।। अध्याय दहावा ।।

।। श्रीगणेशाय नमः ।।

हे मनमोहना पुरुषोत्तमा । मला सद्भक्तीच्या सुखधामा। पांडुरंगा राघवा रामा। सर्व काल नांदवावें
।।१।।

एवढें तूं केल्यावर । मग कशाचा राहिला दर। तूं सर्वशक्ती सर्वेश्वर। भीमातटविहारिया
।।२।।

तूं माय मीं लेकरूं। नको मजसी दूरी धरूं । नको मजविषयीं कठोर करूं। चित्त आपुलें नारायणा
।।३।।

असो, नामधारका सिद्ध म्हणे। ऐक आतां सावधपणें। श्रीगुरुचे बोलणे। काय झालें ते बापा
।।४।।

नामधारका गाणगापुरीं। सहस्रभोजनें वरच्यावरी। होऊ लागली नरनारी। जाऊं लागले जेवावया
।।५।।

नानाविध पक्वान्नें। मिळू लागली वस्त्राभरणें। म्हणून भोजनाकारणें। हपापती द्विज सदा
।।६।।

तों तया गाणगापुरांत। एक द्विज होता शुर्चिभूत। तो न जेवावया कोठे जात। कर्ममार्गी रत सदा
।।७।।

त्या द्विजाची बा नारी। मनीं जळफळे वरच्यावरी। पतीच्या हट्टा काय तरी। करूं मी हे देवदेवा
।।८।।

घरीं दारिद्रय अत्यंत। हा न जेवावया कोठें जात। सुंकले ही ना मजप्रत। नाकीं घालाया कारणें
।।९।।

लुगड्यांस ठिगळें असंख्यात । तेंहि न दुसरें घरांत। एकचि त्या धुवोन नित्य। लागतें मशीं नेसावें
।।१०।।

अन्न नाहीं वस्त्र नाहीं। मान मरातब तोहि नाहीं। पती न माझें ऐके कांही। बहुत जरी सांगितलें
।।११।।

गांवीच्या त्या इतर स्त्रिया। नित्य जाती जेवावया। वस्त्राभरणें नेसोनियां। करिती संसार सुखाचा
।।१२।।

एके दिनी संगमावरी। श्रीगुरुकडे आली नारी। बोलली त्यातें मधुरोत्तरीं। महाराज माझें ऐका हों
।।१३।।

तुमच्या योगें गाणगापुर। झाले आहे वैकुंठनगर। सहस्रभोजनें वरच्यावर । होऊं लागली पक्वान्नाची
।।१४।।

त्याठायीं माझा पती। जेवण्या न जाई निश्चिती। आणि त्यावीण मजप्रती । तेथें प्रवेश मिळेना
।।१५।।

ऐसें ऐकतां श्रीगुरु हसले। तिच्या पतीस पाचारिलें। आपुल्या जवळ बैसविले। आणि बोलले येणें रिती
।।१६।।

हे द्विजवर्या सुजाणा। मान देऊनी माझ्या वचना। जाई उद्यां भोजना। सहस्रभोजनी कांतेसह
।।१७।।

तों सहस्रभोजनीं देखिले। श्वानसूकर जेवू लागले। आपुल्या पात्रांमाजी भले । म्हणून किळस वाटली
।।१८।।

न जेवतां तशीच उठली। निजपतीला सांगितली। गोष्ट जी कां घडून आली । ती सर्व विस्तारें
।।१९।।

दोघे आले संगमावर। स्वामीस केला नमस्कार। आणि घडलेला प्रकार। सर्व कांही श्रुत केला
।।२०।।

मग श्रीगुरु म्हणाले द्विजस्त्रियेस । पुरली ना तुझी हौस । परान्नाचा केवढा दोष। उगीच नादीं पडूं नका
।।२१।।

ब्राह्मण स्वामीस म्हणाला। मीं होता नेम केला। परान्न न घेण्याचा भला। तो मोडला या काय करूं
।।२२।।

श्रीगुरुस्वामी दयाघन। त्याचें करिती समाधान। हा दोष तुज लागून। लागे न कदापि वत्सा रे
।।२३।।

आतां कर्माचा विचार । कथितों मी सविस्तर । तो ऐकें एकवार। म्हणजे सर्व कळेल तुला
।।२४।।

जो जन्मोनी द्विजयोनीं। निंदी वेदा लागूनी। अन्न बापा त्याचे सदनीं। कदापिही घेऊं नये
।।२५।।

अनुभवाविण शुद्ध ज्ञान। झालें जया लागून। वा जो असे आचारशून्य। त्याचें अन्न न घ्यावें कदा
।।२६।।

चार्वाक दुष्टदुर्मती। सत्पथाचा द्वेष करिती । किंवा जे पूर्वजां निंदिती। त्याचें अन्न घेऊं नये
।।२७।।

मातापित्याचा द्वेष करी। वा जो दंभाचार करी। रांड ठेवून त्यागिली नारी। त्याचें अन्न घेऊं नये
।।२८।।

चित्रकार शस्त्रधारी। वा वीणा तंबुरा ज्याच्या घरी। वा जो आख्याड्यांत कुस्ती करी। त्याचें अन्न सेवू नयें
।।२९।।

येथें वीणा म्हणजे तंबुरा। भजनातील नाहीं खरा। जो भजनांत पंढरपुरा। भजनी लोक वापरती
।। ३०।।

तो किनरीचा द्योतक। भोपळ्यामुळे त्यास देख। वीणा हें नांव निःशंक। परंपरेनें प्राप्त झालें
।।३१।।

वीणा त्यालाच म्हणती । जो गायनाची करितो साथी। वारांगना त्यांनाच म्हणती। कीं ज्या नाचती सभेत
।।३२।।

उगीच नागपंचमीचा। नाच न येई त्यांत साचा। म्हणून वीणा शब्दाचा अर्थ भलता करूं नये
।।३३।।

गायक वादक नर्तक । वा जे करिती नाटक। त्यांच्या वीण्याचा निषेध देख। केला येथे सद्गुरूनीं
।।३४।।

तैसी मल्लयुद्धाची। निंदा येथें केली साची । परि न केली शक्तीची। हें येथें ध्यानीं धरा
।।३५।।

कुस्ती माजी ऐसें होतें। द्वेषी अंतःकरण बनतें। मोडण्या हातापायांतें। पाहती परस्परांच्या
।।३६।।

म्हणून कुस्ती त्याज्य धरिली । शक्तीची न निंदा केली। ती पाहिजे कमाविली। प्रत्येकानें शरिरांत
।।३७।।

वा जो मातापितरांतून। वेगळा राहे पुत्र जाण। वा जो लावी भांडण । बळेंच, त्याचें अन्न त्यागा
।।३८।।

जो खेळे सदा द्यूत । सच्छास्त्रांते निंदीत । स्वैराचारी मद्य पीत । त्याचें अन्न सेवू नये
।।३९।।

सदा करी राजसेवा। वैर आणी भावा भावा। वा जो कपटें साधी दावा । त्याचे अन्न सेवू नये
।।४०।।

रसविक्रय हयविक्रय। गोविक्रय कन्याविक्रय। जो का ब्राह्मण करी पाह्य। त्याचें अन्न सेवू नये
।।४१।।

निजगुरुचा करी द्वेष । श्रुती शिकवी शूद्रास। द्रव्य घेऊन जपास। करी, त्याचें अन्न घेऊं नये
।।४२।।

जो न करी संध्या स्नान। वा पितरांचें तर्पण। अतिथीसी न देई अन्न। त्याचें अन्न सेवू नये
।।४३।।

सुतकी निपुत्रिक रोगिष्ट । वा अंगी फुटले कुष्ट । वा जो अतिगर्विष्ठ । त्याचें अन्न सेवू नये
।।४४।।

मित्रद्रोही राजद्रोही। धर्मद्रोही आचारद्रोही। सन्नीती न ज्याचे ठायी। त्याचें अन्न सेवू नये
।।४५।।

पूर्वी नैमिष्यारण्यांत। ऋषी मिळाले समस्त। त्यामाजी प्रमुख सत्य। पराशर नाम ज्याचें
।।४६।।

सकळ मिळुनियां ऋषी। पुसती पराशरासी। ब्राह्मणाच्या आचारासी । विस्तारेंसी सांगणें
।।४७।।

त्यानें जें कथन केलें । तेंच मी सांगतो वहिले। इकडे अवधान आपुलें। असो दे कल्याण व्हावया
।।४८।।

पंचपंच उषःकालीं। पाहिजे ब्राह्मणें त्यागिली। निद्रा ती आपुली । प्रतिदिनीं बापा रे
।।४९।।

पूर्वाभिमुख बैसावे। विधीनें हरिहरास स्मरावें। पुण्यश्लोक राजे आठवावे। नलादिक
।।५०।।

पतिव्रता नारद तुंबर। सप्तऋषी सनत्कुमार। गोदावर्यादि तीर्थे थोर। प्रातःकाळी स्मरावीं
।।५१।।

शय्येवरून उठावें। आचमन तें करावे। शौचविधीस सारावें। वाळल्या पत्री वनामध्यें
।।५२।।

शीतोदकें करणें स्नान। जलप्रवाहीं जाऊन । नसल्या तनूस समाधान। उष्णोदकें करा घरी
।।५३।।

स्नानविधी हाच बरवा। जलीं तीर्थसमूह आठवा । जलाविषयीं भाव व्हावा । जल तीर्थाचे म्हणूनी
।।५४।।

ब्रह्मचारी जो कां नर। त्यानें करावे एकवार। सकाळीं माध्यान्ही साचार। स्नान करणें गृहस्थानें
।।५५।।

वानप्रस्थ संन्यासी जन । यांनी करावे त्रिकाल स्नान। तिन्ही वेळा संध्यावंदन। करणें ऋतुकालीं ब्राह्मणांनी
।।५६।।

ढेकर शिंक वात सरता। आचमन करावें सर्वथा। हें न घडे तरी, हातां। लावणे सव्य कानासी
।।५७।।

ब्राह्मणाच्या उजवे कानी। सप्त देवता असती जाणी। स्नाना न मिळाल्या पाणीं। वायुस्नान करावें
।।५८।।

यज्ञोपवीत कानावरी। ठेवून शौचविधी करी। हें न करी त्या यमपुरी। अन्ती ठेविली निश्चयें
।।५९।।

संध्यास्नान यजनयाजन। वा इष्टदेवतेचें पूजन। भोजनसमयीं आल्या जाण। अतिथी परत लावू नये
।।६०।।

स्नान झाल्यावरी देखा। लावणें भाली भस्मादिका। आहे विभूतीसारखा। द्वारावतीचा धर्म तोहि
।।६१।।

प्रत्यही करावें दंतधावन । तिथी पर्वणी पाहून। लिंबाचे ते काष्ठ जाण। दंतधावना योग्य असे
।।६२।।

काष्ठं दंत घासावे। तें नैऋत्येस टाकावें। बारा चूळ भरावे। शुद्धोदकाने परियेसा
।।६३।।

अशक्त रोगी असल्या जाण। त्यानें करावे भस्मस्नान। अथवा हरिते आठवून। जलें सिंचावी निज तनू
।।६४।।

करणें असल्या हजामत। त्याचें विधान ऐसें सत्य। रविवारीं करिता ज्वराप्रत । झालें समजा अवतणें
।।६५।।

कान्तिहानीं सोमवारी। केल्या हजामत मंगळवारी। मृत्यू येईल निर्धारी। गुरुवारासी धनक्षय
।।६६।।

शुक्रवारीं पुत्रघात। शनिवारी ओंगळ अत्यंत । बुधवारी केल्या हजामत । सर्वसुखे प्राप्त होती
।।६७।।

ऐसा श्मश्रू करण्याचा। विधी जरी आहे साचा। परि प्रसंग आल्या क्षौराचा। तेथें याचे महत्व नसे
।।६८।।

स्नान केल्यावरी जाण। द्वादश टिळे करा धारण। केशवाचें करून स्मरण। भूषवावें ललाटस्थाना
।।६९।।

नारायण नामें नाभीसी। माधवनामें हृदयासी। गोविंदनामें कंठासी। विष्णु नामें कटिप्रदेशा
।।७०।।

दक्षिण बाहूस मधुसूदन । वामबाजूस वामन। दामोदर उच्चारून। शिरस्थानीं गंध लावा
।।७१।।

ऐसे टिळे लावितां। पातकें भस्म होती सर्वथा। ब्रह्मयज्ञ करण्या करितां । दर्भ दहा प्रकारचे
।।७२।।

सर्व दर्भा माझारी। कुश प्रधान सर्वतोपरी। दर्भस्पर्श होती दुरी। पंच महापातकें
।।७३।।

प्रातःस्नान करावें। परि सूर्योदयीं अर्घ्य द्यावें। जप करितां बांधावे। शिखा न ठेवा मोकळी
।।७४।।

ब्राह्मणासी गायत्री। इतरांसी उपास्य मूर्ती । तिचे ध्यान निश्चिती। करावें फळ सारखेचि
।।७५।।

संध्या वा करण्या ध्यान। एकान्त पाहिजे स्थान। महानद्यातटीं विशेष पुण्य। वा शिवविष्णूच्या राउळांत
।।७६।।

जप-ध्यानासी आसन। कंबलाचें योग्य जाण। काष्ठावरी बैसोन। जप केल्या दुःख भोगी
।।७७।।

वस्त्रासनीं बैसतां । प्राप्त होय दरिद्रता। दगडावरी तत्त्वता। व्याधी होय निश्चयें
।।७८।।

ज्ञानप्रकाश कृष्णाजिनी। व्याघ्रासनी मोक्ष जाणी। जप केल्या भस्मासनी। व्याधी जात रोकडा
।।७९।।

हा आसनाचा प्रकार। टाकून बाह्य व्यापार। चित्त करावें यत्नें स्थिर। उपास्यावरी सर्वदा
।।८०।।

प्रभातीं उभे राहून। जप करावा माला धरून। जपकर्त्याचा कर जाण। बेंबी समोर पाहिजे
।।८१।।

जय करावा माध्यान्ही। आसनावरी बैसोनी। कर असावा हृदयस्थानी। मालेसह जपाचा
।।८२।।

मुखासी हात धरूनी। जप करावा अस्तमानीं। या जपाचे विधानीं। चूक केव्हाहि करूं नये
।।८३।।

जप कराया कारण। माला असावी शुद्ध जाण। स्फटिक मोती सुवर्ण। रुद्राक्ष तुलसी कमलाक्षाचिया
।।८४।।

जप असावा नियमित। तेथें नसावे कमी जास्त। ध्येयमूर्ती ध्यानांत। आणूनि जप करावा
।।८५।।

इन्द्रियनिग्रह करावा। भोवती गलबला नसावा। जपकर्त्यांनें न ऐकावा। रजस्वलेचा शब्द कानीं
।।८६।।

सुतकी वा आचारहीन। याचें न व्हावें दर्शन । तेंच झाल्या आचमन । कर्ण स्पर्श करावा
।।८७।।

जप पूर्ण झाल्यावरी। माला ठेवून शिरावरी। जोडूनिया दोन्ही करीं। स्तवावी उपास्य देवता
।।८८।।

सविधी ऐसा जप करितां। दोष दुःख पळती तत्त्वता। जपाधिकार निगुता। आहे सर्व वर्णासी
।।८९।।

अग्निहोत्र द्विजासी। अवश्य पाहिजे निश्चयेसी । अवांतर त्रिवर्गासी। जपे त्यासी पुण्य लाधे
।।९०।।

नंतर करावें तर्पण। पितरासीं आठवून। म्हणजे झाला पितृयज्ञ । तीळ असावे तर्पणासी
।।९१।।

तीळतर्पण शुभदिनी। करूं नये जाण कोणी। रविवार शुक्रवार दिनीं । अष्टमी नवमी एकादशीला
।।९२।।

नंतर करावें तर्पण। यमाची नांवें घेऊन। तीं त्रयोदश असती जाण । ती ऐक अवधारा
।।९३।।

वैवस्वत सर्वभूतक्षयकर। काळनीळ परमेष्ठी औदुंबर। चित्रगुप्त वृकोदर । इत्यादिक बापा रे
।।९४।।

यमतर्पण जो का करी। अपमृत्यू होय दुरी। रोग पीडा शरीरीं। यम न होऊं देत त्याच्या
।।९५।।

माघमासीं शुक्लपक्षांत। येतां अष्टमी तिथी सत्य। तर्पण भीष्माप्रीत्यर्थ। करितां पाप जाय वर्षाचें
।।९६।।

निरुपण ऐशा रिती। स्वामी नृसिंहसरस्वती। सांगतां त्या द्विजाप्रती। कर्म मार्ग अवघा
।।९७।।

गुरुचरित्र ग्रंथांत। अध्याय छत्तिसावा थोर बहुत। जेथें कर्ममार्गाप्रत। सविधी निरोपिलें
।।९८।।

आतां अवघ्या कारण। हा मार्ग सुखद पूर्ण। घडोनिया कर्माचरण। प्राप्ती होईल हरीची
।।९९।।

प्रातःकाळीं प्रत्यहीं। उठोनिया अरुणोदयी। शय्येवरी बसून पाही। जप करावा उपास्याचा
।।१००।।

ऋषी राजे पुण्यश्लोक । तैसी पतिव्रता देख। अंजनीचा बालक । चिरंजीवा आठवावे
।।१०१।।

नंतर शौचविधी करावे। अरण्यासी जाऊन बरवे। दंतधावन साधावे। कडुलिंबाच्या काडीनें
।।१०२।।

गुळणी करून द्वादश। प्रक्षाळावें मुखास। पाहून स्वच्छ जागेस। पूर्वाभिमुख बैसावें
।।१०३।।

जागा नसावी वर खाली। आसन घालून कांबळीं। कृष्णाजिन त्याच्या खाली। घातिले पाहिजे अवधारा
।।१०४।।

ऐशा आसनीं बसावें । पाय दोन्ही पसरावें । उदरचालन करावें । त्याची रीत ऐसी असे
।।१०५।।

पोट न्यावें खपाटी। श्वास सोडूं नये ओठी। पुन्हा ते उठाउठी। पोकळ सोडूनि साफ करा
।।१०६।।

वीस वेळ उदरचालन। मग करावें दोलासन। दोन्हीं कर महीस ठेवून। शरीर तें उचलावें
।।१०७।।

मग करावी भ्रामरी। तोंड मिटून साजिरी। वायू आवाज कंठांतरी। व्हावा हा धर्म तिचा
।।१०८।।

धौती त्राटक कपालभाती। जल-धौती वास-धौती। नौली आणि नौती। ऐसे प्रकार धौतीचे
।।१०९।।

प्रतिपदा अष्टमी पौर्णिमा। तैशा वद्यपक्षाच्या उत्तमा। धौतीच्या चालविण्या नेमा। उक्त आमावस्या वर्ज्य असे
।।११०।।

एकेक तिथीस एकेक धौती। करणें आवश्य सविधी ती। महिन्यामाजी पाच होती। ज्या देती आरोग्या
।।१११।।

धौती म्हणजे धुणें। आपल्या शरिरा कारणें। बाह्यांग ते जलानें। आंतील धौतीनें शुद्ध होय
।।११२।।

प्रकार कपालभातीचा। येणें रिती आहे साचा। जैसा भाता लोहाराचा। तैसा घ्यावा श्वास प्रथम
।।११३।।

आंत श्वास घेतल्यानंतर । करांगुष्ठ नाकपुडीवर। ठेवूनी एक्या भराभर। श्वास सोडावा दुसरीनें
।।११४।।

ऐशा श्वासक्रियेप्रती । कपालभाती बोलती। ही क्रिया कफाप्रती । हटविते निश्चयें
।।११५।।

नाड्या मळानें व्याप्त होती। त्या मोकळ्या करी कपालभाती। हलकेपणा शरीराप्रती। देऊन हरी वातरोगा
।।११६।।

त्राटक नांव त्यांचेच बरवें। डोळे ताठ ठेवावे। एकाच ठाई चित्त लावावे। दृष्टीचें ते अवधान
।।११७।।

प्रथमतः येईल पाणी। परि न मिटवावी पापणी। येणें दृष्टिचांचल्य मोडूनी। नेत्ररोग न होतात
।।११८।।

आतां जलधौतीचे लक्षण । आकंठ करावे उदकपान। तें ओकाऱ्या देऊन । सर्व बाहेर पाडावें
।।११९।।

जलधौती ऐशी करी । पोटदुखी होते दुरी । अजीर्णांश शरीरी । थोडा ही न उरवीत
।।१२०।।

वासधौती नांव त्याचें। वस्त्र पातळ मलमलीचें । तीन बोट रूंदीचे । लांबी चाळीस हात जया
।।१२१।।

तें अधणाचे पाण्यांत। उकळून पिळावे त्वरित । पद्मासनीं होऊनी स्थित। एक टोंक मुखी घाला
।।१२२।।

तें टोंक अन्नापरी। लागावें गिळाया सत्वरी। आल्या मध्येंच ओकारी। तयालागीं मुळीं न भ्यावे
।।१२३।।

हळूहळू संवय करून। तीस पस्तीस हात जाण। गिळावे फडक्या लागून। उदरशुद्धी व्हावया
।।१२४।।

तें नरडी बाहेर । करीं धरून साचार । ओढा हळूहळू , हा प्रकार । आहे वासधौतीचा
।।१२५।।

आता प्रकार नौतीचा। येणें रिती होय साचार। चार बोटे रुंदीचा। मलमलीचा तुकडा घ्यावा
।।१२६।।

लांबी असावी दीड वीत। काथा काडी घालून त्यात। गुंडाळावे अती त्वरीत। लोणी तिसीं लावावें
।।१२७।।

आणि घालावें नाकांत। ती उतरवावी कंठात। दोन्ही टोका लावून हात। घुसळण करा हळूहळू
।।१२८।।

या नौतींने मेंदूची। शुद्धता ती होते साची। गंडमाळादिकांची। भिती धरणें मुळीं नको
।।१२९।।

आतां नौलीचें विधान बरवें। उभं राहून ओणवे। पोटाकडे लक्ष द्यावें। आंत ओढून उदराला
।।१३०।।

आणि करावें नलचालन। याचें नांव नौली जाण। ऐसें धौतीचें विधान। तिथी पाहून करणें कीं
।।१३१।।

आतां पद्मासनीं बसल्यावर। एक्या नाकपुडीनें घ्यावा वर। आंगठा ठेवून दुसरीवर। श्वास तो बा हळूहळू
।।१३२।।

मग नाकपुड्या दाबून दोन्ही। वायू करावा स्थिर जाणी। अंगठा येकीस दुसरीलागूनी। अनामिका आणि करांगुली
।।१३३।।

नाकपुड्या दाबल्यावर । वायू करावा शरीरीं स्थिर। वायू ओढण्या लागे वर। जो कां वेळ लागला
।।१३४।।

चौपट त्या वेळेचा। वायू करावा स्थिर साचा। पुढें वायू सोडण्याचा। प्रकार तो येणे रीती
।।१३५।।

घेतल्याच्या दुप्पट वेळ। सोडण्यासी पाहिजे काळ। हा प्राणायाम प्रकार सकळ। परी हा शिकणें गुरुजवळीं
।।१३६।।

उगीच पुस्तका पाहून। करू नये आरंभ जाण। फायद्या ऐवजी नुकसान। होईल कीं शरीराचें
।।१३७।।

पंधरा दिवसां करा बस्ती। त्याची असे ऐसे रीती। सहा अंगुले घ्यावी ती। नळी कळकाची जाण पा
।।१३८।।

तिशीं तूप लावून। गुदामाजी घालणें जाण। जलीं ओणवे होवून । पाणी आंत ओढावें
।।१३९।।

घेववेल जितकें पाणी। आधीं आंत घेऊनी। तेथें थोडें कुंथूनी। सर्व बाहेर टाकावे
।।१४०।।

महिन्यांतून एकवार। धौती करावी साचार। त्या धौतीचे प्रकार। कथिले आहेत यापूर्वी
।।१४१।।

दिवसांतून प्राणायाम। तीन वेळा करणें उत्तम। करण्या चुकूं नये नेम। तो अखंड चालवावा
।।१४२।।

सर्वांगासन शीर्षासन। नियमे एकान्ती करून। कांही काळ थांबून। नंतर स्नान करावें
।।१४३।।

स्नानाचा तो प्रकार। पूर्वीच कथिला साचार। पूजा जप जाप्य इतर। यथाशक्ती सर्व करा
।।१४४।।

सात्विक अन्न सेवावें। राजस तामस टाकावें। मद्य मांस सेवू नये । कोणत्याहि विवेकीं
।।१४५।।

वयांत आल्या ब्रह्मचारी। त्यानें न निजावें गृहस्थाघरी। पटुत्व आपुल्या शरीरी। राखून विद्यार्जन करावें
।।१४६।।

गान वादन शिकू नये। अनीतिपथें चालू नये। शास्त्राभ्यास सोडू नये। कांहीं केल्या विबुध हो
।।१४७।।

दोन प्रहरा माधुकरी। उदरभरणा मागणें खरी। ऐसे वागतां ब्रह्मचारी। प्रतिसूर्य होईल
।।१४८।।

गृहस्थाश्रमी जो का नर। त्यानें सर्वदा उपकार। करणें अनाथदुबळ्यावर। आला अतिथी न परतवणे
।।१४९।।

यथाशक्ती दान द्यावें। गर्वरहित असावें। याचकांसीं न ताडावें । दुरुत्तरें केव्हाही
।।१५०।।

स्त्रीसंग प्रतिदिवशी। करणें घातक परियेसीं। तेथें तीव्रतर नेमासी। धारण केले पाहिजे
।।१५१।।

दशमी एकादशी द्वादशी। पौर्णिमा आमावस्येसी । व्यतिपात वैधृतीसी। स्त्रीसंग करू नये
।।१५२।।

पितृतिथी कुयोग इतर । टाळावें की साचार। उगीच कुशीत घेऊन नार। न पहुडावें कदाही
।।१५३।।

ऋतुकाली भोग द्यावा । संततीसाठी बरवा। उगीच कामराजाची सेवा। करण्या संग करूं नये
।।१५४।।

या एका स्त्रीसंगापरी। गोष्ट घातक नाही दुसरी। शुक्रघात झाल्यावरी। रोग अवघे बळावती
।।१५५।।

मैथुनाचा प्रेमा ज्यासी। तो होय अल्पायुषी। म्हणून या स्त्रीसंगासी। गृहस्थानीं जपावें
।।१५६।।

जाच न करावा स्त्रियेस । प्रेमें वागवावें तीस। पाहून परक्या नारीस। विकारवश होऊं नये
।।१५७।।

कोणी पाहुणा आला घरा। त्याच्या घेणे समाचारा। आलेला न लावणें माघारा। अतिथी भोजनसमयींचा
।।१५८।।

आपुली प्राप्ती पाहून। करावा कीं खर्च जाण। उगीच कर्ज काढून । उधळेपणा करूं नये
।।१५९।।

वा दुसऱ्याचा करुनी घात। आपुला न करणें सौरांत। प्रापंचिक सुखे क्षणिक सत्य। हे कदापि विसरूं नये
।।१६०।।

पारमार्थिक पुस्तकें वाचावीं। कलांत निपुणता नांही बरवी। शास्त्रशोधनी असावी। बुद्धी संलग्न सर्वदा
।।१६१।।

संपन्नता असल्यावर । घ्यावा आप्तांचा समाचार। नीतिमान होतील पोरं । ऐसी क्रिया करावी
।।१६२।।

बाळें वडिला वंदावे। कुलधर्म ना चुकवावे। न्यायदृष्टीनें सम पाहावें। गृहस्थांनी जगाला
।।१६३।।

ऐसें वागे तो गृहस्थ। बाकीचे की पशू सत्य। त्याशीं शास्त्राचें हृद्गत। नाहीं कळणार कदापि
।।१६४।।

धेनूं असावी दारात। वृन्दावन तें अंगणांत। गोमय घालून उदकांत। सडा प्रभाती घालावा
।।१६५।।

त्रिकाल देवपूजा करावी। पूजा न करितां जो जेवी। तो यमपुरी भोगी बरवी। हे निश्चये जाणावें
।।१६६।।

पूजेचे सहा प्रकार। नारायण अग्नि दिनकर। धेनू आणखी गुरुवर। योग्य पूजा करावया
।।१६७।।

पूजा शाळिग्रामाची। स्त्रियांनी न करणे साची । धूपदीप नैवेद्याची। पूर्तता करा स्वशक्तीने
।।१६८।।

जीं कां फुले असतील शिळी। तीं वाहूं नये कदाकाळीं। वा भोके पडलेलीं। बिल्वपत्र तुलसी असाव्या
।।१६९।।

तांबूल नैवेद्य दक्षिणा। करूनिया समर्पणा। मग करावी प्रार्थना। सद्भावेसी देवास
।।१७०।।

गोग्रास द्यावा धेनूस। अतिथीपूजन विशेष। ऐसें चालतां गृहस्थास। अनायासे मोक्ष लाथे
।।१७१।।

भोजनपात्रा खालीं जाणी। मंडल करावे चतुष्कोनी। अवघ्या द्विजवर्यांनी। त्रिकोणीं मंडल क्षत्रियाला
।।१७२।।

वर्तुलाकार वैश्यासीं । अर्धचंद्र शूद्रांसी। केल्या न जरी मंडलासी। तरी अन्न होय बाधित
।।१७३।।

दक्षिणाभिमुख बैसून । सदा करावें भोजन । रजत वा सुवर्ण । याचें पात्र असावें
।।१७४।।

वा पत्रावळ पळसाची। अवघ्यामधे शुद्ध साची। गृहस्थे तामपात्राची। भोजनीं योजना करूं नये
।।१७५।।

यतीलागी सुवर्ण रजत। पात्र आहे अनुचित। त्यजणें कांस्यपात्राप्रत। यत्ती ब्रह्मचारी विधवानीं
।।१७६।।

सवें घेऊन बाळकासी। जेवू नये श्राद्धदिवसीं । भोजन करतां वाणीसी। मौन असावें सर्वदा
।।१७७।।

स्मशानीं देवालयीं शयनस्थानीं। भोजन करूं नये कोणती। वा चांडालाचे पडलें नयनीं। तें अन्न घेऊं नये
।।१७८।।

कृष्णवस्त्र नेसून । न करावें भोजन । स्वस्त्रियेचे वांचून । उच्छिष्ट कोणा देऊं नये
।।१७९।।

आतां निषिद्ध अन्नाचे प्रकार। सांगेन ऐका साचार। गणअन्न आणि लवण फार। घातलें तें निषिद्ध
।।१८०।।

मुळा कांदा लसूण गाजर। वा श्वेतभोपळा साचार। वा म्हशीचे क्षीर। निषिद्ध ऐसें समजावें
।।१८१।।

शिळें ताजें एक्या ठायीं। तेंहि अन्न निषिद्ध पाही। मात्र लाही पिठास नाहीं। शिळें ताज्याचा दोष पहा
।।१८२।।

तिळमिश्रित भोजन। रात्रीं न करावें जाण। आतां तांबुलाचे महिमान । ऐका सांगतो तुम्हातें
।।१८३।।

भोजनोत्तर विडा खावा। त्रयोदशगुणी बरवा। परि तो आवर्जून त्यागावा। यती ब्रह्मचारी विधवांनीं
।।१८४।।

ऐसा दिनचर्येचा प्रकार। अस्तमानीं संध्या झाल्यावर । रात्र होतां एक प्रहर। क्षीरभोजन करावें
।।१८५।।

भोजनोत्तर वेदाध्ययन। वा शास्त्राचे शोधन। वा प्रेमळपणें हरिभजन। एक प्रहर करावें
।।१८६।।

नंतर जावें शयनागारीं। पहुडावें खाटेवरी। ती नसावी साजिरी। पिंपळ औदुंबराची
।।१८७।।

खाट विणावया देखा। शुभ मूहूर्त पाहिजे निका। रविवारी लाभ देखा। सोमवारी सकळ सुखें
।।१८८।।

दुःख भौमवासरीं। महा पीडा बुधवारीं। सहा पुत्र नांदतील घरीं। गुरुवारी बाज विणल्यास
।।१८९।।

मंदवारी खाटेप्रत। विणल्या निःसंशय मृत्यू येत। असो द्या ध्यानांत। निजकल्याण व्हावया
।।१९०।।

स्वगृहीं करता शयन। उसें पूर्वेस करावें जाण। श्वशुरगृहीं दक्षिण। प्रवासासी पश्चिम पहा
।।१९१।।

उत्तर-दक्षिण केव्हांहि। उसें आपुले करूं नाही। शय्या असावी निर्भय ठायी। ते ऐका सांगतों
।।१९२।।

तळे वारूळ नदी-तीर। धान्याची रास साचार। सर्वदा वर्ज्य मोडकें घर। तेथें शयन करूं नये
।।१९३।।

योग्य ऋतुकालावांचुन। योग्य नव्हे स्त्रीगमन। कांतेस असल्या चतुर्थदिन। अल्पायुषीं पिंड उपजे
।।१९४।।

पांचव्या दिशीं कन्यका। सहाव्या दिवशी पुत्र देखा। सोळा दिवस राहे निका। ऋतुकाल स्त्रियांचा
।।१९५।।

या पुढे मैथुन करणें। म्हणजे चर्म चिवळणें। वागल्या गृहस्थ रीती येणें। सर्व सुखा पावेल तो
।।१९६।।

वानप्रस्थ जो कां नर। त्यानें यात्रा कराव्या निरंतर। अध्यात्मिक ग्रंथ वरचेवर। वाचून मनन करावें
।।१९७।।

एकभुक्त असावें। स्त्रियांसी न बोलावें। वितंडवादी न पडावें । वानप्रस्थ केव्हाहीं
।।१९८।।

संन्यासदीक्षा घेतल्यावरी। परिभ्रमण करावें भूमिवरी। एक्याच ग्रामाभीतरीं। तीन दिवस राहूं नये
।।१९९।।

चौथा दिवस उगवता । पुढें जावें तत्त्वतां । मात्र चातुर्मास येतां। दोन मास रहावें
।।२००।।

ऐसे नियम जे आचरती। ते सर्वदा सुखी होती। श्रीनृसिंह सरस्वती। ऐसें बोलले विप्राला
।।२०१।।

हा गुरुचरित्रग्रंथाचा। छत्तीस सदतीस अध्यायांचा। सारभाग साचा। हैं न माझ्या कल्पनेचे
।।२०२।।

योगभाग या माझारी। आसन विधी निर्धारी। तो मात्र ग्रंथांतरीं। नाही मूळचा
।।२०३।।

परी समयानुरोधेंकरून। तो येथे केला कथन। जेणें आरोग्य रक्षण। होऊनि चित्त स्थिर होई
।।२०४।।

असो श्रीगुरु त्या ब्राह्मणासी। म्हणती न जावें भिक्षेसी। आचरूनियां नियमासी। गृहींच सुखी असावें
।।२०५।।

हें नियम आचरितां। तो वंद्य होय सर्वथा। देव ऋषी सिद्ध संता। ये विषयी शंका नको
।।२०६।।

ऐसें वचन ऐकून। स्वामीस केलें साष्टांग नमन। गृहीं त्याच्या धन धान्य। संपत्ती संतती सर्व आली
।।२०७।।

स्वामी नृसिंहसरस्वती। साक्षात असे दत्तमूर्ती । येथे जे संशय वहाती । ते बुडतील निश्चयें
।।२०८।।

सांप्रत या भूमिवर । दत्त अवतार झाले फार । या भोंदूंचा विचार । येथें मुळीं करणें नको
।।२०९।।

इति श्रीगुरुचरित्र सारामृत। सदा ऐकोत भाविक भक्त। हेंच मागे जोडूनि हात। विठ्ठलासी दासगणू
।।२१०।।

।। इति दशमोध्यायः ।। शुभंभवतु ।।

।। श्रीदत्तात्रेयार्पणमस्तु ।। श्रीहरिहरार्पणमस्तु ।।

卐 卐 卐 卐 卐

इति अध्याय समाप्तः