।। श्रीगणेशाय नमः ।।
हे ब्रह्मांडाधीशा करुणाकरा। श्रीराहीरुक्मिणीवरा। हे भीमातटविहारा। प्रसीद मशी पांडुरंगे
।।१।।
सिद्ध म्हणे नामधारकासी। सुशीला आणि कौंडिण्य ऋषी। क्रमीत असतां पथासी। अपूर्व ऐसें वर्तले
।।२।।
अमरावती नामें नगर । होतें भव्य सुंदर । त्या ग्रामीचे नारी नर । सामोरे आले कौंडिण्या
।।३।।
उभयतांसी पाहून। लोक करिती साष्टांग नमन। म्हणती राजें झाला आपण। आजपासून आमचे
।।४।।
त्यांनी तो कौंडिण्यऋषी। मिरवीत नेला संभ्रमेसी। स्थापिला सिंहासनासी। अमरावतीचा नृप म्हणून
।।५।।
संपत्ती लाधली अपार । सेवेस राहती तत्पर। दासदासी निरंतर । परम झाला भाग्यशाली
।।६।।
यासी कांही दिवस लोटले। पुढें ऐका काय झाले। कौंडिण्याने पाहिले। कांताकरींच्या अनंताला
।।७।।
कौंडिण्य म्हणे पत्नीकारण। हें काय ठेविले बांधून। सूत जें कां रक्तवर्ण। हैं आधीं सांगावें
।।८।।
सुशीला म्हणे प्राणेश्वरा। हा अनंताचा होय दोरा। या अनंतकृपेनें खरा। विभवलाभ झाला असे
।।९।।
कौंडिण्य म्हणे हें न सत्य। मी तप केले अमित। तत्प्रसादें झालें प्राप्त। राज्यवैभव मजलागी
।।१०।।
वशीकरण आम्हांसी। तूं केलेस निश्चयेसीं। म्हणून हा करासी। दोरा ठेविला बांधून
।।११।।
कौंडिण्य ऐसें बोलला । कांताकरीचा तोडला। दोरा अग्नींत फेंकिला। तेणे सुशीला बहु भ्याली
।।१२।।
तिनें लगेच अग्नींतून। घेतला दोरा उचलून । दुधामाजी भिजवून। निर्भय स्थानी ठेविला
।।१३।।
त्या योगें ऐसें झालें। कौंडिण्याचें राज्य गेलें। अठराविश्वीं दारिद्रय आलें। एका क्षणामाझारीं
।।१४।।
राज्य गेलें धन गेलें। वस्त्र प्रावरण सर्व गेले। गृह तेंहि जळालें। अनंताच्या कोपांने
।।१५।।
मग तो कौंडिण्य ऋषी। निघता झाला काननासी। घेऊन आपल्या भार्येसी। अनुताप करी क्षणक्षणां
।।१६।।
म्हणे अनंत भेटल्यावीण। मी नाही घेणार अन्न। विचारी ज्या त्या लागून। तुम्ही अनंत पाहिला कां
।।१७।।
तों आम्रतरू पाहिला। फलपर्णानें पूर्ण भरला। पक्षी कीटक न खाती त्याला। तेणे आश्चर्य झालें
।।१८।।
कौंडिण्य त्या वृक्षासी। पुसे जाऊन आदरेसीं। तूं पाहिलें कां अनंतासीं। हें मज सांग वृक्षराजा
।।१९।।
पुढें सवत्स धेनू पाहिली। तृण तिच्या न ये तोंडी मुळीं। तिजलाही विचारिली। अनंताची शुद्धी पाहा
।।२०।।
पुढे वृषभासीं विचारिलें। तूं अनंता पाहिले। किंवा नाही सांग भलें। तैसेंच विचारी सरोवरा
।।२१।।
ती सरोवरे होती दोन। युक्त कमलादिकें करून। परी त्यांचें जीवन। कोणीहि न सेविती
।।२२।।
पुढे गर्दभ कुंजर। यांसी विचारला समाचार। परी त्यांनी न दिले उत्तर। मग तो द्विज काय करी
।।२३।।
अनंताच्या दर्शनार्थ। कौंडिण्य साहस करी अत्यंत। करून घ्याया प्राणांत। नामधारका ! सिद्ध झाला
।।२४।।
हे अनंता जगन्नाथा। जरी न भेटसी लक्ष्मीकांता । तरी त्यागितो प्राण आतां। तुझ्यासाठी दयानिधें
।।२५।।
ऐसें वढूनी अंग टाकिलें। कौंडिण्याने महीसी भलें। तो वृद्धब्राह्मणाच्या वेषे आले। श्रीअनंत ते ठायीं
।।२६।।
हां हां हे ब्राह्मणा। नको पाहूं त्यजू प्राणा। चल मी अनंतनारायणा । तुजलागीं दावितों
।।२७।।
ऐसें बोलून कंदरीत। नेले त्याचा धरून हात। रूप दाविलें त्याप्रत । शंखचक्र गदाधारी
।।२८।।
रूप देखून कौंडिण्य ऋषी। सद्भावें लागला पायासी। म्हणे हे सच्चिदानंदा ऋषीकेशी। तूं वरेण्य यज्ञपुरुषा
।।२९।।
तूं ब्रह्मदेव चतुरानन। तूं महादेव उमारमण। तूं अनंत विष्णु नारायण। जगजनार्दन तूंच कीं
।।३०।।
कौंडिण्यस्तुतीनें भला। श्रीअनंत मनीं तोषला। वरत्रय देता झाला। लक्ष्मीपती कौंडिण्याते
।।३१।।
ज्या वरें करून। कौंडिण्य झाला संपन्न । हे अनंतव्रताचे महिमान । सर्व व्रतीं श्रेष्ठ असे
।।३२।।
कौंडिण्य पुसे देवासी। मी मार्गी पाहिलें ज्या वृक्षासी। त्याच्या फळ पुष्पासी। कोणी न खाती हे काय
।।३३।।
मग बोलला अनंत। तूं जो वृक्ष पाहिला पंथात । तो पूर्वजन्मीचा द्विज सत्य। महापंडित होता कीं
।।३४।।
त्यानें विद्या आपुलीं। कोणास नाहीं शिकविली। म्हणून त्यास पाळी आली। वृक्ष होण्याची ये जन्मीं
।।३५।।
वृषभ जो कां पाहिलासी। तो धनिक होता बहुवशी। दान न केलें परासी। म्हणून पावला वृषभ जन्म
।।३६।।
सरोसरें जी पाहिलीं नयनीं। त्या दोघी होत्या बहिणी बहिणी। त्या दोघीजणींनी। दान घेतलें आपसात
।।३७।।
त्याच झाल्या सरोवर । इहजन्मी साचार। जो तूं मार्गी देखिला खर। तो क्रोध तुझ्या ठायीचा
।।३८।।
कुंजर जो कां भेटला। तो तवांगीचा मत्सर भला। पुढें ब्राह्मण जो कां पाहिला। तोच प्रत्यक्ष असे मी
।।३९।।
आतां तुझे दुर्दैव सरले। अखिल ऐश्वर्य भोगशील भलें। स्वर्गी स्थाना ठेविलें । तुजलागी पुनर्वसु
।।४०।।
ऐसें बोलता अनंत। कौंडिण्य घाली दंडवत । वराप्रमाणें अवघे प्राप्त। झालें त्यासी युधिष्ठिरा
।।४१।।
ऐशी कथा धर्मासी। सांगता झाला ऋषीकेशी। या योगे पांडवासी। राज्य प्राप्त झालें
।।४२।।
म्हणून द्विजवरा त्या व्रतासी। तूं करावें आदरेंसी। ऐसें गाणगापुरासी। श्रीगुरु सांगते झाले
।।४३।।
अरे हे अवघ्या व्रतात। श्रेष्ठ आहे अत्यंत । हैं जो करी तयाप्रत । पुरुषार्थ चारी साधती
।।४४।।
गुरुच्या आज्ञेकरून भलें। द्विजें व्रत आचरिलें। ज्या व्रतप्रभावें लाधले। गुरुचरण वंशोवंशी
।।४५।।
सायंदेवाकारण। ऐसे लाधले श्रीगुरुचरण। आतां पुढील कथा करी श्रवण । नामधारका आदरेसी
।।४६।।
श्रीगुरु असतां गाणगापुरी। गोष्ट ऐसी घडली खरीं। एक तंतुकार निर्धारीं। भक्त होता सद्गुरूचा
।।४७।।
त्याच्या घरचे अवघे जन । निघाले मल्लिकार्जुनालागून। शिवरात्रपर्व लक्षून। यात्रा कराया कारणें
।।४८।।
माता पिता भ्राता स्वजन। म्हणती तंतुकारालागून। चल घेऊं दर्शन। श्रीमल्लिकार्जुनाचे
।।४९।।
विणकर म्हणे तयासी। मी न येई पर्वतासी। माझा मल्लिकार्जुन ज्ञानराशी। येथें नृसिंहसरस्वती
।।५०।।
शैल पर्वत गाणगापूर। मठ हाच मंदिर। नृसिंहसरस्वती यतिवर। मल्लिकार्जुन माझे पै
।।५१।।
ऐसें ऐकतां लोक हासलें। म्हणे या तंतुकारा लागले। वेड स्वामींचे आगळें। हा न आतां शुद्धीवरी
।।५२।।
स्वजन गेले यात्रेसी। त्या शैलपर्वतासी। विणकर गाणगापुरासी। श्रीगुरुपाशीं राहिला
।।५३।।
आली शिवरात्र अखेर। स्वामी होते संगमावर । तो स्नानास आला विणकर। हें त्यांनी पाहिलें
।।५४।।
स्वामी नृसिंहसरस्वती । विणकारासी बोलती। कां न गेलास यात्रेप्रती । शैलपर्वता आप्तांसह
।।५५।।
तैं विनयें बोले विणकर । कशास जाऊं इतका दूर । मजला क्षेत्र गाणगापूर । शैलपर्वतासी की
।।५६।।
आपण माझे मल्लिकार्जुन। चंद्रमौळी पार्वतीरमण। गुरुराया तुम्हांवाचून। दैवत मशीं आन नसे
।।५७।।
लोक माझे भ्रमित झाले । खरें टाकून यात्रेस गेले। पाषाण पूजावया भले। कळून आले दैवहीन
।।५८।।
तो शिवरात्रीचा होता दिवस। सूर्य आला माध्यान्हीस। तैस्वामी विणकरास। ऐशा रीती बोलले
।।५९।।
चल आपण पर्वतास जाऊं। मल्लिकार्जुनाप्रती पाहूं। शिवरात्रीस दर्शन घेऊं। चंद्रमौळी हराचें
।।६०।।
ये पादुका घट्ट धरी। दृष्टी झाकून घेई खरी। क्षणांत जाऊं पर्वतावरी। मानी प्रमाण वचन हैं
।।६१।।
विणकरानें तसें केलें। श्रीगुरुचे पाय धरिलें। एका घटकेत दोघे आलें। श्रीशैलपर्वतासी
।।६२।।
शिवरात्रपर्वां निमित्त । गजबजून केला पर्वत। लोक जमले असंख्यात । दर्शन घ्यावया हराचे
।।६३।।
इकडे पाताळगंगेवरी। श्रीगुरु प्रगटलें सत्वरी। तों विणकरानें आपली सारी। मंडळी देखिली ते ठाया
।।६४।।
आप्त म्हणती विणकरास। तूं केव्हां निघालास। येण्या शैल्यपर्वतास। गाणगापुराहून सांग तें
।।६५।।
विणकर बोले मधुरोत्तरी। एक घटका झाली खरी। मी स्नान करून संगमावरी। स्वामीसह येथे आलों
।।६६।।
आप्त म्हणती अजिबात। हें खोटे आहे भाषण सत्य। तूं आलास लपत लपत। आमच्या सवेच ये ठाया
।।६७।।
आम्हां लागले पंधरा दिवस। येण्या या पर्वतास। ऐसें असतां तुम्हास। एक घटका लागली कशीं
।।६८।।
म्हणू लागला विणकर। मी असत्य न बोले साचार। श्रीगुरुचा अधिकार। तुम्हीं न मुळी जाणिला रें
।।६९।।
स्वामी नृसिंहसरस्वती। हे मल्लिकार्जुन निश्चिती। जग हेंच त्याची असे मूर्ती। तेथें संदेह कशाचा
।।७०।।
श्रीगुरु बोलले विणकरा। जा आतां करी क्षौरा। स्नानदानादिक प्रकारा। सशास्त्र आतां आचरावें
।।७१।।
विणकरानें केले क्षौर। तया पाताळगंगेवर। स्नान करून अखेर। गेला दर्शना शिवाच्या
।।७२।।
मंदिरीं लिंगस्थानी। स्वामीशीच पाहिलें नयनी। हृदय आलें भरूनी। दंडवत घाली क्षणाक्षणा
।।७३।।
फुलें बेल चंदन। करून स्वामीशी अर्पण। प्राकारा प्रदक्षिणा घालून । आला पुन्हा स्वामीकडे
।।७४।।
तंतुक म्हणे स्वामीला। मी लिंगस्थानी आपणाला। पाहिलें खचित मंदिराला। या दृष्टीनें खचित
।।७५।।
आपलीच पूजा केली। आपण मल्लिकार्जुन चंद्रमौळी। ऐसें असून घातली। कां ही भुरळ लोकांते
।।७६।।
जो तूं आहेस गाणगापुरीं। तो तूंच या पर्वतावरी। मग कां हो आणले येथवरी। काय या महिमा स्थानाचा
।।७७।।
ऐसें ऐकता स्वामी हसले। स्थानमाहात्म्य तुशी ना कळलें। अरें येथे कृतार्थ झाले। जना पार नाहीं मिती
।।७८।।
पूर्वी किरातदेशाकारण। राणा होता विमर्षण। शूद्रापरी आचारहीन । वाटेल ते करितसें
।।७९।।
परी शिवपूजेवरी। प्रेम होतें त्याचें भारीं। येतां शिवरात्रपर्वणी खरी। हर्ष होई चित्तांत
।।८०।।
कुमुद्वती त्याची कांता। सुशील पाहा पतिव्रता। ती म्हणे आपुल्या चित्ता। पती करी शिवभक्ती
।।८१।।
आणि पाहतां वर्तन। करी परदारागमन । भक्ष्याभक्ष्याचें बंधन। मुळी कांही न राहिलें
।।८२।।
धीर करून एके दिवशी । विचारती झाली पतीसी। दुष्टवासना मानसीं। कां जागृत तुमच्या राहे
।।८३।।
ऐसें ऐकतां कांतावचन। बोलला राजा विमर्षण। भार्ये पूर्वजन्मीचें दारुण। दोष येती आडवे हे
।।८४।।
मी पूर्वजन्मी धनगराघरी। श्वान होतो दुराचारी। होतें एक तया नगरीं। भव्य मंदिर शंकराचें
।।८५।।
शिवरात्र पर्वणीस। लोक मिळाले मंदिरास। करण्या शिवपूजनास। नर नारी मुलांसह
।।८६।।
मीहि खाया मिळेल कांही। म्हणून गेलों ते ठायी। मंदिरामाजी लवलाही। भक्ष्याचिया आशेनें
।।८७।।
मज पाहतां कुद्ध जाहले। लोक मारूं लागले। कित्येक काठ्या घेऊन आले। जीव माझा घ्यावया
।।८८।।
पळावयास जागा नाही। लोक उभे ठायीं ठायीं। दैवगतीने मजला पाही। घडल्या तीन प्रदक्षिणा
।।८९।।
कांते प्राकारा भीतरी। मी शिवपूजा पाहिली खरी। अनंत शस्त्रांचे शरीरी। प्रहार माझ्या झाले कीं
।।९०।।
करें लोकांनी धरून । मशीं दिले फेकून । गेला प्राण निघून । शिवालयाच्या समोरी
।।९१।।
त्याच पुण्यें भार्ये मला। हा नृपदेह लाधला। परी श्वानवृत्तीचा न झाला। लोप अजून रंभोरू
।।९२।।
कुमुद्वती बोले त्यावरी। कर जोडून अत्यादरी। आपल्यापरी सांगा सारी। पूर्वजन्मींची माझी कथा
।।९३।।
फार बरें म्हणून। सांगता झाला विमर्षण । तूं पूर्वजन्मालागून। कपोती पक्षीण होतीस
।।९४।।
निज उदर भरावयाला। एके काळी मांस गोळा । धरून आपल्या चोंचीला। उडालीस गगनोदरी
।।९५।।
तुज पाहून एक घार। मागें उडाली साचार। फिरत फिरत शैल्यपर्वतावर । पातलां तुम्हीं दोघीही
।।९६।।
तुझ्यापेक्षा घारीचा। वेग बलवत्तर पळण्याचा। इच्यापुढे वेगाचा। पाड तुझ्या कांही नसे
।।९७।।
पळतां पळतां गगनोदरी। तूं बसलीस कळसावरी। मल्लिकार्जुनाच्या निर्धारी। विश्रांतीच्या आशेने
।।९८।।
तुझें बसणें व्यर्थ झालें। घारीनें तुज मारिलें। पंचप्राण निघून गेले। पुनीतशा शैल्यपर्वती
।।९९।।
त्या पुण्यें करून। तुज लाधलें राणीपण। पहा शैल्यपर्वताचे महिमान । श्रेष्ठ आहे केवढें
।।१००।।
कुमुद्वती म्हणे प्राणनाथा। ऐशी पुढील सांगा कथा। ती सर्व ऐकण्याकरितां। आतुर बहू झाले मीं
।।१०१।।
जन्म माझे आणि तुमचे । पुढें किती होणार साचे। अखेर परमेश्वराचे। पाय कधीं दिसतील
।।१०२।।
पुढील जन्मी सिंधूदेशी। मी जन्मेन नृपवंशी। माझी भार्या तूंच होशी। संजयनृपाची कन्या
।।१०३।।
पुढे सौराष्ट्र देशांत। मी होईन नृपनाथ। तूं कलिंग राजवंशांत। येऊन वरशील मजलागी
।।१०४।।
गांधारदेशी नंतर। मी होईन नृपवर । तूं माधवकुलीं जन्मून कर। माझा धरशील बोहल्यावरी
।।१०५।।
अवंतीदेशी पांचवा । जन्म होईल माझा बरवा । तुज लागेल घ्यावा । जन्म दशार्णवकुलांत
।।१०६।।
सहाव्या जन्मीं अनंत। नामें मी होय नृपनाथ । तूं ययातीचे कुलांत । जन्मूनियां वरशी मला
।।१०७।।
पांड्यराजा सातवे जन्मी । मी होईन या नियमीं । पद्मवर्णा नामी । मजसी मिळेल तेधवां
।।१०८।।
तू वैधर्भकुळांत। जन्मून वरशी मजप्रत। सुमती ऐसें नाम येथ। तुजलागीं मिळेल कीं
।।१०९।।
ते जन्मी आपणासीं । मोक्षप्राप्ती निश्चयेसी । जाऊं उभयता कैलासी । गादीस स्थापून पुत्राते
।।११०।।
ऐसा शैल्यपर्वताचा महिमा। अगम्य असे निगमागमा। मल्लिकार्जुन दे विरामा। पदनतांकारणें
।।१११।।
तंतुका म्हणती गुरुवर । ऐसा स्थानमहिमा साचार। जो गाणगापुरी कल्लेश्वर । आहे तो हाच कीं
।।११२।।
पूजा संगमेश्वरासी। जो करी अहर्निशी। तो प्राणाहून शिवासी। प्रिय होईल वत्सा रे
।।११३।।
ऐसें ऐकता भाषण। तंतूक म्हणे स्वामीकारण। अवघा तूंच दयाघन। आतां न उगे चाळवी
।।११४।।
नामधारका पहिल्यापरी। कृती ती करून खरी। तंतुकासह गाणगापुरी। स्वामी येते झालें
।।११५।।
स्वामी नृसिंहसरस्वती। राहते झाले संगमावरती । तंतुकाला मठाप्रती। धाडिले शिष्य बोलाविण्या
।।११६।।
मठाप्रती जाऊन । तंतूक अवघ्यालागून। सांगता झाला वर्तमान। मल्लिकार्जुनाचे साक्षेपें
।।११७।।
तें ऐकता चकित झाले। लोक संगमी धावून आलें। श्रीगुरुला वंदिले। मल्लिकार्जुन म्हणूनी
।।११८।।
स्वामी नृसिंहसरस्वतीची। पूजा अवघ्यांनी केली साची। नामधारका पुढती। कथा ऐक अभिनव
।।११९।।
नंदी नामे ब्राह्मण। श्वेतकुष्ठ व्याधी जाण। भरली जया कारण। बहुसाल केली औषधे
।।१२०।।
परी गुण नाहीं आला। नंदी ब्राह्मण कंटाळला । तुळजापुरालागी गेला। अनुष्ठान ते करावया
।।१२१।।
तीन वर्षेपर्यंत । पुरश्चरण केले तेथ। उपवासी राहून सत्य । परी न अंबा पावली
।।१२२।।
असो शिष्या एके दिनी। त्या तुळजापूरपट्टणी। स्वप्नी आली हिमनगनंदिनी। अंबिका प्रभातसमयाला
।।१२३।।
स्वप्नी सांगे पार्वती। तूं येथून जावे सत्वरगती। चंदला परमेश्वरी ज्योत जागती। आहे हल्ली कलींत
।।१२४।।
तियेपाशीं शीघ्र जावें। अनुष्ठाना आचरावें। तुझे कार्य होईल बरवे। संशय मनीं वाहू नको
।।१२५।।
ऐशी आज्ञा झाल्यावरी। नंदी निघाला सत्वरी। श्रीचंदला परमेश्वरी। पाहिली त्याने अखेर
।।१२६।।
देवीपाशीं अनुष्ठान। करिता झाला ब्राह्मण। सात मास उपोषण। केले त्यानें अत्यादरें
।।१२७।।
जैसी मागे तुळजापुरीं। आज्ञा झाली त्यास खरी। येथे झाले त्याच परी। ते ऐक सांगतों
।।१२८।।
परमेश्वरी स्वप्नांत । येऊन ऐसें सांगत । म्हणे गाणगापुरांत । तुवां जावें अनुष्ठाना
।।१२९।।
तुझी व्याधी दुर्धर । तूं पापांचा सागर । येथें न होईल परिहार । जा अमरजासंगमातें
।।१३०।।
तेथे नृसिंहसरस्वती। स्वामी साक्षात् दत्तमूर्ती। जे मानवदेहीं जरी दिसती। तरी साक्षात् ब्रह्म बापा
।।१३१।।
त्यांची कृपा झाल्यावर । तुझा रोग होईल दूर। त्यांना भूमितलावर। अशक्य न कांही राहिलें
।।१३२।।
ऐसें स्वप्न पाहतांक्षणी। ब्राह्मण उठला खडबडोनी। देवीस पाणि जोडुनी। बोलता झाला येणेरितीं
।।१३३।।
वाहवा गे अंबिके। हे जगत्त्रयाचे पालिके। भाषण केलें कौतुकें। मशी वाटे येधवां
।।१३४।।
तूं जगत्रयाची स्वामिनी। तुझ्याहून मानवप्राणी। श्रेष्ठ कैसा होईल जनी। कोठें हिरा कोठे गार
।।१३५।।
जगज्जननी नांव सोड। तुझी कळली आम्हां खोड। कांही तरी करून आड। लपून बसाया पाहसी
।।१३६।।
ऐसें नंदीनामा ब्राह्मण। बोलता झाला हट्ट धरून। तैं देवीने भोप्यालागून। स्वप्नीं दृष्टांत दिधला
।।१३७।।
तुम्ही उद्यां या नंदीसी। येथून हांकावें निश्चयेसी। त्यानें माझ्या दर्शनासी। मुळीं आतां येऊ नये
।।१३८।।
भोपे म्हणाले नंदीला। तूं सोडून जाई या स्थानाला। कां कीं तुझा फार आला। राग जगदंबेकारण
।।१३९।।
ऐसा निरुपाय झाल्यावरी। नंदी आला गाणगापुरी। गेला मठाभीतरी। स्वामीचिया दर्शनास
।।१४०।।
दुरुनि केला नमस्कार। म्हणे स्वामी मजवर । कृपा करा हो सत्वर। या मी जीविता कंटाळलो
।।१४१।।
श्रीगुरु म्हणती तयासी। जगदंबा सोडून मानवासी। कां रे शरण आलासी। येथे कां कार्य होणार
।।१४२।।
तैं नंदी म्हणे गुरुनाथा। आतां न सत्व घेई वृथा। म्यां तुझी योग्यता। खचित नाही जाणिली
।।१४३।।
अंबा बोलली तुळजापुरी। तेवी चंदला परमेश्वरी। कीं तूं येथून गाणगापुरीं। जाई श्रीगुरुदर्शना
।।१४४।।
तेथें कार्य होईल । कोड तुझें जाईल। परी संशयाचा कल्लोळ । उठला माझ्या मानसी
।।१४५।।
आतां हीच विनंती। स्वामी नृसिंहसरस्वती । तूं साक्षात् दत्तमूर्ती। माझी उपेक्षा करूं नको
।।१४६।।
मग सोमनाथा बाहून। सांगते झाले दयाघन। यातें संगमी नेऊन । पुष्करणीवरी स्नान घाला
।।१४७।।
अश्वत्थासी प्रदक्षिणा। घालून यासीं मठात आणा। दूर जुन्यां वस्त्रांना। टाकून द्या संगमासी
।।१४८।।
नवीं वस्त्रे देऊन । यांसी नेसण्याकारण । यावें मठांत घेऊन । करायासी पारणा
।।१४९।।
सोमनाथें तैसें केले। नंदीला संगमी नेले। पुष्करणीवरी घातलें। स्नान संकल्प करूनियां
।।१५०।।
तीर्थांमाजी करितां स्नान। कोड गेले निघून। नवीं वस्त्रे नेसून । घातल्या प्रदक्षिणा अश्वत्था
।।१५१।।
जुनी वस्त्रे तेथे सोडिली। तेथील क्षारयुक्त झाली। मेदिनी, एका क्षणांत भली। आश्चर्य झालें सकळिकां
।।१५२।।
नंदी आणिला मठासी। तो नमन करी आदरेसी। स्वामीचिया चरणासी। सद्भाव पोटी धरून
।।१५३।।
म्हणे स्वामीं कोड गेले। अंग अवधेंचें बरें झालें। परी थोडें राहिले। आहे या पोटरीवरी
।।१५४।।
स्वामी म्हणाले नंदीसी। तूं संशय धरून आलासी। म्हणून गोष्ट घडली ऐसी। उपाय त्याते सांगतो
।।१५५।।
कवित्व ईश्वरस्तुतीचें। तूं येथे करावें साचे। कोड जाईल पोटरीचे। संशय कांही धरू नको
।।१५६।।
नंदी म्हणे मी मंदमती। कवित्व करूं कोण्यारिती। नाहीं मुळी काव्योत्पत्ती। मजलागी महाराजा
।।१५७।।
ऐसें ऐकता सदुरू बोलले। तोंड तुझे उघडी वहिलें। हें मी भस्म टाकितों भलें। तुझ्या बापा जिव्हेवरी
।।१५८।।
तेणें कवित्व येईल। कोड सर्व जाईल। मोक्ष तोहि साधेल। अखेर चिंता न करी
।।१५९।।
जिव्हेवरी पडतां विभूती। नंदी करू लागला स्तुती। हे स्वामी नृसिंहसरस्वती। तूं जगाचा जगदाधार
।।१६०।।
हाय हाय आजवर। मी न केला विचार। दुःख भोगिलें अपरंपार। गर्भवास नानापरी
।।१६१।।
मातेच्या गर्भात। शोणित आणि पितृरेत। कढून एके ठायी होत। बुद्बुदाकार दिवस पांच
।।१६२।।
पिंड होय एकमासी। शिर पाय द्वितीयमासीं। पूर्णता अवघ्या अवयवांची। तृतीयमासीं होतसे
।।१६३।।
पंचत्वाचें एकीकरण। चतुर्थ मासांलागून। रोम त्वचें कारण। पूर्णत्व पांचवे मासीं असे
।।१६४।।
सहावें मासीं पवन । सातवे मासीं जिव्हा घ्राण। मेद-मज्जाचे दृढीकरण। होय आठवे मासांत
।।१६५।।
नऊ महिने ऐशा परी। कष्टलों गर्भामाझारी। योनीमार्गे बाहेरी। आलों स्वामी अखेर
।।१६६।।
बाळपणीं कष्ट भोगले। तारुण्य विषयांत गेलें। परी नाहीं आठविले। स्वामी तुझ्या चरणाते
।।१६७।।
ऐशी स्तुती कवित्वांत। करितां तोषले श्रीगुरुनाथ। पहा आतां पोटरीप्रत। कोड गेलें कीं नाही ते
।।१६८।।
नंदी पाहे पोटरीसी। तों कोड गेलें निश्चयेसीं। श्रीगुरुच्या वचनासी। बाध कैसा येईल
।।१६९।।
कोड गेलेले पाहतां। नंदी हर्षला सर्वथा। तुझी योग्यता सद्गुरुनाथा। नाही कोणा येणार
।।१७०।।
मग स्वामी नृसिंहसरस्वती। अवांतरां ऐसे म्हणती। तुम्ही आज पासून याप्रती। कवीश्वर म्हणा नंदीते
।।१७१।।
गुरुचरित्र अगाध ऐसें। कोठेंच त्याची तुलना नसे। भाग्य ज्याचे विशेष असे। त्यांसीच हे प्राप्त कीं
।।१७२।।
कवी नृसिंह नामे दुसरा । झाला एक साजिरा। तो कथाभाग पुढारा। तुशी निवेदन करीन
।।१७३।।
स्वस्ति श्रीगुरुचरित्र सारामृत। सदा परिसा हो प्रेमळ भक्त। ज्या श्रवणें भवाब्धींत । तराल म्हणे दासगणू
।।१७४।।
।। इति त्रयोदशोध्यायः ।। शुभंभवतु ।।
।। श्रीदत्तात्रेयार्पणमस्तु ।। श्रीहरिहरार्पणमस्तु ।।
卐 卐 卐 卐 卐
इति अध्याय समाप्तः