।। अध्याय बारावा ।।

।। श्रीगणेशाय नमः ।।

हे भक्तवत्सला रूक्मिणीरमणा। सोडी मनीचा कठोरपणा। कृपा करावी करुणाघना। विनवीतसे दासगणू
।।१।।

नामधारक म्हणे सिद्धासी। महाराज आमुच्या पूर्वजांसी। सद्गुरूची भेट कैसी। झाली ती कथन करा
।।२।।

ऐसा ऐकूनियां प्रश्न। सिद्ध सांगे वर्तमान। सायंदेव म्हणून। पूर्वज तुझा एक होता
।।३।।

तो उत्तरकांचीचा राहणारा। परी उद्योगास्तव गोदातीरा। जाऊन राहिला बासरा। हे पूर्वीच कथिलें कीं
।।४।।

बासर गांवीं झाला वास। पवित्र गोदेच्या तटाकास। तेणें पुण्य झालें विशेष । म्हणून श्रीगुरु भेटले
।।५।।

तो सायंदेव बासराहुनी। आला गाणगापुरालागुनी। पाहतां ग्राम आपुलें नयनीं। दंडवत घालू लागला
।।६।।

स्वामी नृसिंहसरस्वती। मठांत होते निश्चिती। जे साक्षात् दत्तमूर्ती। जगदुद्धारक अवतरले
।।७।।

श्रीगुरुसी पाहून। सायंदेवाचें लोभलें मन। अनन्यभावें साष्टांग नमन। केले त्यानें श्रीगुरुसी
।।८।।

मुखीं स्तव केला अपार। तो वानावा कोठवर । श्रीगुरूंनी ठेविला कर। सायंदेवाच्या मस्तकीं
।।९।।

जा आधी संगमावरी। भीमा अमरजेचें तीरीं। सद्भावें स्नान करीं। आणि करी अश्वत्थपूजा
।।१०।।

तो झालिया मठांत यावें। पंक्तीस भोजन करावें। तुझ्या मनींचें हेतू आघवे। जाणिले मी सायंदेवा
।।११।।

श्रीगुरुची आज्ञा होता क्षणीं। सायंदेव संगमस्थानीं। येऊनी स्नान करूनी। पूजिता झाला अश्वत्था
।।१२।।

पंक्तीस केले भोजन। आनंदें उचंबळलें मन। म्हणे अखंड सेवा करून। राहीन येथें सद्गुरूची
।।१३।।

स्वामी म्हणती सायंदेवा। करणे आमुची कठीण सेवा। आहे म्हणून सोडावा। नाद सेवा करण्याचा
।।१४।।

सूर्य मंडळी एक वेळ। जातां येईल तात्काळ। योगाचें वाढविल्या बळ। परी सेवा कठीण त्याहुनी
।।१५।।

सेवा करणें शब्द सोपा। परीं तो अवघड आहे बापा। यम नियम जप तपा। करिशील परी सेवा न घडे
।।१६।।

सायंदेव बोले त्यावरी। ही स्वामीची सत्य वैखरी। परी आपुली कृपा झाल्यावरी। अशक्य न कांही राहणार
।।१७।।

माझ्या मनीं हीच आस। करून आपुल्या सेवेस। क्रमण करावें आयुष्यास। ऐसें वाटतें महाराजा
।।१८।।

स्वामी म्हणाले त्यावरी। असेल चित्ताची तयारी। तरी सेवा सुखे करी। निश्चय असल्या फळ मिळे
।।१९।।

असो सायंदेव तया स्थानीं । सेवा करी प्रेमे करूनि । गेले तीन मास होऊनी। सद्गुरूसेवेस
।।२०।।

एके दिवशी ऐसें झाले । श्रीगुरु संगमा निघाले । सायंदेवा घेतले। आपुलियाबरोबर
।।२१।।

अस्तमानाचे समयाला। सूर्य गेला अस्ताचला। अंधकार घोर पडला । झंझावात सुटला असे
।।२२।।

मोठमोठाले तरुवर। पडूं पाहती भूमीवर । मेघ वर्षती अपार । मुसळधारा चालिल्या
।।२३।।

श्रीगुरु बैसले वृक्षातळीं। सायंदेव असे जवळी। उभयतां वाजू लागली। थंडी तेधवा अपार
।।२४।।

भीमा अमरजा दोन्ही भरल्या। मोठमोठ्या लाटा उठल्या। जलाच्या पृष्ठभागी भल्या। वानावें कोठवर
।।२५।।

गुरु सायंदेवा म्हणती । तूं जाऊन मठाप्रती । शेकावया शीघ्रगती। विस्तव यावा घेऊन
।।२६।।

अंधार आहे बहुत पडला। परी शीघ्र जावे मठाला। मुळींच आजूबाजूला। पाहूं नको चालतां पथें
।।२७।।

सायंदेवे तें ऐकून। करिता झाला मठास गमन। द्वारापाशीं येऊन । विनवी द्वारपालातें
।।२८।।

सायंदेव म्हणे त्यांसी। श्रीगुरु आहेत संगमासीं। विस्तव पाहिजे तयासी। शेकावया कारणें
।।२९।।

द्वारपाळे अग्नी दिधला। भांड्यामाजीं घालून भला। तो घेऊन निघाला। सायंदेव संगमातें
।।३०।।

रात्र होती भयंकर । तमें कोंदाटलें अंबर। वर्षे लागले जलधर। तळपताती विद्युल्लता
।।३१।।

मार्गी चिखल झाला अती। झंझावाते झाडे मोडिती। कडकडा शब्द होती। विद्युल्लतेचे अंबरी
।।३२।।

तेणें सायंदेवाप्रत । भय वाटू लागले बहुत। दोन्हीं बाजूस अवलोकीत । तों नाग दोन पाहिलें
।।३३।।

त्या नागांकारण। पांच फण्या होत्या जाण। तेणें घाबरून गेले मन। सायंदेवाचे परियेसा
।।३४।।

घाम सुटला अती। धडाडूं लागली छाती। परमवेगें पळत पथीं। सायंदेव निघाला
।।३५।।

दुरून पांहता स्वामीला। तों ऐसे दिसले तयाला। सहस्त्रावधी दीपाला। उजळती वाटे भोंवताली
।।३६।।

वेदाध्ययनी ब्राह्मण। बसले गुरुपाशी येउन । तों तें गेलें मावळून । सायंदेव जवळ येतां
।।३७।।

सद्गुरू एकटे आसनीं। बैसले ऐसें पाहें नयनीं। वाटे पौर्णिमेचा इंदु गगनी। काय दुजा उगवला
।।३८।।

पथीचे ते फणीवर। आले सद्गुरूचे समोर। गेले निघून साचार। वंदन करून चरणाचें
।।३९।।

तयालागी पाहतां । सायंदेव झाला भीता। तैं सद्गुरू म्हणाले आतां। भय न मानी अणुमात्र
।।४०।।

हे बापा सर्प दोन्ही। मी दिले पाठवूनी । तुझे रक्षण करण्यालागूनीं। पथें जाता शिष्योत्तमा
।।४१।।

सेवा करणे श्रीगुरुची। कठीण आहे अती साची । योग्यतां गुरुभक्ताची। त्रिभुवनांत आगळी असे
।।४२।।

तैं स्वामीलागून । सायंदेव करी प्रश्न । गुरुसेवेचें महिमान । कैसे करावें, कशी ती
।।४३।।

तयीं सद्गुरू म्हणती कालीं। कैलासीं बसला चंद्रमौळी। अर्धांगीं हिमनगबाळी। कथा तियेसी सांगत
।।४४।।

उमेसी म्हणे शंकर। भक्ती गुरुची महाथोर। ती एकदां झाल्यावर । चिंता न करणें कशाची
।।४५।।

हिमनगबाले पूर्वकाली। गोष्ट ऐशी एक झाली। त्वष्टाब्रह्मा भाग्यशाली। अवतार ब्रह्मदेवाचा
।।४६।।

त्यासी एक कुमार झाला। तो गुरुगृहीं पाठविला । विद्या शिकण्याकारणें भला । लोकरितीप्रमाणें
।।४७।।

त्वष्टा ब्रह्माकुमार। गुरुगृहीं असतां साचार। ऐसा घडला प्रकार। तो ऐक सांगतों
।।४८।।

गुरु म्हणे कुमारासी। ऐकणे आमुच्या वचनासी। तूं भव्य मंदिर आम्हांसी। द्यावें एक बांधून
।।४९।।

ही झोपडी पावसाळ्यांत। गळू लागे अत्यंत । म्हणून पाहिजे आम्हांप्रत। भव्य मंदिर बालका
।।५०।।

तें सदन ऐसें असावें। केव्हांच न जुनें दिसावे। डागडुजीचें न पडावें। काम केव्हांहि त्या सदना
।।५१।।

ऐसे गृह ये घेऊन । शिष्या आम्हाकारण। तोंच गुरुपत्नी येऊन । बोलली त्या कुमारा
।।५२।।

मजसाठीं आण चोळी। ती नसावी विणलेली। वा नसावी शिवलेली। विविध रंग असावे तिला
।।५३।।

तोंच गुरुपुत्र येऊन । बोलला त्याकारण। मजसाठीं पादुका आण। पाण्यावरून चालावया
।।५४।।

वा इच्छित ठिकाणी। ज्या नेतील मजलागुनी। ऐशा पादुका आणुनी। घाल माझ्या पायांत
।।५५।।

मग गुरुकन्या बोले वचन । घरकुल आण मजकारण। हस्तिदंताचें करून। भव्य सुंदर खेळावया
।।५६।।

भांडीं तीं स्वयंपाकाची। आण अशा रीती साची। कीं त्या अग्निज्वाळेची। काजळी न लागावी कदा
।।५७।।

त्यांत शिजविलेले अन्न। सदासर्वदा रहावें ऊन। कदां न जावें गारठून। ऐशी बोळकी आण पां
।।५८।।

त्वष्टा ब्रह्माकुमार त्यासी। बोलला अति विनयेसी । त्या चौघांजणासी । तें ऐक सांगतों
।।५९।।

तुम्ही जें जें मागितलें। तें तें मी आणीन वहिले। आपुल्या चरणप्रतापें भलें। ऐसें म्हणून निघाला
।।६०।।

एका निबिडारण्यांत। त्वष्टा ब्रह्माकुमार सत्य। येता झाला फिरत फिरत। एकलाच अनवाणी
।।६१।।

चिंता वाही आपुल्या मनीं। जें मागितलें गुरूंनी। तें तें आणू कोठूनी। हाच विचार पडलासे
।।६२।।

तों एक अवधूत । भेटले त्या काननांत । तया पाहून दंडवत । कुमारानें घातिला
।।६३।।

आपुलें वृत्त कथन केलें। दोन्हीं पाय दृढ धरिलें। तैं कृपासिंधु बोलले। भिऊं नको रे कुमारा
।।६४।।

तुझ्या गुरूंनीं तुजप्रत। जें जें मागितलें आहे खचित। तें तें अवधें होईल प्राप्त। काशीयात्रा केल्यावरी
।।६५।।

अवघ्या यात्रेमाझारी। काशीयात्रा थोर खरी। विश्वेश्वर जाह्नवीतीरीं। उभा इच्छा पुरवावया
।।६६।।

कुमार बोले त्यावर। काशी येथून किती दूर। यात्रेचा तो प्रकार। कैसा हे न ठावें मला
।।६७।।

अवधूत म्हणती तयासी। चल नेतों काशीसी। करावें कैसें यात्रेसी । तेंहि तेथें सांगेन
।।६८।।

ऐसें एकमेकां बोलून। पावतें झालें अंतर्धान। पाहिले काशीपट्टण । क्षणामाजीं उभयतांनीं
।।६९।।

अवधूत म्हणाले कुमारासी। आतां ऐशा करी यात्रेसी। प्रथमतः मणिकर्णिकेसी। जाई स्नान करावया
।।७०।।

मग विनायकाचें पूजन। नंतर पांचाळेश्वराचें दर्शन। मग महाद्वाराकारण। येऊन विश्वेश्वर वंदावा
।।७१।।

पुन्हां स्नानास सत्वरीं। जावें भागीरथीच्या वरी। मनकर्णिकेश्वर त्रिपुरारी। कमलेश्वर वासुकेश्वर पूजावा
।।७२।।

पंच-पर्वतेश्वर गंगेश्वर । ललितादेवी जरासंधेश्वर । सोमनाथ शूलटंकेश्वर । वराहेश्वर पूजावया
।।७३।।

ब्रह्मेश्वर अगस्त्येश्वर । कश्यपेश्वर हरिहरेश्वर । वैजनाथ ध्रुवेश्वर । पूजी गोकर्णहाटकेश्वरा
।।७४।।

अस्थिक्षेप तटाकेश्वर। किंकरेश्वर भारभूतेश्वर । चित्रघंट चित्रगुप्तेश्वर। पूजी पशुपतेश कल्लेश्वरा
।।७५।।

विश्वेश्वर विघ्नेश्वर। चंद्रेश्वर अग्नेश्वर । चिंतामणी नागेश्वर। पूजी सोमनाथ विनायका
।।७६।।

वसिष्ठ वामदेव त्रिसंध्येश्वर। विश्वबाहू धर्मेश्वर । वृद्धादित्य चतुर्वक्त्रेश्वर। प्रकामेश्वर पूजावया
।।७७।।

चंडी चंडेश्वर राजेश्वर । धुंडीराज लांगुलेश्वर । नकुलेश्वर ज्ञानेश्वर । ज्ञानवापीत स्नान करी
।।७८।।

निष्कमलेश्वर मार्कंडेश्वर। तारकेश्वर महाकालेश्वर। मोक्षेश्वर वीरभद्रेश्वर। पूजी पंच विनायका
।।७९।।

ऐसी अंतगृह यात्रा करावी। मग मुक्तिमंडपाची वाट धरावी। पद्मासनी स्थित करावी। आपुली तनू प्रथमतः
।।८०।।

नंतर जप करावा। ऐशा रीती जाण बरवा। तो श्लोक ऐकावा। सांगतों मी तुजप्रती
।।८१।।

।। श्लोक ।।
अंतर्गृहेषु यात्रेयं यथावद्या मया कृता।
न्यूनातिरिक्तया शंभुः प्रीयतामनया विभुः ।।१।।

या श्लोकाचा जप करून । विश्वनाथाते वंदून। दक्षिण-मानस यात्रेकारण। निघावें कीं वत्सा रे
।।८२।।

धर्मकूपीं करी स्नान। धर्मेश्वराचे पूजून। गंगाके शव तेथून। पूजी जाऊन ललितेला
।।८३।।

दशाश्वमेधीं स्नान करावें। मनकर्णिकेचे जाण बरवें। शीतलेश्वरा वंदावें । तैसें तिलभांडेश्वरा
।।८४।।

पुढें द्वैषाकुंडीं स्नान। करावें पितरांचे तर्पण। मानसेश्वरास पूजून। केदारकुंडी स्नान करी
।।८५।।

श्राद्ध तेथें करावें । पितरालागीं पिंड द्यावें । याच विधीला आचरावे । गौरीकुंडा येऊन
।।८६।।

वृद्धकेदार हनुमंतेश्वर । आदरें पूजी रामेश्वर । कृमिकुंडीं सिद्धेश्वर । स्नान करून पूजावा
।।८७।।

स्वप्नकुंडी स्नान करावें। सोमेश्वरासीं पूजावें। पुढें लोलार्ककुंडा जावें। श्राद्ध तर्पण करावया
।।८८।।

कुरुक्षेत्रकुंडी अमृतकुंडी। स्नान करून दुर्गा धुंडी। पूजी धरून आवडी । मग जावें कुक्कुटेश्वरा
।।८९।।

वत्सा त्या कुक्कुटेश्वरीं। जप करी हा आदरी। ज्या योगें पातकें सारीं। जाती भस्म होऊनिया
।।९०।।

।। श्लोक ।।
वाराणस्यां दक्षिणे भागे कुक्कुटो नाम वै द्विजः।
तस्य स्मरणमात्रेण दुःस्वप्नः सुस्वप्नो भवेत् ।।१।।

पुढें गौरी अंबिका पूजावी। सात कवड्याने जाण बरवी। शंखोद्धाराची भेट घ्यावी। । मग पूजी विष्णूतें
।।९१।।

सूर्यकुंडीं करणें स्नान। कामाक्षीचें अर्चन। पुढें लक्ष्मीकुंडा लागून। जावें स्नान करावया
।।९२।।

वैजनाथकुंडाचें । पूजन वैजनाथाचे । करून यावें शीघ्र साचें । गोदावरीकुंडातें
।।९३।।

गोदावरीकुंडांत। आदरें स्नान करी सत्य। कां कीं तीर्थात श्रेष्ठ तीर्थ । वृद्ध गोदावरी
।।९४।।

पूजा गौतमेश्वराची। करून अगस्तीकुंडाची । भेट घेऊन अगस्तीची। पूजा करी अत्यादरें
।।९५।।

ज्ञानवापीं दंडपाणी। धुंडीराज अन्नपूर्णा भवानी। ऐसी यात्रा संपवूनी। जा उत्तरमानसयात्रेतें
।।९६।।

पंचगंगेचें करी स्नान। हे सर्वतीर्थी मोठे जाण। आगळें याचे महिमान। अवघ्या यात्रे माझारी
।।९७।।

किरणा धूतपापपुण्या सरस्वती। गंगा यमुना निश्चिती। ऐशा एकवटून येती। गंगा त्या ये ठाया
।।९८।।

या पंचगंगेप्रत। म्हणत होते कृतयुगांत। धर्मनदी ऐसें सत्य। धूतपाप त्रेतायुगीं
।।९९।।

बिंदुतीर्थ द्वापारीं। पंचगंगा कलीमाझारी। येथें आदरें अर्चन करी। बिंदुमाधव गोपालकृष्णा
।।१००।।

मंगलागौरी विश्वेश्वर। गभस्तेश्वर आदित्येश्वर। आणिक पापभक्षेश्वर। पूजी भैरव क्षेत्रपाला
।।१०१।।

काळेश्वराचें दर्शन घ्यावें। हंसतीर्था स्नानास जावें। श्राद्ध तर्पण करावें। पितृ उद्देशें ते ठाया
।।१०२।।

पूजा रत्नेश्वराची। तैसी चतुर्वक्त्रेश्वराची । करून दक्षिणेश्वराची । अमृतेश्वर पूजावा
।।१०३।।

मंदाकिनीचें स्नान। मध्यमेश्वराचें पूजन। जंतुकेश्वराचें अर्चन । दर्शन वक्रतुंडाचें
।।१०४।।

भूत भैरव ईशान। यांचे अर्चन करून। घंटाकुंडी करा स्नान। कंदूकेश्वर पूजावा
।।१०५।।

पुढे जेष्ठवापीचें स्नान। भीमेश्वराचें दर्शन । मातृपितृ-कुंडालागून। श्राद्ध करावें पितरांचें
।।१०६।।

पिशाच्चमोचन तीर्थावरी। स्नान करून अत्यादरीं। कपालेश्वर त्रिपुरारि। आदरेसीं पूजावा
।।१०७।।

कपर्देश्वर कर्कोटकेश्वर । ईश्वर गंगा अग्नीश्वर। ओंकारेश्वर भीमेश्वर। पूजा परम आदरेंसी
।।१०८।।

तीर्थ जें का कपिलधारा। तेथें आदरें स्नान करा। सवत्सगोदान द्विजवरा। द्यावें श्राद्ध करूनी
।।१०९।।

प्रल्हादेश्वर असंख्यातेश्वर । पूजून यावें सत्वर । स्नान करावा साचार । पंचगंगे कारणें
।।११०।।

अन्नपूर्णा धुंडीराज दंडपाणि। पूजून पंच पांडवां लागूनी। वंदोनियां परतोनी। यावें विश्वनाथालया
।।१११।।

।। श्लोक ।।
उत्तरमानसयात्रेयं यथावद्या मया कृता।
न्यूनातिरिक्तया शंभुः प्रीयतामनया विभुः ।।१।।

या मंत्राचा जप करून। वंदावे विश्वनाथाचे चरण। ऐसें काशीयात्राविधान। सांगितलें मी तुजलागी
।।११२।।

पुढें स्वर्गद्वारभुवनीं। गंगाकेशवा पूजूनी। पुन्हा मनकर्णिके लागुनी। यावें राया स्नानार्थ
।।११३।।

हविष्यान्नाचें भोजन। करावें पूर्व दिवशी जाण। प्रत्यहीं गंगा स्नान। प्रातःकाळीं करावें
।।११४।।

नहुषेश्वर रामेश्वर। वृषभेश्वर सिद्धेश्वर। ज्वालानृसिंह संगमेश्वर। पूजा परशुपाणि विनायका
।।११५।।

मंगलागौरी बिंदुमाधवा। गभस्तेश्वर वसिष्ठ वामदेवा । दंडपाणी आनंदभैरवा । वंदा मोक्षलक्ष्मीविलासा
।।११६।।

।। श्लोक ।।
जय विश्वेश विश्वात्मन् काशीनाथ जगत्पते।
त्वत्प्रसादात् महादेव कृता क्षेत्रप्रदक्षिणा ।।१।।
अनेक जन्मपापानि कृतानि मम शंकर।
गतानि पंचक्रोशात्मा कृतालिंगप्रदक्षिणा ।।२।।

दंपत्तेश्वर रत्नेश्वर । मणिकेश्वर चंद्रेश्वर । भूमेश्वर पर्वतेश्वर । ज्येष्ठेश्वर पंचकुंडीं
।।११७।।

लांगुलेश्वर मंदालेश्वर । चतुर्थीसी मयुरेश्वर । मोदकाचा साचार । नैवेद्य त्यासी दावावा
।।११८।।

पूजी शृंगारसौभाग्यगौरी । मंगळवारीं रविवारी । पूजा भैरवाची करी । सप्तमींसीं देवीपूजा
।।११९।।

नवमी अष्टमी कारण। चंडेश्वरीचें पूजन। कालभैरवा स्मरून। यात्रारंभ करी बा
।।१२०।।

ऐसें काशीखंड यात्रेचें। विधान ब्रह्मचाऱ्या सांगून साचें। तें अवधूत नांवाचे। योगी झाले गुप्त पहा
।।१२१।।

त्वष्टा ब्रह्माकुमार त्यापरी। सांग काशीयात्रा करी। जेणें प्रसन्न झाला मन्मथारी। नीलकंठ मृडानीवर
।।१२२।।

शंकर म्हणे ब्रह्मचाऱ्यास। मागे इच्छित वरास । झालों मी महेश। प्रसन्न बापा तुजलागीं
।।१२३।।

गुरुनें जें मागितलें। तें ब्रह्मचाऱ्यानें निवेंदिलें। श्रीशंकराकारणें भले । भक्तियुक्त होवोनियां
।।१२४।।

तथास्तु बोलला शंकर। तूं त्वष्टा ब्रह्मयाचा कुमार। अवघीं शास्त्रे कला थोर। येतील तुजला बापा रे
।।१२५।।

तुझ्या हाते होणार नाही। ऐसें त्रिभुवनीं न उरलें काहीं। या त्रिभुवनाच्या ठायीं। कर्तृत्ववान होशील
।।१२६।।

ऐसा ब्रह्मचारी वर लाधला। काशीक्षेत्रांमाजी भला। मग तो तेथून परत आला। भेटावया निजगुरुतें
।।१२७।।

केलें गुरुसीं साष्टांग नमन। म्हणे आपुल्या कृपें करून। मी पाहिला पार्वतीरमण। निजदृष्टीनें महाराजा
।।१२८।।

तुम्ही व तुमच्या परिवारें। जें कां मज मागितलें खरें। तें मी आणिलें आदरें। याचा स्वीकार करावा
।।१२९।।

गुरु बोलती त्यावर। मी जें मागितलें अभेद्य घर। याचें कारण साचार। हेंच आहे शिष्योत्तमा
।।१३०।।

चोळी पादुका घरकुल। हेहि त्यावर सकळ । तें सिद्ध कराया मानवबळ । न चाले येतुलेंहि
।।१३१।।

ईशकृपा ज्याचेवरी । तोच हे अवधें करी । तूं ईशकृपेनें भूमीवरी । विश्वकर्मा झालास
।।१३२।।

शक्याशक्यता तुज जवळीं। आतां किमपि न राहिली मुळीं। केलास आपुला चंद्रमौळी। काशीयात्रा करून
।।१३३।।

आतां सर्व पोंचलें मला। तें ऐकतां शिष्य धाला। ईशकृपा होण्याला। कारण आपुले पाय कीं
।।१३४।।

आपुली कृपा होती म्हणून। म्यां पाहिला पार्वतीरमण। ऐसें विनयें बोलून। चरण दोन्ही वंदिले
।।१३५।।

पहा गिरिजे गुरुभक्ती । श्रेष्ठ आहे केवढी अती। गुरुभक्ताच्या नांदती। अष्टसिद्धी अंगणांत
।।१३६।।

तीच कथा सायंदेवा। कथिली मी येधवां । जो अरुणोदय झाला बरवा। दिशा दाही उजळल्या
।।१३७।।

सायंदेव म्हणे गुरुसी। कोणीकडे गेली निशी । हें कांही न आपणासी। कळले कीं महाराजा
।।१३८।।

काशीयात्रेचे विधान। आपुल्या मुखें ऐकतां पूर्ण। त्यावेळी वाटे आपण। होतो काशींत तुम्हांसवें
।।१३९।।

आपुली माया अघटित। आपणचि आहां सर्वत्र। ऐसें म्हणून दंडवत । घालूं लागला वरच्यावरीं
।।१४०।।

।। श्लोक ।।
वाणीला नच वर्णवे सत असे तूं वेदवाणी खरी।
धाता तूं शिव तूंच रे प्रभुवरा तूं दानवारी हरी ।।
धाता तूं अवघ्या जनां पदनतां देतोस तूं सौख्य धाम ।
वंदोऽहं नरकेसरी-सरस्वती-श्रीपाद-युग्मांबुजम् ।१।

ऐसें गीर्वाणभाषेत। सायंदेवें रचिलें स्तोत्र। कंठ झाला सगदित । पुढे कांही न बोलवे
।।१४१।।

श्रीगुरु म्हणाले तयास। तूं पुण्यवान विशेष। तुझ्या एकवीसपिढीस। काशीयात्रेचें फळ मिळे
।।१४२।।

सायंदेवा आम्हापाशी । तूं रहावे अहर्निशी । न करावें म्लेंछासी । नमन तें तूं केव्हांहि
।।१४३।।

जा तुझा परिवार। येथें आण झडकर। माझी कृपा निरंतर । राहील तुझ्या वंशावरी
।।१४४।।

पुढें सायंदेव परिवारासहित। आला गाणगापुरांत। स्तुती केली कानडींत । भाद्रपद शुद्ध चतुर्दशीसी
।।१४५।।

ज्येष्ठ पुत्र काशीनाथ। स्वामीस करितां दंडवत । त्याच्या माथां वरदहस्त । ठेविते झाले श्रीगुरु
।।१४६।।

त्यासहि ते विधान। करिते झाले श्रीगुरुकथन। तूं म्लेंछा कारण। नमस्कार न करावा
।।१४७।।

वा सेवाहि न त्यांची करी। येथें रहा निरंतरी। पुत्रपौत्र तुझ्या उदरीं। सभाग्यसे निपजतील
।।१४८।।

आतां पुत्रादिकां घेऊन । जा संगमीं करा स्नान। मनोभावें करून। पूजा करा अश्वत्थाची
।।१४९।।

सायंदेवें तैसें केलें। पुन्हां मठामाजी आले। नृसिंहसरस्वतीस वंदिले। स्वामी आपला जाणोनियां
।।१५०।।

तै स्वामी म्हणती द्विजासी। आज अनंतचतुर्दशीसी। पूजा करावी अनंताची। निज कल्याण व्हावया
।।१५१।।

द्विज बोले त्यावर। आम्हां अनंत भूमीवर । आपले पाय साचार। आतां अन्य दैवत कशाला
।।१५२।।

श्रीगुरु म्हणती त्याप्रत। तूं म्हणसी हेंहि सत्य। परी आचरावें व्रत। व्रत इनकार करूं नये
।।१५३।।

पूर्वी कौंडिण्य महाऋषी। तेणें आचरिलें व्रतासी। तें मी सांगतो आज तुजसी। द्यावे अवधान कथेतें
।।१५४।।

धर्मराजा युधिष्ठिर । पंडूराजाचा कुमार । बैसला कौरवाचे बरोबर । द्यूत खेळाया कारणें
।।१५५।।

द्यूतें राज्य हरविलें । तें कौरवांनीं घेतलें। धर्मराजा हाकलून दिलें। बंधूसहित काननांत
।।१५६।।

वनवास भोगी युधिष्ठिर। असून राजाचा कुमार। त्याचा घ्यावया समाचार। श्रीकृष्ण तेथें पातला
।।१५७।।

प्रभूस पाहतां चित्त धालें। पांची पांडव शरण आले। द्रौपदीनें भाषण केलें। कृपानिधीस येणेंरिती
।।१५८।।

देवा तुझ्या सारिखा। असून आमचा पाठीराखा। हा वनवासयोग यावा कां। नंदनंदनां आम्हांप्रती
।।१५९।।

कौरव राज्यातें भोगिती। तुझे भक्त वनीं असती। कुलस्त्रिया भीक मागती। वैभव भोगिती वारांगना
।।१६०।।

तूं पांडवा मानिशी प्राण। आणि करशी त्यांचें दैन्य। हें कां थोरांचे लक्षण। ऐसें पांडव बोलले
।।१६१।।

ऐसें बोलणें ऐकून। ओळंगला नारायण। तुम्हां राज्यप्राप्तीकारण। व्रत हे सांगतों युधिष्ठिरा
।।१६२।।

अनंतव्रत नाम ज्याचें। मीच दैवत जयाचें। अणु-परमाणू महीचे। मीच अवघे व्यापिलें कीं
।।१६३।।

हे अनंतव्रत आचरितां। राज्य पावशील पंडुसुता। पूर्वी सुमंतु नामें द्विज होता। वशिष्ठगोत्रीचा ज्ञानवान
।।१६४।।

भृगुकन्या दीक्षा त्याची । उदार पतिव्रता शुची । प्रीति परस्परांची । होती धर्मा अनुपम
।।१६५।।

एक कन्या झालीं त्याला। नाम जिचें होय सुशीला। नामाप्रमाणें कृतीला। ती करी अहर्निशी
।।१६६।।

सुमंतूचें दैव ओढवले। कलत्र त्याचे मरून गेलें। म्हणून लग्न दुसरें केले। भार्या कर्कशी लाधली
।।१६७।।

ती नावांप्रमाणे होती। दुष्ट द्वेषी क्रूर अती। सापत्नकन्या सुशीलेवरती। प्रेम न करी अणुमात्र
।।१६८।।

उपवर होतां कन्यका। ती कौंडिण्यऋषीस दिली देखा। त्या कौंडिण्यरूप ज्ञानार्का। किती म्हणून वानावें
।।१६९।।

कौंडिण्य श्वशुरगृहीं। दोन मास राहिला पाहीं। मनी जळफळे सासूबाई। कन्या जामात पाहतां
।।१७०।।

जेथें सापत्न प्रकार। तेथें ऐसें होणार। म्हणून कौंडिण्य जोडून कर। विनवू लागला श्वसुरासी
।।१७१।।

श्वशुर म्हणे जामातास। आणिक रहा तेरा दिवस। गेले आषाढ श्रावण मास। तैसेच दिन हे जातील
।।१७२।।

सर्वसिद्धा त्रयोदशीशीं। तुम्ही करावें गमनासी। एवढ्या माझ्या विनंतीसी। माना, नाहीं म्हणू नका
।।१७३।।

तें कौंडिण्यानें मानिलें। तेरा दिवस राहिलें। त्रयोदशीस स्नान केलें। निघाला कांता घेऊन
।।१७४।।

सुमंतु म्हणे भार्येसी । कन्या जाते सासरासी । शिदोरी बांधून तिशी । पथे पुरेल ऐशी दे
।।१७५।।

तें ऐकतां कर्कशी। गेली स्वयंपाकघरासी। बंद करोनी द्वारासी । आडवा पाटा लाविला
।।१७६।।

तो पाहतां प्रकार। सुमंतू मनी व्याकूळ फार। म्हणे पूर्व जन्मीचें साधण्या वैर। ही कांता झाली मम
।।१७७।।

गोधूमकोंडा येथे होता। तो बांधून दिला तत्त्वता। कन्या जामात दंडवता। करून निघाली जाण्यास
।।१७८।।

तो भाद्रपद चतुर्दशीसी। कौंडिण्य आला सरिता तटासीं। बैसला अनुष्ठानासी। स्नान करून सरितेचें
।।१७९।।

तो तया नदीवर । सुवासिनी आल्या फार । नेसोनिया रक्तांबर । पूजनासी बैसल्या
।।१८०।।

सुशीला जाऊन त्यांचे जवळी । ऐसें विनवू लागली । किंनिमित्त आरंभिली । तुम्ही सांगा ही पूजा
।।१८१।।

सुवासिनी म्हणती तीस। आम्ही पूजितों अनंतास। या व्रतप्रभावें आम्हांस। सुख सौभाग्य लाथें की
।।१८२।।

सुशीला म्हणे हैं व्रत। सांगा तुम्ही मजप्रत। बायांनो विधानासहित। मीहि करीन आज तें
।।१८३।।

ऐसें वचन ऐकतां क्षणीं। बोलूं लागल्या सुवासिनी। भाद्रपदशुद्ध चतुर्दशीदिनी। या व्रतासी आचरावें
।।१८४।।

प्रातःकाळीं उठोन। सचैल करावें स्नान। जलाशयीं जाऊन । दोन कलश भरावे
।।१८५।।

ती गंगा यमुना कल्पोनी। स्थापन करावे कलश दोन्हीं। वरी पंचपल्लवा घालोनी। शेष करावा दर्भाचा
।।१८६।।

सप्तफणीचा करून शेष। स्थापन करावा ताम्हनास। त्यावरी रक्तदोरकास। अनंत म्हणून स्थापावा
।।१८७।।

षोडशोपचारें पूजा करावी। अपूपाची वायनें द्यावी। ज्या अपूपी असावी। घृत शर्करा गोधूम
।।१८८।।

अर्धं ब्राह्मणासी द्यावें। अर्धे आपण भक्षावें। ऐसें व्रत करावें। चौदा वर्षेपर्यंत
।।१८९।।

पुढें व्रताची सांगता। करावी ती तत्त्वता। त्या त्या सर्व कामना पुरविता। होईल की भगवंत
।।१९०।।

मर्जी असल्या तूंहि करी। व्रत आमुच्या बरोबरी। ऐसें म्हणून तंतू करी । दिधला एक सुशीलेच्या
।।१९१।।

हा तंतू नव्हे श्रीहरी अनंत। प्रत्यक्षच आहे सत्य। आम्हांसवें करी व्रत। ये वेळ करूं नको
।।१९२।।

सुशीलेनें व्रत केलें। गोधूम कोंड्याचे वाण दिले। अवघ्या सुवासिनीसी केलें। अष्टांगेसी नमन तिनें
।।१९३।।

मग भ्रतारासमवेत। निघाली बसून रथांत। यापुढील अवधें वृत। पुढील अध्यायी ऐकावें
।।१९४।।

सिद्ध म्हणे नामधारका। व्रतप्रभाव पुढें ऐका। कौंडिण्यऋषी आक्रमी देखा। मार्ग आपुल्या भार्येसह
।।१९५।।

स्वस्ति श्रीगुरुचरित्रसारामृत। सदा ऐकोत भाविक भक्त। हेंच विनवी जोडून हात। विठ्ठलासी दासगणू
।।१९६।।

।। इति द्वादशोध्यायः ।। शुभंभवतु ।।

।। श्रीदत्तात्रेयार्पणमस्तु ।। श्रीहरिहरार्पणमस्तु ।।

卐 卐 卐 卐 卐

इति अध्याय समाप्तः