।। श्रीगणेशाय नमः ।।
हे रूक्मिणीपति ब्रह्मांडाधीशा। निवारी माझ्या दुरितपाशा। तुजला अशक्य पंढरीशा। कांहीं न उरलें जगत्रयीं
।।१।।
सिद्ध म्हणे नामधारकासी। नृसिंहसरस्वती ज्ञानराशी। आले त्र्यंबक क्षेत्रासी। स्नान करण्या गौतमीचें
।।२।।
इतिहास या क्षेत्राचा। येणें रीतीं आहे साचा। गोहत्यादोष गौतमाचा। गेला गौतमी स्नानानें
।।३।।
शिवमस्तकीं गंगा राहिली। ती तेथूनि काढण्या युक्ति केली। ऋषी मुनींनीं जाण भली। ती ऐक सावचित्ते
।।४।।
मंत्र सामथ्यै निर्माण। एक धेनु करून। ती दिली शेतांत सोडून । साळी खाण्या गौतमाच्या
।।५।।
तिचें कराया निवारण। गौतमें दर्भ घेऊन । हैक म्हणतां गेले प्राण। त्या धेनूचे त्र्यंबकेश्वरीं
।।६।।
गौतमा मुनी म्हणाले। तुझें करें पाप घडलें । तें बापा जाईल भलें। गंगा आणितां मृत्युलोकीं
।।७।।
मानून तें प्रमाणवचन। गौतम करी अनुष्ठान। ज्या तपानें पार्वतीरमण। प्रसन्न झाला गौतमातें
।।८।।
जटास्थ गंगा सोडिली। गौतमी नाम पावली। त्रिभुवनांत गर्जना झाली। गौतमीच्या नांवाची
।।९।।
ती ही गौतमी गोदावरी। त्र्यंबकक्षेत्र तिचे तीरीं। तेथें नृसिंहसरस्वती साक्षात्कारी। आले यति यात्रेस
।।१०।।
या गोदेचें करितां स्नान। जन्मांतरीचे दोष दारुण। जाती भस्म होऊन। ऐसे माहात्म्य गौतमीचें
।।११।।
त्या गंगेची प्रदक्षिणा। करण्या निघाला योगिराणा। जो दत्त अवतार जाणा। स्वामी नृसिंहसरस्वती
।।१२।।
प्रदक्षिणा करित करित। स्वामी आले मंजरथाप्रत। तेथें माधवारण्य शुचिर्भूत । एक येऊन भेटला
।।१३।।
नृसिंह उपासना त्यासी। तो त्या चिंती अहर्निशी। तों अनायासें सदनासी। स्वामी आले चालून
।।१४।।
साष्टांग केलें नमन। सद्भावें वंदिले चरण। तों झालें दर्शन। त्रयमूर्तीचें त्याच ठाई
।।१५।।
हा स्वामी नृसिंहसरस्वती। साक्षात् आहे दत्तमूर्ति। परिभ्रमण भूवरती। जगदोद्धारा करीत हा
।।१६।।
यास कशास पाहिजे तीर्थ। हा तीर्थरूप साक्षात्। जना सुवाटे लावण्याप्रत। कर्ममार्ग आचरे हा
।।१७।।
माधवारण्या वर देऊन । सद्गुरू निघाले तेथून। बासर सरस्वतीचें स्थान। येते झाले तया ठायां
।।१८।।
तेथें पोटदुखीचा । एक विप्र होता साचा । तो प्राण देण्याचा विचार करी मानसीं
।।१९।।
म्हणे मी पूर्वजन्मांत। अन्न ना दिलें याचकाप्रत। म्हणून या जन्मांत। हाल माझे होती असे
।।२०।।
ही दुर्धर व्याधी कोठवरी । सहन करावी आतां तरी । देतों गोदेभीतरीं। मी जाऊन प्राण आतां
।।२१।।
प्राण देण्या गंगेवर। विप्र आला सत्वर । तें पाहून गुरुवर। शिष्यास बोलू लागले
।।२२।।
अरे जा जा त्यास आणा। हा कां कंटाळलासे प्राणा। आत्महत्या दोष जाणा। मुळींच महाभयंकर
।।२३।।
शिष्यानें द्विजा आणिलें। सदुरूपुढे उभे केलें । तें नृसिंहसरस्वती बोलले। व्याधी आज गेली तुझी
।।२४।।
आम्ही औषध देतों त्यास। यथेच्छ करी भोजनास । तों इतुक्यांत दर्शनास । विप्र एक पातला
।।२५।।
तो कौंडिण्य गोत्रींचा । द्विज आपस्तंब शाखेचा । सायंदेव नांवाचा । विबुध हो
।।२६।।
सायंदेव चरणीं लागला। अष्टभावें दाटला। स्वामी माझा उद्धार झाला। आपुल्या चरणदर्शनानें
।।२७।।
सगुरू त्यासी बोलले। तुम्ही कोण कोठले। सायंदेवें सांगितलें। स्वामीलागीं येणें रितीं
।।२८।।
मी कांची नगरचा। राहाणारा आहे साचा। मी नौकर यवनाचा । झालों उदर भरावया
।।२९।।
ऐसें तेधवा ऐकन। स्वामींनीं तुकविलीं मान। आणि म्हणाले आमुचें वचन । मान एवढें बापा तूं
।।३०।।
या व्यथिताला निजघरीं। घेऊन जाय सत्वरी। भोजन घाली अति आदरी। विविध पक्वान्नें करून
।।३१।।
तैं सायंदेव म्हणे जोडून हात। या घालितां भोजन सत्य। पंचत्वा पावेल त्वरित । उदरव्यथा यासी असे
।।३२।।
याचा दोष गुरुनाथा। लागेल कीं माझ्या माथा। म्हणून झालें विनविता। अन्य सेवा सांगणें
।।३३।।
हा महानवमीसी। यथेच्छ जेवला गेहासी। तेणें व्याधि विकोपासी। गेली याची महाराजा
।।३४।।
तें ऐकतां सदुरू हंसले। प्रेमें सायंदेवा बोलले। आमुचें औषध आहे आगळें। भोजनेंची गुण
।।३५।।
एवंच सायंदेवांनीं। तो द्विज नेला निजसदनीं। स्वामीलागी प्रार्थनी। आणिले गेहापुढिते
।।३६।।
मंगल पूजा अवघी झाली। शिष्यांसहित तेधवां भली। सद्गुरूमूर्ति बैसली । भोजन तें करावया
।।३७।।
यथेच्छ जेवला व्यथित। झाला व्याधीपासून मुक्त। स्वामीस घाली दंडवत । नाचूं लागला आनंदे
।।३८।।
जय जय स्वामी नृसिंह सरस्वती। तूं साक्षात् दत्तमूर्ति। कृपाकटाक्षं व्याधीप्रती। त्वां हरिलें गुरुराया
।।३९।।
तव कृपेचें महिमान। आगळे आहे सर्वांहून । हें बासरगांव धन्य धन्य । चरण आपुले लागले
।।४०।।
सायंदेवा वर दिधला। सुसंतति उपजेल वंशाला। पुढें वृत्तांत कैसा झाला। तो आतां परियेसी
।।४१।।
यवनभया पासून। सायंदेव रक्षिला जाण। पुढें वैजनाथपरळीकारण। येते झाले श्रीगुरु
।।४२।।
परळी माजी राहिले गुप्त। कां कीं झाला त्रास अमित। कामनिक लोक असंख्यात। दर्शना येऊं लागले
।।४३।।
मनकामना पूर्ण व्हावया। जी भक्ति होते शिष्यराया। ती अवघीच होय वायां । निष्काम भक्ति एक खरी
।।४४।।
आपुल्या अवघ्या शिष्यांसी। दिलें लावून यात्रेसी। निरोपिलें ऐसें तयांसी। शैल्य पर्वतीं भेटीस यावे
।।४५।।
बहुधान्य-नाम-संवत्सरी। येऊं शैल्यपर्वतावरी। तीर्थयात्रा करून तोंवरी। तुम्ही यावें ते ठायां
।।४६।।
अवश्य म्हणाले शिष्यगण। सदुरूस केलें वंदन। स्वामी नृसिंहसरस्वती दयाघन। ऐसें सांगती तयाला
।।४७।।
या अखिलब्रह्मांडांत। काशीक्षेत्र विख्यात । तेथें तुम्ही जावें त्वरीत । विश्वेश्वरा भेटावया
।।४८।।
भागीरथीची प्रदक्षिणा। तेंवी अर्चावी सरिता यमुना। प्रत्येक नदीच्या संगमस्थाना। प्रयागतीर्थ मानावें
।।४९।।
वरुणा नदी कुशावर्ती। श्रुतकृष्णा वितस्ता शरावती। मरुद्विधा असीवनी मधुमती। देवनदी आदिकरून
।।५०।।
चंद्रभागा शरयू रेवती। मंदाकिनी गोदा निश्चिती। ज्या ज्या नद्या तीर्थं असती। तेथें आदरें स्नान करा
।।५१।।
तैसें सेतुबंध रामेश्वर। पुरुषोत्तम श्रीरंग भीमाशंकर। गंगोत्री बद्रिकेदार। महालय क्षेत्र प्रवरातीरीं
।।५२।।
कोटीतीर्थ नर्मदातीर्थ। मातृकेश्वर कुब्जतीर्थ। प्रसादतीर्थ विजयतीर्थ। गोकर्ण क्षेत्र तैसें पहा
।।५३।।
भीमरथीचे कांठीं । नामा पांडुरंग जगजेठी। जो दोष हरी उठाउठी । दर्शनमात्रं भक्तांचे
।।५४।।
अमरजा संगमांत । कोटी तीर्थं असती सत्य । वृक्ष जेथें अश्वत्थ । कल्पवृक्ष तो देखा
।।५५।।
तुंगभद्रा नदी वरदा। मलप्रभा संगम सुखदा। निवृत्तिसंगम गोविंदा। बहु प्रिय वाटतसे
।।५६।।
सिंहराशीत बृहस्पती। असतां गोदेची विशेष महती। सकळ तीर्थात वृद्धा ती। तिजवीण कोणी श्रेष्ठ नसे
।।५७।।
श्रीकृष्णेस कन्यागती। येते भेटण्यास भागीरथी। तूळ राशीस बृहस्पती। येता महत्त्व तुंगेचें
।।५८।।
कर्क राशीस येतां सूर्य। मलप्रभेचें महत्त्व होय। भीमा कृष्णा संगमी जाय। अवघे पाप दुरित दैन्य
।।५९।।
महालक्ष्मी कोल्हापुरीं। ती दक्षिणकाशी होय खरी। भिल्लवडी क्षेत्र कृष्णातीरीं। औदुंबर तसेंच
।।६०।।
धनुष्यकोटी रामेश्वर। कुंभकोण कावेरी तीर। कन्याकुमारी साचार। दर्भशयन तैसें हो
।।६१।।
त्यां समस्त तीर्थांमाझारीं। कृष्णातटाचें महत्त्व भारी। ऋषी ब्रह्मवेत्ते तिच्या तिरीं। ज्ञानार्जना राहिले
।।६२।।
त्यांतहि क्षेत्र विशेष। अमरापुर नाम ज्यास। पंचगंगा संगमास। महत्त्व आगळें प्रयागाहुनी
।।६३।।
या पंचगंगा संगमासी। अवघींच तीर्थे परियेसी। याच्याहुनी महीसी। क्षेत्र आन पवित्र नसे
।।६४।।
पुढें तीर्थ युगालय। ज्या दर्शनें पाप जाय। नंतर बापा शूर्पालय । विश्वामित्रतीर्थ भगवती
।।६५।।
मलप्रभा संगम । श्वेतश्रृंग तीर्थ उत्तम । उत्तरवाहिनी असे परम । कृष्णा येथें सुखदायिनी
।।६६।।
केदारेश्वर पीठापुरी। वृषभाद्री मणिगिरी। कल्याण नगरीची थोरी। फार चुके येरझारा
।।६७।।
सर्व तीर्थां स्नान करा। नद्यांचा दोष मनीं धरा। वर्षाकाल येता खरा। नद्या होती रजस्वला
।।६८।।
परी ज्या महानद्या थोर। भागीरथी गोदा साचार। चंद्रभागा नर्मदा तीर। सिंधू शरयू परियेसा
।।६९।।
तीन दिवस बरवा । यांना दोष मानावा । वापी तडागा जाणावा । दोष बापा एक रात्र
।।७०।।
येतां नदीसी नवें उदक। ते दिवसींची रजस्वला देख। ग्रीष्म काळीं निःशंक। दोष मानणें दिवस दहा
।।७१।।
तीर्थे तीर्थमहिमा ऐकिला। शिष्यसमुदाय निघून गेला। गुप्त रूपें त्र्यंबकस्थला। राहिलें नृसिंहसरस्वती
।।७२।।
शिष्य जातां तीर्थ यात्रेसी। मी एकटा होतों सद्गुरूपाशी। तेथें एक विप्र दर्शनासी। येता झाला श्रीगुरुच्या
।।७३।।
करून पदाचें वंदन। द्विज बोले करुणावचन। तारा स्वामी मजलागून। माझी उपेक्षा करूं नका
।।७४।।
मागें मी एक गुरु केला। तो न विद्या सांगे मला। निशिदिनीं लावी सेवेला। जी का अती हीन असे
।।७५।।
दुरुत्तरें ताडी वरच्यावर । कदा न बोलतसे मधुर। मी कंटाळून अखेर। त्याग त्याचा केला असे
।।७६।।
तें एकतां द्विजवचन। सद्गुरूनें केलें हास्यवदन। आलें मजला कळून। निर्देवी तूं जन्माचा
।।७७।।
आपुले दोष झांकिसी । सद्गुरूला दूषण देसी। जाऊन कल्पतरूपाशीं । राहिलास रे करंटा
।।७८।।
तुझ्यासारख्या अधमालागुन । गुरुसेवा घडे कोठून। गुरुनिंदकाचें वदन। कदापिही पाहूं नये
।।७९।।
ऐसें ऐकतां द्विज मनीं। परम अनुताप पावुनी। घट्ट धरिले चरण दोन्ही। पायीं लोळू लागला
।।८०।।
महाराज मम करें चुकी झाली। ती पाहिजे दुरूस्त केली। आपण जगत्त्रयाची माउली। आतां न लोटा परता हो
।।८१।।
असा अनन्य भाव पाहून। श्रीगुरु बोलले त्याकारण। ऐक गुरुभक्तीचें महिमान। अवधान देई मम बोला
।।८२।।
अरे, सदुरू ही जननी जनक। हरिहरब्रह्मा देख। गुरु कल्पतरू निःशंक। कल्पिले फळ देणारा
।।८३।।
येविषयीं एक कथा। सांगतों मी तुज आतां । धौम्यमुनी म्हणून होता। ब्राह्मण एक द्वारकेसी
।।८४।।
त्या धौम्यऋषीपाशीं। तिघे शिष्य परियेसी । त्यांतून बापा पहिल्यासी। नाम अरुण पांचाळ
।।८५।।
वेद शिष्य दुसरा । उपमन्यू तो जाण तिसरा । त्याहून त्या अवांतरा। कोण गणती करील
।।८६।।
शिष्याचें पाहून मन। मग देती वरदान। उगीच नमस्कारालागून। कदा न फल अर्पित
।।८७।।
ऐक अरुण पांचाळास। सांगती जा शेतास । तडागीचें पाणी साळीस । देऊन यावें अस्तमानीं
।।८८।।
अरुण साळीचे शेती गेला। तडाग नयनीं पाहिला। म्हणे सदुरूचें शेत माथ्याला। आहे यासी काय करूं
।।८९।।
प्रवाहास बंधारा। घातल्याविण नये खरा। उदकाचा ओघ साजिरा। या साळीच्या शेतासी
।।९०।।
दगड धोंडे आणून। टाकी प्रवाहात नेऊन । भिंत बांधाया कारण। ते सवेंच जाती वाहूनिया
।।९१।।
अखेर बिचारा कंटाळला। प्रवाहामाजीं आपण पडला । बंधाऱ्यासम होऊन भला। तेणें तुंबलें तेथ वारी
।।९२।।
पाणी गेलें शेतांत। सूर्य गेला अस्ताप्रत। धौम्यऋषी आले शोधीत । निजशिष्यास ते ठाया
।।९३।।
शेतामाजीं पाहिले वारी। आनंद झाला अंतरीं। दृष्टि फेकितां सभोंवरी। शिष्य कोठें न दृष्टि पडे
।।९४।।
मग हांक मारिली। ती अरुणानें ऐकलीं। त्वरे जाऊन पाऊलें धरिली । धौम्यमुनीची तयानें
।।९५।।
मुळींच ते अंतर्ज्ञानी। होते बापा धौम्य मुनी। न सांगताहि कोणी। अवघेच त्यानें जाणलें
।।९६।।
अरुणास हृदयीं धरिलें। दोन्ही हातें कवटाळिलें। मुखीं आशीर्वचन बोलले। विजयोस्तु म्हणुनी
।।९७।।
वेद वेदांगें व्याकरण। अवघी तुज लागून। मुळीं नको अध्ययन। याचें तुशी करावया
।।९८।।
माझा हस्त तुझे शिरीं। सांख्य तर्कशास्त्रं दुसरीं। तुझ्या घरीं भरतील वारी। मत्प्रसादेंकरूनी
।।९९।।
तो आशीर्वाद तात्काळ फळला। अरुण पांचाळ विद्वान झाला। सदुरू सेवक नाहीं गेला। वायां बापा जगामध्यें
।।१००।।
दुसरा शिष्य वेद त्याला। धौम्य मुनी सांगता झाला। तूं रक्षून शेताला । कापणी खुरपणी करावी
।।१०१।।
रास होईपर्यंत। त्वां रक्षणा असावें तेथ। तें वेदानें मानून खचित। बैसला राखण शेतातें
।।१०२।।
पिकाची कापणी झाली। रास अवघी तयार केली। धौम्य मुनीला निवेदली। हकीकत रास झाल्याची
।।१०३।।
रास आणाया कारण। गाडा रेडा देऊन । आणि सांगितलें भरून । रास आणावी म्हणुनिया
।।१०४।।
प्रशस्त होता गाडा। ओढण्यासी एक रेडा। म्हणून झाला कानकोंडा। मनामाजी वेद तो
।।१०५।।
मग त्यानें ऐसें केलें । रेड्यास गाड्या जुंपिलें । एक बाजूचे घेतलें । जूं त्यानें निजस्कंधीं
।।१०६।।
परि झालें अघटित । चालतां गाडा पंथांत । रुतून गेला चिखलांत । गती रेड्याची खुंटली
।।१०७।।
मग तो वेद शिष्य। गाडा ओढण्या बळ विशेष । करूं लागला तो फास। लागता झाला गळ्यासी
।।१०८।।
प्राणांताचा समय आला। ओढोंच लागला गाड्याला। म्हणे गुर्वाज्ञेकरितां गेला। प्राण माझा जावो तरी
।।१०९।।
तों इतुक्यांत धौम्यमुनी। उभे ठाकले येऊनी। वेदाची निष्ठा पाहुनी। परम चित्तीं संतोषले
।।११०।।
आणि अमोघ दिधला वर। सर्वत्र होईल जयजयकार। माझा आहे वरद कर। सर्वदा तुझे शिरावरी
।।१११।।
सुख संपदा भोग आतां। अखेर मुक्ती सायुज्यता। पुनरावृत्ति नाहींच आतां। वेदा राहिली तुजकारणें
।।११२।।
तें वेद सद्गुरूचरण। वंदून गेला निजगृहालागुन। लोकरीतीं संसार करून। अखेर गेला उद्धरोनी
।।११३।।
तिसरा उपमन्यू शिष्य त्यासी। गोधन दिलें चारायासी। त्याचा आहार राक्षसीं। अन्न लागे वह पोटा
।।११४।।
म्हणून क्षुधाक्रांत होतां। झाला गुरें घेऊन येता। तें सद्गुरूनें पाहतां। कोपते झाले धौम्यमुनी
।।११५।।
अरे अस्तमानापर्यंत। गुरें चारावीं रानांत। उपाशी न मारीं यांप्रत। दिवसा गृहा येऊं नको
।।११६।।
उपमन्यू तैसें करी। भिक्षा मागून कांतारी। कसेंबसें उदर भरी। जठराग्नीची आग मोठी
।।११७।।
धौम्य पुसे तयास। तुझा देह न कां झाला कृश। काय खाशी काननास। हैं आम्हां सांगावें
।।११८।।
उपमन्यू म्हणे जोडून पाणि। मी भिक्षा मागतों काननीं। त्यावरी निर्वाह करूनी। रक्षितों गुरें स्वामिया
।।११९।।
धौम्य म्हणे तयासी। आम्हां टाकून तूं जेविशी। भिक्षा मागून काननासी। देई आम्हां लागून
।।१२०।।
तें उपमन्यूनें मानिलें। प्रथम भिक्षेस नेऊन दिलें। दुसरीवरी आपुलें। उदर भरी शिष्य तो
।।१२१।।
गुरु सांगती त्याप्रत। हेंहि कर्म अनुचित। दोन्ही भिक्षा सदनाप्रत। आल्या पाहिजेत आमुच्या
।।१२२।।
शिष्य बिचारा तैसें करी। पोटालागी क्षुधा भारी। गाईस वांसरू पीता धरी। कांसेखालीं ओंजळ
।।१२३।।
तेंहि करणें बंद केलें। गुरुनें सत्त्व पहाण्या भलें। तैं एक दिनीं नवल वर्तलें । तें ऐकें सावचित्तें
।।१२४।।
अर्क वृक्षापासून । दूध काढी धरूनी द्रोण। तो त्या चिकाचा एक कण। उपमन्यूच्या नेत्रीं गेला
।।१२५।।
तेणें झाला आंधळा। मार्गों जातां कूपांत पडला । म्हणे या दुर्दैवाला। काय करूं आतां मी
।।१२६।।
सांग सेवा सद्गुरूची। माझ्या करें न घडे साची। तों स्वारी पातली धौम्याची। कूपाचिया सन्निध
।।१२७।।
शिष्यास वरती काढला । आश्विनोध्याय उपदेशिला। तो जो जपतां उपमन्यूला। दृष्टी आली साच की
।।१२८।।
गुरुनीं दिधला वर। अमोघसा साचार। उत्तंकनामें शिष्य थोर। लाधेल तुला वत्सा रे
।।१२९।।
जनमेजय राजाकारण। तोच करील उपदेश जाण। एवंच तुझें महिमान । वाढेल जा भूमंडळीं
।।१३०।।
तुजला तुझे कल्याणाची। जरी इच्छा असेल साची। तरी जा आपले गुरुची। पाऊलें धरी पुनरपि
।।१३१।।
या कथेनें अनुताप। द्विजास उपजला आपोआप। अनुतापा पुढें पाप । राहील सांगा कोठुनी
।।१३२।।
निजगुरुकडे जाण्याला। तो शिष्य परत निघाला। तें पाहून तारिला। श्रीगुरुनें तेथल्या तेथें
।।१३३।।
जगद्गुरू नृसिंहसरस्वती। कोण वर्णील त्यांची कीर्ति। नामस्मरणें भस्म होती। सर्व अंगीचे महादोष
।।१३४।।
असो सद्गुरू तेथून। आले भिल्लवडीग्रामालागुन । तेथें भुवनेश्वरीचें स्थान । त्रिभुवनांत ख्यात जें
।।१३५।।
जवळ कृष्णातटीं पश्चिमेस । स्वामी राहिले औदुंबरास। ज्यायोगें महिमा विशेष । वाढला त्या स्थळाचा
।।१३६।।
राजा जाय जया स्थानीं। तीच होय राजधानी । तैसें औदुंबरालागुनी। महत्त्व आलें स्वामीमुळें
।।१३७।।
असो करवीर नगरांत। वेदविद्यापारंगत। मान जया विद्वानांत। विशेष ऐसा द्विज होता
।।१३८।।
परि त्याचा कुमार । निर्बुद्ध जैसा दगड थोर । ज्या पाहतां विप्रवर । कष्टी राहे मानसीं
।।१३९।।
लोक अवघे छीः थू करिती। अहोरात्र निंदिती। तूं हिऱ्यापोटी गार निश्विती। बा सूर्यासी शनैश्चर
।।१४०।।
मुंज पाहिली करून। परि न ये वेदाध्ययन। सांगितलें जाय विसरून । क्षणामाजी सर्वथा
।।१४१।।
अनुताप उपजला त्याचे पोटीं। खराच मी गारगोटी। निघाला कंटाळून शेवटी । तया करवीरग्रामास
।।१४२।।
भुवनेश्वरींलागी आला। जगदंबेसी नमस्कार केला। तीन दिवस राहिला। उपोषित तिचे पुढें
।।१४३।।
परी न पावे भवानी। ऐसे तेधवां पाहोनि। जीभ आपली कापुनी। अर्पण केली देवीस
।।१४४।।
आतां देतों उद्या प्राण। तुझे चरणांवरी जाण। तुझें आहे जननीपण। खोटें हैं समजलों
।।१४५।।
ते रात्री स्वप्नांत। भुवनेश्वरी सांगत। ऐसा न होई दुःखित । जाय उद्यां औदुंबरा
।।१४६।।
तेथें नृसिंहसरस्वती। नामें आहेत एक यती। ते करतील कृपा ती। ब्रह्मचाऱ्या तुजवरी
।।१४७।।
ऐसें स्वप्न पाहून । सुप्रभातीं केलें प्रयाण । भुवनेश्वरीस वंदून । येतां झाला औदुंबरा
।।१४८।।
श्रीकृष्णेचें स्नान केलें। यती चरणांस वंदिलें। नयनीं वाहो लागले। स्वामीस पाहतां आनंदाश्रु
।।१४९।।
जीभ कापली म्हणून। न बोलवे त्याकारण। स्वामी आहेच त्रिकालज्ञ। सर्व त्यांनीं जाणिलें
।।१५०।।
ब्रह्मचारी हृदयीं धरिला। शिरीं वरदकर ठेविला। त्या योगें तो झाला। बृहस्पती ब्रह्मचारी
।।१५१।।
जिव्हा जी का कापिली। ती त्यासी पुन्हा आली। अवगत होणें न राहिली। एकहि विद्या तयाला
।।१५२।।
क्षणांत ऐसा चमत्कार। झाला तो वानूं कोठवर। साक्षात् असती ईश्वर। स्वामी नृसिंहसरस्वती
।।१५३।।
इति श्रीगुरुचरित्रसारामृत ग्रंथ। तारक होवो भाविकांप्रत। हीच भिक्षा मागत। दत्तात्रेयासी दासगणू
।।१५४।।
।। इति चतुर्थोध्यायः ।। शुभंभवतु ।।
।। श्रीदत्तात्रेयार्पणमस्तु ।। श्रीहरिहरार्पणमस्तु ।।
卐 卐 卐 卐 卐
इति अध्याय समाप्तः