।। अध्याय अकरावा ।।

।। श्रीगणेशाय नमः ।।

जयजयाजी विमलकीर्ति। पांडुरंगा रुक्मिणीपती। तुझ्या पायी असो प्रणति। दासगणूची सर्वदा
।।१।।

नामधारकाकारण। सिद्ध सांगे प्रेमेंकरून। श्रीगुरुचें चरित्र गहन। तें कोठवरी सांगू बा
।।२।।

तूं पुसलें म्हणून। आम्हां आठवलें जाण। खरा तूं भाग्यवान। श्रीगुरुचरणीं प्रेम जडलें
।।३।।

ऐक आतां ही कथा। श्रीगुरुची अगाध सत्ता। भास्कर नामें द्विज होता। एक अति दरिद्री
।।४।।

त्याच्या ऐसें होतें मनी। कीं भिक्षा करावी स्वामीलागुनी। आला अल्प घेउनी। सामुग्री तो गाणगापुरा
।।५।।

त्रिवर्गा पुरतें सामान। डाळ कणिक तांदूळ लवण । ठेविले वस्त्रांत बांधून। दारिद्रय तें कठिण अती
।।६।।

नामधारका गाणगापुरी। समाराधना वरच्यावरी। होऊं लागल्या अमरजातीरीं। नित्य पंच पक्वान्नाच्या
।।७।।

हजारों ब्राह्मण जेविती। तें पाहून आपल्या चित्तीं। भास्कर धरिता झाला भीति। पाहून त्या थाटाला
।।८।।

भीत भीत एके दिवशी। त्यानें हेतू कळविला द्विजांसी। म्हणे करणें आहे भिक्षेसी। श्रीगुरुसी ये ठाया
।।९।।

परी मी दरिद्री अत्यंत । सामुग्री आहे अल्प बहुत । तीन पात्रं तियेंत। कशीं तरी जेवतील
।।१०।।

ऐसें ऐकतां द्विज हांसले। उपहासीं त्या बोलले। भिक्षेचे वेड सोडी भलें। हे दरिद्रया ये ठाया
।।११।।

खंड्यांशीं अन्न येथें। प्रतिदिनीं लागतें। तुझ्या सामुग्रीचा येथें। पाड काय सांग पा
।।१२।।

तूं भिक्षेचें वेड सोडुनी। जेवीत जा समाराधनीं। दुर्बलानें हाव मनीं। कदापि मोठी वाहूं नये
।।१३।।

तें मानावया कारण। द्विजाचें न घेईं मन। तळमळ लागली ती पूर्ण। भिक्षा करण्या श्रीगुरुची
।।१४।।

स्वामी नरसिंहसरस्वती। भक्तवत्सल दत्तमूर्ती। ते आपल्या पदनतासी। उपेक्षितील कैसे हो
।।१५।।

एके दिनी भास्कराला । त्यांनी जवळ बोलाविला। आज भिक्षा आम्हांला। करी ऐसें निरोपिलें
।।१६।।

भास्कर म्हणाला आवश्य। लागला भिक्षेच्या तयारीस। करून संगमीं स्नानास । मठीं चूल पेटविली
।।१७।।

त्रिवर्गा पुरतें सामान। अवघे हंसले जन। अरे ही अवदसा कोठून। तुजला वेड्या उदेली
।।१८।।

आज यात्रा आली फार। पान होईल चार हजार। याचा करोनि विचार। हैं साहस सोडावें
।।१९।।

ज्या दिवशीं नसेल कोणी । भिक्षा करी तूं त्या दिनी । घेई आपला पुरवोनी। मनोरथ मनींचा
।।२०।।

शिवाय तेंहि भातवरण। नाहीं एकहि पक्वान्न। आले आहेत धनिक जन। समाराधना करावया
।।२१।।

भास्कर बोलें त्यावरी। अतिविनयें बद्धकरीं। आज स्वामीची आज्ञा खरी। झाली भिक्षा करावया
।।२२।।

ऐकतां ऐसें उत्तर । द्विज बोलती परस्पर । आज दिनीं आपुलें घर । पाहिलें पाहिजे जेवावया
।।२३।।

हा वेडा न ऐकत । सामान अल्प अत्यंत । कसेंबसें तयांत । इसम तीन जेवतील कीं
।।२४।।

ऐशा रीती अवघ्यांनी। द्विज धिक्कारिला तया स्थानीं। गेले स्वगृहातें कोणी। कोणी गेले स्नानाला
।।२५।।

स्वयंपाक सर्व आटोपला। स्वामी म्हणती भास्कराला। जा बोलावणें ब्राह्मणाला। जेवावया कारणें
।।२६।।

म्हणाले सहपरिवारेंसी। यावें शीघ्र भोजनासी। स्वामी वाट पाहाती मठासी। ऐसें निक्षून सांगावें
।।२७।।

बंदुनी गुरुचरणाला। भास्कर संगमाशी गेला। अवघ्यां बोलावू लागला । स्वामीचे आज्ञेनें
।।२८।।

आज्ञा स्वामीची म्हणून। मठासी आले ब्राह्मण। कोठील पन्नावळी म्हणून। विचारते झाले
।।२९।।

हैं श्रीगुरुने माव केलीं। ती सांगतो ऐका भली। छाटी आपुली घातली। सिद्ध झालेल्या पाकावरी
।।३०।।

केल्या आज्ञा अवघ्यांस । न काढितां या छाटीस। अन्न वाढा ब्राह्मणांस । जें म्हणाल ते निघेल कीं
।।३१।।

भास्करें तैसें तात्काळ केलें । ते भाविकां मानवलें। परी इतरांसी वाटलें। नवल त्या गोष्टींचें
।।३२।।

तिघां पुरतें आहे अन्न। हजारों जमले ब्राह्मण। सुवासिनी घेऊन । लेकुरें आल्यात कडेसीं
।।३३।।

आज वेळा फजितीची। खरोखरी आहे साची। बुद्धि या भास्कराची। ठिकाणास नसे कीं
।।३४।।

जे भाविक होते कोणी। ते बोलले गर्मोनी। पांडवाघरी दुर्वासमुनीं। तृप्त कैसा झाला हो
।।३५।।

तैसेंच होईल येथ। स्वामी प्रत्यक्ष आहेत दत्त। म्हणून कुतर्क घेणें व्यर्थ। चला लागा वाढावया
।।३६।।

पत्रावळी पासून। तों थेट पक्वान्न। निघाली छाटीखालून । ब्राह्मण अवघे तृप्त झालें
।।३७।।

स्वामीं म्हणती लोकांसी। डांगोरा द्या गांवासी। क्षत्रिय वैश्य शूद्रांसी। सहपरिवारें बोलवा
।।३८।।

आणि घाला यथेच्छ भोजन। करूं नका अधिक न्यून। भोजनसमयीं समसमान। अवघ्यांशीच लेखावें
।।३९।।

तेहि तृप्त होऊन गेले। मग अंत्यज बोलाविले । त्यांनाहि वाढिलें। अन्न यथेच्छ सुग्रास
।।४०।।

जलचर भूचर खेचर। तृप्त केले साचार। स्वामिलीलेचा न लागे पार। शेषहि थकेल वर्णितां
।।४१।।

ऐसा भंडारा थोर झाला। अवघे करिती आचंब्याला। लोक स्वामीची अगाध लीला। मुखें गाऊं लागले
।।४२।।

छाटी काढल्यावरी जाण। अन्न राहिलें पहिल्या समान। तिघांचे होईल जेवण । इतुकेंच तेंथ बापा रे
।।४३।।

गुरु म्हणती भास्करासी। निवटलें तुझ्या दारिद्र्यासी। कुबेरासम धनराशी। गृहीं तुझ्या पडतील
।।४४।।

पुत्र पौत्र नांदतील। सत्कीर्ति तुझी वाढेल। अखेर मुक्त होशील। जन्ममरणा पासुनि
।।४५।।

ऐसें पाहतां लोक म्हणती। स्वामी नृसिंहसरस्वती। या नर म्हणावें कवण्या रीतीं। अघटित तें घडवीत हा
।।४६।।

हा प्रत्यक्ष ईश्वर। त्रिमूर्तीचा अवतार। दाविलें विश्वरूप साचार। कुमशीग्रामों त्रिविक्रमा
।।४७।।

यांच्या कृपेंकरून भला। वाळल्या काष्ठा पाला फुटला। शिरोळ ग्रमीच्या बालकाला । मृत होतां उठविलें
।।४८।।

पतित मुखें करून। शास्त्रवाद करविला पूर्ण। विणकरभक्तालागून। शैल्यपद दाखविलें
।।४९।।

ऐशाच समर्था वांचून। दैवत नाहीं कोणीच आन। वंदितां एक स्वामीचरण। दर्शन घडणार विश्वाचें
।।५०।।

भास्कर ब्राह्मण घरात गेला। गुरुकृपेनें सुखी झाला। ऐशा स्वामीच्या चरित्राला। मुखें वां कोठवरी
।।५१।।

नामधारका ऐक आतां। सांगतों मी दुसरी कथा। सोमनाथ नामें द्विज होता। कौशिक गोत्री आपस्तंब
।।५२।।

त्या सोमनाथद्विजाची। गंगा नामें भार्या साची। मूर्ती पातिव्रत्य धर्माची। वाटे काय अवतरली
।।५३।।

पोटीं नव्हतें संतान। उभयतां झुरती रात्रंदिन। गेलीं साठ वर्षे उलटून। सोमनाथकांतेते
।।५४।।

वांझ वांझ म्हणून। बोलू लागले अवघे जन । ती नियमें करून। गुरुदर्शना येत असे
।।५५।।

नीरांजन प्रति दिवशीं। लावीतसे सद्गुरूसी । तिच्या पाहून भक्तीसी। संतुष्टले गुरुवर
।।५६।।

ऐशी सेवा करून। काय मागशी मजकारण। गंगा म्हणे मी संततीविण । कांही न इच्छितें
।।५७।।

संततिवीण स्त्रियांचा। जन्म आहे व्यर्थ साचा। माझ्या निपुत्रिकपणाचा। डाग जावो तुझ्या कृपें
।।५८।।

श्रीगुरु म्हणती साचार। चिंता न करी तिळभर। होतील सुलक्षण साचार। कन्या, पुत्र दोन तुला
।।५९।।

तें ऐकता गंगाबाई। खालीं पाहूं लागली पाही। हळूच म्हणे हे गुरुमाई। विटाळ माझे गेलेत कीं
।।६०।।

मी आजपर्यंत। पुष्कळ पूजिले अश्वत्थ। सेवा केली अतोनात । परी न उपयोग झाला हो
।।६१।।

ऐकून स्वामी म्हणती तीतें। अश्वत्थाची कधीं न जाते। सेवा निष्फळ, वदे न भलतें। जा होईल संतती तुज
।।६२।।

उगीच अश्वत्थाची निंदा। करूं नको बाळे कदा। अश्वत्थसेवा सर्वदा । पतिव्रतेनें करावी
।।६३।।

अश्वत्थाचें महिमान। आगळे आहे सर्वांहून। कल्पतरू हाच जाण। अश्वत्थ, बाळे कलियुगीं
।।६४।।

ब्रह्मांडपुराणा भीतरीं। वर्णिली आहे याची थोरी। अश्वत्थाची नये सरी। कोणत्याहि वृक्षातें
।।६५।।

नारदानें ऋषींस। सांगितलें अश्वत्थमाहात्म्यास । तेंच मी आज खास । सांगतो तुजकारणें
।।६६।।

अश्वत्थवृक्ष मुळासी । विधिरूप परियेसी । मध्यभाग ऋषीकेशी । अग्रभागे शिव असे
।।६७।।

दक्षिणशाखेस शूलपाणी। पश्चिमेस विष्णू जाणी। उत्तरेच्या शाखास्थानीं। ब्रह्मदेव बैसलासे
।।६८।।

शाखा ती पूर्वेकडील । बसले असती देव सकळ । तीर्थं करून एक मेळ। अश्वत्थ वृक्षीं राहती
।।६९।।

अश्वत्थ पूजेचें विधान। सांगून गेला अथर्वण। चैत्र आषाढ पौष तीन। महिने न उपयोगी व्रतारंभा
।।७०।।

हे महिने टाकून । व्रतारंभ करावा जाण । प्रदक्षिणा अश्वत्थालागून । स्वइच्छा पुरवावी
।।७१।।

रविवारीं सोमवारीं। संक्रातीसी भृगुवासरीं। अश्वत्थवृक्षा न स्पर्श करी। दुर्दिनीं व्यतिपाती वैधृतीला
।।७२।।

सचैलस्नान करावें । शुभ्रवस्त्र नेसावें । गंगा यमुनेचें आणावें । कलश दोन भरून
।।७३।।

पुण्याहवाचन करूनी। सेवा आरंभावी जाणी। पुरुषसूक्त वा महिम्न म्हणोनी। अभिषेकावें अश्वत्था
।।७४।।

अष्टभुजा विष्णूची। मूर्ती अश्वत्थतळीं साची। पूजा अर्चा तियेची। भाव धरूनी करावी
।।७५।।

असें केल्या पूजन। महादोष पळती जाण। अश्वत्थ पूजनें करून। मनींच्या इच्छा तृप्त होती
।।७६।।

अश्वत्थतळीं एका ब्राह्मणा। घातल्या भावें भोजना। कोटी गुणें पुण्य जाणा। लाधेल कीं निश्चयें
।।७७।।

अश्वत्थतळीं हवन होम। करावें, प्रदक्षिणेचा करून नेम। तरी मनींचें सर्व काम। पूर्ण होतील सर्वथा
।।७८।।

जितक्या जप प्रदक्षिणा। घातल्या त्याच्या दशांश जाणा। करणे आहे होमहवना। त्याच्या दशांशें भोजन
।।७९।।

व्रतसमाप्तीचें दिवशीं। आपुल्या पाहून शक्तीसी। सुवर्णप्रतिमा ब्राह्मणासी। द्यावी करून पिंपळाची
।।८०।।

श्वेत-धेनूचें करणें दान। आणि दांपत्याचें पूजन। ऐसी सेवा केल्या जाण। ती न होय निष्फळ कदा
।।८१।।

जा अमरजासंगमतीरा। तेथें अश्वत्थ आहे खरा। सेवा आरंभी करूनी त्वरा। माझा वास ते ठायीं
।।८२।।

अश्वत्थ सेवेनें तुजप्रती। कन्या पुत्र दोन होती। हे व्रताची प्रचीती। उगीच वल्गना करूं नको
।।८३।।

ऐकूनिया गुरुवचना । नमस्कार करी अंगना । म्हणे मी आपुल्या वचना । सत्य मानून करी सेवा
।।८४।।

तीन दिवस पर्यंत । सेवा केली तरी खचित । तों तिच्या स्वप्नांत । एक विप्र आलासे
।।८५।।

तूं संगमीं केल्या प्रदक्षिणा। आतां जाय गाणगाभुवना। जेथें योगियांचा राणा। स्वामी नृसिंहसरस्वती
।।८६।।

त्यांस प्रदक्षिणा घाली सात। वेगें जाऊनी मठांत। तो जो प्रसाद देईल सत्य। तो तूं भक्षण करावा
।।८७।।

ऐसें स्वप्न पाहूनी। बाई आली गाणगाभुवनीं। मठाप्रती जाऊनी। स्वामीस प्रदक्षिणा सात केल्या
।।८८।।

तो स्वामीनीं फळें दोन। दिधलीं त्या स्त्रियेलागून। म्हणती करी भक्षण। येणे कार्य झालें तुझें
।।८९।।

फळें भक्षितां विटाळशी। झाली असे त्याच दिवशीं। प्रथमतः पाहिले कन्येसीं। नवमास पूर्ण झाल्यावर
।।९०।।

कन्येस घातलें पायावर। श्रीगुरुंच्या साचार। आणि बोलली जोडून कर। भार्या सोमनाथाची
।।९१।।

स्वामी कन्येचा लाभ झाला। आतां पुत्राचा राहिला। तो तव कृपें होवो भला। हीच आशा मनाची
।।९२।।

तोहि व्हावा शतायुषी। पांच पुत्र व्हावे तयासी। ऐसें ऐकून ज्ञानशशी। तथास्तु म्हणून बोलिले
।।९३।।

पढ़ें सोमानाथा पुत्र झाला। बाईचा वांझपणा फिटला। स्वामीची ती अगाध लीला। वेदहि वर्ण शकेना
।।९४।।

ऐसेंच एक वर्तलें। नवल गाणगापुरीं भलें । तें ऐक सांगतों वहिलें। नामधारका तुजप्रती
।।९५।।

आपस्तंबशाखेभीतरी । गार्ग्यगोत्रा माझारी । द्विज होता नरहरी । सर्वांग कुष्ठ भरलें ज्या
।।९६।।

तो श्रीगुरुच्या चरणकमला। सद्भावें शरण आला। म्हणे मज अनाथाला। कृपा कांही करा हो
।।९७।।

गुरुराया व्याधीमुळें। माझें तोंड झालें काळें। तें दावावया नाहीं उरलें। स्थान कोठें जगीं मला
।।९८।।

लोक अवघे हेवा करिती । दूर दूर हो म्हणती । कोणीहि न प्रभातीं। मुख माझें पहातात
।।९९।।

तों इतक्यांत एक आला। गृहस्थ स्वामीच्या दर्शनाला। त्याच्या करीं वाळलेला। ठोकळा होता औदुंबराचा
।।१००।।

पाहून त्या ठोकळ्याप्रत। नरहरीशीं बोलले सदुरूनाथ। हा संगमीं नेऊनी त्वरित । जमिनीशी लावावा
।।१०१।।

तूं पूर्वजन्मी दोष केले। त्या योगें हैं कोड फुटलें । त्या उपाय म्हणून दिलें। हें मी लाकुड तुजलागीं
।।१०२।।

तें हैं काष्ठ घेऊनी करीं। जाय सत्वर संगमावरीं। स्नान करून नमस्कारी। अश्वत्थ वृक्षा प्रथमतः
।।१०३।।

पुनरपि काष्ठ घेऊन। संगमामाजी करी स्नान। कलश भरून आणी दोन। या शुष्क काष्ठा घालावया
।।१०४।।

तीन वेळा घाल पाणी। आणि दे जमिनींत रोवूनी। संगमनाथाचे लक्षूनी। पूर्वदिशा बापा रे
।।१०५।।

ज्या दिवशी काष्ठाप्रत। पालवी फुटेल निश्चित । ते दिनी दोषरहित। होशील चिंता करू नको
।।१०६।।

ऐसें ऐकतां भाषण। नरहरी गेला धावून । त्या काष्ठाजवळ जाण । घेतला ठोकळा डोईसी
।।१०७।।

आज्ञेनुरूप संगमावरी । संगमेश्वरा समोरी । काष्ठ रोविले भीमातीरीं । सेवा करूं लागला
।।१०८।।

दोन कलश काष्ठावरी । घालीतसे तो नरहरी । ऐशी सेवा चालली खरी । सात दिवस पर्यंत
।।१०९।।

स्वतः केलें उपोषण। पाहून ते हांसले जन। म्हणती तुझें दोष दारुण। जातील ऐसे दिसेना
।।११०।।

म्हणून वाळल्या काष्ठाचा। उपाय तुशीं कथिला साचा। या शुष्क यष्टीचा। काय उपयोग बापा रे
।।१११।।

तुझी करण्या समजूत । सांगते झाले सद्गुरूनाथ। तुज ऐशा उपायाप्रत। हैं आम्ही समजलों
।।११२।।

नरहरी बोले त्यावरी। व्यवहारिक तुमची वैखरी। नृसिंहसरस्वती भूमीवरी। प्रतिईश्वर अवतरला
।।११३।।

तो काहीं तरी बोलणारा। नाहीं नाहीं ध्यानी धरा। स्वामीनृसिंहसरस्वतीची गिरा। श्रुतीच पाहिजे मानिली
।।११४।।

माझा विश्वास त्यांचेवर। वाळल्या काष्ठास घालीन नीर। सेवा करीन निरंतर । स्वामींनी जी बोधिलीं
।।११५।।

हें झालेलें वर्तमान। शिष्यानें स्वामीलागून। केलें असे निवेदन । दर्शना जातां मठामध्यें
।।११६।।

तें ऐकून स्वामी म्हणती। गुरुवचनीं ज्यांची भक्ती । ते सर्वसुख पावती। यांत कांही संदेह नसें
।।११७।।

कथा स्कंदपुराणात। आहे एक ऐशी ग्रथित। ऋषीकारणे सांगे सूत । तेंच मी तुम्हां सांगतो
।।११८।।

पूर्वी पांचाळनरांत । सिंहकेतू नृपनाथ । धनंजय त्याचा सुत । प्रज्ञावंत असे कीं
।।११९।।

तो धनंजय एके दिवशी। गेला काननीं शिकारीसी। शबर लोक बहुवशी। होते त्याच्या बरोबर
।।१२०।।

धनंजय तृषाक्रांत। काननीं हिंडे पाणी पाहत। तो तेथे एक शबरसुत। पाहिला धनंजयानें
।।१२१।।

त्या शबरसुतें करीं भलें । उन्मळून पडलेले । लिंग होतें घेतलें । भग्न शिवालयींचे
।।१२२।।

राजा म्हणे शबरासी। हें लिंग घेऊन काय करशी। शबर बोले प्रेमेशीं । त्याची पूजा करीन
।।१२३।।

मात्र पूजेचें विधान। तुम्ही सांगा मज कारण। मी अनन्यभावें आपणा शरण। तुम्हीच आहां गुरु माझें
।।१२४।।

मग तो धनंजय राजकुमार। पूजाविधान सांगे सत्वर । म्हणे चिताभस्मी फार। प्रीति आहे हराची
।।१२५।।

तें तं रोज आणावें । या लिंगास समर्पावें । हेंच आमुचे मानावें । वचन तुवां शबरपुत्रा
।।१२६।।

चिताभस्में सदाशिव। प्रसन्न होईल महादेव। शिवचरणीं आपुला भाव। अचल करी शबरकुमारा
।।१२७।।

शबरें तें ऐकून। धनंजया केले साष्टांग नमन। आला गृहासी घेऊन। उन्मळित लिंग शिवाचें
।।१२८।।

घरी आणून ओट्यावरी। स्थापन केला मन्मथारी। हिंडून स्मशानाभीतरी। नित्य आणी चिताभस्म
।।१२९।।

तें शिवासी लावित। पोडषोपचारें पूजित। चिताभस्माचा दावित। नैवेद्य तो हराला
।।१३०।।

एके दिनी ऐसें झाले। चिताभस्म कोठें न मिळालें। सात गांव धुंडाळिले। शबरानें चिताभस्मास्तव
।।१३१।।

परी न भस्माचा लाभ झाला। शबर मनीं चिंतावला। निजकांतेस कळविला । त्यानें सर्व समाचार
।।१३२।।

ती शबराची कांता। होती महा पतिव्रता। ती म्हणे भस्माकरितां । उगी न चिंता करावी
।।१३३।।

मी आपुल्या देहाचें । भस्म हरा देतें साचें। शरीर हे मृत्तिकेचे । लागो ईशकार्यासी
।।१३४।।

मज कोंडा गृहांत। आणि अग्नि लावा तयाप्रत। मी होतां भस्मीभूत। ते घेऊन पूजा करा
।।१३५।।

शबर बोले त्यावरी। तुला कैसे मारूं तरी। बांधिलें आहे माझ्या पदरी। तुझ्या मायबापें तुज
।।१३६।।

तुला वधितां दोष दारुण। घडतील कांते मजलागून। पूजा राहतां उमारमण। कोपेल कीं मजवरी
।।१३७।।

ऐशी झाली अडचण। ये समयीं मजकारण। तैं कांता बोले हांसून। हेंच तुमचे अज्ञान असे
।।१३८।।

अहो उपजे कोण मरे कोण। अवघाच आहे भ्रम जाण । जें दिसेल त्यालागून। नाश आहे एके दिनी
।।१३९।।

म्हणून सोडा या कल्पना। सत्वर करून माझ्या दहना। भस्म घेऊन उमारमणा। नेमाप्रमाणें लावा तुम्ही
।।१४०।।

शेवटीं त्या शबराने। अग्नी गृहाकारणें। लावून चिताभस्म त्यानें। घेतलें कांतेचे करूनी
।।१४१।।

आनंदे पूजेस बैसला। भस्म लाविलें लिंगाला। शबर पूजनीं संलग्न झाला। देहभाव उरला नसे
।।१४२।।

नैवेद्य आरती सर्व झाली। प्रसाद घेण्याची वेळ आली। तों त्यानें हांक मारिली। कांतेस नित्याप्रमाणें
।।१४३।।

तों ती आली धांवत। प्रसाद शिवाचा घेण्याप्रत। तें पाहून आश्चर्यचकित । शबर झाला मानसीं
।।१४४।।

म्हणे कांते तुजप्रत। मी जाळिलें असून सत्य। तूं कैसी आली परत। नैवेद्य घ्याया कारणें
।।१४५।।

कांता बोले प्राणेश्वरा। मीं निजलें होतें मंदिरा। शीततेने माझ्या शरीरा। व्याप्त केले होते कीं
।।१४६।।

तुमच्या ऐकून हांका। मी पातलें येथ देखा। येथें न घ्यावीं मुळीं शंका। अग्नींत स्वामी न मेलें मी
।।१४७।।

ऐसें परिसतां शबर। आनंदे बोले साचार। म्हणे पावला शंकर। कांता माझी जीवली
।।१४८।।

तों इतक्यांत लिंगामधून । दशभुज पंचवदन। प्रगट झाला उमारमण। सर्वेश्वर जगत्पती
।।१४९।।

शबरास म्हणे माग वर। शबर बोले जोडून कर। तुझ्यावीण कांही इतर। नको मजला शंकरा
।।१५०।।

सदाशिवाच्या कृपेकरून। तो शबर झाला संपन्न। कां कीं गुरुवाक्यीं पूर्ण। विश्वास होता शबराचा
।।१५१।।

तैसेंच येथे होईल । तुम्ही दृष्टी पहाल। नाहीं लागलें खचित खुळ । त्या कुष्टी नरहरीला
।।१५२।।

असो स्वामी नृसिंहसरस्वती। येते झाले संगमावरी। नरहरीची पाहून भक्ती। परम चित्तीं संतोषले
।।१५३।।

गंगाजलानें पूरित। कमंडलू होता हातांत। तों त्यांनीं ओतिला खचित। त्या शुष्ककाष्ठावरी
।।१५४।।

पाणी पडतां पानें फुटलीं। सर्व भक्तांनी पाहिली। नरहरीला पाहिलें जवळी। म्हणती कोड गेले तुझें
।।१५५।।

नामधारका तें सत्य झालें। नरहरीचें कोड गेले। त्यानें अमोघ स्तवन केले। श्लोक रचून श्रीगुरुचें
।।१५६।।

।। श्लोक ।।
तूंच आद्यपीठ तूंच निर्विकार सद्गुरू ।
तूंच दत्त ब्रह्मदेव रुक्मिणीश शंकरू ।।
भक्त-कामकल्पवृक्ष दंडधारि पूर्णकाम।
वंदयामि नारसिंह सरस्वतीश पाहि माम् ।।

ऐसें आठ श्लोकांचें। स्तोत्र रचिलें श्रीगुरुचे। सानंद चित्त अवघ्यांचे। झाले पाहून प्रकार हा
।।१५७।।

वाळल्या काष्ठा फुटला पाला। कोडरहित केलें नरहरीला। त्या श्रीगुरुच्या पदकमला। नमन दासगणूचें
।।१५८।।

संगमावरून स्वामीस। आणिलें मिरवीत मठास। केलें समाराधनेस। मोठ्याप्रमाणें तया दिनीं
।।१५९।।

नरहरीस बोलले गुरुवर। तूं येथेंच रहा निरंतर। कन्या-पुत्र परिवार। तुझा वाढेल ये ठाई
।।१६०।।

तूं आमच्या भक्तांत। श्रेष्ठ अससी अत्यंत । योगेश्वर ऐशी तुजप्रत। नामाभिधा ठेविली आम्ही
।।१६१।।

वेदशास्त्रसंपन्न। तुझा वंश राहील जाण। विद्यासरस्वतीमंत्र सांगून । कृतार्थ केलें तयाला
।।१६२।।

तुला होतील तिघे सुत। त्यांत एक योगी सत्य। वंशानुवंश तुजप्रत। आमुची सेवा घडेल कीं
।।१६३।।

तें ऐकून नरहरी। लोळू लागला पायावरी। श्रीचा वशीला असल्यावरी। कोठून कमी पडेल
।।१६४।।

ऐसा सिद्धनामधारकसंवाद झाला। तो सरस्वतीगंगाधरें गायिला। तो सार काढून कथन केला। संक्षेपें दासगणूनें
।।१६५।।

स्वस्ति श्रीगुरुचरित्रसारामृत। ऐकोत सदा भाविक भक्त । हीच इच्छा मनांत। आहे दासगणूच्या
।।१६६।।

।। इति एकादशोध्यायः ।। शुभंभवतु ।।

।। श्रीदत्तात्रेयार्पणमस्तु ।। श्रीहरिहरार्पणमस्तु ।।

卐 卐 卐 卐 卐

इति अध्याय समाप्तः