।। अध्याय तिसरा ।।

।। श्रीगणेशाय नमः ।।

हे कमलनाभा आनंदकंदा। हे सच्चिदानंद गोविंदा। भक्तीचिया मकरंदा। मम मुखीं घाल पांडुरंगे
।।१।।

नामधारका सावधान। श्रीगुरुनिघाले तेथून । गिरीपर्वतीं नारायण। येऊनिया पाहिला
।।२।।

तेथें राहिले चार मास। कृतार्थ केले कैलास। पुढें निवृत्तिसंगमास। येते झाले शीघ्रगती
।।३।।

तेथून पुढें कुरवपूर । पवित्र कृष्णाबाईचे तीर। यात्रा लोटे अपार । श्रीगुरूंचें दर्शना
।।४।।

श्रीपादवल्लभ यति। साक्षात् असे दत्तमूर्ति। जे जे चरणां लागती। ते ते पावले इच्छित फळा
।।५।।

श्रीपाद सौख्यदिनकर। तेथे दुःखरूप अंधार। कोठूनि रहावा साचार। धन्य महिमा सद्गुरूचा
।।६।।

असो तया कुरवपुरीं। एक विप्र सदाचारी। संतती त्याची न वाचे खरी। उपजतां मृत्यू येतसे
।।७।।

उभयतांनी नाना देवता। आराधिल्या पुत्राकरितां । दैवगति नये वारितां । कोणा सद्गुरूवांचून
।।८।।

एक पुत्र झाला त्यासी। तो मंदमति दुर्गुणराशी। तया पाहून पित्यासी। दुःख होई अनावर
।।९।।

कशीबशी मौंज केली। विद्या शिकविण्या सुरूवात झाली। परि पुत्राकारणें ग्रहण मुळीं। ती विद्या होईना
।।१०।।

पिता ताडी वरचेवर। तें पाहून घाबरे फार। तयाची माता साचार। दुःख पुत्राचें न पाहवें
।।११।।

निर्धार करूनि एके दिनीं । विनवी निज पतीलागुनी। पतिराया आजपासूनि । तुम्ही पुत्रा न ताडावें
।।१२।।

हें न जरी मानाल। तरी विपरीत होईल । श्रीकृष्णेचें पाहून सलिल। जीव आपुला त्यागीन मी
।।१३।।

ऐसें कांता-वचन ऐकतां । विप्र न ताडी सर्वथा। त्या मतिमंद आपुल्या सुता। परि चित्तीं जळफळे
।।१४।।

त्याच्या चिंतेकरून । विप्र पावला असे मरण। निंदू लागले अवघे जन । गांवीचे त्या कुमारा
।।१५।।

तू सूर्यापोटी शनैश्वर। वा हिऱ्यापोटी जन्मली गार। तूं दो पायाचा खर। धोंड्यापरी जन्म तुझा
।।१६।।

एके दिनीं ऐसें झालें। मायपुत्र दोघे आले। जीव देण्याकारण भले । कृष्णाबाईचे तीरावरी
।।१७।।

तेथें श्रीपादवल्लभ यती। स्नान करीत होते प्रभातीं। पाहून ती सद्गुरूमूर्ति। दोघे पायीं लागले
।।१८।।

आम्ही जीव द्यावया। सिद्ध जहालो सद्गुरूराया। परि याचा दोष जाया। उपाय कांहीं सांगणें
।।१९।।

दोष आम्हां न लागावा । ऐसा उपाय सांगावा । पुढचे जन्मीं देवदेवा । ब्रह्मवेत्ता पुत्र होवो
।।२०।।

तोही बाळपणांत। हे मी मागतें तुजप्रत। तें ऐकतां सद्गुरूनाथ। ऐसें बोलू लागले
।।२१।।

श्रीकृष्ण गौळिया घरीं। ज्या व्रते आले भूमीवरी। तें मी सांगतो माझ्यापरी। जेणें पुत्र होय तुज
।।२२।।

पूर्वी अवंतीनगरांत। चंद्रसेन नामें नृपनाथ। त्याचा मणिभद्र सखा सत्य। शिवभक्तिपरायण
।।२३।।

एक माणिक त्याचे जवळीं। देता झाला चंद्रमौळी। या माणिकाची गोष्ट आगळी। किती सांगू तुजलागी
।।२४।।

प्रकाश त्या माणिकाचा। ज्या वस्तूवर पडे साचा। ती ती वस्तू सुवर्णाचा। भाग होऊन बैसत
।।२५।।

त्या माणिकाकारण। कित्येक राजे इच्छिती जाण। परि ना प्राप्त म्हणून। आले एकदां लढावया
।।२६।।

ते दिवशीं शनिवार । तिथी त्रयोदशी साचार। पूजना बैसला नृपवर। महाकाललिंगाच्या
।।२७।।

तें गौळियाच्या कुमारांनी। निज नयनीं पाहूनी। तैसेचि येऊनियां वनीं। पूजन त्यांनीं आरंभिलें
।।२८।।

अस्तमानाच्या वेळेला। त्या गौळियांच्या बालकाला। धुंडित समुदाय येता झाला। त्यांच्या आप्तवर्गाचा
।।२९।।

अवघ्या गोपकुमारांसी। घेऊन गेले गेहासी। त्यापैकी एक तया स्थलासी। लिंगापाशींच बैसला
।।३०।।

त्याची माता तयाप्रत। बहुप्रकारें विनवित। परि तो न हाले यत्किंचित। गेहा न येई सर्वथा
।।३१।।

म्हणून माय रागावली। पूजा अवघी मोडली। लिंगशाळुंका फेकून दिधली। तेणें बाळ दुःखी झाला
।।३२।।

हरहर म्हणूनी आक्रंदत। डोके आपटोनियां घेत। तें पाहून पार्वतीकांत। काय करता जाहला
।।३३।।

रत्नखचित मंदिर निर्मिलें। आंत तेजायमान लिंग भलें। ज्याच्या प्रकाशे व्यापिलें। अवघे तें उज्जयिनीनगर
।।३४।।

सूर्यप्रकाशापरी। हा प्रकाश कोठून तरी। आला रात्रींचे अवसरीं। म्हणून पहावया जन धांवले
।।३५।।

इकडे गोपकुमारा कारण। प्रसन्न झाला पंचवदन। वर माग म्हणून। बोलला त्या बाळकासी
।।३६।।

कुमार म्हणे गंगाधरा। पूजा भंगाचा दोष जरा। लागो न माझ्या जननीस हरा। हेंच मागणें तुजप्रती
।।३७।।

तथास्तु बोलला भगवान् । समस्त राजे मंदिर पाहून । त्या गोपकुमाराचें वर्णन। मुखें करून लागले
।।३८।।

ऐसें शनिप्रदोष व्रत। तें तूं करावें यथास्थित। तुझी इच्छा उमानाथ। पुरविल गे पुढील जन्मीं
।।३९।।

ऐसें म्हणून श्रीपाद यती। पुत्राचे शिरीं हस्त ठेविती। तैं वेदत्रय येऊन व्युत्पत्ति। कळली तया कुमारातें
।।४०।।

अवधें ज्ञान त्यासी आलें। अजाणपण निमालें। ऐसें श्रीपाद वल्लभें कौतुक केलें । कुरवपुरीं कृष्णातीरीं
।।४१।।

त्या विप्रस्त्रीनें अर्चन। शनिप्रदोषीं केलें जाण। श्रीपादवल्लभा मानून। नीळकंठ पशुपती
।।४२।।

ऐसा गुरुकृपेचा महिमा। ऐक नामधारका शिष्योत्तमा। गुरुभक्तीचा ज्यास प्रेमा। तो सर्वत्र वंद्य होई
।।४३।।

तया कुरवपुरांत। एक रजक होता भक्त। श्रीपादचरणी प्रेम अमित। जडलें होतें तयाचें
।।४४।।

तों एके दिनीं ऐसें झाले। एक बादशहा तेथें आले। जलविहार करूं लागले। स्त्रियांसवें कृष्णेंत
।।४५।।

त्या यवनभूपाच्या वैभवासी । पार न लागे निश्चयेसी । हत्ती घोडे दासदासी। सेवेस त्याच्या तत्पर
।।४६।।

तें पाहून रजक म्हणे। कोणतें पाप केलें येणें। मानवदेहा येऊन भोगणें। वैभव तरीच कृतार्थता
।।४७।।

ती इच्छा रजकाची। श्रीपादवल्लभें जाणली साची। ईश्वरा जाणल्या कोणची। गोष्ट आहे अशक्य सांगा
।।४८।।

नित्याप्रमाणें दंडवत। रजक घाली श्रीपादाप्रत। तैं बोलले सद्गुरूनाथ। रजकास येणें रितीं
।।४९।।

तुझी इच्छा मी जाणिली। होशील बापा वैभवशाली। जा वैदुरानगरीं यवनकुलीं। सर्व वैभव भोगावया
।।५०।।

तेथें माझें दर्शन। होईल पुन्हां तुजकारण। त्यावेळी ब्रह्मज्ञान। होऊन मुक्त होशील तूं
।।५१।।

मीहि नृसिंहसरस्वती। नामें होणार आहे यती। ऐसें श्रीपादवल्लभ सांगती। तया रजकाकारणें
।।५२।।

पुढें रजक पंचत्व पावला। आश्विन वद्य द्वादशीला। श्रीकृष्णेच्या पवित्र जलां। श्रीपाद झाले नाहींसें
।।५३।।

म्हणजे श्रीपाद झाले अदृश्य । तया कुरवपुरास । जे कां भक्तविशेष। त्यांना भेटी होतसे
।।५४।।

एक कश्यपगोत्रीचा। विप्र वल्लभेश नांवाचा। धंदा व्यापार करणेचा। होता त्याचा शिष्योत्तमा
।।५५।।

तो प्रतिवर्षी कुरवपुरीं। येतसे कृष्णातीरीं। श्रीपादचरणीं ज्याची खरी होती निष्ठा अलोट
।।५६।।

त्यानें एकदां नवस केला। जरी मजसी विपुल मिळाला। पैसा तरी मी या स्थळां। ब्राह्मण संतर्पण करीन कीं
।।५७।।

घालीन सहस्रभोजन। कुरवपुरासी येऊन । सर्वदा श्रीपादचरण। चिंतित होता मानसीं
।।५८।।

इच्छा त्या सद्भक्ताची। श्रीपादवल्लभे पुरविली साची। म्हणून नवस फेडण्याची। आला तयारी करून तो
।।५९।।

बरोबर घेतले बहु धन। निघाला कुरवपुराकारण। तें तस्करांनीं पाहून। पंथी त्यासी गांठिलें
।।६०।।

तस्कर म्हणाले आम्हीं। यात्रेकरू आहोंत पाही। जातो कुरवपुराठायीं। श्रीपादाच्या यात्रेस
।।६१।।

दोन रात्र बरोबर ।। होते ते तस्कर । । एका रात्रीं भयंकर ।। प्रसंग आणिला तस्करें
।।६२।।

वल्लभेशाचा कंठनाळ। तस्करें छेदिला तात्काळ । घेऊनियां धन सकळ । जाऊं लागले अधम ते
।।६३।।

तों श्रीपादवल्लभे त्याप्रति। येऊन आडविलें पंथीं। होता जो का त्रिशूळ हातीं। त्यानें तस्कर ठार केलें
।।६४।।

भक्तसंकटाकारण ।। आले श्रीगुरु धांवून ।। मूर्ति तेजायमान ।। जटाभार मस्तकीं
।।६५।।

शूल तो सव्य हातीं। ऐसी प्रगटली गुरुमूर्ती। एका तस्कराचे हातीं। विभूति त्यानें दिधली
।।६६।।

आणि म्हणाले या विभूतीस। लावी वल्लभेशाच्या कंठास। तेणें होईल सजीव खास। तो आहे भक्त माझा
।।६७।।

कंठा विभूति लावितां। वल्लभेश झाला उठून बसता। आणि झाला विचारिता। त्या उरलेल्या तस्करासी
।।६८।।

या तस्करा कोणी मारलें। कोणीं मजला सजीव केले। हें सर्व सांग वहिलें। ऐकण्या मी आतुर असे
।।६९।।

तस्कर बोले त्यावरी। एक आला जटाधारी। शूल घेऊनियां करीं। तस्करातें मारावया
।।७०।।

हे चारी तस्कर। तयानीच केले ठार । विभूति लावितां तव शरीर। सजीव झाले मागुतीं
।।७१।।

ऐसा वृत्तांत ऐकिला। वल्लभेश आनंद पावला। म्हणे सदुरू माझा शिणला। येथे येऊन प्रत्यक्ष
।।७२।।

धन्य धन्य तूं तस्कर। नयनीं पाहिले गुरुवर। महादोषही होती दूर। सद्गुरूच्या स्मरणमात्रं
।।७३।।

पुढे तो वल्लभेश ब्राह्मण। आला कुरवपुरालागुन । घातिले सहस्रभोजन। ऐसा महिमा सदुरूचा
।।७४।।

ऐक शिष्या नामकरणी। सांगतों मी तुजलागुनी। श्रीपादवल्लभ गुप्तपर्णी। कुरवपुरासी राहिले
।।७५।।

ज्या स्त्रीलागून। शनिप्रदोष व्रत कथिलें जाण। तीच जन्म घेऊन । आली जाण करंजपुरा
।।७६।।

हें करंजपूर। उत्तरेसी माहुरगडाचे सान्निध्यासी। तेथें वाजसनीय शाखेसी। जन्म तिचा जहाला
।।७७।।

नांव ठेविलें अंबिका। तीस दिधली माधवा देखा। तिच्या पोटीं झाला निका। अवतार श्रीदत्ताचा
।।७८।।

उभयतां वयांत आल्यावर । अंबिकेस झाला कुमार। जो साक्षात् विधिहरिहर। जडजीवांते तारिता
।।७९।।

पोर उपजतां क्षणीं। ओंकार वदते झाले वदनीं। तो चमत्कार पाहूनीं नयनीं। लोक विस्मित जहाले
।।८०।।

एक दिवसाचें हें पोर। वदले कैसे ओंकार। हा न मानवी प्रकार । असावा कोणी सिद्ध योगी
।।८१।।

जन्म नांव शालिग्राम। लौकिकीं नरहरी उत्तम। धन्य तें करंज ग्राम। अवतार जहाला सद्गुरूचा
।।८२।।

मातापिता क्षणक्षणां। दृष्ट बाळाची काढती जाणा। जो सकल योगियांचा योगिराणा। त्यास दृष्ट होय केवीं
।।८३।।

असो अंबिका म्हणे माधवासी। दूध अल्प मम स्तनासी। म्हणून बालकाच्या पोषणासी। कांहीं योजना करा हो
।।८४।।

तें ऐकतां सद्गुरूमूर्ति। दाविण्या आपली प्रचिती। मातेच्या स्तना लाविती। हात आपुला सव्य पहा
।।८५।।

तों निघाल्या दुग्ध धारा। बत्तीस तेथें एकसरा। त्या पाहूनि प्रकारा। जननी विस्मय पावली
।।८६।।

आणि म्हणाली मनांत। हैं नोहे बालक सत्य। अवतरलासे श्रीदत्त । पांग माझा फेडावया
।।८७।।

असो एक वर्ष झाले। बाळ परि कांहीं न बोले। एक ओंकाराविण भले । जनकजननीं चिंतावली
।।८८।।

जाणत्या पुसती समाचार। कशानें हा बोलेल कुमर। कोणी म्हणती पानावर । जेवू घाल पिंपळाच्या
।।८९।।

कोणी म्हणती कुलदैवता। तूं आपुली पूजी सर्वथा। तेणें होईल बोलता। हा बालक निश्चये
।।९०।।

ऐसीं सात वर्षे झालीं। जननीजनकां चिंता लागली। हा मुका आहे मुळीं। कैसी करूं मुंज याची
।।९१।।

गायत्रीचा उच्चार। झाला पाहिजे साचार । ईश्वर कोपला आम्हांवर। पुत्र मुका दिधला
।।९२।।

शनिप्रदोष व्रत केलें । मूल मुकें जन्मलें। अवघे यत्न व्यर्थ गेले। हाय हाय रे दुर्देवा
।।९३।।

जननीचा पाहून शोक। बाळ करी कौतुक। लोहार्गळा घेऊन एक। आला घरांतून जननी पुढें
।।९४।।

ती लोखंडाची पहार। सद्गुरूचा लागतां कर। होऊनि बसली भांगार। जननी कौतुक करितसे
।।९५।।

हें वृत्त निवेदन । केलें पतिकारण । मग तो माधवनामें ब्राह्मण । काय करी तें ऐका
।।९६।।

तुकडा घेऊनीं लोखंडाचा। देई बाळकाचे करीं साचा। तोहि झाला सुवर्णाचा। हें त्यानें पाहिलें
।।९७।।

माधव म्हणे कांतेसी। हा कुलदीप आपुले वंशीं। मानव लेखूं नको यासी। याची योग्यता थोर असे
।।९८।।

मातापित्याकारण। सद्गुरू सांगती करून खूण। माझें मौंजीबंधन । करा म्हणजे बोलेन मी
।।९९।।

व्रतबंध होतां क्षणीं। बाळ बोलला वेद वाणी। त्या श्रीनरहरिचरणां लागुनी। नमन माझे हें असो
।।१००।।

अवघे लोक कौतुक करिती। हा दिवीचा देव निश्चिती। जडजीव उद्धराया भूमीवरती। मनुजरूपें अवतरला
।।१०१।।

मातेनें प्रथम भिक्षा घालितां। ऋग्वेद बोलला तत्त्वतां । द्वितीय भिक्षा पदरीं पडतां। वेद यजु बोलला कीं
।।१०२।।

तृतीयभिक्षासमयीं जाण। केलें सामाचें गायन। तें अवघ्यांनीं पाहून। जयजयकारें गर्जियेले
।।१०३।।

मग मातेस गुरुमूर्ती। बोलते झाले येणें रीती। आम्हां आज्ञा द्यावी त्वरित गती। तीर्थाटण करावया
।।१०४।।

ते ऐकतां घाबरी झाली। माता बोलूं लागली। तूं आमची काठी भली। सोडून आम्हां जाऊं नको
।।१०५।।

गुरु बोलती त्यावर। हा तुझा कोता विचार। तुम्हां पुत्र होतील चार। सेवा कर्ते सभाग्य
।।१०६।।

आमच्या नादीं न लागावें। आम्हां सुखें जाऊं द्यावें। गतजन्मीचे आणावे। विचार कांही मनांत
।।१०७।।

ऐसें म्हणून मस्तकावर। ठेविले झाले वरद कर। तयीं पूर्वजन्मींचा समाचार। सर्व कांही समजला
।।१०८।।

हा नोहे ब्रह्मचारी। श्रीपादवल्लभ निर्धारी। जो मी पाहिला कुरवपुरीं। श्रीकृष्णेच्या तटाकास
।।१०९।।

शनिप्रदोष व्रत ज्यानें। सांगितलें मजकाजणें । ज्या व्रतप्रभावानें। हा आला मम पोटीं
।।११०।।

ऐसें म्हणून सद्गुरूसी। नमन करी साष्टांगेसी। तूं पुत्र होऊनि माझ्या कुशीं। अवतरलास नांवाला
।।१११।।

करावया तीर्थाटणा । आज्ञा मशी देववेना । हें ऐकून भाषणा । सदुरू करूं लागले
।।११२।।

माते संसार मायामयी। यामध्यें न सार कांहीं। अशाश्वत देह हा पाही । याचा नाहीं भरंवसा
।।११३।।

म्हणून शरीर जोंवर। तोंवरी परमार्थ व्यापार। करूनि घ्यावा झडकर। ऐसें वाक्य सुज्ञाचें
।।११४।।

माता बोले त्यावरी। हें न मी कांहीं ऐके खरी। मला पुत्र झाल्यावरी। तूं जावें तीर्थाटणा
।।११५।।

तें ऐकतां सद्गुरू हांसले । मातेप्रती म्हणाले। एक कां गे दोन मुलें । झाल्यावरी जाय मी
।।११६।।

ऐसें बोलून राहिलें घरीं । त्या करंज ग्रामाभीतरीं। शिष्यशाखा जमली भारी। सद्गुरूचे समीप
।।११७।।

बाल वृद्ध ब्रह्मचारी। हंस परमहंस दंडधारी। अवघे येऊं लागले घरीं। विद्या शिकाया कारणें
।।११८।।

सद्गुरूचें अमोघ ज्ञान। अज्ञान राहील कोठून। जेथें उगवला नारायण। तेथे तम कशाचा
।।११९।।

असो गर्भिणी झाली माता। नवमास लोटले तत्त्वतां । प्रसूतीची वेळ येतां । जुळी मुलें दोन झालीं
।।१२०।।

कांही दिवस गेल्यावर । बोलते झाले गुरुवर। जातों आम्ही महीवर। तीर्थाटण करावया
।।१२१।।

आणिक होतील मुलगे दोन। आणि एक कन्या सुलक्षण। हे पूर्णायुषी अवघे जाण। होतील माते निःसंशय
।।१२२।।

सदा राहतील संपन्न। चिंता न स्पर्शेल यांलागून। बोल आपुले खरे करून । आतां आज्ञा देई मला
।।१२३।।

ग्रामवासी अवघे मिळाले। आज्ञा देते जहाले। करंजाहून निघाले। गुरु उत्तर दिशेकडे
।।१२४।।

जनक जननी बोळवित । आली सीमेपर्यंत। तेथें कौतुक केले अघटित । सद्गुरूंनीं ऐका तें
।।१२५।।

त्रयमूर्तीचें दर्शन । मातापित्यासी देऊन । आनंदवना केलें गमन । वाराणशी क्षेत्रातें
।।१२६।।

काशीमध्ये ख्याती झाली। दर्शना येऊं लागली। ब्रह्मचारी हा चंद्रमौली। वाटूं लागला तयांना
।।१२७।।

तेथें कृष्णसरस्वती। एक होता वृद्ध यती। त्याने सद्गुरूस केली विनंती । आश्रम घ्याया कारणें
।।१२८।।

तुमचें वय आहे लहान । परि तेज देवासमान। ब्रह्मा विष्णु हरि आपण। आहात हैं मी समजलों
।।१२९।।

शास्त्रकार संन्यास। न घ्यावा म्हणे कलीस। परि त्या रक्षण्या पंथास। शंकराचार्य यति झाले
।।१३०।।

तैसें तुम्ही आतां व्हावें। संन्यासधर्मा रक्षावें। कोड आमुचें पुरवावें। होऊन कृपाळु स्वामिया
।।१३१।।

श्रीगुरु म्हणाले अवश्य । तात्काळ घेतला संन्यास। तया वाराणशीक्षेत्रास । जान्हवीच्या तटातें
।।१३२।।

कृष्णसरस्वती गुरु केला। तयीं नामधारक बोलला । दत्तात्रेयानें कैसा केला। सामान्य स्वामी निजगुरु
।।१३३।।

सिद्ध म्हणती तयास। ऐक सांगतो गुरुपीठिकेस। या सद्गुरूच्या पीठास । प्रथमतः चढले शंकर
।।१३४।।

पुढे विष्णु कमलासन। वशिष्ठ पाराशर व्यास जाण। शुक गौडपाद सगुण। गोविंद शंकर त्यापुढें
।।१३५।।

तेथून विश्वरूप पुढारी । ज्ञानबोध सिद्धगिरी । ईश्वरतीर्थ त्यावरी । नृसिंहतीर्थ नंतर
।।१३६।।

विद्यातीर्थ शिवतीर्थ । तेथून पुढें भारतीतीर्थ । त्याचा पुढें शिष्य सत्य । विद्यारण्य जाणपां
।।१३७।।

नंतर श्रीपाद मुनि। विद्यातीर्थ त्यापासुनी। मलयानंद सद्गुणी। शिष्य त्याचा जाण पां
।।१३८।।

देवतीर्थ सरस्वतीवृंद। तेथून सरस्वतीयादवेंद्र । तेथोनि शिष्य प्रसिद्ध। कृष्णसरस्वती जाण पां
।।१३९।।

ऐशी गुरुची परंपरा। कथिली ती ध्यानीं धरा। कृष्णसरस्वतीपासून खरा। संन्यास मिळाला सद्गुरूते
।।१४०।।

नाम नृसिंहसरस्वती । धारण केले देहाप्रती । बद्रिकावना गुरुमूर्ति । जाते झाले तेथून
।।१४१।।

पुढें प्रयागक्षेत्रास। सद्गुरूनीं केला वास । तेथें माधव नामें विप्र त्यास। एक येऊन भेटला
।।१४२।।

सद्गुरूंनीं त्यावर। कृपा केली अपरंपार। संन्यास देऊन सत्वर। ब्रह्मज्ञान उपदेशिले
।।१४३।।

नांव माधवसरस्वती। ठेविते झाले तयाप्रती। सद्गुरूची वर्णाया कीर्ति। वेदहि मुका होईल
।।१४४।।

या प्रयागक्षेत्रांत। शिष्य केले अगणित। त्यामाजीं मुख्य सात। त्यांचीं नांवें ऐक पां
।।१४५।।

मुख्य माधव सरस्वती। बाळसरस्वती कृष्णसरस्वती। उपेंद्रमाधवसरस्वती। सदानंदसरस्वती जाण पां
।।१४६।।

ज्ञानज्योतीसरस्वती। पुढे सिद्ध मी एक निश्चिती । प्रयागाहून सद्गुरूमूर्ति। दक्षिण दिशेस निघाले
।।१४७।।

मधलीं तीर्थं करून। आले करंजनगरालागून। तेथें जननीजनकांकारण। बहिणीभावांस भेटले
।।१४८।।

नागरिक अवघे आनंदले। आदरेसी पूजिले। श्रीपादवल्लभरूपें दिधलें । तेथें मातेसी दर्शन
।।१४९।।

रत्ना नामें एक । स्त्री होती तेथ देख । तिनें केलें कौतुक । तें आतां सांगतों
।।१५०।।

रत्नाबाई म्हणे गुरुनाथा। माझी सांगावी जन्मकथा। भूत भविष्य आपण जाणतां । म्हणून प्रश्न केला हा
।।१५१।।

सद्गुरू म्हणती तिजकारण। तुझें प्राक्तन आहे गहन। तुझें जावया दोष दारूण। तप केलें पाहिजे तुवां
।।१५२।।

दक्षिण देशीं गाणगापुरीं। भीमा-अमरजा संगमावरीं। तपा बैसावें सत्वरीं। भेटी होईल माझी तेथ
।।१५३।।

ती झाल्या दोष दारूण। होतील तुझे बाळें दहन। ऐसें तिशीं सांगून । सद्गुरू आले त्र्यंबकेश्वरा
।।१५४।।

सिद्धानें नामधारकाला। जो कां इतिहास कथन केला। तोच मीं संक्षेपें तुम्हांला । कथन करितों श्रोते हो
।।१५५।।

स्वस्ति श्रीगुरुचरित्रसारामृत। ऐकोत सदा भाविक भक्त। । हेंच विनवी जोडून हात। अति विनयें दासगणू
।। १५६।।

।। इति तृतीयोध्यायः ।। शुभंभवतु ।।

।। श्रीदत्तात्रेयार्पणमस्तु ।। श्रीहरिहरार्पणमस्तु ।।

卐 卐 卐 卐 卐

इति अध्याय समाप्तः