।। श्रीगणेशाय नमः ।।
जयजयाजी आदि अनादि पुराणपुरुषा। लीलाविग्रही परेशा। हे अचिंत्यरूपा पंढरीशा। पाहि मां श्रीरुक्मिणीपते
।।१।।
नानापरीच्या भक्तांसाठी। नानारूपें जगजेठी। धारण केलींस उठाउठी। भक्तकामना पुरवावया
।।२।।
दत्तभक्तांकारण। तूंच अत्रीचा नंदन। होवोन झालास अवतीर्ण। कृपाराशी जगतीतला
।।३।।
श्रीपादवल्लभ तूंच देवा। नरसिंहसरस्वती तूच बरवा। तुझ्या लीला वासुदेवा। वेदांहि न वर्णवती
।।४।।
तुझा लाधतां वशीला। कांही न अशक्य जगतीतला। ऐसा अनुभव कित्येकांला। येऊन गेला मागुती
।।५।।
असो मागील पंधराव्यांत । पूर्ण झालें गुरुचरित्र। आतां या सोळाव्यांत। सार सांगतों तयाचे
।।६।।
जग सुवाटे लावण्यास । सद्गुरू पाहिजे खास । हें आणून ध्यानास । विष्णु झाले दत्तगुरु
।।७।।
दत्तगुरु जेव्हां झाले। तेव्हां शेषशयन त्यागिलें। पहुडावया घेतलें। व्याघ्रांबर वा मृगाजिन
।।८।।
अंगा विभूति लाविली। वैजयंती त्यागिली। समर्थ असोन घातिली। लंगोटी लज्जा रक्षावया
।।९।।
म्हणजे सद्गुरू व्हावयास । वैराग्य पाहिजे अवश्य । काय दत्तात्रेयास। विभवाची वाण होती
।।१०।।
परिभ्रमण भूमीवर। करीत दत्त निरंतर । रहावयासी औदुंबर। वृक्ष गर्दछायेचा
।।११।।
जठराग्नीची करण्या तृप्ति। भिक्षा मागे दत्तमूर्ती। काय तद्भक्त तयाप्रती। शिरा घालण्या तयार नव्हते
।।१२।।
श्रीपादवल्लभ यति। तैसे नरसिंहसरस्वती। जे दत्तावतार निश्चिती । तेहि वैराग्येंच वागले
।।१३।।
म्हणजे सद्गुरूचें लक्षण। असणे वैराग्यसंपन्न। डामडौल विभवालागून। शिवू न देणें यत्किंचित्
।।१४।।
आदिनाथापासून भली। गुरु परंपरा सुरू झाली। गुरुकृपेने झाले बली। शिष्य त्यांचे जगामध्ये
।।१५।।
श्रीमच्छिंदर जालिंदर। जे आदिनाथाचे शिष्य थोर। पाहतां अंगींचा अधिकार। ब्रह्मदेवहि फिका पडे
।।१६।।
मच्छिंदरें आपुला। शिष्य उकिरड्यांत निर्मिला। जालिंदर उत्पन्न झाला। अग्निज्वाळेपासुनी
।।१७।।
मच्छिंदरे साबरी। मंत्रविद्या निर्मिली खरी। ज्या विद्येनें गोरख करी। पहाड अवघा सोन्याचा
।।१८।।
ऐसा अंगींचा अधिकार। परी भिक्षा मागे घरोघर। संजीवनीच्या बळावर । कृत्यें अघटित केली बहु
।।१९।।
परी न कोठे बांधिलीं। मठमठीं त्यानें भली। कोणाहि न मागितली। वर्गणी त्यानी ध्यानीं धरा
।।२०।।
जो चोरानें मारिला। तो श्रीपादवल्लभें जीवविला। ज्याच्या आशीर्वादें झाला। रजक राजा बेदीं
।।२१।।
पुढें दत्त अवतार निश्चिती। स्वामी नरसिंहसरस्वती। मृतद्विजकुमाराप्रती। वाडींत ज्यांनी सजीव केले
।।२२।।
ज्यांनी एका क्षणांत। मूर्खास केलें पंडित । ज्यांनी वांझ म्हशीप्रत। दुग्धधारा फोडिल्या
।।२३।।
वाळल्या काष्ठाप्रती पाला। निजकृपें ज्यांनी फोडिला । त्या नरसिंहसरस्वतीला। सदुरू ऐसें म्हणावें
।।२४।।
सातरेघा ओढून। मातंग केला ब्राह्मण। केलें गर्वाचे खंडन। त्याच्या हातून विप्राच्या
।।२५।।
सात शिष्यांच्या गेहासी। एकाच वेळीं भोजनासी। बसते झाले ज्ञानशशी। स्वामी नरसिंहसरस्वती
।।२६।।
विणकर नेला क्षणांत। ज्यांनी शैल्यपर्वताप्रत। जेथें मल्लिकार्जुन उमानाथ। लिंगरूपें राहिला
।।२७।।
निसर्ग जें जें करावया। असमर्थ आहे जगाठाया। तें तें कृत्य घडवोनियां। जगीं आणिती सद्गुरू
।।२८।।
जेवढे आजपर्यंत। सद्गुरू गाजले जगतांत। त्यांनी त्यांनी अघटित । कृत्यें ऐशींच केलीं कीं
।।२९।।
प्रल्हाद आद्य भागवत । न जळाला अग्नींत । शंकराचायें प्राशिला सत्य। रस काचेचा श्रोते हो
।।३०।।
ज्ञानेश्वरें बोलका। पशु पैठणीं केला देखा। हरीचा भक्त कुलाल राका। आव्यांत मांजरें जीवविलीं
।।३१।।
श्रीनामदेवें फिरविलें । राऊळ औंढ्यामाजीं भलें। निजोदरास फाडिलें। सावत्यानें अरणामधीं
।।३२।।
कमालाचे शरीर। दिधले असतां सुळावर। करिते झाले नमस्कार। शिर कापिलें असूनियां
।।३३।।
धामणगांवी बोधला। भक्त हरीचा होऊन गेला। ज्याच्या थोट्या ताटाला। कणसें फुटलीं हरिकृपें
।।३४।।
इंद्रायणीच्या गोट्यास। करस्पर्श केला परिस। त्या संतसम्राट् तुकोबास । किती म्हणून वानावें
।।३५।।
मुकुंदराज दासोपंत। प्रतिष्ठानीं एकनाथ। पिंपळनेरी निळा संत। समर्थ सज्जनगडासी
।।३६।।
अलीकडेहि ऐशा रीती। संत झाले भूवरती । माणिकप्रभु गुरुमूर्ति । प्रगट झाले कुंडांतून
।।३७।।
सद्गुरू हरी नारायण। एकदां पावोनियां मरण। पुन्हा झाले सजीव जाण। ज्याची समाधी अष्ट्यामधें
।।३८।।
इगतपुरीच्या सान्निध्यास। पिंपरी नामें ग्रामास । सद्रोद्दीन पुण्यपुरुष। ऐसेच गेले होवोनियां
।।३९।।
ज्यांनीं यमाऊच्या गाईस। दूध आणिलें विशेष । सैंपाक नसून अरण्यास। जेवू घातले गुराख्यांना
।।४०।।
हनुमंताची पाषाणमूर्ति। बोलली देवनाथाप्रती। पाण्याचे दिवे निश्चिती। साईनें लाविले शिर्डीत
।।४१।।
म्हणजे जे जे खरे संत होती। तेच अघटित कृत्ये करिती। निंदकांना शरण आणिती। ऐसें सामर्थ्य तयांचें
।।४२।।
ईश्वरासी जाणिल्याविना । संतत्व अंगीं येईना। आणि संतावांचून होईना। अघटित प्रकार केव्हांहि
।।४३।।
संत वैराग्य ना सोडिती। संत दंभ ना दाखविती। आपणास ना म्हणवून घेती। मीच ईश्वर म्हणोनियां
।।४४।।
सेव्यसेवक भाव आपुला। ज्यांनीं कदा न टाकिला। मात्र अधिकार दाखविला। प्रतिईश्वर म्हणूनी
।।४५।।
ऐशा थोर अधिकाराचे। जे जे कोणी झाले साचे। तेच सद्गुरूपदाचे। आहेत एक अधिकारी
।।४६।।
श्रोते हैं गुरुचरित्र। कामुकासाठी आहे खचित। आणि भक्त इच्छा पुरविण्याप्रत। भगवान दत्त जाहले
।।४७।।
ह्या दत्त अवताराची सरी। नये कोणासीहि खरी। अध्यात्माचे अधिकारी। झाले दत्तकृपेनेंच
।।४८।।
इच्छा अवघ्या कामुकांच्या। दत्तानेंच पुरविल्या साच्या। त्या पुरवून भक्तांच्या । वृत्ति वळविल्या अध्यात्मीं
।।४९।।
कां कीं या जगतांत। वासनेचें प्राबल्य बहुत। कोटीमाजी विरळागत। निरिच्छ ऐसा प्राणी निपजे
।।५०।।
परी ती अध्यात्माची पर्वणी। सर्वां लाभावी म्हणूनी। गुरुचरित्राचा जन्म अवनीं। झाला दत्त आज्ञेनें
।।५१।।
श्रोते ही वासना। जन्ममरणाची मूळ जाणा। कृतदोष भोगिल्याविना । सुटका नोहे कोणाहि
।।५२।।
दोष पूर्वजन्मार्जित। येती आडवे संसारांत। त्या दोषाचा परिहार होत। नाना व्रतें केल्यावरी
।।५३।।
तें व्हावयासी जाणा। गुरुचरित्राची योजना। म्हणूनी येथें कुकल्पना। मुळीं न घ्याव्या श्रोते हो
।।५४।।
असो स्वामी नरसिंहसरस्वती। गुप्त झाले शैल्यपर्वतीं। बैसून पुष्पासनावरती । पाताळगंगेत कृष्णातिरीं
।।५५।।
तेच पुढें कल्याणनगरीं। जन्मले मनोहराच्या उदरी। माणिकप्रभू भूमीवरी। नाम धारण करूनियां
।।५६।।
ज्यांनी बहिणाबाईप्रत। एकेक कवडीस एकेक सुत। दिला होऊन कृपावंत । खरेंच दत्त अवतार ते
।।५७।।
हळ्ळी खेड्यांत कुंडांतून। प्रगट झाले दयाघन। ज्यांच्या चरण संपुटालागुन। हनुमान वाही निजशिरीं
।।५८।।
माणिकप्रभुलीलेचा। ग्रंथ निराळा आहे साचा। म्हणून ये ठायीं तयाचा। मी न करी उल्लेख
।।५९।।
माणिकप्रभूनंतर। झाला दत्ताचा अवतार। स्वामीसमर्थ दिगंबर। अक्कलकोटीं वास ज्यांचा
।।६०।।
यांचीही अघटित करणी। आली प्रत्यया लागुनी। कृतार्थ केले कैक त्यांनीं। भक्त आपल्या कृपेने
।।६१।।
पुढें स्वामी आळंदीचे। नरसिंहसरस्वती नांवाचे। हेहि अवतार दत्ताचे। मानूं लागले भाविक
।।६२।।
याहि स्वामींचा अधिकार । थोर होता साचार। वैराग्यनीतीस तिळभर। फाटा नव्हता यांजवळी
।।६३।।
पुढें श्रीसाईमहाराज शिर्डीचे। दत्त अवतार होते साचे। यांनीं लाविले पाण्याचे। दिवे असंख्यात शिर्डीत
।।६४।।
श्रीवासुदेवानंदसरस्वती। विद्वान शुचि ज्ञानमूर्ती। वाटे त्रिविक्रम भारती। आले पुन्हा जन्मास
।।६५।।
हेहि वैराग्यसंपन्न। होते अधिकारी पूर्ण। यासहि दत्त अवतार म्हणून। भाविक लोक मानिती
।।६६।।
कांहीं लोक म्हणती येथ। ग्रंथकर्ता साईभक्त। आहे म्हणून यवनाप्रत। दत्त अवतार ठरविले
।।६७।।
हें वरीवरी पाहतां दिसेल खरें। परी शोधितां अंतर बा रे। म्हणावें लागेल अत्यादरें। दत्तअवतार साईंस
।।६८।।
पहा दत्तांनीं बहुत वेळां । यवन वेष घेतला । भेट दिधली नाथाला। दत्तात्रेयें फकीर वेर्षे
।।६९।।
यवनाधिप गाणगापुरीं। लोळला स्वामीचरणावरी। जो बादशहा बेदरीं। होऊन गेला दत्तकृपें
।।७०।।
त्या बादशहानें स्वामीस। जेव्हां नेले बेदरास। बसविलें आपुले तक्तास। अत्यादरे करून
।।७१।।
तैं स्वामीनें केलें मधुरोत्तर। कीं मी मूळचा फकीर। या बादशाही तक्तावर। आम्हीं मुळींच बसू नये
।।७२।।
ते फकीरशब्द करण्या खरे। दत्त झाले साईं साजिरे। दत्तापरी वैराग्य पुरें। होतें अंगीं पाहिलें म्यां
।।७३।।
श्रोते शिर्डीत कित्येक वेळां। साईंबाबा बोलले मला। कीं मी गेलों होतों बेदराला। संन्याशाच्या वेषानें
।।७४।।
म्हणून मी तयाप्रत। दत्तअवतार मानितों खचित। दुराग्रहाचें काम येथ। मुळींच नाहीं विबुध हो
।।७५।।
असो हल्लीं भूमीवर। दत्त अवतार झाले फार। तें मी सांगू कोठवर। पार न ये सांगतां
।।७६।।
पाहतां त्यांचें वर्तन। शास्त्रमार्गा विरुद्ध असून । ऐशा दांभिकालागून । दत्त अवतार मानिती
।।७७।।
बाहा वर्तन पाहूं जातां। अश्लील ओंगळ सर्वथा। जेथें वैराग्य नीतीची वार्ता। मुळींच नाहीं
।।७८।।
ज्ञान नाहीं कर्तृत्व नाहीं। सशास्त्र ऐसें वर्तन नाहीं। अनुकरणीय नसेच कांहीं। ज्यांच्या ठायीं विबुधहो
।।७९।।
अशासी दत्त अवतार म्हणतां। अवतारासी येईल लघुता। कसबिणीशीं पतिव्रता। म्हणणें कां शोभेल
।।८०।।
कोणी नागवा बैसतो। दत्त अवतार म्हणवितो। झोंपड्याभोंवती हिंडवितो। आपुल्या शिष्यवर्गाला
।।८१।।
आणि सांगे ऐसें म्हणा। धन्य हो प्रदक्षिणा। अवताराच्या पाहतां खुणा । एकहि न दृष्टी पडे
।।८२।।
दत्त होते कौपीनधारी। हा नागवा कटघरीं। दत्ताजवळ नव्हत्या नारी। येथें त्यांचा सुळसुळाट
।।८३।।
दत्त स्त्रियांसी भाषण। करीत होते दुरून। हा गळ्यांत हात घालून । स्त्रियेसहित चित्र काढवी
।।८४।।
दत्तात्रेयाचे शुद्ध ज्ञान। याचें ऐकतां येईल घाण। सांगे शिष्यालागून। मला भार्या अर्पण करा
।।८५।।
येतां संक्रांतीचा सण। बैसे लुगडें नेसून। ऐशा बहुरूप्याकारण। दत्त अवतार म्हणू नका
।।८६।।
म्हणे मी योगयोगेश्वर। आणि फिरे मोटारींत निरंतर। योगी तोच साचार। कीं जो अधर चाले अंतराळीं
।।८७।।
कोणी जीवनमुक्त म्हणविती। ज्ञानेश्वरी वाचिती। तेच आपणा करून घेती। दह्यादुधाचा अभिषेक
।।८८।।
वर्णाश्रमाची करिती निंदा। वेदवाक्य ना मानिती कदा। कोणी चैनींत राहती सदा। एखाद्या राजपुत्रापरी
।।८९।।
कोणी संतांच्या नांवावरी। एखादी दिंडी काढून खरी। नाचवितात भरबाजारीं। गरत स्त्रियांकारणें
।।९०।।
कोणी मठ बांधिती पंढरपुरीं। परी दर्शना न जाती मंदिरी। म्हणती विठ्ठल श्रीहरी। आहे आमच्या हृदयांत
।।९१।।
ऐसीं सोंगे निघालीं। लोपून गेल्या खऱ्या चाली। याच मांगांनीं रसातळीं। धर्म नेला हाय हाय
।।९२।।
हे ढोंगी साधु ऐसे करिती। आपुली चरित्रं लिहविती। ज्यांत गप्पाच गप्पा असती। अवासवा मारलेल्या
।।९३।।
त्याचे करविती पारायण। आपुल्या शिष्यांकडून। चरित्र पाहिल्या शोधून। मुळीं न पत्ता खऱ्याचा
।।९४।।
त्यायोगे ऐसें झालें। विचारवंता सांकडें पडलें। पूर्वसंतांविषयी बनलें। मन तयांचें साशंक
।।९५।।
याच चरित्रापरी। तींही चरित्रं असतील खरीं। ऐसें मानून अंतरीं। विद्वान गप्प बसतील
।।९६।।
एवंच सुशिक्षिताला। धर्माविषयीं संशय पडला। तो पडण्या कारण झाला। हा दांभिक वर्ग पहा
।।९७।।
ऐशा ढोंग्याभोंवती। कामिक लोक आधीं जमती। वेडेवांकडे विधी करिती। इच्छा मनींची पूर्ण व्हाया
।।९८।।
अवधें अविधी म्हणून। फलद न होय अनुष्ठान। खडकी पेरितां धान्य कण। त्यास कणसें येतील का
।।९९।।
अनुष्ठान कैसें करावें। हें गुरुचरित्रीं पहावे। आणि त्याचेच कीं भोगावें। आलेले तें गोड फळ
।।१००।।
म्हणून हे आर्य बंधूहो। सावध तुम्ही शीघ्र व्हा हो। सशास्त्र विधि आचरा हो। अनाचार टाकूनी
।।१०१।।
आचार आणि विचाराची। जोड घालूनियां साची। करा पारायणें ग्रंथाची। दत्तक्षेत्रीं जाऊनियां
।।१०२।।
संतांठायींचा सदाचार। पाहिजे सशास्त्र साचार। ज्या ठायीं तिळभर। वैराग्या फाटा नसावा
।।१०३।।
सदाचार असूनी नुसता। जरी नसेल वैराग्यवार्ता। त्याही संतपणाची योग्यता। येणार नाहीं कदापि
।।१०४।।
सदाचार असावा वैराग्यभरित। सदाचार असावा विचारयुक्त। सदाचार असावा शास्त्रसंमत। तरीच तो उपयोगी
।।१०५।।
आतां दत्तक्षेत्राचा विचार। सांगतों येथें साचार। पाहतां दत्त जगदाधार। व्यापूनि राहिला विश्वातें
।।१०६।।
परी ही उच्चतम भावना। ती ज्ञात्यासाठीं आहे जाणा। तीच कामुकजनांना। फलदायी ना होईल
।।१०७।।
अवघ्या दत्तभक्तांना । अवश्य आहे उपासना। उपासनेवीण भक्तपणा। येत नाहीं कोणाहि
।।१०८।।
उपासना ऐसें करी। नांदवी सौख्यसागरीं। दुरित संकटें पापें दुरी। करीत आपुल्या भक्तांची
।।१०९।।
सदाचारा वांचून। उपासना ना घडे पूर्ण। सदाचार हें शरीर जाण। उपासना ही प्राण पहा
।।११०।।
मन दयार्द्र असावें । त्याज्यात्याज्य शोधावे । यमनियम आचरावे। व्यवहार हा न सोडितां
।।१११।।
श्रोते भक्तस्थितींत । प्राधान्य आहे प्रतिमेप्रत। म्हणून तया लागत। कोठें तरी क्षेत्र पहा
।।११२।।
तीं दत्तक्षेत्रं साधारण। कथितों मी तुम्हांकारण। असू द्यावें अवधान। आपुले या कथेकडे
।।११३।।
प्रथमतः माहूरक्षेत्र। जेथें अवतरले श्रीदत्त । रेणुका ती राहिली जेथ। जननी परशुरामाची
।।११४।।
पिठापूर कुरवपूर। भिलवडी करवीर औदुंबर। कृष्णा पंचगंगातीर। भीमा अमरजासंगम तसा
।।११५।।
त्र्यंबक प्रयाग वाराणसी। बद्रिकाश्रम हिमालयासी। गोकर्ण तें दक्षिणदेशी। गोदावरींचे उभय तीर
।।११६।।
जांब आपेगांव पैठण। टोकें पुणतांबे राक्षसभुवन। नांदेडपुरी कुशतर्पण। वंजारा संगम कंदकूर्ती
।।११७।।
ज्ञानेश्वरीचें जननस्थान। जें कां महालय पट्टण। अमृतकुंभ घेऊन। मोहिनीराज जेथ उभा
।।११८।।
म्हातारदेव वृद्धेश्वर। जेथ गोरख मच्छिंदर। नाथपंथी साधू इतर । येऊन राहिले वरचेवरी
।।११९।।
अरवी मुद्रलेश्वर भीमातिरीं। वाडी अमरापूर कृष्णतिरीं। पंचगंगासंगमावरी। कुरुंदवाड दत्तक्षेत्र
।।१२०।।
ज्या कुरूंदवाडांत। हरभटजीने दर्शनार्थ। स्थापन केल्या पादुका सत्य। स्वामी नरसिंहसरस्वतीच्या
।।१२१।।
श्रोते या हरभटजीची। कथा ऐका तुम्ही साची। म्हणजे अनुष्ठानाविषयींची। खात्री तुमची पटेल
।।१२२।।
हा हरभटजी कोतवड्याचा। उपाध्याय सहस्त्रबुध्दयांचा। ब्राह्मण चित्पावन जातीचा। गणेशभक्त महा जो
।।१२३।।
ज्याने गणेशाची उपासना। केली असे खडतर जाणा। ज्यायोगे भेटला त्यांना। पुळेग्रामी गजानन
।।१२४।।
तीस वर्षानंतर। लग्न झाले साचार। गजाननाचे साक्षात्कार। होऊ लागले वरच्यावरी
।।१२५।।
राजापूर ग्रामांत। बुडतें जहाज समुद्रांत। तारिते झाले गणेशभक्त । हरभटबाबा पटवर्धन
।।१२६।।
एकदां म्हापणगांवांत। आले हरिबा फिरत फिरत। तो आपुला घेऊन सुत। एक विधवा पातली
।।१२७।।
बाई म्हणे बाबाशी। कोणी नाहीं आधार मशी। या पोरक्या अर्भकाशी। कृपा करून सांभाळा
।।१२८।।
हा मुंजीच्या योग्य झाला। मी आपल्या उपाध्यायाला। धर्म मुंज लावण्याला। केली विनंती नानापरी
।।१२९।।
तें न त्यानें ऐकिलें। म्हणून मी येथें आलें। हे दीनदुबळ्यांचे माऊले। आतां परतें लोटूं नका
।।१३०।।
ऐसे ऐकतां तिचे वचन। महाराज म्हणती हा नारायण। पुत्र नोहे आहे निधान। तुझ्या पोटीं जन्मलेलें
।।१३१।।
मीच याचा पुरोहित। होऊन मुंज लावितों येथ। याचा वशिला एकदंत। झाला आतां न चिंता करी
।।१३२।।
म्हातारपणीं मुंज लाविली। नारायण जोश्याची ती भली। आणिक आज्ञा वरी केली। कापशीस जाया कारणें
।।१३३।।
याचा यजमान कापशींत । क्षत्रिय मराठा जातिवंत। त्याच्या आश्रयें विभवाप्रत। तुझा हा पावेल नारायण
।।१३४।।
तेंच पुढे सत्य झालें। नारायणराव सरदार बनले। इचलकरंजीकरांचे आलें। घराणे ते उदयाला
।।१३५।।
पूर्वी ब्राह्मण मराठ्यांत। द्वेष नव्हता यत्किंचित। म्हणून स्वराज्य महाराष्ट्रांत। स्थापितां आलें शिवाजीला
।।१३६।।
कापशीगांवचा अधिपती। संताजी घोरपडे सेनापती। ज्याची तलवार पाहून ती। शत्रू पळती समरांगणी
।।१३७।।
त्याने नारायण जोश्याला। सर्वस्वी आधार दिला। पुत्राप्रमाणे प्रतिपाळ केला। धन्य धन्य तो मराठा
।।१३८।।
यजमानाचे गौरवार्थ। नारायण धरी आपणाप्रत। उपनांव तें घोरपडे सत्य। पहा केवढी स्वामिनिष्ठा
।।१३९।।
शूर पुरुषालागुनी। स्वामिनिष्ठा भूषण जाणी। पूर्वी हुसेन कांगोनी। बहमनी आपणा म्हणविलें
।।१४०।।
असो या नारायणालागुन । पुत्रप्राप्ती कारण। सांगते झाले अनुष्ठान। पटवर्धन हरीबाबा
।।१४१।।
गिरीच्या व्यंकटेशाची। तूं उपासना करी साची। तेणे वासना मनींची। पूर्ण होईल नारायणा
।।१४२।।
हरिप्रसादें नारायणाला। व्यंकटेश नामें पुत्र झाला। परमेश्वर आपुल्या भक्ताला। उपेक्षीना कधीही
।।१४३।।
असो कुरुंदवाडांत। जेव्हां सांगते झाले हरीबा संत। आपुल्या भास्कर पुत्राप्रत। स्थापण्या पादुका दत्ताच्या
।।१४४।।
तई त्या भास्कररावांनी। सुवर्णपादुका करूनी। आणिल्या स्थापावया जाणी। श्रीदत्ताच्या कुरुंदवाडीं
।।१४५।।
तैसेच आपुल्या पित्याप्रत। आणिले कपडे उंच बहुत। सुवर्णताट जेवण्याप्रत। छपरी पलंग निजावया
।।१४६।।
तैसा हरिनिवासधाम। राजवाड्यापरी उत्तम। बांधण्यासी लाविलें काम। सरदार भास्करपंतांनीं
।।१४७।।
भास्करराव होते सरदार। हरीबा पडले संत थोर। दोघांमाजीं अंतर। होतें जमीन अस्मानाचें
।।१४८।।
तें पाहून हरीबासी। दुःख झालें मानसी। आणि बोलले पुत्रासी। भास्करा ऐसें करूं नको
।।१४९।।
वेड्या हैं भांगार। जरी मौल्यवान धातु थोर । परी परमार्थमार्गाची करणार। हानी हेंच बापा रें
।।१५०।।
आज तूं सुवर्णाच्या। जरी पादुका केल्या साच्या। तरी त्या पुढेंमागे चोरांच्या। करामाजीं पडतील
।।१५१।।
कां की या सुवर्णाप्रत। चोराचें भय आहे बहुत। याचा उपयोग परमार्थांत। ऐसा कांहीं करूं नको
।।१५२।।
चोरानें पादुका नेल्यावरी। त्या तो विकील बाजारीं। आटवून सोनाराचे घरीं। अंधारांत एकीकडे
।।१५३।।
बाजारी सोनें आल्यावर। जाईल वेश्येच्या अंगावर। आणि तसें झाल्या होणार। अपमान ह्या पादुकांचा
।।१५४।।
स्वतः दत्तात्रेयांनी। काष्ठपादुका सेविल्या जाणी। सोनें चांदी त्यजोनी। हें येथें विसरूं नको
।।१५५।।
ही परमार्थ संपत्ती। अमोल आहे त्रिजगतीं। या कृत्रिम वैभवें तिजप्रती। भूषविण्या तूं पाहूं नको
।।१५६।।
तुझ्या आधीं थोर थोर। सम्राट झाले भूमीवर। त्यांना कां हैं भांगार। देव कराया मिळत नव्हते
।।१५७।।
त्या सम्राट राजांनी। देवळें ठेविलीं बांधोनी। परी योजना मुख्यस्थानीं। केली कृष्णपाषाणाची
।।१५८।।
तैसेंच या वैभवाची। गरज नाही मला साची। या वैभवें वैराग्याची। हानी होईल माझ्या रे
।।१५९।।
एक वैराग्य गेल्यावर। हा परमार्थ व्यापार। सफल न होय साचार। पायावांचून घर जसें
।।१६०।।
माझ्या शौचविधीकारण। आणवून उत्तम पाषाण। अत्तरे आंत ओतून। शौचकूप बनवू नको
।।१६१।।
वैभव योग्य तुम्हाला। शोभे न आम्हा फकीराला। जेथे वैभवाचा बोलबाला। त्याची फकीरी टिकणें नसे
।।१६२।।
ऐसें ऐकतां उत्तर। मौनेच केला नमस्कार। सूर्यासी कां पटणार। उजेड कृत्रिम दिव्याचा
।।१६३।।
श्रोते अलीकडच्या काळांत। ऐशीं सोंगें निघाली बहुत। आणि ऐशा बहुरूप्याप्रत। सुशिक्षित साधू मानिती
।।१६४।।
कोणी आपुलें सिंहासन। उत्तम बनविती शिष्यांकडून। भिकाऱ्याच्या पोटां येऊन। वैभवी बनती वर्गणीने
।।१६५।।
मनगटाचे जोरावर। जो वैभवा चढतो नर। तोच भाग्यवान् साचार। बाकीचे न तैसे पहा
।।१६६।।
ज्याच्या भाग्य प्रदर्शना। वर्गणीचे कारण जाणा। राजयोगी न त्याते म्हणा। तो योग खरा नसे
।।१६७।।
तो भाग्यवानही नाही। संतत्वहि ना त्याचे ठायीं। मुर्के मारून होऊं पाहीं। सौंदर्यखनी कसबिण
।।१६८।।
कोणी कोणी देवाच्या। मूर्ती करिती सुवर्णाच्या। आपुल्या शिष्याकडून साच्या। उसने वैभव दावावया
।।१६९।।
म्हणून पुत्रा मजकारण। तूं न हैं कांहीं करी जाण। करी पादुका स्थापन। पाषाणाच्याच कुरुंदवाडीं
।।१७०।।
महाराज आज्ञे-प्रमाणे। पादुका स्थापिल्या भास्कराने। म्हणून कुरुंदवाडाकारणें। क्षेत्र होण्याचा योग आला
।।१७१।।
या हरीबाचे पुत्र भले। पेशवाईंत उदया आले। नांवलौकिकाप्रती चढले । गणेशकृपेनें भूमीवर
।।१७२।।
परी पुत्राच्या वैभवाला। हरीबाबा न भाळला। गणेशपदांपुढें त्याला। तुच्छ वाटलें वैभव
।।१७३।।
मुलगे बैसले अंबारींत। हरीबा पायीं यात्रा करीत। स्वानंदसाम्राज्यीं नांदत। हरीमहाराज गणेशकृपें
।।१७४।।
खरा जो कां वैराग्यभरित। तोच होतो जगीं संत। या वैभवलोलूप दांभिकाप्रत । संतत्व ते कशाचें
।।१७५।।
सांगली जमखिंडी मिरजमळा। कुरुंदवाडादि ग्रामाला। हरीबाबाचा वंश भला। राज्यपद भोगतसे
।।१७६।।
या पटवर्धन घराण्यात। नांदे सदाचार मलरहित। त्यांच्या धनमान सुखाप्रत । रक्षण करो गणपती
।।१७७।।
या हरिबाची कृपा खरी। झाली दोन वंशावरी। ज्यांनी गाजविल्या तलवारी। छत्रपतीच्या अमलांत
।।१७८।।
निजवंश वैभवाला। हरीबाबांनी चढविला । तैसे इचलकरंजीकराला । न विसरले संत ते
।।१७९।।
अजें दुजें संताजवळीं। न वराहतें पहा मुळीं। जो शरण आला पदकमलीं। त्याचें कल्याण करिती ते
।।१८०।।
तीर्थयात्रा हरीबांनीं। केल्या पायीं चालुनी। अष्टविनायकांचे स्थानीं। जाते झाले महाराज
।।१८१।।
पुळे, पाली बल्लाळेश्वर। सिद्धटेक भीमातीर। मोरगांव रांजणगांव थेऊर । तैशीच केलीं इतर क्षेत्रं
।।१८२।।
मोरया गोसाव्यापरी। हरीबाबा झाले साक्षात्कारी। संन्यास घेऊन अखेरी। आले ओंकारेश्वरी पुण्यास
।।१८३।।
तेथे शके सोळाशें बहात्तरांत। वद्य प्रतिपदा मार्गशीर्षांत। स्वामी झाले ब्रह्मीभूत। नमन माझें तयाला
।।१८४।।
असो शिरोळग्रामाभीतरीं। भोजनपात्र निर्धारीं। जेथे नरसिंहसरस्वतीची स्वारी। बसली होती भोजना
।।१८५।।
भीमा अमरजासंगम। गाणगापूर नामें ग्राम। जें स्वामीचे निवास धाम। जेथें निर्गुणपादुका
।।१८६।।
मल्लिकार्जुन कल्लेश्वर। बारा ज्योतिर्लिंग नरसिंगपूर। गिरी द्वारका पंढरपूर। गिरनार डाकुर जगन्नाथ
।।१८७।।
आळंदी अक्कलकोट माणिकनगर। नर्मदातटाकीं गरुडेश्वर। श्रद्धेचिया तीरावर। शिर्डी निवासस्थान साईचें
।।१८८।।
ऐशा क्षेत्रामाझारी। जो गुरुचरित्राचें पारायण करी। त्याची मनकामना सारी। अवधूत दत्त पुरवितील
।।१८९।।
मात्र अचल भाव धरावा। सदाचारा न फाटा द्यावा। सशास्त्र करावी दत्तसेवा। तरीच फळ पावाल
।।१९०।।
हल्ली केडगांवनामें ग्रामांत। नारायणमहाराज सांगतात। नाना अनुष्ठानें शिष्याप्रत। कल्याण त्यांचें व्हावया
।।१९१।।
त्या अनुष्ठानाची प्रचीती। येते कित्येक भक्तांप्रती। कित्येकांची विफल जाती। याचें हेंच कारण
।।१९२।।
जे सद्वर्तनी सदाचारी। अनुष्ठान घडतां त्यांचे करीं। ते विफल न जाय निर्धारीं। हें ध्यानी असूंद्या
।।१९३।।
दत्तात्रेयाचा नाम गजर। केडगांवी चाले निरंतर। तें पाहून साचार। भाविक जाती गहिंवरोनी
।।१९४।।
सद्भावाची आवश्यकता। अनुष्ठानासी तत्त्वता। ती असल्या न जाई वृथा। दत्तानुष्ठान केव्हांहि
।।१९५।।
हा गुरुचरित्रसारामृत। चहूंवर्णांनी वाचणें ग्रंथ। दत्तभक्ती करण्याप्रत। अधिकार आहे सर्वांना
।।१९६।।
नरसिंहवाडी क्षेत्राला। या ग्रंथासी आरंभ झाला। पूर्णता गोदातटाला। झाली असे नांदेडीं
।।१९७।।
बाबासाहेब पाटलानें। नेलें वाडीस मजकारणें। करून आग्रहाचे बोलावणें। श्रीविठ्ठलाच्या उत्सवास
।।१९८।।
हा बाबासाहेब लक्ष्मणनंदन। क्षत्रिय मराठा विद्वान्। दृष्टी जयाची समसमान। अवघ्या विविध जातीवरी
।।१९९।।
हा राजाराम छत्रपतीचा। हस्तक शिरोळ ग्रामीचा। अधिकार मामलेदारीचा। व्यवहाररीत्या त्याकडे
।।२००।।
त्या शिरोळग्रामाची। वाडी ही नरसोबाची। सत्ता जेथे छत्रपतीची। कोल्हापुरीच्या विबुधहो
।।२०१।।
ज्या शिवछत्रपतींनीं भला। स्वराज्य वृक्ष लाविला । त्या वृक्षाचा शेष उरला। हाच भाग सांप्रत
।।२०२।।
म्हणून अवघ्या हिंदूंनी। कोल्हापूरचा अभिमान मनीं। वाहून छत्रपतीच्या चरणी। निष्ठा ठेवा द्वेषरहित
।।२०३।।
तरीच होईल कल्याण। टिकेल तुमचें हिंदूपण। करो परमात्मा रक्षण। त्या राजाराम छत्रपतीचें
।।२०४।।
बाबासाहेब पाटलापरीं। विद्वान् आहेत ज्याच्या पदरीं। ही भूषणाची गोष्ट खरी। आहे छत्रपतीला
।।२०५।।
हे बाबासाहेब मामलेदार। पूर्वी होते नास्तिक फार। कांता संगतीनें साचार। परम भाविक जाहले
।।२०६।।
त्यांनी माझ्या करें भला। हा ग्रंथ रचविला। करून अति आग्रहाला । नरसिंहवाडी क्षेत्रांत
।।२०७।।
तेथे अध्याय सात झाले। मग मी नांदेडा गमन केलें। श्रीगोदेच्या तटा भले । अधिकमासानिमित्त
।।२०८।।
शके अठराशें छप्पन्नांत। भावनाम संवत्सरांत। वैशाख शुद्धपक्षांत। परशुरामजयंतीला
।।२०९।।
तृतीयप्रहरीं बुधवारीं। नांदेड ग्रामा भीतरीं। धोंडोपंत वकिला घरीं। ग्रंथ पुरा झाला हा
।।२१०।।
हा धोंडोपंत सज्जन। देशस्थ आश्वलायन। धर्मावरी श्रद्धा पूर्ण। दंभाचारी मुळीं नसे
।।२११।।
हा मम जन्मांतरीचा। कोणीतरी आप्त साचा। असावा म्हणून आमुचा। स्नेह जडला ये जन्मीं
।।२१२।।
आणिक येथीचे इतर। स्नेही माझे थोर थोर। शंकर मोरे मुळावेकर। देवरे लव्ह्याचे देविदास
।।२१३।।
राजे साहेब सरदेशपांडे। भगवानराव गंगाखेडे। देविदास कुर्तडे। सराफ महाजन देविदास
।।२१४।।
दत्तोपंत महाफिजदप्तर। गोपाळ मंगळ सांगवीकर। शेषटोके वरूडकर। तात्या देशमुख शिरडचा
।।२१५।।
ह्यांनी ग्रंथ शोधिला। गुरुचरित्रासी ताडून पाहिला। म्हणून नाम निर्देशाला। केलें तयांच्या ये ठायीं
।।२१६।।
या ग्रंथासी लिहिणार। भगवान, बापू तांबोळकर। तुकाराम, जगन्नाथ शिंदगीकर। विठ्ठल रामदुर्गीचा
।।२१७।।
यांनीं अवघा ग्रंथ लिहिला। मी नुसता सांगितला। विठ्ठलकृपें शेवटा गेला। लिहिता लिहविता पांडुरंग
।।२१८।।
लिहिणार माझा काळें नेला। दामोदर नामें शिष्य भला। म्हणून हा प्रसंग आला। इर्जिक घालण्या लिहिण्याची
।।२१९।।
असो हे दत्तात्रेया। श्रीपादवल्लभ सदया। नरसिंहसरस्वती स्वामिया। करा कृपा दासगणूवरी
।।२२०।।
माझें मन अनावर। संकल्पविकल्प वरचेवर। करी न कोठें राही स्थिर। त्यासी आळा घाला हो
।।२२१।।
पांडुरंगाचे दर्शन। साक्षात् व्हावें मजकारण। दैन्य दारिद्र्य पापदहन। करा माझें दत्तात्रेया
।।२२२।।
आपण बहुतांचे आर्त पुरविलें। मग माझें का सांकडे पडलें। काय माझें नाहीं सरलें। अजून हें दुर्दैव
।।२२३।।
स्वामी तुम्ही मातंगाला। क्षणामाजी ब्राह्मण केला। मग माझ्या पातकाला। जाळणे कां अशक्य झालें हो
।।२२४।।
पापपुण्याची वासना। तुम्हीच उपजविता दयाघना। मसी स्वतंत्रता मुळींच ना। मीं केवळ बाहुलें
।।२२५।।
आतां हीच विनंती। तुजलागी गुरुमूर्ती। भेटवा मला रुक्मिणीपती। बाप माझा पांडुरंग
।।२२६।।
ईश्वरचिंतनी राहो मन। मुखें होवो ईश्वरभजन। त्रास पराकारण। न होवो माझ्यापासुनी
।।२२७।।
आमरण वारी घडो । चित्त विठ्ठलपायीं जडो। अखेरीस देह पडो। श्रीगोदेच्या तटाकीं
।।२२८।।
कर्ज नसावे कवणाचें। कारण न पडो याचनेचें। प्रेम सनातनधर्माचें। शुक्लेंदुवत् वाढो कीं
।।२२९।।
सत्पथाने मला न्यावें। भूतमात्रीं प्रेम असावे । साधूसंतांचें सदा व्हावें। दर्शन देवा वरच्यावरी
।।२३०।।
हेंच मागणें तुजकारण। तें दे उदार होऊन । चित्ती ठसवा अध्यात्मज्ञान। दुर्घट मोक्ष साधावया
।।२३१।।
मी कोंकणस्थ ब्राह्मण। ऋग्वेदी आश्वलायन । सावित्री दत्तात्रेयापासून। जन्म झाला अकोळनेरीं
।।२३२।।
मी पदरज अवघ्यां संतांचा। शिष्य वामनशास्त्रीचा। रामदासी पंथ साचा। असून झालों वारकरी
।।२३३।।
दत्त पांडुरंग शंकर। हें एकस्वरूप साचार। ऐसें माझे निरंतर। मन मानो निश्चयानें
।।२३४।।
स्वस्ति श्रीगुरुचरित्रसारामृत। सोळा अध्यायांचा ग्रंथ। भाविकां दावो सत्पथ। हेंच इच्छी दासगणू
।।२३५।।
।। इति षोडशोध्यायः ।। शुभंभवतु ।।
।। श्रीदत्तात्रेयार्पणमस्तु ।। श्रीहरिहरार्पणमस्तु ।।
।। पार्वतीपते हरहर महादेव ।। सद्गुरु श्रीज्ञानेश्वर तुकाराम महाराज की जय ।।
卐 卐 卐 卐 卐
इति अध्याय समाप्तः