।। श्रीगणेशाय नमः ।।
हे दीनोद्धारा जगद्गुरू। तूं पदनताचा कल्पतरू । तूं अलोट दयेचा सागरू। कृपा करी पांडुरंगा
।।१।।
हे मायबापा आजवरी। तुझ्या येऊनियां द्वारीं। कोणी न गेला विन्मुख हरी। असें म्यां ऐकिलें
।।२।।
हे ऐकिलें म्हणून। तुझे देवा धरिले चरण। आतां पापताप आणि दैन्य। वारा दासगणूचें
।।३।।
सिद्ध म्हणे हे नामकरणी। स्वामी आले गाणगापुरभुवनीं। सर्व शिष्यांस जमवोनी। ऐसें बोलते जाहले
।।४।।
प्रगट होतों आजवरी। या अमरजा संगमतीरीं। येथूनियां पुढारी। गुप्त आम्हां होणें असे
।।५।।
कां कीं या कलीत। लोक झाले आशाळभूत। सद्वासना मनांत। नाहीं किमपि जयांच्या
।।६।।
ते विषयलोलूप या स्थानीं। येतील विषयाला हापापुनी। त्रास देतील मज लागुनी। म्हणून गुप्त होणें बरें
।।७।।
कां की मावळेल अवघा आचार। मग कैसा राहील विचार। दांभिकतेला येईल जोर। अपमान होईल खऱ्याचा
।।८।।
वैराग्य होईल नामशेष। तेणें वाढेल विलास । आणि अतिविलासी नरास। साधू मानतील भोळे जन
।।९।।
शिष्य हो वैराग्यावांचून। साधुत्व ना टिके एक क्षण। शरीरांतून गेला प्राण। किंमत काय मढ्यातें
।।१०।।
परी येथून पुढती जनांची। ऐशी प्रवृत्ती होईल साची। मानमान्यता मढ्याची। होऊं लागेल हट्टानें
।।११।।
मग कशाचे साक्षात्कार। अवघा गप्पांचा बाजार। म्हणून हें गाणगापूर। तुम्ही सोवळेंच ठेवा कीं
।।१२।।
वैराग्यासी बसेल धक्का। ऐसें कृत्य करूं नका। इमारती बांधू नका। अवासवा
।।१३।।
सत्पुरुषाचें ठिकाण । असावें वैराग्यसंपन्न । इमारती भूषण । आहे राजधानीमध्ये
।।१४।।
राजे अमीर उमरावाशीं। वैभव शोभे निश्श्येसी। म्हणून गाणगापुरासी। आहे तसेंच राहू द्या
।।१५।।
जे भावभक्ती धरून। सत्पंथानें चालून । येतील त्यांची पुरवीन। सर्व मी कीं मनीषा
।।१६।।
ऐसें अवघ्यांना सांगितलें। श्रीगुरु पर्वतासी निघाले। शिष्य बोळवीत चालले। दुःखित होऊन अंतरीं
।।१७।।
अवघे लोळती पायावरी। विनंती करिती वरच्यावरी। महाराज लेंकरां सोडून दुरी। तुम्ही न जावें हाच हेत
।।१८।।
आजवरी होता आपला। वशिला आम्हां सकलांला। आतां मात्र कठीण आला। काळ आम्हासी सद्गुरू
।।१९।।
स्वामी नृसिंहसरस्वती। बोलते झाले त्याप्रती। तुम्ही उगीच दुःख चित्तीं । किमपिहि मानूं नये
।।२०।।
या गाणगापूर क्षेत्रास। माझा सर्वदा होईल वास। भीमा अमरजा संगमास। स्नान करून माध्यान्हीं
।।२१।।
मठामाजी नित्य राहूं। पदनतासी दर्शन देऊं। आतां वेळ झाला बहु। पर्वतीं आम्हां जाणें असे
।।२२।।
हा विघ्नहर चिंतामणी। चिंतिलें फळ देईल क्षणी। शिष्य हो तुम्हां लागुनीं। भाव ठेवा अष्टतीर्थी
।।२३।।
आरती करावी त्रिकाळ। मनेच्छा पुरती सकळ । ऐसें सांगून तात्काळ । स्वामी गेले पर्वता
।।२४।।
शिष्य मठामाजीं आलें । तों श्रीगुरु येथें बैसले । ऐसें त्यांनी पाहिलें । निजनयनेंकरून
।।२५।।
धन्य धन्य ही गुरुमूर्ति। स्वामी नृसिंहसरस्वती। हा साक्षात् गुरुमूर्ती। संशय आता घेणें नको
।।२६।।
यानेंच व्यापिलें त्रिभुवन। याचेवांचून वस्तू आन। हाचि जगजनार्दन । सच्चिदानंद हाच पै
।।२७।।
मनीं आणितां सद्गुरू दिसती। सवेंच अंतर्धान पावती। जैशी ज्याची असें भक्ती। तैसं होय दर्शन तया
।।२८।।
पर्वतीं पाताळगंगेवर। येते झाले गुरुवर। आज्ञापिती साचार। आपुल्या शिष्यां कारणे
।।२९।।
पुष्पासन वेगें करा। जाणें मशीं पैलतीरा। ऐक्य पावू शंकरा । मल्लिकार्जुनीं आम्ही हो
।।३०।।
पीत क्षेत शेवंतीची। कर्दळी कल्हार मालतीची। पुष्पे नानाविध प्रकारांची। भक्तजनांनी आणली
।।३१।।
कर्दळीचीं लावुन पानें। आसन केलें त्वरेनें। गंगेत ठेविलें आदरानें। सद्गुरूसी बसावया
।।३२।।
स्वामी सांगती अवघ्यांना। श्रीगुरुदेव दत्त म्हणा। निघून जावें निजसदना। दुःख न करावें
।।३३।।
लोकाचारें आम्ही जातों। परी गुप्तपणें राहतों। गाणगापुरीचा आम्हांस तो। पडणें नाहीं विसर कदा
।।३४।।
नित्य करा माझे भजन। मम चरित्राचें गायन। मी आहेच ऐसें समजून। करा तुम्हीं बाप हो
।।३५।।
माझ्या निर्गुण पादुका। गाणगापुरी ठेविल्या देखा। येथें न घ्यावी मुळीं शंका। मनोहर पादुका वाडींत
।।३६।।
या दोन्हीं पादुकांचे। अर्चन जो करील साचें । त्रिताप तया भक्तांचे। हरण मी करीन
।।३७।।
जे गुरुचरित्र वाचिती। त्यांवरी राहील माझी प्रीती। धन धान्य संपत्ती। नांदवीन त्यांच्या घरा
।।३८।।
पुत्रपौत्र शतायुषी। करीन त्याचें अहर्निशी। मम भक्ताचे पातकासी। हरण करीन सर्वदा
।।३९।।
ऐसें अवघ्यांस सांगितलें। स्वामी पुष्पासनी बैसले। उत्तरायण होतें लागलेलें। माघ वद्य प्रतिपदा
।।४०।।
कन्याराशीस बृहस्पती। होता तेधवां निश्चिती। असें कुंभ संक्रांतीसी। बहुधन संवत्सर
।।४१।।
ऋतु होता शिशिर । बालाजीचा असे वार । ते दिवशीं गुरुवर । निजानंदी बैसले
।।४२।।
जातां जातां ऐसे बोलले। निज शिष्याकारणे भले। पाठवीन खूण तुम्हां फुलें। तीं जा घेऊन निजगृहा
।।४३।।
तो प्रसाद माझा बरवा। संशय मुळीं न रहावा। जातो आम्ही आमुच्या गांवा । लोक दृष्टीनें परियेसा
।।४४।।
क्षणांत तेथून झाले गुप्त। पावलें परतटाप्रत । भेटते झाले मार्गात । नावाडियांकारणें
।।४५।।
ते नावाडी पैल तीरा। येऊन सांगती समाचारा। एक संन्याशी पर्वतशिखरा। आम्हां देखत गेला असे
।।४६।।
सतेज तनू दंड हातीं। नाम नृसिंहसरस्वती। सुवर्णाच्या पादुका असती। पायीं, आम्ही पाहिलें
।।४७।।
त्यानें निरोप सांगितला। आम्हापाशीं तुम्हां भला। जावें निघून आगराला। पुष्प प्रसाद घेऊनी
।।४८।।
दृष्टी ठेवून प्रवाहावर। पाहती शिष्य होऊन आतुर । तों प्रसाद पुष्पे आली चार। ऐसें त्यानी पाहिलें
।।४९।।
दोन शिष्य यती झाले। तीर्थाटना निघून गेलें। पाताळगंगेवरी आले। होते बापा चारचि
।।५०।।
बाळकृष्ण सरस्वती । उपेंद्रमाधव सरस्वती । हे दोघे होते यती । जे गेले तीर्थाटना
।।५१।।
साकरे सायंदेव थोर। नंदी नरहरी कवीश्वर। चौथा मी सिद्ध साचार। आम्ही फुलें घेतली तीं
।।५२।।
गुरुने कथिलें आम्हांसी। आम्ही गुरुरूपें अहर्निशी। राहूं गाणगापुरासी। अमरजा संगमातें
।।५३।।
मठीं ठेविल्या पादुका। तुम्हासाठी आहेत देखा। त्या मनकामनेस ऐका। पुरवतील तुमच्या शिष्य हो
।।५४।।
संगमीं आहे अश्वत्थ। तो कल्पतरू साक्षात । सेवा करिता मनोरथ। पुरवील तो निश्चयें
।।५५।।
पादुकांची पूजा करावी। त्रिकाळ आरती करा बरवी। मात्र कुकल्पना नसावी। कोणत्याहि प्रकारें
।।५६।।
ऐसें कथून अवघ्यांप्रती। स्वामी नृसिंहसरस्वती। निघून गेले शैल्य पर्वतीं। रमावया निजानंदी
।।५७।।
या ग्रंथाची अवतरणिका । देतों आतां श्रोते देखा। हा ग्रंथ सार निका। आहे गुरुचरित्राचें
।।५८।।
प्रथमाध्यायीं मंगलाचरण। देव गुरूंचे वंदन। तसेंच आहे वंश कथन। सरस्वती गंगाधराचें
।।५९।।
नामधारक शिष्यासी। सिद्ध भेटले पंथासी। त्यांनीं सद्गुरूच्या महिम्यासी। कथन केले तयाला
।।६०।।
ब्रह्मोत्पत्तीचे कथन। तैसें चारी युगाचें विवरण। संदीपकालागून। वेदधर्मं केली कृपा
।।६१।।
अंबरीषाचे सदनाला। दुर्वास अतिथी पातला। साधन द्वादशी समयाला। ही कथा प्रथमाध्यायीं
।।६२।।
द्वितीयाध्याया माझारीं। आले अनसूयेचे घरीं। ब्रह्मा, विष्णु, त्रिपुरारि। सत्व पाहावया तियेचें
।।६३।।
म्हणती नग्न होऊन। त्वां घालणें आम्हां भोजन। सतीच्या सत्वें करून। बाल झाले तिघेहि
।।६४।।
दुर्वास चंद्र निघून गेले । आश्रमीं दत्त राहिले । देवादिकांनीं पूजिले । श्रीगुरुदत्त म्हणून
।।६५।।
येथेंच दशावतार । धरिल्याचें आहे सार । पुढें ग्राम जें पिठापूर । तेथें आले दत्तात्रेय
।।६६।।
आपळ राजांची कांता। सुमती नामे तत्वतां । वर पावली ही कथा। द्वितीयाध्याया ठायी असे
।।६७।।
श्रीपाद वल्लभ स्वामीचा। झाला अवतार तेथ साचा। हेत पुरवून जननीचा। श्रीपाद गेले तीर्थाटना
।।६८।।
श्रीपाद वल्लभ वाराणशी। जाऊन बद्रिकाश्रमासी। आले वंदून दक्षिण देशी। गोकर्ण क्षेत्रा कारणें
।।६९।।
गोकर्णाचे महिमान। साकल्यें केलें कथन। गजाननानें रावण । लंकाधिपती चकविला
।।७०।।
तीन वर्षे पर्यंत । श्रीपाद राहिले तेथ। मित्रसह नामें नृपनाथ। तो जेथे उद्धरला
।।७१।।
चांडाळणीचा उद्धार। गोकर्णी झाला साचार। हे आदिलिंग साचार । सर्व लिंगा माझारीं
।।७२।।
तृतीयाध्यायाचे ठायी। गिरीपर्वता लवलाहीं। श्रीपादवल्लभ आले पाहीं। चातुर्मास राहावया
।।७३।।
पुढें निवृत्ती संगम । पुढें कुरवपूर ग्राम । ज्या ग्रामी उत्तमोत्तम । शनिप्रदोष व्रत कथिले
।।७४।।
याच कुरवपुरांत । रजक लाधला वराप्रत । वल्लभेश विप्राप्रत । राखिते झाले सद्गुरू
।।७५।।
शनिप्रदोष व्रत जियेसी । कथन केलें निश्चयेसी । ती जन्म घेऊन वैदर्भ-देशी। करंजास आली असे
।।७६।।
स्वामी नृसिंहसरस्वतीचा। जन्म तृतीयाध्यायीं साचा। तैसाच बाल लीलेचा। कथन केला विस्तार
।।७७।।
माता पित्यांस देऊन वर। सोडोनियां करंजापूर। पाहिलें जान्हवीचें तीर। संन्यास घेतला प्रयागीं
।।७८।।
नाम नृसिंहसरस्वती। धारण केलें देहाप्रती। शिष्य असंख्य संगतीं। जमते झाले श्रीगुरुच्या
।।७९।।
पुन्हां आले करंजापुरी। रत्नाबाईची हकीकत सारी। सांगून निघाले सत्वरी। पुढे तीर्थयात्रेस
।।८०।।
चतुर्थाध्यायी ऐशी कथा। श्रीगुरु आले त्र्यंबक क्षेत्रा। श्रीगोदेच्या प्रदक्षिणे करितां। निघते झाले तेथून
।।८१।।
बासरी सायंदेव भेटला। पोटदुखीच्या विप्राला । यथेच्छ घालून भोजनाला। व्याधी त्याची केली बरी
।।८२।।
यवन त्रासांपासून । सायंदेव रक्षिला जाण। शिष्यांस यात्रेकारण। जायालागी सांगितलें
।।८३।।
पुढे परळी वैजनाथीं। गुप्त झाले श्रीगुरुमूर्ती। स्वामी नृसिंहसरस्वती। थोर अधिकार जयांचा
।।८४।।
धौम्य शिष्यांची हकीकत। येच ठायीं आहे ग्रथित। पुढें भिल्लवडी ग्रामांत। येते झाले श्रीगुरु
।।८५।।
तेथें भुवनेश्वरा पाशीं। उद्धरिलें एका ब्राह्मणांसी। पुढें पंचमाध्यायासी। पंचगंगा तटा आले
।।८६।।
तेथे घेवडा कापला। द्रव्यलाभ विप्रा झाला। औदुंबराच्या महिमेला । वर्णिते झाले श्रीगुरु
।।८७।।
योगिनीची कथा येथ। गंगानुज केला मुक्त। शिरोळ ग्रामीचे ब्राह्मणीप्रत। पुत्र झाला गुरुकृपें
।।८८।।
तो पंचत्व पावतां । पादुकेपाशीं आणतां । सजीव होऊन बैसतां । झाला हें पाहिलें सर्वांनीं
।।८९।।
षष्ठाध्यायामाझारीं । वांझ म्हशीची कथा सारी । स्वामी आले गाणगापुरी । ब्रह्मराक्षसा मुक्त केलें
।।९०।।
त्रिविक्रमभारतीची । भेट तेथें घेतली साची । फजिती दोघां ब्राह्मणांची । वादामध्यें केली असे
।।९१।।
रेघा सात ओढून । मातंग केला ब्राह्मण । तो पूर्ववत करून । पुन्हां धाडिला गेहातें
।।९२।।
भस्मप्रभाव सप्तमामाजीं। वामदेवें राक्षस राजी। केला सांगून सहजीं। उद्धार त्याचा त्या योगें
।।९३।।
गोपिनाथपुत्र दत्त। आणिला गाणगापुरांत। तो येतांच झाला मृत। होती भार्या बरोबरी
।।९४।।
त्या दत्त-भार्येसी। सहगमन विधि साकल्येंसी। सांगते झाले ज्ञान शशी। तयां अमरजा संगमातें
।।९५।।
सद्गुरूची कृपा जाहली। चरण जले तनू सिंचली। ज्या योगें उठून बसली। मूर्ती दत्त विप्राची
।।९६।।
पुढें रूद्राक्षमहिमान। महानंदेची कथा पूर्ण। कुक्कुट मर्कटाचे अवतरण। झालें काश्मीर देशांत
।।९७।।
आतां अष्टमाचे ठायीं। कथा अभिनव असे पाहीं। भद्रसेनाचे गेहीं। पराशर पातले
।।९८।।
रुद्रमहिमा सांगितला। राजपुत्र जीवविला। सुधर्म तारक एकमेकांला। देते झाले सौख्य बहू
।।९९।।
स्त्रियेलागी उपदेशितां। मंत्रहानी होय सर्वथा। म्हणून सांगती कथा। कच-देवयानीची
।।१००।।
कथा आहे नवमांत। सीमंतिनीची इत्थंभूत। सोमवाराचे व्रत । श्रेष्ठ किती हे सांगितले
।।१०१।।
कथा आहे दशमांत। सांगते झाले सद्गुरूनाथ। दोष परान्नाचे विप्राप्रत। गाणगापूर ग्रामांसी
।।१०२।।
सर्व कथिलें कर्माचरण। त्याज्यात्याज्य विचार संपूर्ण। नित्य साधकें वर्तन। कैसे ठेवणें तें कथन केलें
।।१०३।।
एकादशाध्यायी। भास्करब्राह्मणाची कथा पाहीं। थोर भंडारा लवलाही। करते झाले श्रीगुरु
।।१०४।।
सोमनाथाकारण। देते झाले पुत्ररत्न । फेडिलें त्यांचें वांझपण। वृद्धापकाळीं उभयतांच्या
।।१०५।।
शुष्ककाष्ठा फुटला पाला। ऐसा श्रीगुरुचा सोहळा। नरहरी नामें विप्राला । उद्धरिते झाले श्रीगुरु
।।१०६।।
कथानक द्वादशांत। सायंदेव पुत्रासहित । आला असे भेटण्याप्रत । पुत्र पौत्रा घेऊनियां
।।१०७।।
संवाद ईशपार्वतीचा। कथन केला सर्व साचा। तैसाच काशी-यात्रेचा। विधि कथन केला कीं
।।१०८।।
कथा अनंतव्रताची। तेराव्यामध्यें साची । तैशीच मल्लिकार्जुन क्षेत्राची । कथा तेथें ग्रथित असे
।।१०९।।
क्षण न लागतां विणकर। नेला शैल्यपर्वतावर । मल्लिकार्जुनमहिमा थोर। तोहि वर्णन केला असे
।।११०।।
नंदीनामें ब्राह्मण । बैसला कवी होऊन । कोड त्याचे जाऊन । ही कथा तेच ठायी
।।१११।।
चौदाव्यांत कथा सुंदर । नरहरीसी कल्लेश्वर । आपण हेंच साचार । दाविलें असें श्रीगुरुंनी
।।११२।।
दिपवाळीच्या सणा। साती जणांच्या गेले सदना। आपुल्या योगबळें जाणा। एकाच वेळी भोजनासी
।।११३।।
जोंधळा शेतीं कापविल्याची। कथा येथेच ग्रथित साची। गाणगापूर माहात्म्याची। रत्नाबाईची कथा येथ
।।११४।।
बेदराधिप राजा यवन। आला दर्शनाकारण। त्याच्या स्फोटा दवडून। श्रीगुरु गेले बेदरीं
।।११५।।
रायासी आशीर्वाद दिधला। पुढें गेले सिंहस्थाला । श्रीगोदावरीचे तटाला। स्वामी नरसिंह सरस्वती
।।११६।।
परतूत आले गाणगापुरी। क्षेत्र महती कथिली सारी। गुप्त होऊं भूमीवरी। ऐसें शिष्यांस बोलले
।।११७।।
घालून पुष्पाचें आसन । पाताळगंगेवरी जाण । सद्गुरू पावले अंतर्धान। पुष्पप्रसाद पाठविला
।।११८।।
आतां हा पंधरावा। अध्याय आहे साच बरवा। हा कळसाध्याय लेखावा। याच चरित्रसारामृताचा
।।११९।।
हे जें गुरुचरित्राचें। सार म्यां काढिलें साचें। कारण इतुकेंच आहे याचें। वाचतां यावें चहुं-वर्णांना
।।१२०।।
म्हणून खटाटोप केला। हा सारामृत ग्रंथ रचियेला। तो ईशकृपे शेवटा गेला। भावनाम-संवत्सरी
।।१२१।।
जें सरस्वती गंगाधरें। गुरुचरित्र रचिलें आदरें। त्याचेंच हें सार खरें। तुम्ही ऐकिले श्रोते हो
।।१२२।।
याचा मथितार्थ ध्यानी धरा। विचार सर्वदा जागृत करा। गुरुचरित्रीं प्रेमा धरा। खऱ्या भक्तिभावाने
।।१२३।।
श्रीगुरूंचा अवतार सत्य। पाहिजे वैराग्यभरित। तेथ कर्म असल्या विपरीत। अवतार त्यासी म्हणू नका
।।१२४।।
सच्चिदानंद झाला दत्त। कौपीनधारी ऊर्ध्वरेत। शिवं न दिले विभवाप्रत । यत्किंचितहि दत्तानें
।।१२५।।
वास केला औदुंबरीं। बसले व्याघ्रासनावरी। धवल विभूती अंगभरी। चर्चन केली दत्तात्रेयें
।।१२६।।
दत्तापरीच पुढें भले। श्रीपाद वल्लभ वागले। तैसेंच वर्तन ठेविलें। स्वामी नृसिंहसरस्वतींनी
।।१२७।।
अधिकार अंगी असावा। परी दंभाचार नसावा। अशांचीच करा सेवा। तरीच सुखा पावाल
।।१२८।।
पहा श्रीगुरु नेले बेदरी। यवन भूपानें अत्यादरीं। उत्सव केला सर्वतोंपरी। बादशहानें श्रीगुरुचा
।।१२९।।
म्हणून कां स्वामीप्रत। शौचकूप केला रत्नखचित। अत्तरें विशेष ओतून आंत। शोभा आणली काय तया
।।१३०।।
किंवा इस्तरी कपडे अंगावरी। घालणें होते अशक्य तरी। याचा विचार अंतरीं। आधी केला पाहिजे
।।१३१।।
ज्या कोणा गुरुचें। चित्त लोलूप साचे। पदार्थ छानछोकीचे। सेवण्याच्या विषयाकडे
।।१३२।।
त्यांसी गुरु म्हणू नका। भलताच मान देऊं नका। अशाची न होय कदा देखा। सेवा मोक्षदायी विबुध हो
।।१३३।।
श्रीगुरुचें वर्तन। पाहिजे वैराग्य संपन्न। असल्या विभवाचे झांकण । ते खोटेंच केव्हां हि
।।१३४।।
या दुर्धर कलींत । दत्तावतार बहुताप्रत । मानिताती सुशिक्षित । हेंच आश्चर्य वाटतें
।।१३५।।
जेथें विभवा आला ऊत। तेंच खुळ, हें म्हणती दत्त। अशाने गुरुचरित्राप्रत । येणार आहे लघुपणा
।।१३६।।
ऐशा विभवलोलूप गुरुचे। साक्षात्कार त्याच दर्जाचे। भक्त त्यांचे सांगती वाचे। एकमेकां कारणें हो
।।१३७।।
कोणी म्हणती वात गेला। सदुरूदर्शनें माझा भला। कोणी म्हणती मुलगा झाला। तीन वाऱ्या करितां मज
।।१३८।।
कोणी म्हणती पोटशूळ। गुरुदर्शनीं निमाला सकळ । ऐसें साक्षात्काराचें खूळ। माजले सांप्रत चोंहींकडे
।।१३९।।
एवंच जे जे निवारितां येती। औषधाने वैद्याप्रती। तेच साक्षात्कार ऐकू येती। या वैभवी गुरुच्या खात्यांत
।।१४०।।
ऐशा प्रकारच्या कृत्यांस। साक्षात्कार नये म्हणतां खास। अशक्य गोष्टी घडविणारांस। साक्षात्कारी म्हणावे
।।१४१।।
पहा साताजणाचे घरी। श्रीगुरु गेले निर्धारी। एकाच वेळीं अत्यादरीं। हे ध्यानांत असू द्या
।।१४२।।
विणकर नेला क्षणांत । शैल्यपर्वताप्रत । वांझ म्हैस दूध देत । श्रीगुरुच्या कृपेने
।।१४३।।
या वैभवीं गुरुपाशीं। वैराग्य नये प्रत्ययासी। विषमिश्रितखिरीसी। सेवितां पुष्टी कोठून
।।१४४।।
ज्या गुरुचा अवघा भर । छानछोकींवरी साचार। तो विषयडोहींचा जलचर। सदुरू त्या म्हणू नका
।।१४५।।
वैराग्यरूप चंद्रासी । वैभव कलंक निश्चयेसी । वा वैराग्यरूपसूर्यासी। वैभव हे ग्रहण समजा
।।१४६।।
सविता सूर्य नारायण। योग्य कराया अर्चन। परी लागतां त्यासी ग्रहण। नुसतें न करणें नमनही
।।१४७।।
अलीकडे ऐसें झालें। गुरुचें खाते वाढलें। शिष्य बिचारे कंटाळले। सरबराई करितां त्यांची
।।१४८।।
म्हणून पदर पसरून। सांगणें तुम्हां कारण। जेथें वैराग्याची आहे वाण। त्याचें तोंड पाहूं नका
।।१४९।।
सद्गुरू पाहिजे वैराग्यभरित। सदाचारी अति शांत। अजादुजाचे यत्किंचित्। वारे न जेथें तो गुरु
।।१५०।।
छानछोकीचे नांव नाहीं। वेडें वाकडे न करीं कांहीं। कर्म भक्ती जागृत राहीं। ज्याचे ठायीं तो गुरु
।।१५१।।
आतां कित्येक लोकांप्रत। माझे बोलणें वाटेल विषवत। त्यास माझा यत्किंचित । इलाज नाहीं विबुध हो
।।१५२।।
एक वैराग्यावांचून। संत नये होतां जाण। प्रत्यक्ष हरीचें दर्शन। मग तयांसी कोठून हो
।।१५३।।
म्हणून विनंती पुन्हां पुन्हां। करितसे मी तुमच्या चरणा। उगीच अभिमाना। भलत्यासी न माना हो
।।१५४।।
व श्रीगुरुचरित्रसारामृत। संक्षेपरूपे आहे ग्रंथ। परी तो संक्षेप कथानुसंधानांत। नाहीं केला विबुध हो
।।१५५।।
कथा सर्व ग्रथित केल्या। संक्षेपरूपे येथ भल्या। त्या पाहिजे गोड केल्या। तुम्ही भाविक श्रोते हो
।।१५६।।
कां कीं तुम्ही श्रोते जननीपरी। मी बालक तुमच्या समोरीं। माझी वेडी वांकडी वैखरी। मान्य केली पाहिजे
।।१५७।।
स्वस्ति श्रीगुरुचरित्रसारामृत। भाविक सेवो भला सत्य। कल्याण करो त्याचें दत्त। हेंच इच्छी दासगणू
।।१५८।।
।। इति पंचदशोध्यायः ।। शुभंभवतु ।।
।। श्रीदत्तात्रेयार्पणमस्तु ।। श्रीहरिहरार्पणमस्तु ।।
卐 卐 卐 卐 卐
इति अध्याय समाप्तः