।। अध्याय सातवा ।।

।। श्रीगणेशाय नमः ।।

पूर्णब्रह्मा राघवा रामा। हे पांडुरंगा पुरुषोत्तमा। हे संतजनांच्या विश्रामधामा। पाव मजला श्रीपती
।।१।।

मी पातकांचा सागर । नाना दोष वरचेवर । घडती करें रमावर । त्याची क्षमा करी तूं
।।२।।

तुझ्यावांचून दोषासी । कोणी निवारी हृषीकेशी। मी अनन्यभावें शरण तुसी । माझा न करी अव्हेर
।।३।।

सिद्ध म्हणे नामधारकासी । त्रिविक्रमभारती सदुरूसी। पुसता झाला महिम्यासी। तेंच तुजला निवेदितों
।।४।।

पूर्वी कृतयुगांत। वामदेव नामें विख्यात । ब्रह्मवेत्ता झाला सत्य। जो महा तापसी
।।५।।

वामदेवाची थोरवी सारी। किती सांगू तुजला तरी। जटामुगुट ज्याचे शिरीं। विभूती सर्वांगास
।।६।।

दृष्टि नासाग्र सदोदित । प्रणवाचा जप चालत । स्वइच्छेनें हिंडत । पतितोद्धारा कारणें
।।७।।

असा वामदेव तापसी। आला क्रौंचारण्यासी। जेथें वसती अहर्निशी। असे ब्रह्मराक्षसांची
।।८।।

वामदेवातें पाहून। आला ब्रह्मराक्षस धावून। खदिरांगारापरि नयन। अती भयंकर दांतदाढा
।।९।।

ब्रह्मराक्षस म्हणे मनीं। यासी टाकावें खाऊनी। तेणे उदरींचा जठराग्नी। तृप्त माझा होईल
।।१०।।

वामदेवाच्या सान्निध्यास। आला ब्रह्मराक्षस। तैं कौतुक झाले विशेष । तें ऐक सांगतो
।।११।।

वामदेव राहिला निवांत । निजानंदा भोगित। ब्रह्मराक्षसें त्याप्रत। उचलण्या हात घातिला
।।१२।।

तनूचा स्पर्श होतां क्षणीं। गेला दुष्टभाव पालटोनी। ब्रह्मराक्षस लागला चरणीं। वामदेवाच्या तेधवां
।।१३।।

भस्म वामदेवांगीचे। राक्षसा लागले साचें। त्यायोगें दुष्टत्व त्याचें। गेलें असे मावळून
।।१४।।

ब्रह्मराक्षस चरणीं लागला म्हणे स्वामी तारा मला। तुम्हांवाचून वशिला। अन्य आतां नसे कीं
।।१५।।

तव देहाचा स्पर्श होतां। दुष्टभाव पालटला सर्वथा। आतां कृपा करावी सद्गुरूनाथा। या योनीस मी कंटाळलों
।।१६।।

पहा सत्पुरुषाचें महिमान। केवढें आहे अगाध जाण। नुसत्या देहस्पर्शेकरून। राक्षस ज्ञानी जाहला
।।१७।।

परिस लोहासी लागतां । तें कांचन होय तत्त्वतां । वा उदयाचलासी सूर्य येतां । रजनी तीच दिवस होई
।।१८।।

तैसेंचे येथे जाहलें। ब्रह्मराक्षसा ज्ञान झालें। वामदेव पुसू लागले। तूं कोण कोठील त्या
।।१९।।

ब्रह्मराक्षस जोडून कर। साकल्यें सांगे सत्वर। मी पंचविशीं जन्मीं नृपवर। होतों यवनदेशींचा
।।२०।।

तै मी अगणित पाप केलें। बऱ्याबुऱ्यासी न जाणिलें । तें सांगो जातां पहिलें। महाभारत होईल
।।२१।।

पराव्याच्या धरून नारी। म्या भोगिल्या नानापरी। ब्राह्मण क्षत्रिय वंजारी। तेली तांबोळी महारादिक
।।२२।।

त्या पायें करून। हीन योनींत जन्मलों जाण। व्याघ्र गेंडा गाढव श्वान। ऐशा किती सांगू तरी
।।२३।।

आपुल्या अंगाचा स्पर्श झाला। तेणे दुष्टभाव पालटला। भोगिल्या जन्माचें ज्ञान मला। आपुल्या कृपें झालें कीं
।।२४।।

आतां कृपा करूनी मजवरी। पुन्हा जन्म न येई ऐसें करी । ब्रह्मवेत्ते भूमीवरी। प्रती ईश्वर म्हणतात
।।२५।।

वामदेव म्हणे त्याप्रत । भस्ममहिमा जाणे उमानाथ। भस्ममहिम्याची सांगतों तुजप्रत। कथा की पाहिलेली
।।२६।।

द्रविड-द्वेषीं एक ब्राह्मण। शूद्र-स्त्रीसी रतला जाण। बहिष्कार घातला पूर्ण। द्विजवर्गानें तयाला
।।२७।।

तो परम दुराचारी। शूद्रवत् आचरण करी । एके रात्री व्यभिचार चोरी। गेला असे करावया
।।२८।।

तैं शूद्रं त्यासी बांधिलें। शिरकमल छेदिलें । श्वानवत् ओढून नेलें। प्रेत त्याचें तेधवां
।।२९।।

तैसेंच टाकिलें उघड्यावर । न झाला अग्निसंस्कार। तों अघटित प्रकार। ऐसा घडला परियेसी
।।३०।।

एक श्वान क्षुधाक्रांत। झालेला आला धांवत। भक्षण्या त्या प्रेताप्रत। अती आनंदें परियेसी
।।३१।।

तो श्वान त्याच्या आधीं। बैसला होता भस्मामधीं। ज्या, भस्मीं झाली शुद्धी। त्या प्रेताची सहजगती
।।३२।।

भस्म श्वानांगीचें। प्रेताप्रतीं लागले साचे। तेणे अवघे दोष तयाचे। गेले भस्म होऊन
।।३३।।

म्हणून त्या द्विजाकारण। यमकिंकरांपासून । न्यावया आले शिवगण। कैलास-भुवना कारणें
।।३४।।

शिवगणासी पाहतां । पळाले यमकिंकर सर्वथा। यमास झालेल्या वृत्तांता। जाऊन त्यानें कळविलें
।।३५।।

तेणें यमराज सत्वरगती। निघून शिवदूता पुसे निगुती। तुम्हीं माझ्या किंकराप्रती। कां हो अडविले मार्गांत
।।३६।।

हा ब्राह्मण दुराचारी। योग्य यासी यमपुरी। तैं शिवगण बोलले त्यावरी। यमा ऐसे न रागवावें
।।३७।।

भस्म श्वानांगींचें। याच्या प्रेता लागलें साचें। म्हणून आम्हा न्यावयाचें। कारण पडलें याप्रती
।।३८।।

जो असे भस्मांकित। तो योग्य बसाया कैलासांत। म्हणून भस्मांकिताप्रत । तुझ्या दूतें न आणावें
।।३९।।

रुद्राक्षमाळ कंठांत। त्रिपुंडू भाली चमकत। त्यासी न लावा तुम्हीं हात। ऐसें यम सांगे निजदूता
।।४०।।

वामदेवा म्हणे राक्षस। मी राजा असतां तळ्यास। बांधिलें दिलें वृत्तीस । एका विप्रवरासी
।।४१।।

येवढेंच घडलें पुण्य। त्यायोगें मजकारण। इहजन्मी तुझे चरण। प्राप्त झाले महाराजा
।।४२।।

आतां कृपा करून। भस्म लावण्याचें विधान। सांगा फोड करून। कोणत्या मंत्र लावणें तें
।।४३।।

मग बोलूं लागले वामदेव । ऐक कथा ही अभिनव । मंदराचल पर्वतीं आला शिव। क्रीडा कराया कारणें
।।४४।।

त्या मंदराचल पर्वती। बैसलासें उमापती। निजगणासहित निश्चिती। तो थाट न वर्णवे
।।४५।।

वीरभद्र नंदिकेश्वर। श्रृंगी भृंगी आणि इतर। गण शिवाचे सागराकार। किती म्हणून सांगावे
।।४६।।

त्यावेळीं शिवदर्शना। देव सकल आले जाणा। आपआपल्या बसून याना। दक्ष ब्रह्या पुरंदर
।।४७।।

दिवी न राहिले कोणी। आले मंदराचला लागुनी। पार्वतीसहित सिंहासनीं। शिव त्यांनी बंदिला
।।४८।।

पुसते झाले सनत्कुमार। पातकें घडतां दुर्धर। त्या दोषाचा परिहार। होईल कशानें शंकरा
।।४९।।

शंकर म्हणे त्यावरी। भस्मासमान नाही दुसरी। पातका करण्या बोहरी। वस्तु या जगामध्यें
।।५०।।

शुद्ध जें कां गोमय। भस्म त्याचें श्रेष्ठ होय। वा पुरातन यज्ञठाय। तेथील भस्म उक्त असें
।।५१।।

भस्म तळहाती घ्यावें। तें मंत्रे अभिमंत्रावें। वा सद्भाव धरून लावावें । इतरानें मंत्राविण
।।५२।।

प्रथम लावणें शिरीं। मग ललाटीं भुजावरी। तीन तीन रेषा निर्धारी। दंडी ललाटीं लावाव्या
।।५३।।

एक एक रेषेत नव देवता। विराजती तत्त्वता । पहिल्या रेषेची अधिदेवता। अकार आणि महादेव
।।५४।।

दुसऱ्या रेषेत उकार। दक्षिणाग्नि देवता थोर । तृतीय रेषेत मकार। तिची देवता येणें रिती
।।५५।।

शिव शक्ति देवता। वेद साम सर्वथा। ऋग्वेद पहिल्या रेषेकरितां । दुसरीसी यजुर्वेद
।।५६।।

ऐसें त्रिपुंडू लावावे। सर्वांगी सारखे बरवे । भस्मा विषयी असावें । सर्वांनी भावयुक्त
।।५७।।

ऐसें हे भस्मधारण। जो का करी भावें करून । कितीहि दोष दारुण । त्याचे असले तरी जाती
।।५८।।

जे भस्मातें निंदिती। त्यासी नोहे सद्गती। भस्मासमान त्रिजगतीं। पावनकर्ती वस्तू नसे
।।५९।।

ऐसें भस्माचे महिमान। देवास सांगे उमारमण । तेंच मी तुजलागून। कथन केलें राक्षसा
।।६०।।

मंत्रित करून भस्म दिलें । वामदेवें राक्षसा भले । तें त्यानें लाविलें । सद्भावेंसी निजांगा
।।६१।।

तात्काळ दिव्य देह पावला । विमानासी बैसला। वामदेवा वंदून गेला । कैलासलोकाकारणे
।।६२।।

त्रिमूर्तीचा अवतार। वामदेव साचार। त्याचें करीचें भस्म थोर। लागलें म्हणून घडलें हैं
।।६३।।

ऐसें त्रिविक्रम-भारतीसी। तया अमरजा संगमासी। सांगते झालें ज्ञानशशी। स्वामी नृसिंहसरस्वती
।।६४।।

नामधारका गाणगापुर। झालें पदनताचें माहेर। मुके आंधळे आणि बधिर। कुष्ठयोगी महारोगी
।।६५।।

ऐसे बहुत मिळाले। सर्वांचे आर्त पुरविलें । कृपा करूनिया भले । श्रीगुरूंनी जाण पां
।।६६।।

येविषयींची एक कथा। सांगतों मी ऐका आतां। गोपीनाथ नामें द्विज होता। माहुरक्षेत्राचा राहणार
।।६७।।

त्या गोपीनाथ-विप्राची। संतती न वाचे साची। म्हणून त्यानें दत्ताची। केली सेवा बहू साल
।।६८।।

दत्तकृपें करून। त्या गोपीनाथ-विप्रालागुन । सुंदर झालें पुत्ररत्न । नाम ठेविले दत्त त्याचें
।।६९।।

पुत्र थोर झाल्यावरी । मुंज त्याची केली खरी । पाहून सुंदर नोवरी । पुढें विवाह केला असे
।।७०।।

दोघे अती सुंदर । प्रीति एकमेकावर । जडली असे अपरंपार । तो प्रेमा न वर्णवे
।।७१।।

ऐन-तारुण्यामाझारी । गोपीनाथ-पुत्राचें शरीरीं । दुर्धर व्याधी झाली खरी । क्षीण झाला अत्यंत
।।७२।।

सेवेस कांता तत्पर । न विसंबे घटकाभर । क्षीण झाला उत्तरोत्तर । गोपीनाथपुत्र पहा
।।७३।।

मातापितर उभयतांचे। दुःख सागरीं बुडाले साचे। वृद्धापकाळीं पुत्राचे। प्रेम वाटे विशेषें
।।७४।।

नानाविध केले नवस। परी एकही न आला फळास। औषधी दिधल्या विशेष। परी न आला गुण कांहीं
।।७५।।

गोपीनाथस्नुषा सगुणी। बोलली श्वशुरालागुनीं। मर्मी जीं करिते विनवणी। ती आपण मान्य करा
।।७६।।

दक्षिणदेशीं गाणगापूर। भीमा-अमरजा संगमावर । क्षेत्र आहे मनोहर। जेथें वसती सद्गुरू
।।७७।।

मी पतीस घेऊन। जातें गाणगापुरालागुन । झाल्या स्वामींचे दर्शन । पति माझा वांचेल कीं
।।७८।।

तें श्वशुरासी मानवलें। आप्तइष्टांनी मान्य केलें। डोली लागीं आणविलें । त्या व्यथितासी न्यावया
।।७९।।

पतीस घालून डोलींत । करून सासूश्वशुरा दंडवत । होती झाली मार्गस्थ। गाणगापुरा जावया
।।८०।।

कांही दिसानीं ती बाला। आली अमरजा संगमाला। गाणगापुरीं येतांच गेला। प्राण पतीचा निघून
।।८१।।

श्रीगुरु होते संगमावरी। बाला आलीं गाणगापुरीं। येतांचि पति निर्धारी। पावलासे पंचत्वा
।।८२।।

दुःख करी अनावर। दोन्हीं करें बडवी शिर। शोकास जिच्या नाहीं पार। तो किती वर्णावा
।।८३।।

क्षण-क्षणा प्रेतासी। धरी आवळून हृदयासी। म्हणे मीं पापीण जन्मासी। आलें साच पतिराया
।।८४।।

तुमचे अंतरविले मातापितर। जन्मभूमी माहूरनगर। घेऊन आलें इथवर । बरे होईल म्हणूनी
।।८५।।

आतां ही मृत्युवार्ता। तुमच्या जननीजनकास कळतां। पुत्र शोकें तत्त्वतां । दोघे प्राण त्यजितील
।।८६।।

ऐशा तीन हत्या मजप्रत। घडतील या निश्चित। मी उगीच आलें घेऊन येथ। पतिराया तुम्हालागीं
।।८७।।

ऐसें होतां एक आला। जटाधारी तया स्थला। ज्याच्या कंठी रुद्राक्षमाला। भस्म विराजे तनूसी
।।८८।।

तो बोलला तियेस। उगी न करी शोकास। पाहून या मृत्तिकेस। वेड्यापरी रडूं नको
।।८९।।

जो कां बाळे जन्मास आला। कधीं ना कधी मरण त्याला। येणार हा न्याय ठरला। हा शोकाचा विषय नसे
।।९०।।

जैसी ज्याची कर्मगती। असेल तैसे भोगिती। तुझें कोठें सांग पति। आहेत मागच्या जन्मीचे
।।९१।।

जें पूर्वजन्मीं करावें। तें या जन्मी भोगावें। वृथा न कोणा दोष द्यावे। विचार आपुला करीं कीं
।।९२।।

आतां पतीचिया ठाई। तुझें प्रेम असल्या पाही। सहगमनाविण नाहीं। अन्य यासी उपाय
।।९३।।

ऐसें म्हणून स्त्रियांचे। धर्म अवघे कथिले साचे। तैसेच सहगमनाचे। विधी तेहि निरोपिले
।।९४।।

सहगमन जी जी नारी। निजपतीच्या सवें करी। तिला स्वर्गाभीतरी । वंदन करिती इंद्रादिक
।।९५।।

म्हणून शोक सोडून। त्वां करावें सहगमन। येणें लाभेल अतुल पुण्य। जन्ममरण निरसेल
।।९६।।

तें सतीनें मानिलें। सहगमनाचे विधी केले। विप्रवरासी बोलाविले। वायने दिधलीं बहुमोल
।।९७।।

सतीचा पाहुनी धीर। अवघे करिती जयजयकार । दर्शना आली संगमावर। स्वामी नृसिंहसरस्वतींच्या
।।९८।।

दुरून केलें साष्टांग नमन। मुखें केलें अपार स्तवन। आज्ञा सहगमनाकारण। मागू लागली स्वामीसी
।।९९।।

गाणगापुरच्या विप्रांनीं। साकल्यें कथिलें श्रीगुरुलागुनी। तै स्वामी बोलले गर्जुनी। इचें सौभाग्य स्थिर असे
।।१००।।

आणा इच्या पतीचें । प्रेत मजपुढें साचे । पाहूं प्राण तयाचे । कैसे नेले यमाने
।।१०१।।

ग्रामस्थांनी आणले प्रेत। तया संगमस्थानीं त्वरित । तो गर्जुन बोलले सद्गुरुनाथ। बंधनें सोडा प्रेताचीं
।।१०२।।

आपुले घेऊन चरणतीर्थ। गुरु सांगती विप्राप्रत । तें सिंचितां उठेल प्रेत। संशय चित्ती धरूं नका
।।१०३।।

तैसे केलें द्विजांनीं । प्रेत बैसले उठोनी । तें सतीनें पाहतां नयनीं। आनंद झाला विशेष
।।१०४।।

पति बोले तिजकारण। कोठें आलीस घेऊन । कां हे सभोवार जमले जन। हें कांहीं कळेना
।।१०५।।

सतीनें सर्व कथन केलें। अवघे जन आनंदले। उभयतांनी वंदिले। स्वामीचरण ते धवां
।।१०६।।

उभयतांनी केली स्तुती। हे स्वामिनृसिंहसरस्वती । तूं साक्षात दत्तमूर्ति। जें न घडे तें घडविणारा
।।१०७।।

स्वामी तुम्हावांचून । आम्हां पदनताकारण । वशीला तो नसे आन । हैं आतां समजलें
।।१०८।।

तूं जगाचा उत्पादिता। तूंच तयाचा संरक्षिता। तव चिंतेनें संसारयात्रा। अवघी सुखद होतसे
।।१०९।।

कल्पवृक्ष चिंतामणी। हेही हीन तुझ्याहुनी। तूं अपार सुख देऊनी। शेवटी नेशी निर्वाणा
।।११०।।

श्रीगुरु बोलले त्यावर । आतां शोक न करा तिळभर। तव पतीचें गंडांतर। म्यां बाळे निरसिलें
।।१११।।

जा आतां माहुरीं। सुखें यासवें संसार करी। अष्ट पुत्र तुझ्या उदरी। होतील शंका धरूं नको
।।११२।।

धन-कनक संपन्न । राहील सर्वदा तुझें सदन। हें माझें असत्य भाषण। न होय कल्पांतीं
।।११३।।

अवघ्या लोका आनंद झाला। जेथें सुखसूर्य उगवला। तेथें तमरूपदुःखाला। जागा कैसी राहील
।।११४।।

असो त्या मंडळीत एक। कुबुद्धि होता वादक। त्यानें प्रश्न ऐसा देख। केला सद्गुरू कारणें
।।११५।।

कोणा न चुके ब्रह्मलिखित। ऐसें असून हैं प्रेत। सजीव कैसे झालें येथ। हें सांगा मजप्रती
।।११६।।

श्रीगुरु बोलले त्यावर। तूं खराच आहेस चतुर। यांत न आश्चर्य तिळभर। झालें जाण येधवां
।।११७।।

याच्या पुढील जन्माचें। आयुष्य तीस वर्षे साचें। मी उसने विधात्याचे। पासून जाण आणिलें कीं
।।११८।।

म्हणून सजीव झाला। आश्चर्य कां रे वाटलें तुला । गाणगापुरी भक्ताला। मी न विन्मुख पाठवित
।।११९।।

ऐसें ऐकतां अमोघ वचन। आनंदले अवघे जन । संगमी पतीसह स्नान। केलें तया साध्वीनें
।।१२०।।

असो तें दांपत्य उभयतां । स्वामीचरणीं ठेवून माथा। विचारिते झाले कथा। संशय मनीचा जाण्यास्तव
।।१२१।।

साध्वी म्हणे जटाधारी। एक येऊनि बोध करीं। हे रुद्राक्ष घेऊनि करी । घाल प्रेताचे कानांत
।।१२२।।

आणि मग करी सहगमन। स्वामीचे दर्शन घेऊन । याचे काय कारण। सांगा मजला गुरुमूर्ते
।।१२३।।

स्वामी बोलले त्यावरी। मीच तो होतो जटाधारी। रुद्राक्षमहिमा ऐक पोरी। देवादिकां दुर्लभ जो
।।१२४।।

जो रुद्राक्ष करी धारण। त्याचे दोष होती दहन। न लागतां एक क्षण। ऐसा महिमा रुद्राक्षाचा
।।१२५।।

सहस्त्र रुद्राक्ष अंगावरी। जो मनुज धारण करी। तो साक्षात त्रिपुरारी। होतो रुद्राक्षधारणें
।।१२६।।

सहस्त्र रुद्राक्ष धारण। जयासी न होय जाण। त्यानें दोन्हीं बाहू लागून। षोडश षोडश बांधावे
।।१२७।।

कंठी बांधावे बत्तीस । मस्तका-भोंवते द्वात्रिंश। दोन्ही कर्णी द्वादश। आदरें धारण करावे
।।१२८।।

अष्टोत्तराची माला। परम आदरें घालणें गळा । त्यांत मोती पोवळे याला। मर्जी असल्या गोववावे
।।१२९।।

एकमुख पंचमुख। पूजनीं पूजावे सुरेख । रुद्रसुक्ते वा महिम्ने देख। त्यासी अभिषेक करावे
।।१३०।।

येविषयींची एक कथा। सांगतों मी ऐक आतां। भद्रसेन नामें होता। नृप काश्मीर देशींचा
।।१३१।।

सुधर्मा नामें पुत्र त्यासी। तारक पुत्र प्रधानासीं। दोघे कुमार ज्ञानशशी। जणो काय उदेले
।।१३२।।

ते थोरकुळीं जन्मोन। भोगावरी न बैसे मन। मोती पोवळे कांचन। टाकून रुद्राक्ष सेविती
।।१३३।।

सुधर्मा आणि तारकाचा। स्नेह अत्यंत जडला साचा। दोघांचीहि वदे वाचा। नमः शिवाय म्हणूनी
।।१३४।।

त्याच्या सदनी पराशर। आला एकदा साचार। भद्रसेन जोडून कर। पूजी तया आदरेंसी
।।१३५।।

आणि केला ऐसा प्रश्न । हे दोघे कुमार रात्रंदिन। शिवाचे करिती आराधन। व्यवहार-रीती आवडेना
।।१३६।।

याचें काय कारण। सांगा सविस्तर मजलागून । हा पूर्वजन्मींचा दोष पूर्ण। किंवा पुण्य असे हो
।।१३७।।

प्रश्न ऐसा ऐकिला। पराशर मनी धाला। नृपास म्हणे या कुमाराला । तूं न राया जाणिलें
।।१३८।।

हे कुक्कुट मर्कट दोघे जण। आले जन्म घेऊन । पूर्वजन्मी यांचे स्थान। होतें एक्या गणिके घरीं
।।१३९।।

ती महानंदा गणिका । सर्वमान्य होती देखा। तिनें अर्चिलें उमानायका। भाव भक्ति ठेवोनियां
।।१४०।।

ती शिवभक्ति-परायण। वर्तन पतिव्रतेचें समान। शास्त्राज्ञा उल्लंघून। जी न गेली बापा कदा
।।१४१।।

त्या गणिकेच्या नृत्यागारीं। शिवलिंगा समोरी। कुक्कुटमर्कटा बांधूनी दोरी। बांधिले होते स्तंभाला
।।१४२।।

महानंदेचा बघण्या भाव। कौतुक करी सदाशिव। व्यापाऱ्याचा अभिनव। वेष घेऊनी आला असे
।।१४३।।

त्या वैश्याचे सव्यकरीं। रत्नखचित लिंग निर्धारीं। तें पाहून अंतरी। संतोष पावली महानंदा
।।१४४।।

नृत्यमंडपी त्यास नेले। नृत्य कलेनें रिझविलें। आणि करींचे मागितलें। रत्नखचित लिंग पहा
।।१४५।।

मी तीन दिवसपर्यंत। तुमची सहधर्मचारिणी सत्य। होईन म्हणून वचन देत। महानंदा त्या वैश्यासी
।।१४६।।

वैश्य बोले प्रेमेंकरून। हें लिंग नोहे माझा प्राण। तें तूं करावें जतन । तीन दिवस रंभोरू
।।१४७।।

तिनें मानिलें। लिंग मंडपी ठेविलें । उभयतांनी शयन केलें । अंतर्गृहांत जाऊनी
।।१४८।।

नृत्यमंडपा लागला अग्नी। मंडप गेला जळोनी। लिंग होते तया स्थानीं। तेहि गेलें जळोन
।।१४९।।

कुक्कुट मर्कट भस्म झाले। कांहीच तेथें न राहिले। तें पाहून घातिले । वैश्याने अंग भूमीसी
।।१५०।।

वैश्याने त्या अग्नींत । उडी टाकिली सत्य। तें महानंदेनें पाहुनि खचित। सहगमन करण्या सिद्ध झाली
।।१५१।।

तैं म्हणती सकल जन । महानंदेलागून । तुम्हा गणिके लागून । सहगमन कशाचें
।।१५२।।

महानंदा बोले त्यावरी। मी तीन दिवस झाले त्याची नारी। म्हणून त्याच्या बरोबरी। सती जाणें भाग मला
।।१५३।।

ऐसें अवघ्यासी बोलून। संपदा टाकिली वाटून । श्रेष्ठ द्विजाकारण। सती जाया सिद्ध झाली
।।१५४।।

चित्तीं स्मरुनी शंकर। केला भास्करा नमस्कार। घेतली कुंडीं अखेर। उडी नमः शिवाय म्हणूनी
।।१५५।।

तों अपूर्व ऐसें वर्तले। शंकर तेथें प्रगटले। महानंदेसी झेलुन धरिलें। निजहृदयी हरानें
।।१५६।।

तिशी बोलला उमारमण। तुझी भक्ति पाहून । प्रसन्न झालों वरदान। माग अपेक्षित तुजला जें
।।१५७।।

महानंदा बोले हरा। कांही नको मज शंकरा। तुझ्या चरणकमळीं थारा। असो हाच द्यावा वर
।।१५८।।

तथास्तु बोले भगवान। महानंदा नेली उद्धरून। जो मर्कट मंडपी झाला दहन। तो आला कुशीं तुझ्या
।।१५९।।

कुक्कुट मंत्रीपुत्र झाला। तारक नाम पावला। म्हणून यांचा स्नेह जडला। विशेषपणें या जन्मी
।।१६०।।

पूर्वजन्मी रुद्राक्ष होते। त्यांच्या बांधिले गळ्याते। म्हणून दोघे या जन्माते। रुद्राक्षा न विसरती
।।१६१।।

त्या रुद्राक्षधारणे करून। या जन्मी झाले ज्ञानवान। ऐसें रुद्राक्षाचें महिमान। सांगे पराशर नृपासी
।।१६२।।

यावरचे अवघे वृत्त। पुढील अध्यायी होईल विदित। ऐसे नामधारकाप्रत। सांगता झाला सिद्धमुनी
।।१६३।।

तें सरस्वती गंगाधरें। गुरुचरित्रीं गोविलें खरें। दासगणू त्याच आधारें। सार तुम्हां सांगत
।।१६४।।

स्वस्ति श्रीगुरुचरित्र सारामृत। सदा ऐकोत गुरुभक्त । हेच विनवी जोडून हात। सर्वकाल दासगणू
।।१६५।।

।। इति सप्तमोध्यायः ।। शुभंभवतु ।।

।। श्रीदत्तात्रेयार्पणमस्तु ।। श्रीहरिहरार्पणमस्तु ।।

卐 卐 卐 卐 卐

इति अध्याय समाप्तः