।। अध्याय सहावा ।।

।। श्रीगणेशाय नमः ।।

हे अज अजिता पूर्णब्रह्मा। पांडुरंगा पुरुषोत्तमा। तुझ्या कथेचा देई प्रेमा। ही आहे इच्छा मशीं
।।१।।

या तव प्रेमेंकरून। ऐहिक पारमार्थिक दैन्य। जाय ऐसें महिमान। संत सांगती आम्हांतें
।।२।।

तेच येवो प्रत्यया। दासगणूच्या पंढरीराया। तूंच नरसिंह सरस्वती होउनिया। वससि नाथा गाणगापुरी
।।३।।

नामधारक म्हणे सिद्धासी। आले अमरजासंगमासीं। श्रीगुरुस्वामी पुण्यराशि। हें मीं ऐकिलें तुम्हापून
।।४।।

तेथें पुढें काय जाहलें । तें पाहिजे कथन केलें। मन माझें हपापलें। ऐकण्या कथा सद्गुरूची
।।५।।

सिद्ध म्हणे तूं धन्य धन्य । गुरुचरित्रीं जडलें मन। लाभ अलौकिक याहून। नाहीच कोठें राहिला
।।६।।

ऐक आतां सावध चित्तें। या सद्गुरूचरित्रातें। भीमा अमरजा संगमातें। राहिले नृसिंहसरस्वती
।।७।।

भीमा उत्तरवाहिनी। आहे वत्सा या ठिकाणीं। हा अमरजासंगम प्रयागाहुनी। अति श्रेष्ठ असे रे
।।८।।

गाणगापुर नगरांत। घरें द्विजाची एक शत। त्या मध्यें एक अत्यंत । दरिद्री ऐसा द्विज होता
।।९।।

द्विज शुची सन्मती। पत्नी पतिपरायणा अती। परी दोप्रहराची असे भ्रांती। गृहींच तया द्विजाच्या
।।१०।।

वांझ म्हैस घरांत। जिचे न राहिले मुळीं दंत। वेसण घातली नाकात। माती वाहणे काम जिचें
।।११।।

लोक माती वाहाण्यास। दाम देऊनी नेती म्हैस। तीच चरितार्थ चालविण्यास। सोय होती द्विजाला
।।१२।।

पुण्य पूर्वजन्मींचे। एके दिनीं फळलें साचें। पाय लागले सद्गुरूचे। त्या द्विजाचे घराला
।।१३।।

नामधारका ते दिवशीं। म्हैस होती घराशी। कोणी न नेली वाहण्यासी। ती रोजच्या प्रमाणें
।।१४।।

द्विज नव्हता घरांत। स्त्रीनें घातले दंडवत । म्हणे स्वामी व्हा स्थित। ह्या आसनीं क्षणभरी
।।१५।।

इतर ब्राह्मण ऐसें म्हणती। हा संन्यासी वेडा निश्चिती। त्याची त्यालाच भ्रांती। मग स्वामीस अन्न कोठलें
।।१६।।

श्रीमंत घरें वगळून। हा दरिद्री गृहा आवर्जुन। आला याचें कारण। कांहीच आम्हा कळेना
।।१७।।

असो स्वामी म्हणती विप्रस्त्रियेसी। वेळ न आम्हा थांबण्यासी। म्हैस तुझ्या सदनासी। आहे मग प्रश्न कशाचा
।।१८।।

इचें दूध काढोनिया। भिक्षा घाली लवलाह्या । तैं ती साध्वी लागली पाया। दीन वचन बोलली
।।१९।।

स्वामी आपण त्रिकालज्ञ। ऐसें सत्य असून। पय भिक्षा मजलागुन । घाली म्हणतां नवल हैं
।।२०।।

म्हैस आहे घरांत। ती नांवालाच मात्र। रेड्यापरी उपयोग होत। माती वाहण्या कामीं पडे
।।२१।।

वांझ ती जन्मापासुन। पय निघावें कोठून। पती धान्य घेऊन । येतील थांबा थोडकें
।।२२।।

श्रीगुरु म्हणती त्यावरी। असत्य न वदें वैखरी। जा हें पात्र घेऊन करीं। धार तिची काढावया
।।२३।।

गुरुवचनीं ठेऊन विश्वास। ब्राह्मणी बैसली दोहण्यास। नामधारका त्या वांझ म्हशीस। तैं अपूर्व ऐसें वर्तलें
।।२४।।

म्हशीलागी फुटला पान्हा। दूध निघालें विपुल जाणा। तेणें विप्र स्त्रीचे मना। हर्ष झाला अतिशय
।।२५।।

हा स्वामी न मानव। आहे साक्षात दिवीचा देव । काय त्याचा प्रभाव। वांझ म्हशीनें दूध दिलें
।।२६।।

अष्टभाव दाटून आले। स्वामीचरणा वंदिले। ते तोषवून घातिले । भिक्षा म्हणून सद्गुरूशीं
।।२७।।

योगिराज दूध प्याला। आशीर्वाद दिधला ब्राह्मणीला। धनधान्य तुझ्या सदनाला। नांदेल चिंता करूं नको
।।२८।।

तुझें दारिद्रय निवटिलें। ऐसें म्हणून संगमा गेले। बाईनें वृत्त सांगीतले। पती येतां निजगृहा
।।२९।।

तोही परम संतोषला। उभयतां आले संगमाला। पंचारती करून ओवाळिला । त्यांनी संगमीं श्रीगुरु
।।३०।।

पहा श्रीगुरुकृपेचा चमत्कार। वांझ म्हैस देई क्षीर। हें का करूं शकेल नर। सांग मनीं शोधुनी
।।३१।।

त्या ब्राह्मणाचें घरीं। अपार संपत्ति आली खरी। सद्गुरूकृपा झाल्यावरी। दैन्य राहावें कोठुनी
।।३२।।

दुसरें दिनीं म्हशीस । लोक माती वाहण्यास । मागूं येतां गेहास । विप्र त्यासीं बोलला
।।३३।।

माझी म्हैस आहे दुभती। ती न वाहील आतां माती। संगमावरी आला यती। त्याने कृपा केली ही
।।३४।।

कर्णोपकर्णी हें वृत्त। कळले ग्रामाधिकाऱ्याप्रत। म्हणून तोहि निघाला धांवत। संगमीं वंदण्या श्रीगुरु
।।३५।।

राजा म्हणे स्वामीसी। चलावे महाराज ग्रामासी। तारणे आम्हां पतितासी। विनंती आमुची मान्य करा
।।३६।।

नृपाचिया वचनासी। मानिते झाले कृपा राशी। बरें येतों ग्रामासी। चाल आम्हां घेऊन
।।३७।।

समारंभें ग्रामीं आणिला। तो दीनजनाचा वशिला। तेथलिया थाटाला। किती म्हणून वर्णन करावें
।।३८।।

पालखी घोडे अब्दागिर। पुढें चालले सैनिक स्वार। टाळ वीणे वाजती मधुर। विप्र वदती वेदऋचा
।।३९।।

सडे घातले पंथांनी। आरत्या करिती सुवासिनी। नृसिंहसरस्वती ज्ञानतरणी। गाणगापुरीं उदेला
।।४०।।

ग्रामाचिया पश्चिमेस। अश्वत्थवृक्ष विशेष । त्यापाशी ब्रह्मराक्षस । होता एक शिष्योत्तमा
।।४१।।

त्यानें प्रगटून सदुरूपायीं। लोळण घेतलें लवलाहीं। म्हणे कृपामूर्ते माझी आई। उद्धार माझा करी कां
।।४२।।

मी या पिशाच्चयोनीस। येऊन भोगतों आहे त्रास । द्यावे मजला सगतीस। हीच याचना गुरुराया
।।४३।।

सगुरू तेथें राहिले। ब्रह्मराक्षसा बोलले। स्नानकरितां संगमी भले । मुक्त होशील पिशाच्चा
।।४४।।

मग तो ब्रह्मराक्षस। त्वरें गेला संगमास। कलेवर टाकून मुक्तीस । पावता झाला गुरुकृपें
।।४५।।

त्या समंधाचे स्थानीं। श्रीगुरु राहिले प्रेमें करूनी। ख्याती झाली त्रिभुवनीं। स्वामिचिया प्रभावाची
।।४६।।

लांब लांबून येती जन। दर्शनें होती पावन। कित्येकांचे रोग दारुण। गेले नुसते दर्शनें
।।४७।।

असो एक होता यती। नामे त्रिविक्रमभारती। तया लागीं स्वामीकीर्ती। असह्य झाली शिष्योत्तमा
।।४८।।

जैसें पाहून सूर्याप्रत। जळफळे मनीं दिवाभीत। वा धार्मिक कुलवधूप्रत। सहज निंदिती वारांगना
।।४९।।

तो त्रिविक्रमभारती। अहर्निशी निंदी गुरुप्रती। म्हणे हा नोहे खरा यति। दांभिक आहे निःसंशय
।।५०।।

नरहरीची उपासना । त्रिविक्रमभारतीची जाणा । वेदत्रयाच्या करी पठणा । यतिधर्में वर्ततसे
।।५१।।

त्याचा हरावया भ्रम। निघाले श्रीगुरु शांतिधाम। सोडून गाणगापूर ग्राम। त्याच्या कुमसी कारणें
।।५२।।

श्रीगुरु बसले पालखींत । सर्व सैन्य असे बहुत। घोड्यावरी नृपनाथ। गाणगापुरी ग्रामीचा
।।५३।।

इकडे कुमसीग्रामाभीतरीं। भारती ध्यान धरी । परी ध्यानीं नये नरहरी। विक्षेप होऊं लागला
।।५४।।

कुमसीचिया सांन्निध्यास। आले स्वामी परम पुरुष। तैं कौतुक केलें विशेष। तें ऐक सांगतो
।।५५।।

त्रिविक्रमभारतीला। दंडधाऱ्यांचा समूह दिसला। तेणें तो घोटाळला। हैं काय दिसतें म्हणून
।।५६।।

अवघेच लोक दंडधारी। अवघे समान अधिकारी। थोरधाकटा त्या भीतरीं। निवडतांहि नये कीं
।।५७।।

ऐसें ध्यानी पाहून। निघाला घालित लोटांगण। जैसें ध्यानीं तैसे जन। देखता झाला तेधवां
।।५८।।

सद्गुरूस केला नमस्कार। म्हणे मी पतित पामर। निंदा केली आजवर । त्याची क्षमा करा हो
।।५९।।

तो क्षणांत थाट मावळला। पहिल्यासमान पुन्हा झाला। पालखी स्वार शिपायाला। पाहे त्रिविक्रमभारती
।।६०।।

म्हणे हाय हाय केवढा तरी। आहे श्रीगुरु अधिकारी। हेच अवघे दंडधारी। यानेंच मज दाखविले
।।६१।।

तेच पुन्हा केले स्वार। हा दत्तावतार साचार। कोण याची करणार। बरोबरी या जगामध्यें
।।६२।।

त्रिविक्रमभारती। गलिताभिमान झाला अती। वरच्यावर करी प्रणती। श्रीगुरु च्या चरणातें
।।६३।।

अभिमानरहित पाहून। ओळंगले दयाघन । त्रिविक्रमभारतीचें अज्ञान । निवटिते झाले सद्गुरू
।।६४।।

जा आतां ध्यानधारणा। करी एकाग्र करून मना। तुझ्या परमार्थ साधना। येतील फळें गोमटी
।।६५।।

त्रिविक्रमभारती। वर देऊन कुमसीसी। आले गाणगापुरासी। परत नरसिंहसरस्वती
।।६६।।

नामधारका ऐक आतां। सांगेन तुज अभिनव कथा। विदुर ग्रामीं एक होता। बादशहा यवनाधिप
।।६७।।

तो ब्राह्मणांचा पक्का वैरी। करडी नजर तयावरी। हिंदू धर्माचा अंतरीं। पाडाव करण्या इच्छितो
।।६८।।

राज्यांतील द्विजासी। आणून सर्भेत बळेंसी। म्हणे तुम्ही वेदासी। म्हणा येधवां माझ्यापुढें
।।६९।।

वेद ऐकून देई धन। विपुल द्विजा कारण। ही कीर्ति त्याची पसरली जाण। हळोपाळीस चोहोंकडे
।।७०।।

द्विजही येती बहुत। धनावरी ठेऊन चित्त। वेद म्हणण्या सभेत । विदुरग्रामीं बादशहापुढें
।।७१।।

वेदपाठ ऐके कानीं। बादशहा उन्मत्त होऊनी। कांही भागाचा अर्थ पाहुनी। करी निंदा ब्राह्मणांची
।।७२।।

म्हणे यवनांत ब्राह्मणांत। फरक नाहीं यत्किंचित । तेही यज्ञकर्मांत। पशुहत्या करतात कीं
।।७३।।

ऐसें सत्य असुनी। निंदिती यवनांलागुनी। आपला मात्र झाकोनी। दोष ठेविती अधम हे
।।७४।।

असो त्याच्या सभेंत। दोन आले फिरत फिरत। ब्राह्मण तीन, वेद ज्याप्रत । सर्वांगासह येत होते
।।७५।।

ते बोलले शहाला। आम्ही वाद करायाला। आलों तुझ्या सभेला । आणी विद्वान बोलावुनी
।।७६।।

जरी न येतील द्विजवर। वाद करावया साचार। तरी आम्हा झडकर। जयपत्र तें देई गा
।।७७।।

तरी ब्राह्मणाशीं। कोणी न करिती वादासीं। या योगें अभिमानासी। दोघे चढते जाहले
।।७८।।

शत्रू अभिमानासारिखा। कोठें नाहीं साच देखा। अभिमानानें रावणादिका। दुर्गती ती प्राप्त झाली
।।७९।।

बली राजा सहस्त्रार्जुन। तेवीं धृतराष्ट्र-नंदन। यांचें केलें निर्मूलन। अभिमानानें जगामधें
।।८०।।

असो ते विप्र दोघे । कुमसीम आले सवेगें। त्रिविकम-भारतीसंगें। शास्त्रचर्चा करण्यास
।।८१।।

त्रिविक्रम-भारती मुनी। बोले त्या विनयें करूनी। आम्ही कोठें आहोत ज्ञानी। रामो हरी न येत आम्हां
।।८२।।

आम्ही भणंग भिकारी वनवासी। घेतले संन्यास आश्रमासी। मर्जी असल्या गाणगापुरासी। चला वाद करण्यातें
।।८३।।

तेथें आमुचे गुरुवर। नरसिंहसरस्वती दयासागर। वेदवेदांगे शास्त्रं इतर । त्यांना अवगत असती तीं
।।८४।।

त्रिविक्रम-भारती मुनी। आले दोघांस घेऊनी। भीमा अमरजा संगमस्थानीं । जेथें बैसले गुरुवर
।।८५।।

बोले त्रिविक्रमभारती। हे दोघे विप्र विद्वान अती। शास्त्रवादाची या प्रती। इच्छा उद्भवली स्वामिया
।।८६।।

मी बहुत प्रकारें बोधिले। परी ते न त्यांनी ऐकिलें। वाद करण्या येथें आले। ना तरी जयपत्र मागती
।।८७।।

श्रीगुरु त्या दोघांला। आणून सन्मुख बोध केला। परी तो वाया गेला। वाद कराच म्हणतात
।।८८।।

नरसिंहसरस्वती यतिवर। म्हणती तुम्ही जाणतां वेद सार। हैं असंबद्ध साचार। मज वाटे येकाळीं
।।८९।।

पैल वैशंपायन जैमिनी। यांनाहि न वेद कळले जाणी। तेच वेद तुम्हां लागुनी। येती म्हणतां हैं आश्चर्य
।।९०।।

हा विद्वत्तेचा अभिमान। द्या संगमीं सोडून। तरिच होइल कल्याण। भरीस वादाच्या न पडा कीं
।।९१।।

पूर्वकाली मुनी एक। भारद्वाज नामें देख। वर्तन ज्याचें अतिचोख। तो गेला ब्रह्मयाकडे
।।९२।।

भारद्वाज म्हणे ब्रह्मदेवा । द्यावा मशी वेदठेवा। हाच हेतु पुरवावा। माझ्या मनीचा चतुरानना
।।९३।।

ऐकून भारद्वाज-वचन। ब्रह्मयानें केलें हास्यवदन। पर्वताकार ढीग तीन। घातिलें त्यानें वेदांचे
।।९४।।

पर्वताकार वेद पाहतां । भारद्वाज झाला बोलता। या वेदास नये शिवतां । वेद गणती न करवे कीं
।।९५।।

कांहीं तरी मज द्यावें । कृतार्थ वेगें करावे । रितें ना पाठवावें । मजलागीं महाराजा
।।९६।।

मग ब्रह्मदेवानें मुठी तीन। घेतल्या तीन ढिगांतून। दिल्या भारद्वाजा लागून। इच्छा त्याची पुरवावया
।।९७।।

तेंच पुढें व्यासांनी। एक एक वेद दिला जाणी। प्रथम जो पैल त्या लागुनी। ऋग्वेद तो दिधला
।।९८।।

उपवेद त्या ऋग्वेदाचा। आयुर्वेद तो असे साचा। देव ब्रह्मदेव याचा। अत्रिनामें गोत्र असे
।।९९।।

शाकल बाष्कल अश्वलायन। ऐशा अनंत शाखा जाण। त्या तुम्हां अवगत पाहून। आश्चर्य आम्हां वाटते
।।१००।।

वैशंपायनाकारण। सांगितला यजुर्वेद जाण। या वेदाच्या उपवेदालागुन । नाम धनुर्वेद असे
।।१०१।।

भारद्वाज गोत्र याचें । रुद्र अधिदैवत तयाचें । पंचमुखी गायत्रीचे । ध्यान करणें ये ठाया
।।१०२।।

शाखा ती वाजसनी। दुसरी जाण बोधायनी। हिरण्यकेशी म्हणूनी । तृतीय भेद असे कीं
।।१०३।।

यज्ञादिक-क्रियेसी। मुख्य यजुर्वेद परियेसी । अनंत शाखा आहेत यासी। त्या सांगाव्या कोठवर
।।१०४।।

वेद तिसरा जो का साम। तो जैमिनीस दिधला अत्युत्तम। मंत्रशास्त्र ज्याचे नाम। तो उपवेद अथर्वणाचा
।।१०५।।

ऐसें वेदरूपी अमूल्य धन। मिळालें ब्राह्मणा कारण। ज्या योगें ते पूज्य होऊन । बैसते झाले जगत्त्रया
।।१०६।।

हल्लीं या कलींत । ब्राह्मण झाले भ्रष्ट अत्यंत। जाऊन यवन सभेत । वेद त्यांना ऐकविती
।।१०७।।

तीच स्थिति आहे तुमची। इच्छा न करा जय पत्रिकेची । त्रिविक्रमभारतीमुनीची। उगीच हेळणा करूं नका
।।१०८।।

ऐसें श्रीगुरु वरचेवर। सांगती परि ते न तिळभर। मानिती, चर्चा शास्त्रावर । कराच ऐसें बोलले
।।१०९।।

मग श्रीगुरूंनी नवल केलें। एका पांथासी बाहिलें। आणि पुसू लागले। तूं कोण कोठील म्हणूनी
।।११०।।

पांथ बोले या कारण। मी मातंगजातीचा अती हीन। आपण पाचारिलें म्हणून। आलों स्वामी ये ठाया
।।१११।।

मग स्वामी नरसिंहसरस्वती। निज शिष्यास आज्ञापिती। हा दंड घेऊन हाती। काढ महीसी सात रेघा
।।११२।।

पांथास केलें भाषण। एक एक रेघ ओलांडून। सांग जातां विधान। आम्हा कारणें भिऊं नको
।।११३।।

पांथ म्हणे मी किरात। नाम बनराखा सत्य। लंघिता तिसऱ्या रेषेप्रत। गंगापुत्र झालों म्हणे
।।११४।।

चौथी रेषा ओलांडितां। म्हणे शूद्रजाती झालों आतां। पांचवी शीव ओलांडितां । म्हणे सोमदत्त वैश्य मी
।।११५।।

सहावी रेषा ओलांडिली। म्हणे मी क्षत्रिय झालों बळी। माझी नामाभिधा भली। गोदावरी महाराजा
।।११६।।

सातवी रेषा ओलांडितां। म्हणें मी विप्र झालों आतां। अवगत शास्त्र संहिता। अध्यापक नाम माझें
।।११७।।

हें सद्गुरूकृपेचें महिमान। मातंग केला ब्राह्मण। म्हणे हा पंडित आहे पूर्ण। यासी वाद करा आतां
।।११८।।

आम्हा सारिखे संन्यासी। नाहीत योग्य वादासी। हा अध्यापक तुम्हासी। सर्व उत्तरे देईल
।।११९।।

तें पाहतां ब्राह्मण भ्याले। मुखात मुकेपण आलें। जिव्हेनें स्थान सोडिलें। पडली अर्धी वाळून
।।१२०।।

बोलतांहि येईना। शरीरीं भरल्या यातना। अखेर अनन्य भावे चरणा। आले शरण श्रीगुरूंच्या
।।१२१।।

अनुतापें पाहून। श्रीगुरुचें द्रवलें मन। म्हणती निजकर्म भोगल्याविण। तुमची सुटका होणे नसे
।।१२२।।

व्हाल तुम्ही द्वादश वर्ष। कांतारी ब्रह्मराक्षस । तुम्ही छळिलें ब्राह्मणांस। तेणें राक्षसयोनी पावाल जा
।।१२३।।

एवंच शिष्या त्याठिकाणीं । भिमा अमरजा संगमस्थानीं। कलेवर ठेविलें दोघांनी। ब्रह्मराक्षस जाहाले
।।१२४।।

चांडालहातें गर्व खंडण । बोलले शिष्या कारण। या चांडालयोनींत जनन । पूर्व दोषं होतसे
।।१२५।।

जो वेद विक्री करी । यवनसभे श्रुती उच्चारी। जो सदाचारा वैरी। तो चांडाल योनीं जन्मतसे
।।१२६।।

जो गुरुपत्नीचें ठाई। पापवासना ठेवी पाही। तोहि मरणांतीं जन्मा येई। चांडाल योनींत परियेसा
।।१२७।।

द्विजकुलीं जन्मून। जो अभक्ष्य करी भक्षण। वा सेवी मद्यमांसालागुन। तो चांडाळ योनी जन्मतसे
।।१२८।।

जो विधवेचा संग करी। वा पराव्याची भोगी नारी। वा जो हरिहरनिंदा करी। तो चांडालयोनी पावतो
।।१२९।।

तुलसीपत्रावाचून। करी शालिग्राम पूजन। वा जो ब्राह्मणाचें हरी धन। तो चांडाळ योनी जन्मतो
।।१३०।।

फेफरें अर्धांग गंडमाळा। ऐशा होण्यास रोगाला। कारण पूर्वजन्मींचा दोष भला। म्हणुनी दोषा न आचरावें
।।१३१।।

ऐसें कर्माकर्मांचें व्याख्यान। करिते झाले दयाघन। प्रायश्चित्ताचें विधान। तेंहि सर्व सांगितलें
।।१३२।।

मग बोलले पतिताला। पूर्व दोषें जन्म झाला। चांडालाचे कुलाला। कृत दोषातें भोगावया
।।१३३।।

ऐक आतां मात्र संगमस्थानीं। स्नान करी प्रति दिनीं। म्हणजे तूं पुन्हा विप्रयोनीं। जन्मा येसी बापा रे
।।१३४।।

पतित बोले त्यावर। जोडून आपुले दोन्ही कर। कृपाकरून माझेवर। विप्र तुम्हीं केलें मशी
।।१३५।।

आतां ब्राह्मणाचे समाजांत। मिळवूनी टाका मजप्रत। पुन्हा न करणें मला पतित। हीच विनंति आहे मम
।।१३६।।

तुझ्या दर्शनें गेले दोष। ऐसा तो महिमा विशेष । हें ऐकून सद्गुरू त्यास । काय बोलले तें ऐका
।।१३७।।

अरे पूर्वी विश्वामित्र ऋषी। जन्मून क्षत्रिय वंशासी। आचरून खडतर तपासी। ब्रह्मवेत्ता जाहला
।।१३८।।

परी राजऋषीच राहिला। ब्रह्मऋषी नाहीं झाला। त्यानें मारिलें शतपुत्राला । वसिष्ठाच्या कोपानें
।।१३९।।

त्याचा वसिष्ठाप्रत। राग न आला किंचित । वसिष्ठ शांतिधाम साक्षात । ब्रह्मकुलीं जन्मला
।।१४०।।

वसिष्ठाच्या आज्ञेने। देह सूर्यकिरणानें। जैं विश्वामित्रानें। जाळून घेतला आपुला
।।१४१।।

नूतन देह केला धारण। तेव्हां ब्रह्मऋषी झाला जाण। सप्तऋषी माजी स्थान। मिळालें त्या विश्वामित्रा
।।१४२।।

म्हणून द्विज होण्याचा। हट्ट धरूं नको साचा। त्याग आपुल्या जातीचा। करणें हे बरें नोहे
।।१४३।।

परी तें न मानी पतित। मीं विप्रचि आहे साक्षात। इतुक्यांत आले धांवत। कन्या पुत्र स्त्री त्याची
।।१४४।।

स्त्री पाहून भ्रताराला। म्हणे चाल घराला। तो पतित म्हणे तियेला। मशीं स्पर्श करूं नको
।।१४५।।

मी आहे ब्राह्मण। तूं हीन जाती चांडाळिण। तुझा स्पर्श आम्हा लागुन । कदापीहि होऊं नये
।।१४६।।

ऐसें बोलून पळे दुरी। कांता झाली घाबरी। सद्गुरूची विनंती करी। भ्रतार माझा मज द्यावा
।।१४७।।

हा गेल्या सोडून। आमुचें कोण करी पोषण। तूं साक्षात् करुणाघन। कृपा करा हो लौकरी
।।१४८।।

कुलस्वामी नरसिंहसरस्वती । एका शिष्यास आज्ञापिती। पाणी आणून अंगावरती। घाल याच्या लवलाह्या
।।१४९।।

म्हणे विभूति जाईल धुऊन। ती जातां याचें ज्ञान। न उरेल, संगोपन। करील आपुल्या पुत्राचें
।।१५०।।

शिष्यानें पाणी घालता क्षणीं। गेली विभूति धुऊनी । ती जातां पाहतां नयनीं। भार्येस, आपुल्या आनंदला
।।१५१।।

कन्या पुत्रासी भेटून। दिलें कांतेसी आलिंगन । म्हणे मीं येथे कोठून। आलों हैं न कांही कळे
।।१५२।।

म्हणे त्रिविक्रम भारती। हे गुरुराया नरसिंहसरस्वती। अंगीची जातां विभूती। अज्ञान कैसें प्रगटलें
।।१५३।।

धन्य भस्माचें महिमान। चांडालास झालें ज्ञान। तो भस्ममहिमा मजलागुन। कथन करा जी स्वामिराया
।।१५४।।

स्वस्ति श्रीगुरुचरित्रसारामृत। सदा ऐकोत भाविक भक्त। हेंच इच्छी मनांत। सर्वकाल दासगणू
।।१५५।।

।। इति षष्ठोध्यायः ।। शुभंभवतु ।।

।। श्रीदत्तात्रेयार्पणमस्तु ।। श्रीहरिहरार्पणमस्तु ।।

卐 卐 卐 卐 卐

इति अध्याय समाप्तः