।। श्रीगणेशाय नमः ।।
जयजयाजी ब्रह्मांडाधीशा। आदिअनादिपुराणपुरुषा । स्वसंवेद्या पंढरीशा । उपेक्षा गणूची करूं नको
।।१।।
सिद्ध म्हणे नामधारकासी । पूर्वी अत्री नामे ऋषी । जो मानसपुत्र निश्चयेसी । ब्रह्मदेवाचा जाण पां
।।२।।
त्याची कांता अनसूया । पूर्ण श्रद्धा पतीचे ठाया। पतीच देव मानोनिया । सेवा करी एकनिष्ठ
।।३।।
तिच्या पतिसेवेचें सामर्थ्य । काय सांगू तुजप्रत । सूर्यादिकांसी धाक पडत । ऐसा प्रभाव तियेचा
।।४।।
साध्वीस पाहून नारदमुनी । गेला देवलोकां लागुनी। अनसूयेचे गुण वदुनी। गाऊ लागला प्रेमभरें
।।५।।
अरे तुम्ही सृष्टीचें नियंते । परी तुमचे कांही न चालते। अनसूयेचे लोपविते । तेज तुम्हांकारणें
।।६।।
ती जरी आणील मनीं । निस्तेज करील तुम्हांलागुनी। ऐसी अधिकारी स्त्री अवनी। एक हीच समजा हो
।।७।।
तें देवांनीं ऐकिले । आपापसांत बोलले । मनुष्य प्राणी श्रेष्ठ जाहले । आपणाहून काय हे
।।८।।
अनसूया एका ऋषीची । सहधर्मचारीणी आहे साची । तिच्या पातिव्रत्यतेजाची । वाखाणणी करी नारद
।।९।।
म्हणून तिचा बंदोबस्त । करणें भाग आपणांप्रत । काय कोल्ह्यांनी मृगनाथ । घरीं ठेवावा खेळावया
।।१०।।
सर्व देव मिळोनी । गेलें ब्रह्मलोकालागुनी । चतुराननास घेउनी । गेलें पुढें कैलासा
।।११।।
शिवासमवेत देवमेळा । वैकुंठलोकाप्रती आला । अवघा वृत्तांत निवेदिला । श्रीमहाविष्णूतें
।।१२।।
नारायणा अनसूयेचें । सत्त्व आहे अगाध साचें । धाबे दणाणलें देवांचें । तिच्या तेजा पाहून
।।१३।।
म्हणून वाटतें त्रिवर्गांनी । जावें अनसूयेचे सदनीं । हरप्रयत्नें सत्त्वहानी । करून येऊं तियेची
।।१४।।
विष्णू बोले त्यावर । हा तुमचा कोता विचार । तिच्यापुढें माघार । घ्यावी लागेल आपणाला
।।१५।।
तुमचा आग्रह बहुत । म्हणून चला मीहि तेथ। येतों तुमच्या समवेत । कार्य देवांचे साधावया
।।१६।।
अतिथीच्या वेषानीं । ब्रह्मा विष्णू पिनाकपाणि । येते झाले अत्रिसदनीं । ऋषी घरांत नसतांना
।।१७।।
अनसूयेस म्हणती निघेजण । आम्हांस इच्छाभोजन । द्यावें तुवा प्रेमेंकरून । म्हणून आलों त्वत्सदना
।।१८।।
अनसूया म्हणे अवश्य । आज माझे भाग्य विशेष । येऊन बसा पात्रास । स्वयंपाक सिद्ध असे कीं
।।१९।।
तिघे म्हणाले यावर । नुसते जेवण्या साचार । आम्हीं न आलो इथवर । इच्छाभोजन घालणें
।।२०।।
अनसूया म्हणे तयांसी । करा निवेदन इच्छेसी । ती मी पुरवीन त्वरेसी । अनमान मुळीं करूं नका
।।२१।।
तिसी बोलले वेषधारी । तूं नग्न होऊन सत्वरी । अन्न वाढणें पात्रावरी । हें पहा आम्ही बैसलो
।।२२।।
तें वचन ऐकतां । अनसूया साशंक झाली चित्ता । केवढा प्रसंग मजवरतां । ओढवला हा दुर्धर
।।२३।।
जरी नाहीं म्हणावें । तरी सत्त्व माझे जाईल बरवे । नग्न होऊन वाढावें । तरी तेंहि अनुचित
।।२४।।
ऐसा विचार काहीं वेळ । करी मानसीं वेल्हाळ । विचारानें खळबळ । चित्तामाजी उडविली
।।२५।।
शेवटीं निग्रह करूनी। पतीचरण चिंतिले मनीं । आणि म्हणे नग्न होवोनी । अवश्य यांते वाढीन
।।२६।।
ज्या अर्थी नग्न व्हाया । हे इच्छिती सदनीं या । त्या अर्थी बाल व्हाया । आहे यांचा विचार
।।२७।।
माझ्या पतीचें तपःसामर्थ्य । बालकें करील तिघांप्रत । नग्न पाहण्याचा न लागत । दोष शिशूकारणें
।।२८।।
ऐसे बोलून नग्न झाली । अन्न घेऊन बाहेर आली । तैं तो ओटीवरी पाहिली । बालकें तिन्हीं प्रत्यक्ष
।।२९।।
तिघांसी घेतले अंकावर । वस्त्र नेसून सत्वर । उपनिषदें गाऊन मधुर । गाणें गाई तयांतें
।।३०।।
तो इतुक्यांत आश्रमासी । येते झाले अत्री ऋषी। ही मुलें सदनासी । आणलीस तूं कवणाची
।।३१।।
ऐसे पुसतां भार्येप्रत । अनसूया सांगे सकल वृत्तांत । तो ऐकतां मुलांप्रत । ज्ञानदृष्टीनें अवलोकिलें
।।३२।।
आणि घातिला नमस्कार । साक्षात् विधीहरिहर । तुझें माझें भाग्य थोर । भार्ये आज उदेलें
।।३३।।
पूर्व स्वरूपीं देव तिन्हीं। प्रगट झाले तया स्थानीं । शंकर दुर्वास होऊनी । निघून गेले परिभ्रमणा
।।३४।।
विधी चंद्र जाहला । निजलोकां निघून गेला । हरी मात्र राहिला । दत्तरूपें तें ठाया
।।३५।।
ही दत्तात्रेयाची मूर्ती । त्रिगुणात्मक निश्चिती । एक अर्चिता या प्रती । तिन्हीं देवांचें पूजन घडे
।। ३६।।
हेच साक्षात् सद्गुरू । भवार्णवीचे भव्य तारू । निजभक्तांना कल्पतरू । दत्त अवधूत दिगंबर
।।३७।।
नामधारक म्हणे सिद्धासी। आपण साक्षात् ज्ञानराशी। पुढेरं सदुरूची परंपरा कैशी। चालली ती निवेदा
।।३८।।
दत्तात्रेयाचा अवतार झाला। तो मी आपुल्या मुखीं ऐकिला। आतां पुढे कथा ऐकण्याला। मन माझें आतुर जाहलें
।।३९।।
पुढें सिद्ध बोलले वचन । अरे अंबरिषाकारण । दश अवतार धरून । जग राहाटी चालविली
।।४०।।
सुष्टांचे केलें रक्षण । दुष्टांचें केलें हनन । तें मत्स्य कच्छ वराह जाण । नरहरी वामन भार्गव
।।४१।।
राम कृष्ण बौद्ध कली । ऐसें झाले भूमंडळी । सगरोद्धारा भगीरथबली । ज्यानें आणिलें जान्हवीला
।।४२।।
ऐशी अवतारपरंपरा । झाली हरीची जाण चतुरा । पुढील वृत्तांत अवधारा । जो मी आतां सांगतो
।।४३।।
पूर्वदेशी पिठापूर । ग्राम आहे साचार । तेथें अपस्तंभ शाखेचा द्विजवर । आपळराजा नाम ज्याचे
।।४४।।
तयाची भार्या नामें सुमता। जी पतिभक्तिपरायण तत्त्वता। पतीध्यान धरून चित्ता। अतिथ अभ्यागता पूजीतसे
।।४५।।
नामधारका एके दिवशीं । श्राद्धतिथी अमावस्येची । दत्त आले सदनासी । अतिथीरूप धरोनियां
।।४६।।
तें पाहून सुमता । धांवून ठेवीं पदीं माथां । भिक्षा आणिली होती हातां । ती तयातें घातली
।।४७।।
सुमतीचा भाव पाहून । प्रगट झाले अत्रीनंदन । वरदपाणी उभारून । बोलले त्या सुमतीसी
।।४८।।
काय इच्छा आहे मनीं। ती तूं माग मजलागुनी। तुझी इच्छा पुरविण्या जननी। ये स्थला मी पातलो
।।४९।।
श्री दत्तातें अवलोकिलें । सुमतीचें हृदय भरून आलें । नेत्रीं वाहू लागले। आनंदाश्रू एकसरा
।।५०।।
देवा आपण ध्रुवासी । अढळपद दिलें निश्चयेसीं। लंकेच्या राजसिंहासनासी। स्थापन केले बिभीषणा
।।५१।।
वानर अवघे उद्धरिले । गोपगोपींसी सुखी केले। तुमच्या पदा ज्यांनीं नमिलें। तो न गेला विन्मुख
।।५२।।
आतां जननी ऐसें मला। आपण जे कां बोलला । तेच येवो सत्यत्वाला । हीच आहे विनंती
।।५३।।
देवा आजपर्यंत । मुलें झाली मजला बहुत । कित्येक उपजता झालीं मृत। कांही राहिलीं अंध पंगु
।।५४।।
ऐसा एकही पुत्र नाहीं। जो आम्हां तारील पाही। म्हणून हे देवदेवा माझे आई। आपुल्यासम पुत्र व्हावा
।।५५।।
ऐकतां सतीचे वचन । ओळंगले करुणाघन । तुला पुत्र मज समान । होईल काळजी करूं नको
।।५६।।
परी तो न राहील तुम्हांपाशीं । हिंडून देशी विदेशी । अवघ्या शरणांगतासी । उद्धरील जाण पां
।।५७।।
मैं ऐसे बोलता तेथल्या तेथ । गुप्त जाहले श्रीदत्त । पुढे ते अवघे वृत्त । सतीनें कथिले पतीसी
।।५८।।
उभयतांसी आनंद झाला । सतीसी गर्भ राहिला । सुमुहूर्ती पुत्र झाला । नांव ठेविले श्रीपाद
।।५९।।
मुलाचें जातक वर्तविले। ग्रह उच्चीचे होते भले । व्रतबंध होतां अवघे आले । वेद तया श्रीपादा
।।६०।।
अवघ्या विद्या करतलामल । झाल्या असती तात्काळ । मुलास पाहून वेल्हाळ । बहु आनंद मानीतसे
।।६१।।
मुलगा तरतरीत बुद्धिवंत। म्हणून मुली येऊं लागल्या बहुत। परी श्रीपादाचे नव्हतें चित्त। तयावरि येतुलेहि
।।६२।।
जननीजनकां श्रीपाद म्हणती। मी ब्रह्मचारी निश्चिती। जडजीव उद्धारावया आलो क्षितीं। याचा विसर न पडो द्या
।।६३।।
वैराग्य योग आमुची नारी । आहे सर्वदा बरोबरी । तियेवीण वधू दुसरी । मुळीं आम्हा करणें नसे
।।६४।।
अवघ्या स्त्रिया तुजसमान। आहेत जननी मज कारण। आठीव दत्ताचें वचन। हा मोहपसारा पसरूं नको
।।६५।।
मी श्रीपाद श्रीवल्लभ । आहे मुळीच स्वयंभ । माझ्या ठायी नाहीं भेद । मीच अवघ्या चराचरीं
।।६६।।
ते ऐकतां जनकजननी । बोलती श्रीगुरुलागुनी । तुम्हीं पोटीं येऊनी । काय झाला उपयोग
।।६७।।
आमुच्या वंशीचा दिवा । कोण लावील देवदेवा । याचा विचार करावा । कांहीं आपुल्या मानसी
।।६८।।
श्रीगुरु म्हणाले त्यावर । आण तुझे कुमार । जे पंगु आहेत साचार । मजपुढती येधवां
।।६९।।
त्या दोन्हीं पोरांप्रती । सत्कृपेनें कृपामूर्ती । अवलोकन करितां निश्चिती । कौतुक ऐसे वर्तले
।।७०।।
अंधपंगुत्व अवधें गेलें । वेदशास्त्रसंपन्न झाले । हे गुरुकृपेचें फळ भलें । ऐक बापा नामधारका
।।७१।।
मुलें सर्वांग सुंदर । पाहून हर्षले मातापितर । श्रीगुरुचा जयजयकार । करिते झाले तेधवां
।।७२।।
पुढें श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी । गेले वाराणसीं धामी । तेथोनियां बद्रिकाश्रमीं । नारायणासी भेटले
।।७३।।
बद्रिकाश्रमीं अदृश्य होऊन । पाहिले क्षेत्र गोकर्ण । जे गोकर्ण पुरातन । स्थान कैलासपतीचें
।।७४।।
नामधारक म्हणे सिद्धासी । सोडून बद्रिकाश्रमासी । सद्गुरु गोकर्णासी । कां आलें निरोपावे
।।७५।।
काय त्या बद्रिकाश्रमाहून । श्रेष्ठ आहे गोकर्ण । म्हणून आपणा केला प्रश्न । त्याचा निवाडा करा हो
।।७६।।
सिद्ध बोले त्यावरी । ह्या गोकर्णाची सरी । न ये कोणास भूमीवरी । तें अनादी क्षेत्र असे
।।७७।।
लंकाधिपती रावण । खडतर तप करून । भगवान पार्वतीरमण । आपुलासा केला असे
।।७८।।
शिवानें आत्मलिंग त्यांसी। दिलें काढून प्रेमेसी । ते घेऊन लंकेसी । जाऊं लागला रावण
।।७९।।
कां की मातेनें होतां धरिला। हट्ट नामधारका ऐसा भला। कीं माझ्या शिवपूजनाला। लिंग पाहिजे प्रत्यक्ष
।।८०।।
रावणें तप केलें । कैलास पर्वता उचलिले । आपल्या समर्थ बाहुबलें । तें सांगू कोठवरी
।।८१।।
शिव म्हणाले रावणासी । कैलास नेऊन काय करिसी । आत्मलिंग देतो तुसी। तें त्वां द्यावें जननीतें
।।८२।।
तें रावणें मानिलें । आत्मलिंग घेतले । देव अवघे दणाणले । जातां शिवाचे आत्मलिंग
।।८३।।
अरे हा रावण आतां बली। होईल रे भूमंडळी । कांही तरी पाहिजे केली । युक्ति लिंग आणावया
।।८४।।
अवघ्या देवामाजी चतुर । एकदंत गौरीकुमार । त्यानें बटुवेष साचार । धारण केला देवकार्या
।।८५।।।
नारदानें देवासी । आधीच या कथेसी। सांगून इंद्रचंद्रासी । ब्रह्मलोकां धाडिलें
।।८६।।
ब्रह्मा घेऊन देवास । जातां झाला वैकुंठास । म्हणे अहो देवा रावणास । लिंग शिवें अर्पिले
।।८७।।
आतां रामावतारीं । तुम्हीं कोणा वधणार तरी । रावण बली झाल्यावरी । साम्राज्य होईल असुरांचें
।।८८।।
तें ऐकतां नारायण। गेलें कैलासभुवनालागून । जेथें नीलकंठ हैमवतीरमण । स्थित असे व्याघ्रासनीं
।।८९।।
विष्णु म्हणे शंकरा । तुम्ही रावणास दिधले वरा । आत्मलिंग त्याच्या करा । किंनिमित्त दिधलेंत
।।९०।।
तेणें आम्हा अडचण झाली । देव मंडळी घाबरली । असुरांचे भूमंडळी । साम्राज्य आपण केलेत
।।९१।।
शंकर म्हणाले त्यावर । हे जरी आहे साचार । परी तूं प्रयत्न केल्यावर । लिंग आणितां येईल कीं
।।९२।।
मी रावणा लिंग दिधले जरी। परी करार आहे ऐशापरी । लंकेवीण भूमिवरी । लिंग कोठें ठेवू नये
।।९३।।
म्हणून देवां सुखी करण्यास । विघ्न करा त्या रावणास । माझा कुमार गणेश । हे अवघे साधेल कीं
।।९४।।
ऐशी ऐकून शिवगिरा । आनंद झाला शाड्. गंधरा । तेथे झालेल्या प्रकारा । देवांलागी कळविलें
।।९५।।
इकडे आत्मलिंग घेऊनी। रावण जाऊं लागला निजस्थानीं। तो विष्णूनें वासरमणी। निजचक्रानें झांकला
।।९६।।
ऐसे होतां नारदऋषी । वेगे आला रावणापाशीं । घेऊन द्विजवेषासी । ऐसें बोलू लागला
।।९७।।
की रावणां तूं ब्राह्मण । संध्या समय झाला असून । कां करितोस पुढें गमन । नियम ब्राह्मणें टाकू नये
।।९८।।
ऐसें तयासी बोलुनी । संध्येस बसले नारदमुनी। तों इतुक्यांत बटुवेषांनीं। आला गणाधीप ते ठायां
।।९९।।
तयालागीं पाहून । रावणें केले भाषण । हे कुमारा मजलागून । सहाय्य थोडे करावे
।।१००।।
माझा संध्यासमय झाला। सूर्य टेकला अस्ताचला । संधिकाली भास्कराला । अर्घ्य देणें नियम माझा
।।१०१।।
म्हणून हे मम करीचें। लिंग क्षणभरी घ्यावे साचे । या तुझ्या उपकाराचे । ऋण मी फेडीन
।।१०२।।
मी आहे राजेश्वर । तूं गरीबाचा दिसशी कुमार । म्हणून तुला माझे घर । सुखद होईल सर्वदा
।।१०३।।
गणेशें तें मानिलें । आणि रावणाशीं भाषण केलें । तुझे मी ऐकेन भले । परी आहे वर्म एक
।।१०४।।
तुज तीन हांका मारीन । तूं न आल्या लिंग ठेवीन । भूभागी म्हणून । तूं न मशी दोष द्यावा
।।१०५।।
रावणाच्या करीचे । लिंग घेतलें गणेशें साचें । रावणें अर्घ्य देण्याचें । काम पुढें आरंभले
।।१०६।।
बोलीप्रमाणे तीन हांका। मारल्या रावणासी देखा। अखेर लिंगरूपी उमानायका। ठेवून दिधले भूमीवरी
।।१०७।।
रावण आला पळत पळत । लिंग उपटावया तेथ । परी झाला गर्वहत । लिंग मुळी हलेना
।।१०८।।
म्हणून करें मुरगाळिलें । लिंग गोकर्णाकार झाले । म्हणून त्याचें गोकर्ण पडलें । जगामाजीं नाम पहा
।।१०९।।
हें शिवाचे आदिलिंग । समुद्रतटाकीं चांग । ज्या शिवाचें अर्धांग । भूषविलें पार्वतीनें
।।११०।।
तें हे गोकर्ण महाबळेश्वर । अवघ्या क्षेत्रीं राजराजेश्वर। गोकर्णासम पुनीत इतर । क्षेत्र कोठें न लाधे कीं
।।१११।।
म्हणून श्रीपादवल्लभ मुनी। येते झाले या स्थानीं। तीन वर्षे राहूनी । आराधना केली असे
।।११२।।
नामधारक म्हणे सिद्धास । या गोकर्ण क्षेत्रास । महिमा कां विशेष । येथें कोण उद्धरला
।।११३।।
तें साकल्यें करून । सांगा स्वामी मजलागून । म्हणून आपुले धरले चरण । गोकर्णकथा सांगावी
।।११४।।
सिद्ध सांगती त्यावरी । इक्ष्वाकु कुलाभीतरी । मित्रसह राजा भूमीवरी । होता एक जन्मला
।।११५।।
तो राजा मृगयेस । गेला नामधारका काननास । तेथें ब्रह्मराक्षस । एक त्यानें मारिला
।।११६।।
बंधू त्या राक्षसाचा । त्यानें सूड घ्याया बंधूचा । कपट व्यूह रचिला साचा । तो ऐक सांगतों
।।११७।।
मित्रसह राजाचे पदरी । हा कपटें राहिला चाकरी। आचाऱ्याचें काम करी। सदनीं त्या भूपतीच्या
।।११८।।
एके काली पितृतिथी। आली असता निश्चिती। एके क्षणाचे आमंत्रण नृपती। देतां झाला वसिष्ठादिकां
।।११९
इकडे त्या कपट्यानें काय केलें । नरमांस तें शिजविले । भोजना बसतां वाढिलें । वशिष्ठाचे पानावर
।।१२०।।
नरमांसातें पाहून । चित्तीं झाले कोपायमान । कमंडलूचे उदक घेउन । शापिते झाले भूपतीला
।।१२१।।
अरे दुष्टा मजप्रती । नरमांस घातिले निश्चिती । म्हणून तूं विचरशील क्षिती । ब्रह्मराक्षस होऊनी
।।१२२।।
ऐशी ऐकून शापवाणी । मित्रसह कोपला निजमनीं । शापिले विनाकारणी । हें काहीं बरें नव्हे
।।१२३।।
मीही शापितों त्याप्रत । ऐसे बोलून उदक हातांत । तों पत्नी आली धांवत । मदयंती नाम जिचें
।।१२४।।
हां हां नाथा प्राणेश्वरा । न शापावे गुरुवरा । गुरुकृपेनें साजिरा । आपुला शाप निरसेल
।।१२५।।
अवघ्या देवतेन । श्रेष्ठ सद्गुरूचे चरण । तेथें असा निष्ठा ठेवून । तरीच कल्याण आपले
।।१२६।।
ऐसें कामिनी बोलतां । विवेक उपजला नृपनाथा । करीचें उदक तत्वतां । त्यानें टाकिले निजचरणीं
।।१२७।।
त्या योगे ऐसें झाले। पाय दोन्हीं काळे पडले । म्हणून रायासी लाधले । नाम कल्मषपाद पहा
।।१२८।।
हा कल्मषपाद ब्रह्मराक्षस । राहे निबिडतर कांतारास । नाना प्रकारें प्राण्यास । भक्षण करूं लागला
।।१२९।।
तों एके काळीं ऐसे जाहलें। एक दांपत्य पातलें । तया काननामाजी भले । सहज दैवगतीनें
।।१३०।।
ते अरण्य भयंकर । वृक्ष भेदती गगनोदर । मोठमोठाले विखार । काननामाजी हिंडती
।।१३१।।
दांपत्यातें पाहूनी । आला कल्मषपाद धावुनी। पतीस करानें धरूनी । मुखीं घालू लागला
।।१३२।।
तै त्याची सत्पात्र ज्याया । राक्षसाचे लागली पाया। म्हणे माझ्या पतीस वांया। भक्षण तूं करूं नको
।।१३३।।
ऐसें बहुत प्रकारें । विनवी त्यांस अत्यादरें । परी ते न ऐकिले खरे । कल्मषपादें शिष्योत्तमा
।।१३४।।
पती मुखांत घातला । मांस खाऊन रक्त प्याला । अस्थीपंजर टाकिला । समोर तया भार्येच्या
।।१३५।।
सांपळ्यासी पाहून । सतीनें दिधला शाप दारूण । तूं निजकांतेचे सेवन । करितां जाशी मरोनी
।।१३६।।
शापनिवृत्ती व्हावयाची। तुझी अवधी थोडी होती साची। परी तुझ्या कर्माची। गती ओढवली अधमाधमा
।।१३७।।
म्हणून माझ्या पतीचे । तूं केलें भक्षण साचे । आतां केलेल्या कर्माचे । फळ भोगणें भाग तुला
।।१३८।।
पतीच्या अस्थी जमवून । सतीनें केलें सहगमन । पुढे शापनिवृत्ती होऊन । मित्रसह राजा निजनगरी
।।१३९।।
परी सदा राहे दुश्चित । सतीचा शाप आठवे अहोरात्र । हा प्रकार मदयंतीप्रत । सर्व कांही समजला
।।१४०।।
ती ही झाली दुश्चित । तुमचा माझा जन्म व्यर्थ । कर्मगती कोणा न चुकत । काय आता करावे
।।१४१।।
पुत्र नाहीं आपुले कुशीं । तै अधोगतीं पितरांसी । होईल ऐसे मानसी । भय वाटतें प्राणेश्वरा
।।१४२।।
राजानें प्रधान पुरोहित । यांस अवघी सांगून मात । शापनिवृत्तीचा त्याप्रत । विचार पुसू लागला
।।१४३।।
प्रधान पुरोहित सांगती । तुम्ही तीर्थाटना जा त्वरित गती। तेणें शापाची निवृत्ती । होईल ऐसे वाटतें
।।१४४।।
रायाने ते ऐकून । तीर्थाटना केलें गमन । अवघी तीर्थे करून । मिथिलानगरास आला पै
।।१४५।।
तेथे भेटले गौतममुनी । रायासी बोलले मधुरवाणी। तूं तीर्थे बहुत अवनी । जरी बापा फिरलास
।।१४६।।
परी न कांही उपयोग झाला । ब्रह्महत्येचा न दोष गेला । ती उभीच तुझ्या पाठीला । पुरंदराचिये परी
।।१४७।।
आतां सांगतों एक उपाय । तूं गोकर्णक्षेत्रा त्वरित जाय। तेथें तुझें होईल कार्य। ब्रह्महत्या निरसेल ही
।।१४८।।
त्या गोकर्णक्षेत्रापरी। क्षेत्र ना अन्य भूमीवरी । जेवी गंधांत कस्तुरी । दिग्गजी ऐरावत
।।१४९।।
आत्मलिंग शंकराचे । तेथे प्रत्यक्ष आहे साचे । तुज घडतां तयाचे । अर्चन, हत्या जाईल
।।१५०।।
अरे त्या गोकर्ण क्षेत्रांत । आम्ही देखिले अद्भुत । एक चांडाळीण पतित । महापातकी होती बा
।।१५१।।
सर्वांग ते सडून गेलें । पुवाचे पाट चालले। आसमंत भागा व्यापिले । दुर्गंधीनें तनूच्या
।।१५२।।
ती एका वृक्षातळीं । येऊन पडली अंतकाळीं । तो शंकराची दूत मंडळी । आली विमान घेऊन
।।१५३।।
मी पुसलें तयाप्रत। विमान आणिलें किन्निमित्त। तों गण म्हणती आम्ही येथ। चांडाळणीस न्याया आलों
।।१५४।।
ही पातकी महा जरी। परी पंचत्व पावते गोकर्णाभीतरी। म्हणून आम्हां मन्मथारी। झाला येथे पाठविता
।।१५५।।
कां कीं ही चांडाळीण । पूर्वीची ब्राह्मणकन्या जाण । सौदामिनी इजलागून । नांव होते गौतमा
।।१५६।।
ती सर्वांग सुंदर । परी दैवयोग खडतर । ऐन तारुण्यर्थी भ्रतार । पावता झाला मरण इचा
।।१५७।।
म्हणून पित्यानें गृहा आणिली। परी ही स्वैरिणी झाली। काम तृप्त करण्या भली। भोगू लागली परपुरुषा
।।१५८।।
तेणें गौतमा ऐसे झालें। बापास तिच्या वाळींत टाकिलें। त्यानें प्रायश्चित्त केलें। आणि कन्या दिली हांकून
।।१५९।।
ती पुढें वाण्याघरीं । येऊन राहिली दुराचारी । मद्यमांस भक्षण करी । राहून घरीं शूद्राच्या
।।१६०।।
एकदां मद्याच्या धुंदींत । मेषा ऐवजी मारिले खचित। तिनें धेनूच्या वत्साप्रत। मुंडकें ठेविलें शिक्यावरी
।।१६१।।
दोहन समयीं अस्तमानीं । मेष पाहिला स्वस्थानी । तेणें गेली घाबरोनी। पती कोपेल म्हणोनिया
।।१६२।।
पाप घडले म्हणोनी । शिव शिव ऐसे बोले वदनी । आपुले कृत्य झांकोनी । ऐसा केला पुकारा
।।१६३।।
वत्स व्याघ्रं भक्षिलें । ते लोकां खरे वाटलें । पुढें तिसी मरण आले । चांडाळवंशी जन्मली
।।१६४।।
तीच ही चांडाळीण । पूर्वदोषें करून । कृमिकीटकाचे निवासस्थान । होवोनियां राहिली
।।१६५।।
ती यात्रेकऱ्यांबरोबर । भिक्षा मागत खरी । आली गोकर्णक्षेत्राभीतरी । पर्व शिवरात्री लक्षोनिया
।।१६६।।
तो शिवरात्रीचा दिन । अवघ्यास होतें उपोषण । तेधवां ही चांडाळीण । खाया मागू लागली
।।१६७।।
कोणी न देती खायासी । बिल्वपत्र देती तियेसी । ती घेऊन हातासी । चांचपून पाहे तया
।।१६८।।
हा खाण्याचा पदार्थ नाहीं। ऐसें म्हणून टाकून देई । तें तों दैववशे लवलाही । पडलें येऊन शिवाशिरीं
।।१६९।।
येणें रीती उपोषण । घडले चांडाळणी लागून । पोटीं नाहीं किमपि अन्न । तेणें जागरण घडलें कीं
।।१७०।।
अहोरात्र भजन ऐंकिलें । तेणें दोष सरले । म्हणून शिवें पाठविलें । तिसी विमान गौतमा
।।१७१।।
दिव्यदेह आम्हादेखत । पावून बसली विमानांत । चांडाळीण असून पतित । जाती झाली कैलासा
।।१७२।।
म्हणून राजा तूंहि जावें । गोकर्ण क्षेत्र नयनीं पाहावें । तेथें तप आचरावें । श्रीशंकराप्रीत्यर्थ
।।१७३।।
कितीही दोष असले तरी । ते निवारील मन्मथारी । गोकर्णक्षेत्राभीतरी । असा आहे क्षेत्रमहिमा
।।१७४।।
गोकर्ण समुद्रातिरीं । पश्चिमेस कोकणांभीतरी । भाषा जेथें कारवारी । हल्लीं आहे विबुधहो
।।१७५।।
तें राजानें ऐकिलें । गौतमास वंदन केलें । सवेंच क्षेत्र पाहिलें । सद्भावेसी गोकर्ण
।।१७६।।
तेथें राजा उद्धरिला । पुत्रसंतती पावला । ऐसा त्या अभिनव स्थला । श्रीपाद राहिले तीन वर्षे
।।१७७।।
सिद्ध म्हणे नामधारका । परमपवित्रा भाविका । गोकर्ण हे मेरू निका । अवघ्या क्षेत्रांमाझारी
।।१७८।।
स्वस्तिश्रीगुरुचरित्रसारामृत । ऐकाहो भाविक भक्त । दासगणू जोडून हात । वारंवार विनवीतसे
।।१७९।।
।। इति द्वितीयोध्यायः ।। शुभंभवतु ।।
।। श्रीदत्तात्रेयार्पणमस्तु ।। श्रीहरिहरार्पणमस्तु ।।
卐 卐 卐 卐 卐
इति अध्याय समाप्तः