतां। अंबरीष नामे होता। राजा एक पूर्वकाळीं
।।१४०।।

तो एकादशी निरशन। करून विष्णूचें आराधन। अहोरात्र करी जागरण। नामस्मरणें रत सदा
।।१४१।।

सूर्योदयीं द्वादशीला। सोडणें ऐशा नियमाला। राजा अंगिकारता झाला। बहुत काळपर्यंत
।।१४२।।

कोणतेहि करा कृत्य। तें परीक्षेवीण ना फळत। म्हणोन त्याच्या सदनाप्रत । दुर्वास ऋषि पातले
।।१४३।।

नामधारका हा दुर्वासमुनी। प्रत्यक्ष होता पिनाकपाणी। परिभ्रमण करोनी अवनीं। खऱ्या खोट्या पडताळीत
।।१४४।।

दुर्वासासी पाहतां। आनंद झाला नृपनाथा। म्हणे स्वामी स्नानास आतां। जावें आपण सत्वरगतीं
।।१४५।।

कां कीं नेम साधनद्वादशीचा। आहे माझा साचा। अवघा एक घटकेचा। अवकाश आहे स्वामिया
।।१४६।।

दुर्वास ऋषि स्नानास गेले। अंबरीषासी सांकडे पडले। वेळ झाली म्हणुन घेतलें। तीर्थ द्वादश्ते स्वामिया
।।१४७।।

कां कीं ब्राह्मणांस टाकून। कैसें करावें भोजन। न करतां नियमालागून। व्यत्यय येऊं पहात
।।१४८।।

ऐसा योग्य विचार करूनि । तीर्थ घेतलें अंबरीषानीं। तें दुर्वासे जाणुनी। शाप दिधला तयातें
।।१४९।।

त्या शापाच्या निरसना। अंबरीष बाही नारायणा। हे पूर्णब्रह्मा जगज्जीवना। केवढें संकट ओढवलें
।।१५०।।

तूंच माझी ध्येय देवता। तूच सद्गुरू तत्त्वतां । या दुर्धर प्रसंगी होई त्राता। तुजविण बाहू कवणातें
।।१५१।।

तों नामधारका त्या ठायीं। प्रगट झाले शेषशायी। या शापाची तुला नाहीं। बाधा तान्हुल्या होणार
।।१५२।।

तुझ्या प्रीत्यर्थ मीच घेतो। दुर्वासाला विनवितो। मत्पदीं जो एकनिष्ठ राहतो। त्याचा कैवारी मीच असे
।।१५३।।

विष्णू म्हणती दुर्वासासी। महाराज शापावें आपण मशीं। परी राजा अंबरीषासी। बाधा त्याची होऊं नये
।।१५४।।

हा शाप नोहे अनुग्रह थोर। मी मानिला साचार। नाना ठिकाणी अवतार। घेऊन साधेन सृष्टिकार्या
।।१५५।।

ते व्हावयासाठीं। आपण इच्छा धरिली पोटीं। वरी वरी शाप ओठी। दिधला अंबरीषातें
।।१५६।।

तें ऐकतां दुर्वास संतोषले । तथास्तु ऐसें म्हणाले। येणे रीती रक्षण झाले। अंबरीषाचे शिष्योत्तमा
।।१५७।।

पहा सद्गुरूवांचून। कोणी न संकटाचें हरण। केलें, हे ध्यानी धरून। वर्तन आपुलें ठेवावें
।।१५८।।

आतां महीच्या उद्धारा। सदुरू धरून अवतारा। कैसें आले ऐक चतुरा। पुढती तुजशी सांगेन
।।१५९।।

इति श्रीनामधारकसंवाद। जो जगत्रयीं प्रसिद्ध। त्याचाच हा मकरंद । नाहीं माझ्या कल्पनेचा
।।१६०।।

श्रीगुरुचरित्रसारामृत। सदा ऐकोत प्रेमळ भक्त। आरंभ नृसिंहवाडींत । झाला म्हणे दासगणू
।।१६१।।

।। इति प्रथमोध्यायः ।। शुभं भवतु ।।

।। श्रीदत्तात्रेयार्पणमस्तु ।। श्रीहरिहरार्पणमस्तु ।।

卐 卐 卐 卐 卐

इति अध्याय समाप्तः