।। अध्याय चौदावा ।।

।। श्रीगणेशाय नमः ।।

अजा अजिता जगदीश्वरा। ओंकाररूपा उदारा। हे चंद्रभागातटविहारा। पाहि मां दीनबंधो
।।१।।

सिद्ध म्हणे नामधारकासी। स्वामी नृसिंहसरस्वतीसी। नेलें हिपरगीग्रामासी। एक्या गृहस्थें आदरानें
।।२।।

ह्या हिपरगी ग्रामांत। कल्लेश्वर देव प्रख्यात। त्याचा नरकेसरी परम भक्त। रोज कवन नवें करी
।।३।।

कल्लेश्वरावाचूंन। देव त्यासी नाही आन। अर्चन वंदन आणि भजन। करी हराचे नरके सरी
।।४।।

ग्रामवासी त्यास बोलले। श्रीगुरु आपुल्या ग्रामी आले। त्याचे स्तुतीचे कां न केले। कवन तूं हे नरकेसरी
।।५।।

ते साक्षात दत्तमूर्ती। विधिहरिहरात्मक निश्चिती। म्हणून त्यांची कवनी स्तुती। तूं करावी हेच बरें
।।६।।

तें ऐकतां नरहरी । म्हणे या भूमीवरी । एक कल्लेश्वर निर्धारी । देव कीं मी मानितों
।।७।।

त्याच्यावांचून आणिकांची। मी न स्तुती करी साची। स्वामी नृसिंहसरस्वतीची। गणना न होय देवांत
।।८।।

ऐसें ग्रामस्थां बोलून । नरहरी गेला निघून । पूजा करावया कारण । कल्लेश्वराच्या मंदिरी
।।९।।

तों ऐसें झालें तया दिनी। नरहरीं बैसता पूजासनी। निद्रावश झाला झणी। कांही नसतां कारण
।।१०।।

तों स्वप्न त्यासीं ऐसें पडले। लिंगस्थानीं पाहिले। नृसिंहसरस्वतीस्वामी भले । गाणगापुरविहारी
।।११।।

साङ्ग पूजा त्यांचीच केली। पायी डोई ठेविली। तेणें भ्रांती उडून गेली। आश्चर्य करी मनांत
।।१२।।

पूर्ण जागा झाल्यावर। नरहरी करी विचार। म्हणे स्वामी साक्षात कल्लेश्वर। व्यर्थ संशय वाहिला म्यां
।।१३।।

पूजासाहित्य घेऊन। आला श्रीगुरुकडे धांवून । षोडषोपचारे पूजन। करावया कारणें
।।१४।।

तैं स्वामी म्हणाले तयांसी। मज मानवा कां रे पूजिसी। सोडून कल्लेश्वर व्योमकेशी। आराध्य दैवत तुझें जें
।।१५।।

तें ऐकतां नरहरी। बोलूं लागला ऐशापरी। तूंच कल्लेश्वर निर्धारी। आतां सत्व घेऊं नको
।।१६।।

स्वामिराया मूर्ती आपुली। मी लिंगस्थानीं पाहिली। तेणें भ्रांती उडाली। कळून चुकले तूंच एक
।।१७।।

आतां या पदनताला। न पाहिजे दूर लोटला। ऐसें म्हणून साष्टांग केला। नरहरीनें नमस्कार
।।१८।।

तूंच माझा कल्लेश्वर । चतुरानन रमावर । तूंच पार्वती परमेश्वर । स्वामी नृसिंहसरस्वती
।।१९।।

ऐशा ऐकून स्तुतीला। स्वामिराज ओळंगला। अमोघसा वर दिधला। नरहरी विप्राकारणें
।।२०।।

श्रीगुरुचे बरोबरी। आला नरहरी गाणगापुरीं। कवित्त्व केलें बहुतापरी। रसाळ स्वामी स्तुतीचें
।।२१।।

नामधारका एके काळीं। सण आला दिपवाळी। आठ रूपें तया वेळीं। धारण केलीं श्रीगुरूंनीं
।।२२।।

हे कैसें घडून आलें। तें की सांगतों वहिलें। सात शिष्य पातले । स्वामीजवळ गाणगापुरीं
।।२३।।

जो तो म्हणे स्वामीस। यावें स्वामीनीं दिवाळीस। आमुच्या कीं गृहास। देऊन मान विनंतीला
।।२४।।

न याल आपण जरी। आम्ही न करूं दिवाळी खरी। तैसेंच भक्त गाणगापुरीं। बोलते झाले श्रीगुरुला
।।२५।।

महाराज दिवाळीच्या सणा। कोठेंही न करा गमना। पाहिजे असल्या तुम्हींच यांना। ठेवून घ्या दिवाळीस
।।२६।।

ऐशी आड विहीर झाली। स्वामीलागीं तेधवां भली। मग श्रीगुरूंनीं युक्ती केली। ती ऐक सांगतों
।।२७।।

एकएकां बाहून। श्रीगुरु सांगती कर्णी जाण। तुझ्याच सदना येईन। दिवाळीस मी शिष्योत्तमा
।।२८।।

परी ही गोष्ट न फोडावी। कोणासीहि न सांगावी। जा आपल्या निघून गांवीं। मी दिवाळीस येईन तुजकडे
।।२९।।

ऐसे सांगतां शिष्य गेले। आपआपल्या ग्रामा भले। श्रीगुरुनीं निजलीले। धरिलीं आठ रूपें कीं
।।३०।।

त्रयोदशीच्या दिवशीं। प्रत्येकाचे सदनासीं। जाते झाले ज्ञानराशी। स्वामी नृसिंहसरस्वती
।।३१।।

गाणगापुरीं मठांत। होते स्वामी आसनीं स्थित। आणि शिष्याचिया सदनांत। होतेच कीं त्यादिनीं
।।३२।।

हर्ष प्रत्येक शिष्याला। अपरंपार वाढला । पुढें कार्तिकी पौर्णिमेला। आले अवघे गाणगापुरीं
।।३३।।

एकमेकांचे वर्तमान। सांगती एकमेकांलागून। तें अवघ्यांनीं ऐकून । आश्चर्य करिती चित्तांतरीं
।।३४।।

मग म्हणती अवघे जन । सद्‌गुरुमहिमा अगाध पूर्ण। याचें करावया वर्णन। वेदहि थकेल निःसंशय
।।३५।।

स्वामी नृसिंहसरस्वती। सच्चिदानंद अगाध कीर्ति। याची नये कोणास ती। सर साचार त्रिभुवनीं
।।३६।।

नामधारका गाणगापुरी। एक होता शेतकरी। शूद्रजातीचा निर्धारीं। तो प्रत्यहीं ऐसें करीतसे
।।३७।।

संगमीं श्रीगुरु स्नानास जातां । दुरून घाली दंडवता। पुन्हां श्रीगुरु परत येतां। वंदन करी तैसेंच
।।३८।।

दूर उभा राहून। अष्टांगेंसी करी नमन। परी श्रीगुरु भाषण । त्यासी न करती केव्हां ही
।।३९।।

क्रम ऐसा दिवस बहुत । चालला गाणगापुरांत। एके दिवशीं दंडवत । घालतां ऐसें वर्तलें
।।४०।।

श्रीगुरु निघाले स्नानास। भीमा अमरजा संगमास । बोलते झाले शूद्रास। बहुप्रेमानें येणें रीतीं
।।४१।।

बापा तूं प्रत्येक दिवशीं। येतांजातां संगमासी। कां रे आम्हां नमन करसी। काय इच्छी तुझें मन
।।४२।।

शूद्र बोले जोडून कर। माझे शेत पिकावें फार। कृपादृष्टीनें एकवार। आपण शेता अवलोकावें
।।४३।।

फार बरें म्हणून । शेताजवळ येऊन । करते झाले अवलोकन । यावनाळा कारणें
।।४४।।

शेतीं यावनाळ बहुत । पीक असे जोरांत । तें पाहून शूद्राप्रत । श्रीगुरु ऐसें बोलले
।।४५।।

शेतीं धान्य बहू यावें। ऐसे इच्छित असल्यास ऐकावें। बोल आमचे येधवां बरवे । दृढ विश्वास धरावा
।।४६।।

शूद्र म्हणे अवश्य। मानीन तुमच्या वचनास। करणें जया आज्ञेस। असेल ती करावी
।।४७।।

ऐसें ऐकतां श्रीगुरु म्हणती। आम्ही जातों स्नानाप्रती। परत येण्याच्या आंत निश्चिती। शेत अवधें कापी हैं
।।४८।।

त्याच्यायोगें करून। शेतीं येईल विपुल धान्य। ऐसें शूद्रास बोलून। स्वामी गेले संगमातें
।।४९।।

इकडे शूद्र ग्रामीं आला। ग्रामाधिकाऱ्या बोलता झाला। शेतखंड चालू साला। किती देणें सांगा मी
।।५०।।

अधिकारी बोले त्यावर। पीक दिसतें आलें फार। म्हणून ऐसा करार। करावयास आलास तूं
।।५१।।

कांहीं असो शूद्र म्हणे। गुदस्तांपेक्षां दुप्पट घेणें। खंड शेताचा आदरानें। हीच आहे विनंती
।।५२।।

तें अधिकाऱ्यानें केलें मान्य। कागद घेतला लिहून । इकडे शूद्र शेतीं येऊन। काय करी तें ऐका
।।५३।।

पीक कोंवळे लुसलुसीत । शूद्र स्वहस्तें कापीत। त्याशीं करावया हरकत। कन्यापुत्र धांविन्नले
।।५४।।

शूद्र न ऐके कोणाचें। पीक अवधें जोंधळ्याचें। पोटरींत आले साचें। कापूनियां टाकिलें कीं
।।५५।।

श्रीगुरुस्वामी परत येतां। शूद्र घाली दंडवता। म्हणे पीक कापिलें समर्था। येऊन पहा एक वेळ
।।५६।।

श्रीगुरु शेतापाशीं आले। तो शेत होतें कापिलेलें। विनोदें शूद्रास बोललें। अरे हैं केलें तूं काय
।।५७।।

शूद्र म्हणे स्वामीसी। आपली आज्ञा मान्य मशीं। तेथें नफ्यातोट्यासी। पहाणें न मशीं महाराजा
।।५८।।

तुझी आज्ञा ही श्रीगुरु। कामधेनू वा कल्पतरू । ऐसा मनींचा निर्धारू । माझा असे स्वामिया
।।५९।।

पुढें आठ दिवसांनी। हींव पडलें तया स्थानीं। अवघी शेतें करपोनी। गेलीं गाणगापुरींचीं
।।६०।।

सर्वेच अकालीं पर्जन्य। मूळ नक्षत्रीं पडला जाण। शेतीं न मावे जीवन । जलमय झालें चोहींकडे
।।६१।।

शेतीं प्रत्येक ताटासी। फनगड्या फुटल्या बहुवशीं। कणसभाराने महीसी। लागलीं लोळावया
।।६२।।

तो पहातां प्रकार। लोक आश्चर्य करिती फार। म्हणती याचा गुरुवर। खचित आहे पाठीराखा
।।६३।।

पुढलें भाकीत जाणलें। म्हणून शेत कापविलें । आतां काय उणें उरलें। या शूद्राच्या भाग्यास
।।६४।।

कन्यापुत्र आत्मजन। गेले असती आनंदोन। श्रीगुरुचें महिमान। कळून आलें अवघ्यांसी
।।६५।।

स्वामीकृपेनें शेतीं भला। शतगुणित माल झाला। वांटून गोरगरीबांला। भरलीं पेवें शूद्रांनीं
।।६६।।

धन्य नृसिंहसरस्वती। शूद्र केला संपन्न अती। श्रीगुरुच्या कृपे पुढती। लाभ अमोलिक कोणता
।।६७।।

पुढें शिष्या आश्विनमासीं। येतां वद्य चतुर्दशी। दिपवाळीच्या पर्वणीसी। श्रीगुरु म्हणती शिष्यातें
।।६८।।

आज दिवाळी पर्व थोर । यात्रेस चला लवकर। गया प्रयाग काशीपूर। त्रिस्थलीं यात्रा करूं
।।६९।।

शिष्य बोले त्यावरी। करूं यात्रेसी तयारी। कां कीं जाणें आहे दूरवरी। म्हणून अवसर असावा
।।७०।।

श्रीगुरु म्हणती शिष्याप्रत। अरे ही त्रिस्थळी आहे येथ। नको करणें किंचित्। तयारी या यात्रेची
।।७१।।

श्रीअमरजा संगम । हेंच प्रयाग उत्तम। भीमरथीचें येथे नाम। जान्हवी गंगा भागीरथी
।।७२।।

ऐसें सांगून शिष्यांसहित। श्रीगुरु आलें संगमाप्रत। स्नान षट्कुल-तीर्थात । करिते झाले आदरें
।।७३।।

ही जी आहे अमरजा सरिता। तिची तुम्हां सांगतों कथा। पूर्वी जालंदर नामें होता। दैत्य एक अनावर
।।७४।।

त्यानें जिंकून इंद्रासी। दुःख दिलें देवांसी। सर्वत्र झाले महीसी। साम्राज्य तें राक्षसांचें
।।७५।।

तेणें इंद्र दुःखित झाला। श्रीशंकरा शरण गेला। देवा वांचीव आम्हांला। या राक्षसांपासून
।।७६।।

युद्ध करावे कोठवरी। राक्षस रक्त भूमीवरी। पडता राक्षस निर्धारीं। दुप्पट उत्पन्न होतात
।।७७।।

देव आमचे मरून गेले। अमरासी मरण आलें। हेंच आहे वाटलें । आश्चर्य कीं तिन्हीं लोकां
।।७८।।

ऐकून इंद्राची प्रार्थना। मनीं तोषला कैलासराणा। अमृत घट तयांना। दिला एक मंत्रून
।।७९।।

इंद्रें तो घेतला करीं। शिंपडू लागला देवांवरी। जेणें देव निर्धारींव। पुनरपि सजीव झाले
।।८०।।

अमृताचे होतां सिंचन। राक्षसासी येई मरण। देव मात्र उठून। लागती त्यासी झगडावया
।।८१।।

तों अमृत घट पुरंदर। घेऊन जातां साचार। सिंचन करतां भूमीवर। तिची ही झाली अमरजा
।।८२।।

म्हणून अमरजेसी। स्नान करती भावेंसी। तें असल्या अल्पायुषी । शतायुषी होणार
।।८३।।

आतां हैं अश्वत्थ तीर्थ। येथें स्नानकर्त्याप्रत । सौंदर्य सुख समस्त । प्राप्त होती निश्चयें
।।८४।।

मी या अश्वत्थवृक्षापाशीं । आनंदें वसतों अहर्निशीं । हा कल्पवृक्ष निश्चयेंसी। माना तुम्हीं शिष्यहो
।।८५।।

या कल्पवृक्षाचें पूजन । करून पुढें पार्वतीरमण । संगमासी जाऊन । पूजा अति आदरें
।।८६।।

जैसा शैल्यपर्वतीं। मल्लिकार्जुन पार्वतीपती। तैसाच हा निश्चिती। संगमेश्वर जाणा हो
।।८७।।

सोमसूत्रीं प्रदक्षिणा। यांसी कराव्या तीन जाणा। नंदीचिया धरून वृषणा। पहावें पार्वतीपतीतें
।।८८।।

हें संगमेश्वराचें दर्शन। प्रत्यक्ष आहे साधन । व्हावया धनकनक संपन्न । महिमा ऐसा दर्शनाचा
।।८९।।

येथून अर्धकोसावरी। ग्राम नागेशी तीच खरी । वाराणसी साजिरी। चला तेथें स्नानास
।।९०।।

या नागेशी ग्रामाप्रत। भारद्वाजगोत्री शुचिर्भूत। ब्राह्मण महाविरक्त। होता एक पूर्वकालीं
।।९१।।

त्या प्रसन्न झाला चंद्रमौळी। भवभयांतक शूली। अवाढव्य भूमंडळी । शिवचि त्याला दिसतसे
।।९२।।

त्यासी दोन सहोदर। एक ईश्वर एक पांडुरंगेश्वर। या दोघांनी विचार। केला काशीयात्रेचा
।।९३।।

तयीं विप्र म्हणे बंधूंशी। कशास जातां काशीसी। ही जी आपली नागेशी। तीच वाराणशी पहा
।।९४।।

भगवान काशीविश्वेश्वर । मठापाशी निरंतर । संशय न धरा तिळभर । तुम्हांलागीं दाखवितों
।।९५।।

ऐसें बोलून गंगास्नान। करिता झाला ब्राह्मण। तों प्रगटला पार्वतीरमण। दृष्टी पाहिला सर्वांनीं
।।९६।।

ब्राह्मण म्हणे हे व्योमकेशी। आम्हां दिसावी नित्य काशी। विश्वेश्वरा या स्थलासी। ऐसें कांही करावें
।।९७।।

तों तें नागेशी नगर । काशी झाले साचार । मनकर्णिका कुंड थोर । तेथें एक प्रगटलें
।।९८।।

कुंडामाजीं शिवमूर्ती । भीमा तीच भागीरथी । ऐसें सवें दिसल्यावरती । विप्र बोलला बंधूतें
।।९९।।

येथून पुढें आमच्या वंशीं। कोणी न जावें काशीसी। तुम्हीं दोघांनीं पंढरीशीं। जाऊन वास करावा
।।१००।।

पांडुरंगाचें आराधन। करा अति प्रेमें करून। आराध्य नाम तुम्हां लागून । पुढें मिळेल क्षेत्रीं त्या
।।१०१।।

प्रतिवर्षी कार्तिक मासीं। येत जावें या स्थलासी। म्हणून शिष्यहो हीच काशी। म्हणती गुरु आपणांतें
।।१०२।।

श्रोते क्षेत्र पंढरींत । आराध्याचें कुल सत्य। पावते झाले वृद्धिंगत। असे पाटिलकी यांकडे
।।१०३।।

स्वामी नृसिंहसरस्वती। पुढें आपल्या शिष्यांप्रती। पापविनाशी दाविती। तीर्थ जें कां मनोहर
।।१०४।।

या पापविनाशी तीर्था पाहीं । भगिनी आमची रत्नाबाई । निर्दोष असे झाली पाही। ती कथा सांगतो
।।१०५।।

रत्नाबाईकारण। पूर्वजन्मींचा दोष दारुण। घडला होता म्हणून । कुष्ठ भरलें तियेसी
।।१०६।।

मांजरी भांड्यामध्ये व्याली। पांच पिलें प्रसवलीं। ती रत्नाबाईनें न पाहिलीं। भांडें ठेविलें चुलीवर
।।१०७।।

त्यायोगें मांजरे मेलीं। हीच तिला हत्या घडली। ती या जन्मीं उदयास आली। कोड भरलें शरीरा
।।१०८।।

मग मी सांगितलें तिशीं । तीर्थ पापविनाशी । तूं जाऊन त्वरेशीं । तेथें स्नान करावें
।।१०९।।

तें तिनें ऐकिलें । तीर्थामाजीं स्नान केले । कोड आंगीचें सर्व गेलें । ऐसा तीर्थमहिमा असे
।।११०।।

पुढें आहे कोटी तीर्थ। हें जंबुद्वीपीं प्रख्यात । प्रत्येक पर्वणीस येथ। साधकें स्नान करावें
।।१११।।

रुद्रपदतीर्थ गयातीर्थ। चक्रतीर्थ महिमा अद्भुत । हे द्वारावतीच साक्षात। संशय येथें धरूं नको
।।११२।।

ग्रामाचिया पूर्वेसी। हा कल्लेश्वर व्योमकेशी। गोकर्ण महाबळेश्वर आपणासी। साक्षात् आहे श्रवण करा
।।११३।।

ऐसा गाणगापूर ग्रामींचा। क्षेत्र महिमा सांगून साचा। समारंभ यात्रेचा। थोर करविला स्वामींनीं
।।११४।।

श्री गुरुप्रसादें करून। रजक झाला बादशहा यवन। बेदर ग्रामाकारण। हें मागेंच ऐकिलें त्वां
।।११५।।

तो बादशहा असतां बेदरासी। कथा एक वर्तली ऐशी। फोड झाला मांडिसी। त्या बेदराधिपतीच्या
।।११६।।

राजा जरी होता यवन। तरी श्रेष्ठ मानी ब्राह्मण । त्यानें मंदिरें पाडून। मशिदी नाहीं बांधल्या
।।११७।।

यवनपुरोहितांनीं। राजास पाहिलें सांगोनी। कीं मूर्तिपूजकाचे कानीं। शब्द तुम्हीं न ऐकावे
।।११८।।

हे मुळींच काफर । साकार यांचा ईश्वर । पाणी झाडें फत्तर । मूर्ख मानती हिंदू हे
।।११९।।

ऐसा बहुत वेळां भला । राजासी उपदेश केला । परी तें न पटे शहाला । उलट येई राग त्यांचा
।।१२०।।

तो म्हणे ईश्वर। सर्वत्र सारखा साचार। मज वाटे धर्म थोर। खचित आहे हिंदूंचा
।।१२१।।

यवनकुलीं जन्म झाला। परी मानी हिंदूंच्या शास्त्राला । त्यायोगें यवनाला। राग त्याचा येतसे
।।१२२।।

असो राजाच्या मांडीसी। फोड झाला, औषधं त्यासी। जरी लाविली बहुवशी। परी न येई गुण कांहीं
।।१२३।।

त्या फोडाच्या यातना । शरीरीं होती क्षणक्षणां । शहा झाला दीनवाणा । उपाय विचारी अवघ्यांला
।।१२४।।

इकडे गाणगापुरीं गुरुवर। करती मनीं विचार। येथें तो आल्या नृपवर। घेऊन यवन लोकांना
।।१२५।।

होईल त्रास द्विजांसी। छळील गोरगरीबांसी। आणि या गाणगापुर ग्रामासी। सरबराई करणें लागेल
।।१२६।।

यासाठी आपण । येथें न रहावें एक क्षण । आहे सध्या आसन । सिंहराशीस गुरुचें
।।१२७।।

आहे ईश्वर नाम संवत्सर । पाहूं गोदावरीचें तीर। यात्रा करू वर्षभर । वृद्धगंगा गौतमीची
।।१२८।।

इकडे राजा बेदरीं। ज्याला त्याला विचारी। ही माझी व्यथा दूरी। होईल कोणत्या उपाये
।।१२९।।

ज्ञाते म्हणती रायास। हा पूर्व जन्मींचा दोष। तो एकाद्या सत्पुरूषास । शरण जातां निमेल
।।१३०।।

ज्या अर्थी औषधीर्नी । गुण न ये तुजलागुनी। त्या अर्थी खास जाण । पूर्वजन्मींचा दोष हा
।।१३१।।

तो व्हावया परिहार । जाई पापविनाशीवर । जें तीर्थ साचार । येथून जवळ असे कीं
।।१३२।।

यवनाधिप तें ऐकुनी। आला पापविनाशीलागूनी। लवाजमा दूर ठेवूनी। गेला स्नान करावया
।।१३३।।

तीर्थामाजीं करितां स्नान। झालें यतीचें दर्शन। त्यासी फोड दाखवून । उपाय पुसूं लागला
।।१३४।।

यती म्हणें शहासी। पाहिलें मी फोडासी। हा पूर्वजन्मींचा निश्चयेंसी। आहे तुझा जाण पां
।।१३५।।

ऐशा व्याधीलागून । उपाय संतदर्शन । तें केल्यावांचून । परिहार याचा होईल ना
।।१३६।।

येविषयींची एक कथा। सांगतों मी ऐक आतां । अवंती नामें नगरीं होता। विप्र एक दुराचारी
।।१३७।।

पिंगला नामें वेश्येसी । रत असे अहर्निशीं। बंधन त्या अधमासी। न राहिलें कोणतेंच
।।१३८।।

एके दिवशीं असें झालें। ऋषभ नामें योगी आले। त्यांसी उभयतांनीं पूजिलें। षोडशोपचारें परियेसी
।।१३९।।

एक दिवस पर्यंत। ऋषभ योगी राहिला येथ। पुढें या दोघांप्रत। वार्धक्य अवस्था पातली
।।१४०।।

जरेनें तनू ग्रस्त झालीं। आयुर्मर्यादा संपली। दोघेही मरण पावली। पुढें अपूर्व वर्तलें
।।१४१।।

हा दुराचारी ब्राह्मण। आला जन्माकारण। वज्रबाहूचे कुशीं जाण। दशार्णवाधिपती जो
।।१४२।।

त्या वज्रबाहु नृपासी। दोन कांता परियेसी । त्यापैकी थोरलीचें कुशीं। हा गर्भी राहिला
।।१४३।।

वसुमती नाम जिचें। गर्भधारण पाहून तिचें। पित्त खवळले धाकटीचें। सवतीमत्सरें करून
।।१४४।।

तिनें सर्पगरळ आणूनीं। पाजिलें वसुमती लागूनी। परी दैवाची विचित्र करणी। मरण नाहीं आलें तिला
।।१४५।।

विषायोगें इतकें झालें। सर्वांगासी व्रण उदेले। तें प्रसूतीचे दिवस भरले। प्रसूत झाली वसुमती
।।१४६।।

बालकाचे अंगावर। फोड आले अपार। जागा न राहिली तिळभर। कोठेंहि त्या किती सांगू
।।१४७।।

राजानें वैद्य आणविले। औषधोपचार बहुत केले। परीं न कांही चीज झालें। अखेर नृप कंटाळला
।।१४८।।

राजा म्हणे सेवकासी। याचें न दुःख पहावें मशी। या उभयतां माय लेकरासी। महारण्या नेऊन सोडा
।।१४९।।

सेवकांनी तैसें केले। अरण्यांत सोडिलें। वसुमती कारणें भलें। पुत्रासहित तियेच्या
।।१५०।।

तें भयंकर कानन । पृष्ठभागा वाढवी तृण। गगनोदरातें भेदून । वृक्ष पाहती जावया
।।१५१।।

वन्य पशू विचरती । व्याघ्र आरोळ्या मारिती । कोठेंहि न दृष्टीस पडती । मानवी प्राणी काननास
।।१५२।।

वसुमती सुकुमार । शरीरीं व्याधी असे फार । व्याकूळ होईन वरच्यावर । अन्न न मिळे खावया
।।१५३।।

तैसीच घेऊन पोराशी । हिंडे तया काननासी । वेताळ राक्षस दृष्टिसी। पडूं लागले असंख्यात
।।१५४।।

ऐशी काननीं भ्रमण करितां । घेऊन आपल्या सुता । पडले दृष्टीस तत्वतां । कांहीं गोप गुरांसह
।।१५५।।

वसुमती आली त्यांजवळ । सांगे आपुला वृत्तांत सकल । म्हणे येथें मजला जल । मिळेल कां रे प्यावया
।।१५६।।

तें ऐकतां गोपकुमार । देते झाले प्रत्युत्तर । म्हणती माते सोडी न धीर । उदक अन्न मिळेल कीं
।।१५७।।

या कानना शेजारीं । आहे एक लहान नगरी । तूं जा तेथें सत्वरी । कार्य तुझें होईल
।।१५८।।

गोपांनी मार्ग दाविला । वसुमती घेऊन आपल्या मुला। येती झाली ग्रामाला । विनयें पुसे लोकांसी
।।१५९।।

हे परम सभाग्य नगर । कोण येथला नृपवर । लोक म्हणती पद्माकर । वैश्य राजा येथींचा
।।१६०।।

तो महा उदार । धर्मवंत साचार । करी अनाथदुबळ्यांवर । कृपा परम आदरानें
।।१६१।।

तो इतुक्यांत वसुमतीपाशीं । पद्माकराच्या आल्या दासी । पुत्रासह मंदिरासी । गेल्या घेऊन तियेला
।।१६२।।

वैश्यनाथाकारण। साकल्य कथिलें वर्तमान। तें पद्माकरें ऐकून । ठेवून घेतलें राणीतें
।।१६३।।

घर दिधलें रहावयासी। अन्नवस्त्रही बहुवशी। तों मरण आलें कुमारासी। तेणें वसुमती शोक करी
।।१६४।।

कुमाराचें पाहून प्रेत। राणी शोक करी अत्यंत । लोक सारे समजवितात। परि न तिचा शोक आवरे
।।१६५।।

तों ऋषभ नामें योगी आला। पद्माकराचे सदनाला। म्हणे हा कोणी मांडिला। आकांत ऐसा सांगा मज
।।१६६।।

तों वैश्यनाथ पद्माकर। सांगता झाला जोडून कर। वसुमतीचा कुमार। मरण पावला येधवां
।।१६७।।

ही वसुमती कोण कोठली। सर्व हकीकत सांगितली। त्यायोगें उपजली। करुणा ऋषभ देवासी
।।१६८।।

ऋषभदेव प्रेतापाशीं। येते झाले त्वरेसी। उपदेश वसुमतीसी। करते झाले येणें रितीं
।।१६९।।

वत्से हा शोक करण्याचा। विषय मुळींच नाहीं साचा। देह पंचभूतांचा । त्याची शाश्वती मुळीं नसे
।।१७०।।

हा मायेचा असे खेळ। नाही कशाचा कशास मेळ। वेडे हा ब्रह्मांडगोळ। मुळींच स्फुरण ईशाचें
।।१७१।।

हे अवघे मनुष्यप्राणी। उपजती रजोगुणापासुनी। उत्पन्न तमोगुणापासुनीं। होती जे राक्षस
।।१७२।।

सत्वगुणापासुनी देव। ऐशीं रचना अभिनव । जन्ममरणरहित जीव। आहे हें विसरूं नको
।।१७३।।

पूर्वी जें करावें। ते ये जन्मी भोगावें। दोष कोणा न लावावे । आपुला शोध करावा
।।१७४।।

ऐसा उपदेश ऐकतां। वसुमती ठेवी पदीं माथा। म्हणे हे ऋषभदेवा सदुरूनाथा। कृपा करा मजवरी
।।१७५।।

ऋषभेश्वर म्हणे तियेसी । तूं शरण जाई शंकरासी। तो तुझ्या पूर्व दोषासी। हरण करील क्षणांत
।।१७६।।

वसुमती म्हणे शंकर। तुझे हे पाय साचार। आतां न लोटी मजला दूर। कृपा करा गुरुराया
।।१७७।।

मग ऋषभेश्वरेंभस्मकाढिलें। प्रेताचे भाला लाविलें। तो तें प्रेत तत्काळ उठून बसलें। व्रण अंगींचे अंगीं निमालेकीं
।।१७८।।

भस्म लाविता उभयतांसी। व्याधी झाली नाहींशी। वसुमती मुक्तकेशी। लोळू लागली पायांवर
।।१७९।।

ऋषभदेवें दिधला वर। कीं तुझा कुमार। चिरायू होईल साचार। जरा न येईल कधीं या
।।१८०।।

हा होईल कीर्तीमान। भोगील राज सिंहासन। ऐसा वर देऊन। गेला योगी तेथूनियां
।।१८१।।

म्हणून शहा तूंहि आतां। व्याधी परिहार होण्याकरितां। सत्पुरुषाचे पदीं माथा। ठेवी जाऊन तत्काळ
।।१८२।।

राजा पुसे यतीप्रत। मी मंदमती अत्यंत । तुम्हीच दावा मजप्रत। स्थान एकाद्या सिद्धाचे
।।१८३।।

यती बोले त्यावरी। तूं जाई गाणगापुरीं। भीमा अमरजा संगमतीरी। सिद्ध नरसिंहसरस्वती
।।१८४।।

त्याचें दर्शन झालिया। फोड जाईल लवलाह्या। ऐसा बोध ऐकूनियां। शहा निघाला तेथुन
।।१८५।।

यवनाधिप सहपरिवारीं। येता झाला गाणगापुरीं। पौरजनांना विचारी। स्वामी कोठें सांगा तें
।।१८६।।

पौरवासी मनीं म्हणती। कैसी ओढवली आपत्ती। हा यवनाधिप दुष्टमती। त्रास देईल स्वामियाला
।।१८७।।

कोणी न देती प्रत्युत्तर। तेणें शहा कोपला अनिवार। म्हणे भयानें अंतर। व्याप्त न ऐसें होऊ द्या
।।१८८।।

मी स्वामीच्या दर्शनासी। आलो गाणगापुरासी । तैं लोक म्हणती तयासी। स्वामी संगमी भेटतील
।।१८९।।

राजा बसून पालखींत । गेला अमरजासंगमाप्रत। दृष्टी पडतां सद्गुरूनाथ। पायीं चालू लागला
।।१९०।।

जवळ येतां सद्गुरूमूर्ती। स्वामी नरसिंहसरस्वती। बोलते झाले येणें रितीं। तें शांत चित्ते अवधारा
।।१९१।।

कां रे रजका इतके दिवस। कोठें सांग होतास। कैसा विसरला आम्हांस। तूं आमुचा असूनियां
।।१९२।।

ऐशा ऐकूनियां बोला। शहासी पूर्वजन्म आठवला। आनंदाश्रू लोचनाला। खळखळा वाहूं लागले
।।१९३।।

शहा करी नमस्कार। अष्टांगेसी साचार। लोळू लागला चरणावर। स्वामिचिया तेधवां
।।१९४।।

महाराज प्रसादे आपुले। राज्यपद प्राप्त झालें । त्या राज्यमदानें विसरले। स्वामीचरण आजवर
।।१९५।।

आतां कृपा करून। हरावें माझें अज्ञान। तुमचे हे पवित्र चरण। त्यांचा आठव असावा
।।१९६।।

श्रीगुरु म्हणती शहासी। तेंहि होईल निश्चयेंसी। आतां इच्छा मानसीं। काय असे ती सांग
।।१९७।।

तें ऐकतां नृप बोलला। मांडीस माझ्या फोड झाला। त्याच्या परिहारार्थ या स्थला। दास आपला पातलासे
।।१९८।।

स्वामी म्हणती हांसून। पहा मांडीस उघडून। फोड नाहीं तुजकारण। उगीच भ्रमी पडलांसी
।।१९९।।

नृपें मांडीस पाहिलें। फोडाचें ना नांव उरलें। शरीरातून उठतें झालें। ठाणें व्याधीचें तात्काळ
।।२००।।

ऐसा होता प्रकार। भूप आनंदला फार । घालून साष्टांग नमस्कार। करी विनंती स्वामीसी
।।२०१।।

मी सेवक स्वामीचा। पूर्व जन्मापासून साचा। स्वामींनी दिलेल्या वैभवाचा। अनुभव हा मी घेतसें
।।२०२।।

म्हणुनियां एकवार। पवित्र करावे बेदर। माय न विसंबे आपुलें पोर। ऐसें ठावें आहे मला
।।२०३।।

श्रीगुरु म्हणती शहासी। तुझ्यासवें आम्हांसी। येतां न ये बेदरासी । संन्यासधर्माप्रमाणे
।।२०४।।

त्यांतून तूं अविंध यवन। अवघे संस्कार हीन। तुझ्यासवें भाषण। तापसानें करूं नये
।।२०५।।

माझा होतास तूं परी। म्हणून लोळू दिलें पादुकांवरी। आतां न वृथा हट्ट धरी । जाय आपुल्या शहरांत
।।२०६।।

ऐसें ऐकतां श्रीगुरुवचन। राजा अविंध यवन। गेला मनीं गहिंवरून। म्हणे महाराज हैं न खरें
।।२०७।।

साधने हीं साधकासाठी। तुम्ही साक्षात् जगजेठी। सूर्यप्रकाशा आडकांठी। आहे कोठें सांगा हो
।।२०८।।

तुम्ही न आल्या बेदरा। मी न जाई येथून खरा। माझा हेतू पूर्ण करा। हीच विनंती चरणासी
।।२०९।।

स्वामी म्हणाले चाल पुढें। आम्हां न घाली सांकडे। आम्हीं भेटूं रोकडे। पापविनाशी तीर्थावर
।।२१०।।

तूं राष्ट्राधिप भूपती। आम्हीं संन्यासी निश्चिती । तूं बैस घोड्यावरती। आम्हीं पायींच तेथे येऊं
।।२११।।

ऐसें बोलून भूपाप्रत । गुप्त झाले सद्गुरूनाथ। सहपरिवारें बेदराप्रत। आला राजा निघूनी
।।२१२।।

शहा म्हणे मनांत। माझें भाग्य थोर खचित। दृष्टीं पाहिला सद्गुरूनाथ। स्वामी नरसिंहसरस्वती
।।२१३।।

जो भवार्णवींचा त्राता। जो अनंतब्रह्मांड उत्पादिता। जो पदनताच्या हरितो दुरिता। सकल सुखें देऊनियां
।।२१४।।

त्याचें पुन्हां दर्शन मशीं। होणार पापविनाशीसी। ऐशा आनंदें वेगेसी। भूप पातला बेदरा
।।२१५।।

शिष्यांसहित सदुरूनाथ। प्रगटले पापविनाशी तीर्थाप्रत । एका क्षणामाजीं सत्य। आपुल्या योगसामर्थ्य
।।२१६।।

शिष्य अवघे पूजा करिती। दर्शना कारणें लोक येती। हळोपाळी पासरली कीर्ति। अवघ्यां प्रती आनंद जाहला
।।२१७।।

साकरें सायंदेवाचा । पुत्र नागनाथ नांवाचा। आला भेटण्या तेथ साचा। श्रीगुरुचा परमभक्त
।।२१८।।

त्यानें प्रार्थून आपुले घरीं। श्रीगुरूंची नेली स्वारी । षोडशोपचारें पूजा करी। समाराधना करूनियां
।।२१९।।

श्रीगुरु म्हणती नागनाथा। येथें न ये मशीं राहतां। चाल पापविनाशी तीर्था । नातरी भूप येईल येथ
।।२२०।।

तुम्ही अवघे ब्राह्मण। तो राजा आहे यवन। म्हणून तुमचें तया सदन। योग्य मुळीं न यावया
।।२२१।।

ऐसें नागनाथा बोलले। पापविनाशी तीर्थास आले। मनोवेगें करून भले । स्वामी नृसिंहसरस्वती
।।२२२।।

बेदरपुरी कळली मात। आनंदला नृपनाथ। श्रृंगारून बिदराप्रत । आला स्वामीस न्यावया
।।२२३।।

पालखींत बसवून गुरुमूर्ती। चौरीचामरें ढाळी हाती। आपण चाले पायीं पथीं। भाव चित्ती ठेवोनियां
।।२२४।।

नाना वाद्यांचे गजर। होऊं लागले वरच्यावर । होन पुतळ्या मोहरा फार। लोक उधळती स्वामीवरी
।।२२५।।

ब्राह्मणाच्या सुवासिनी। दारीं उभ्या राहुनी। ताटी निरांजनें ठेवुनी। ओंवाळिती स्वामीला
।।२२६।।

पायघड्या त्या महाद्वारी। घातल्या होत्या नानापरी। आले राजमंदिरी। स्वामी नृसिंहसरस्वती
।।२२७।।

सिंहासनीं बैसले। सर्वाकारणें भेटले । मग सवेच बाहिले। अंतःपुरीच्या स्त्रियांना
।।२२८।।

सर्वांस दिलें आशीर्वचन। आनंदले बेदर पूर्ण। अपार केलें असें दान। भूपतीनें तेधवां
।।२२९।।

स्वामी म्हणाले रायांस। आतां निरोप द्यावा आम्हांस । जाणें आहे गौतमीस। सिंहपर्वणीकारणें
।।२३०।।

राजा बोलें त्यावर। जोडून आपुले दोन्ही कर। माझा न पडो कदा विसर। गुरुराया आपणांसी
।।२३१।।

मग स्वामी नृसिंहसरस्वती। शहाप्रती बोलती। पुत्रांस बसवून राज्यावरती । येई शैल्य पर्वता तूं
।।२३२।।

बेदरीं निरवून अवघ्यासी। गेले गौतमी तीरासी। साधण्या सिंहपर्वणीसी। स्वामी नृसिंहसरस्वती
।।२३३।।

गौतमीचें केले स्नान । परमादरे करून । कां कीं हें गौतमीचें जीवन । सार चहूं वेदांचे
।।२३४।।

मग वंदून गौतमीसी । आले गाणगापुरासी । जमवून अवघ्यांसी । ऐसें बोलते जाहले
।।२३५।।

यावच्चंद्रदिवाकर। आम्ही आहों येथें स्थिर। जो शुचि सात्विक भाविक नर। त्यासी भेट होईल कीं
।।२३६।।

आतां लोकाचारें येथून जाऊं। शैलपर्वताप्रती राहूं । येथून पुढे गुप्त राहूं। तुम्ही न खंती करावी
।।२३७।।

जे गाणगापुरीं येऊन । करतील माझें अनुष्ठान। त्यांचे मनकामनेंलागून। पुरवीन वचन हें माझें
।।२३८।।

कां की पुढे जगतांत। प्रगट रहाण्यांत नाही अर्थ। दुष्ट कुटिल दांभिकाप्रत। भाव येणार आहे कीं
।।२३९।।

म्हणून आम्ही गुप्त राहूं। भाविकाला दर्शन देऊं। आतां आक्षेप नका घेऊं। या आमुच्या बोलण्यावर
।।२४०।।

सिद्ध म्हणे नामधारका। श्रीगुरु सांगते झाले लोकां । ऐशापरी तेंच देखा। म्यां कथिलें तुजलागी
।।२४१।।

स्वस्ति श्रीगुरुचरित्रसारामृत। सदा ऐकोत प्रेमळ भक्त। हेंच वरदान मागत। दासगणू विठ्ठलासी
।।२४२।।

।। इति चतुर्दशोध्यायः ।। शुभंभवतु ।।

।। श्रीदत्तात्रेयार्पणमस्तु ।। श्रीहरिहरार्पणमस्तु ।।

卐 卐 卐 卐 卐

इति अध्याय समाप्तः