।। श्रीगणेशाय नमः ।।
हे पांडुरंगा मंगलधामा। पुराण पुरुषोत्तमा। नृसिंहसरस्वती या नामा। तूंच धरिलें पांडुरंगे
।।१।।
सिद्ध म्हणे नामधारका। भक्तिमान तुझ्यासारिखा। या अवघ्या तिन्ही लोका। ज्ञानदृष्टी न पाहिला रे
।।२।।
ऐकें गुरुचरित्र । जें तारक परम पवित्र । जो सदाचारी शुचिर्भूत । त्याची निष्ठा गुरुचरित्री
।।३।।
मागें क्षेत्र औदुंबरी। उद्धरिला ब्रह्मचारी। तेथून सद्गुरूची स्वारी। आली पंचगंगासंगमांत
।।४।।
हा पंचगंगासंगम । सर्व तीर्थात अत्युत्तम । जेवीं देवांत पुरुषोत्तम । वा गंधांत कस्तुरी
।।५।।
शिवा भद्रा भोगावती। कुंभ नदी सरस्वती। ऐशा मिळोन पंचगंगा ती। पावती झाली नामाला
।।६।।
कृष्णा वेणी या दोन। ऐशा संपन्न नद्या एकवटून । राहिल्या तेथें म्हणून। दुसरे प्रयाग जाण हे
।।७।।
पंचगंगा संगमावरी । ग्राम एक कुरवपुरी । हे कुरुक्षेत्र निर्धारी । संशय येथे वाहू नको
।।८।।
याच कुरवपुराचे । कुरूंदवाड नांव हल्लीचे । औरवाड नगर साचे । अमरपूर असे कीं
।।९।।
या अमरपूर ग्रामांत। अमरेश्वर पार्वतीकांत । हाच काशीविश्वनाथ। कोट तीर्थे येथ असती
।।१०।।
कृष्णा पश्चिम वाहिनी । शुक्रतीर्थ तया स्थानीं । जे औरवाडा पासुनी । जवळ असे कृष्णेच्या
।।११।।
समोर औदुंबर कल्पतरू । जेथें राहिले सद्गुरू । द्वादश वर्षे, त्याचा करू। कोठवर मीं विस्तार
।।१२।।
स्थान रम्य मनोहर । अमरपुरा समोर । स्फटिकतुल्य वाहे नीर । जे ठाई कृष्णेचें
।।१३।।
नृसिंहवाडी यास म्हणती। त्रिभुवनांत ज्याची ख्याती। औदुंबरतळवटी गुरुमूर्ति। स्वामी राहिले निजानंदी
।।१४।।
पंचगंगा संगमस्थानी। तीर्थे असती बहु जाणी। शक्तितीर्थ अमरतीर्थ या नावांनी। ख्यात असती जाण पां
।।१५।।
असो अमरापुरांत। एक द्विज दरिद्री अत्त्यंत। घेवड्याचा अंगणांत। वेल त्याच्या एक होता
।।१६।।
चरितार्थ त्याचा यावरी। नसे सामुग्री मुळीं दुसरी। शेंगा रांधून करी। पंचमहायज्ञ तो
।।१७।।
त्यानें एके दिनीं भोजना। नेला सद्गुरू निजसदना। करोन पायाच्या वंदना। चरणी धरिला अचल भाव
।।१८।।
शेंगा रांधिल्या भोजनास । तेणें जाहला संतोष । स्वामीचिया चित्तास। खरेच भक्तवत्सल ते
।।१९।।
द्विज बोले स्वामिराया। हे सर्वसाक्षी परम सदया। काय घालूं जेवावया। तुज घेवड्याच्या शेंगा मी
।।२०।।
परी या शेंगावांचून। काहीं न मशीं साधन। ऐसें श्रीगुरुसी बोलून। ढाळू लागला दुःखाश्रू
।।२१।।
तें पाहतां नृसिंहसरस्वती। बोलले तयास येणे रीती। न करी मानसीं खंतीं। दारिद्रय तुझें आज सरलें
।।२२।।
भोजन करून वेल छेदिला। योगयोगेश्वर निघून गेला। तें पाहता द्विजकुटुंबाला। शोक झाला अपार
।।२३।।
कैसें दैव ओढवलें। वेलास स्वामींनी छेदिलें। जेवोन आमचें बरेंच केलें । संन्याशानें कल्याण
।।२४।।
विप्र म्हणे कांतेसी। दोष न देई सद्गुरूसी । त्याने आपुल्या कर्मासी। काय करावें सांग पां
।।२५।।
जैसें द्यावें तैसें घ्यावें। दोष कोणास लावावे। स्वामीस ना ताडावें । दुरुत्तरें तूं के व्हां हि
।।२६।।
ते साक्षात् दत्तमूर्ति। आले आपुल्या गृहाप्रती। ज्याची वेडे इच्छा करिती। इंद्रादिक देवहि
।।२७।।
परि न लाभ कवणाला। होई तो आपणा जाहला । जगत्रयाचा जेवला। स्वामी येऊन आपल्या घरीं
।।२८।।
हाच लाभ विशेष। जाहला कीं आपणांस। ऐसें बोलून वेलास। उचलून फेकलें नदीमध्यें
।।२९।।
मूळ खांदावया जो गेला। तो तेथें कुंभ देखिला । मोहरानी भरलेला। दावू लागला भार्येस
।।३०।।
आणि म्हणाला धन्य धन्य । श्रीनृसिंहसरस्वती दयाघन। आशा वेल छेदून। निरिच्छ प्रथम केले मला
।।३१।।
आणि मग हा कुंभ दिधला। कृपा करूनिया भला। या स्वामीचे रहस्याला। कोण जाणे जगामध्ये
।।३२।।
पुढें हा वृत्तांत। येऊनी सांगे स्वामीप्रत। तैं स्वामी म्हणती गुप्त । ठेवीं न करी स्फोट याचा
।।३३।।
पुत्र पौत्र तुझे घरीं। नांदती आनंदा माझारी। दैन्य दारिद्रय झालें दुरी। त्याची भीती धरूं नको
।।३४।।
नाम धारक पुसे सिद्धासी। सद्गुरू औदुंबरापाशी। कां राहती अहनिर्शी। हें काय सांगा हो
।।३५।।
वृक्षामाजी अश्वत्थ। असुनी श्रेष्ठ अत्यंत । सद्गुरूचा जडला हेत। औदुंबरीं कशास्तव
।।३६।।
सिद्ध म्हणे एक गोष्टी। प्रल्हाद रक्षणासाठी। स्तंभी प्रगटला जगजेठी। नृसिंह रूप घेऊनियां
।।३७।।
हिरण्यकश्यपु प्रल्हादपिता। झाला पोट फाडून वधिता। काढून आंतडी गळा घालितां। जाहलासे नरहरी
।।३८।।
तया पोटीं होतें विष। ते झोंबले नखास। तेणें श्रीनरहरीस। अतिशय त्रास झाला
।।३९।।
दाहशमनाकारण । आली लक्ष्मी घेऊन । औदुंबरा कारण । परम शीतता त्या ठाई
।।४०।।
नरहरीनें नखें आपुलीं। औदुंबरवृक्षीं खोविलीं। ज्या योगें शांत झाली। व्याधी नखाची शिष्योत्तमा
।।४१।।
म्हणून वृक्षा दिधला वर। तूं फलद राहशील निरंतर। तूं कल्पतरूच साचार। होशील या कलीयुगीं
।।४२।।
म्हणून औदुंबर तळवटी। राहुं लागले ज्ञानजेठी। दत्तावतारीं प्रीती मोठी। औदुंबराची शिष्यराया
।।४३।।
हें औदुंबर स्थान। अमरपुराचे समोर जाण। ज्या स्थलाचें महिमान । कोठवरी सांगावें
।।४४।।
प्रतिदिवशीं माध्यान्ही। येती चौसष्ट योगिनी। सद्गुरूतें पुजूनी। भिक्षा घालती बहु प्रेमें
।।४५।।
तैं अमरापुरांत। ब्राह्मण बोलती आपसांत। हा संन्याशी कधी न येत। भिक्षेकारणें कोठेहि
।।४६।।
पाहूं याचा प्रकार। म्हणूनी आले संगमावर। येतां भय वाटले थोर। गेले परतून निजघरा
।।४७।।
एक गंगानुज नांवाचा। शेती होता नर साचा। परम भक्त सद्गुरूचा। तो कौतुक ऐसें पाहे
।।४८।।
सूर्य आला माध्यान्हीं। प्रवाही आल्या योगिनी। तैं पाणी दुभंग होउनी। सद्गुरू प्रवाही प्रवेशले
।।४९।।
त्या कृष्णेच्या प्रवाहात। निर्मिते झाले नगर त्वरित। जेथलीं मंदिरे रत्नखचित। होती अवघी शिष्योत्तमा
।।५०।।
सद्गुरूचे बरोबरी । गंगानुज प्रवाहाभीतरीं। जाता झाला अंतरी । प्रेम त्याच्या उपजलें
।।५१।।
योगिनीनी सद्गुरूला। सिंहासन दिलें बसायाला। करून षोडशोपचारें पूजनाला । भिक्षा तिहीं घातली
।।५२।।
ओवाळून आरती अखेर। सद्गुरूसी नमस्कार। करून गुप्त झाल्या साचार। सद्गुरू आले वरी पुन्हा
।।५३।।
तो गंगानुज देखिला। सद्गुरूसी विस्मय वाटला । तूं सांग या स्थला। कैसा आलासी मजलागी
।।५४।।
गंगानुज म्हणे सदुरूप्रती। तुमचे ठाई ज्याची भक्ति। त्याला कोण आडविती। ऐसा प्रभाव आपुला
।।५५।।
सद्गुरू बोलले त्यावर। असो तुजला देतों वर। तुझें दुःख दारिद्रय झालें दूर। परी ही गोष्ट फोडूं नको
।।५६।।
गंगानुजा जे दिवशी। तूं ही गोष्ट सांगसी । तैं पावशील मुक्तिसी। हें सावधपणें ध्यानीं धर
।।५७।।
प्रेमा गंगानुजाचा। सद्गुरू चरणीं जडला साचा। भक्त कल्पद्रुमाचा। दैन्य कां कधी भोगणार
।।५८।।
गंगानुज येता शेती। द्रव्यघट सापडला त्या प्रती। धन्य नरसिंहसरस्वती। दत्तावतार साक्षात जे
।।५९।।
माघमासीं पौर्णिमेस । गंगानुज विचारी सद्गुरूस । जावें माघस्नानास। प्रयाग क्षेत्री मज वाटे
।।६०।।
सद्गुरू म्हणती त्या प्रती। पंचगंगासंगम निश्चिती। हे प्रयागचि आहे निगुती। येथे शंका धरूं नको
।।६१।।
दक्षिणकाशी कोल्हापूर । त्यांत यांत ना अंतर। याचे दावितों प्रत्यंतर । मजसवें चाल आतां
।।६२।।
गंगानुज सवे घेतले। क्षणामाजी अदृश्य झाले। गंगायमुना संगमीं भले। प्रगटले की, प्रयाग क्षेत्रीं
।।६३।।
पुढें गया वाराणशी। करून आले अस्तमानासी। कृष्णातटाकी पश्चिमेसी। अमरपुराच्या जाण पां
।।६४।।
गंगानुजा आज्ञा केली। तूं जाई आपुल्या स्थळीं। आतां येथें न राहूं मुळीं। प्रगट रूपें आम्ही पहा
।।६५।।
तो चौसष्ट योगिनी स्वर्गांतून। आल्या श्रीगुरुचे धरिले चरण। स्वामि आम्हास सोडून। येथून कोठे जाऊं नका
।।६६।।
सद्गुरू बोलले त्यावर । यावच्चंद्रदिवाकर । आम्ही येथें असूं स्थिर । परी ते गुप्तरूपानें
।।६७।।
या क्षेत्रीचें महिमान। आगळें आहे सर्वांहून। हें क्षेत्र ना कामधेनु पूर्ण। आहे भक्ताकारणें
।।६८।।
एकादशीस सोमवारी। वा अमावास्येस शनिवारीं। जे स्नान येथे कृष्णातीरीं। करतील त्या मोक्ष लाधे
।।६९।।
वैधृती व्यतिपात सूर्यग्रहण। अर्थोदय महोदयपर्व जाण। अथवा गजच्छाया चंद्रग्रहण। येतां येथे स्नान करावें
।।७०।।
जे या औदुंबराखाली। अनुष्ठान करतील मंडळी। ते अवघे होतील बळी। सर्व सुखें लाधून
।।७१।।
येथे अनुष्ठान करितां। मनकामना पुरती तत्त्वतां। कोड रक्तपितीसम व्यथा। येथे निरसन होतील
।।७२।।
एका ब्राह्मणाकारण। येथे घालितां भोजन। त्याचें अवघे जाऊन दैन्य। सुखी होईल सर्वथा
।।७३।।
येथे घालितां प्रदक्षिणा। वाजपेयासम पुण्य जाणा। येथें वांझेचा वांझपणा। जाईल सत्य वचन हैं
।।७४।।
गोहत्या ब्रह्महत्या। यतिहत्या स्त्रीहत्या। मित्रहत्या बालहत्या। ऐशा हत्या निरसतील
।।७५।।
असले कोणी अल्पायुषी । ते होतील दीर्घायुषी। ऋण फिटेल त्वरेसीं। करितां वंदन पादुकेचें
।।७६।।
मात्र सद्भाव धरून। हें अवघे करणें जाण । फळ न ये भावावांचून । हें ध्यानी असूं द्या
।।७७।।
माझ्या पादुका ये स्थानीं। म्यां ठेविल्या तुम्हालागुनी। आतां आम्ही येथूनी। गाणगापुरी प्रकट होऊं
।।७८।।
नामधारक म्हणे सिद्धास। पादुकानुभव कवणास। आला जातां गाणगापुरास। श्रीगुरु, तें सांगा मला
।।७९।।
सिद्ध म्हणती शिष्या ऐक। शिरोळ नामें ग्राम एक। त्या ग्रामीं कौतुक। ऐसें झालें सदृरूचें
।।८०।।
त्या शिरोळ ग्रामांतरी। एक विप्र होता सदाचारी। शुचिर्भूत त्याची नारी। पतिपरायण सर्वथा
।।८१।।
परी पूर्वजन्मींचा महादोष । न सोडितां स्त्रियेस । प्रसूत होता संततीस। मृत्यु येई निश्चयें
।।८२।।
ऐसें झालें पांच वेळा । दुःखित झाली वेल्हाळा । पुसे शास्त्रीपंडितजाणत्याला। हैं ऐसें कां होतसे
।।८३।।
एक होता त्रिकालज्ञ। तो बोलला तिजकारण। तुला ब्रह्महत्या दोष दारूण। घडला आहे पूर्वजन्मीं
।।८४।।
द्विज शौनक गोत्राचा। एक पूर्वी होता साचा। अपहार त्याच्या द्रव्याचा। केलास तूं पूर्वजन्मी
।।८५।।
विप्र मागू येतां धन। तूं न देशी त्याकारण। म्हणून त्यानें आपुला प्राण। दिधला जाण तुजवरी
।।८६।।
तोच आहे पिशाच्च झाला। ये जन्मीं तुज लागला । तोच तुझ्या संततीला। वाचूं न बाळे देत असे
।।८७।।
आतां उपाय एक यासी। तूं जा पंचगंगासंगमासी। तेथें नृसिंहसरस्वतीच्या पादुकासी। अर्चन करी सद्भावें
।।८८।।
धन द्यावें शतमान। शौनकगोत्री द्विजालागून। एक मास करावें अर्चन। स्वामीचिया पादुकांचें
।।८९।।
बाई बोलली त्यावरी। शतमान द्रव्य आम्हां घरीं। कोठून यावें आतां तरी। हाच एक प्रश्न असे
।।९०।।
सेवा कराया कारण। मी आहे तयार पूर्ण। परी द्याया शतमान धन। अशक्य दिसे मजलागीं
।।९१।।
तें ऐकून ज्ञाता बोलला । तूं जा करी सेवेला। जें प्राप्त होईल ते वेळा । तेंच देई सुशीले
।।९२।।
नामधारका ती नारी। येती झाली औदुंबरी। अमरपुराच्या समोरी। पश्चिमतटीं कृष्णेच्या
।।९३।।
मनोभावें करून। करूं लागली अर्चन । काम्य तीर्थी प्रत्यहीं स्नान। करिती झाली तीन वेळेला
।।९४।।
पादुकास करी वंदना। उंबरासी घाली प्रदक्षिणा। तो एकें दिनीं गुरुराणा। आला तिच्या स्वप्नांत
।।९५।।
तुझ्या ब्रह्महत्येकारण। तें तूं वेचून धन। दहा दिवस प्रेमें करून। करी येथ समाराधना
।।९६।।
बाईनें स्वप्न पाहिलें। शौनकगोत्री ब्राह्मणा दिलें। धन थोडेंसे जें मिळालें। होतें तिला ते काळीं
।।९७।।
हैं कृत्य झाल्यावर। पुन्हां स्वप्नीं भेटले जगदुद्धार। ओटी भरली साचार। श्रीफलें करून बाईची
।।९८।।
एक ब्रह्मराक्षस। ते करण्या विरोधास। करूं लागला श्रीगुरुस । तें न त्याने ऐकिलें
।।९९।।
हे पिशाच्चा येथें गती। तूं घ्यावी निश्चिती। मी आपुल्या भक्ताप्रती। तुला न छळू देणार
।।१००।।
ऐशा ऐकतां वचनाला। समंध गती घेता झाला। तों जागृती आली बाईला । पदरीं नारळ पाहिला
।।१०१।।
स्वप्न अवधें मानुन खरें। पादुकेस अर्चिलें अत्यादरें। सद्गुरूकृपें पुढें उरे। अशक्य तें काय सांगा
।।१०२।।
त्या बाई कारण। पुढें मुलें झालीं दोन। एक कन्या एक पुत्र जाण। जन्म होतां न मेलीं तीं
।।१०३।।
पुत्र मुंजीच्या योग्य झाला। चौलाचा विचार ठरविला। तो व्याधी झाली पुत्राला । धनुर्वात दुर्धर
।।१०४।।
त्याच व्याधीकरून। पंचत्व पावला पुत्र जाण। बाई श्वास कवटाळून। रडूं लागली धाय धाय
।।१०५।।
हे गुरुराया तव कृपेनें। पुत्र झाला मजकारणें। तो हा धनुर्वातानें। मरण पावे हा बोल तुला
।।१०६।।
हे स्वामी नृसिंह सरस्वती। धांव धांव सत्वर गती। मी न वांचें आतां निश्चिती। जळेन या पोरासह
।।१०७।।
तों एक येऊन ब्रह्मचारी। बाईस सांगे ते अवसरी। तूं हें प्रेत घेऊनी सत्वरी। जाई पादुके जवळ आतां
।।१०८।।
तें बाईस मानवलें। प्रेत पाठीस घातलें। कृष्णातटीं आणून ठेविलें। पादुकेचे समोर
।।१०९।।
तो अस्तमानाची झाली वेळा । ज्ञाती बांधव म्हणती तिला। दहनार्थ देई प्रेताला। आतां शोक करूं नको
।।११०।।
ज्ञानदृष्टीनें विचार करी। वेडे हा शोक आवरी। जन्ममृत्यु हीच खरी गोष्ट आहे भ्रमाची
।।१११।।
ती बाई न माने यत्किंचित। मी न देई तुम्हा प्रेत। मर्जी असल्या मजसमवेत। प्रेतास तुम्हीं जाळावें
।।११२।।
समजूत घालतां कंटाळले। स्वस्थाना निघून गेले। स्नान करूनियां भले। श्रीकृष्णेचें ते ठाया
।।११३।।
आतां सकाळीं करूं दहन। या प्रेताचे येऊन। सुटू लागल्या ती घाण। ही त्या सहज सोडील कीं
।।११४।।
प्रेतासह पादुकावरी। बाई लोळू लागली खरी। धांव, धांव सत्वरी। स्वामी नृसिंह सरस्वते
।।११५।।
ऐसा तीन प्रहरपर्यंत शोक केला अत्यंत । प्रभातीचा थंड वात। सुटतां डोळा लागला
।।११६।।
तों एक व्याघ्रांबरधारी। विभूती सर्वांग ज्याच्या शरीरी। शूल ज्याच्या सव्य करीं। जटाभार मस्तका
।।११७।।
तो स्वामी बोलला । बाई न सोडी धीराला । तुझा मुलगा सजीव केला। मी ही विभूती लावून
।।११८।।
ऐसें स्वप्न देखलें। बाईस जागेपण पातलें। तों प्रेताचें शरीर उष्ण झाले। अवयव हलू लागले कीं
।।११९।।
थोडा वेळ जातां क्षणीं। बाळ बैसला उठोनी। तैं ते पाहून उभयतांनीं। आनंद मानला विशेष
।।१२०।।
सूर्योदय होतां । आले लोक तया प्रेता । दहन करावया करितां । ज्ञातीबांधव बाईचे
।।१२१।।
तो त्रिवर्गासी पाहिलें। प्रेत सजीव जाहलें। सकळा आश्चर्य वाटलें। धन्य म्हणती सद्गुरू
।।१२२।।
मग सगळ्यांनी मिळून। पादुकेचें केलें अर्चन। बाई मुला घेऊन । गेली शिरोळ ग्रामातें
।।१२३।।
ऐसा पादुकेचा महिमा। किती सांगू शिष्योत्तमा। सद्गुरूभक्त सौख्यधामा। जातो सेवा केल्यानें
।।१२४।।
स्वस्ति श्रीगुरुचरित्रसारामृत। ऐकोत सद्गुरूभक्त । हेंच विनवी जोडून हात। स्वामिचरणा दासगणू
।।१२५।।
।। इति पंचमोध्यायः ।। शुभंभवतु ।।
।। श्रीदत्तात्रेयार्पणमस्तु ।। श्रीहरिहरार्पणमस्तु ।।
卐 卐 卐 卐 卐
इति अध्याय समाप्तः