।। श्रीगणेशाय नमः ।।
हे अद्वया पांडुरंगा। कृपामूर्ते भवभयभंगा। तुझे चरण ही ज्ञानगंगा। स्नाना योग्य असे कीं
।।१।।
त्या चरणतीर्थी जया स्नान। घडे तोचि धन्य धन्य । एका सद्गतीवांचून। तें घडणें अशक्य कीं
।।२।।
हें पांडुरंगा मशी कळतें। परी सद्भक्ति न तशी होते। अधिकाराविण मनातें। आस उपजे चरणाची
।।३।।
परी तूं परम उदार। माझे दोष न बघे तिळभर। मी पातकांचा सागर । परी तूं व्हावें अगस्ती
।।४।।
जेव्हां मनाचें कुत्सितपण। जाईल देवा झडून । तेव्हां तुझे चरणदर्शन। घडणें हा न्यायचि
।।५।।
आतां देवा ऐसें करा। दासगणूच्या ठेवा शिरा। वरद हस्त साजिरा। न पाहतां दोष माझें
।।६।।
परीस काय लोहाचे। गुणधर्म पाहातो साचे। मोठें अवधेंच मोठ्याचें। ऐसें आम्हीं ऐकिलें
।।७।।
तुझ्याहून मोठा कोणी। नाहीं देवा चक्रपाणी। दासगणू हा शरण चरणी। सुखीं करा सर्वस्वी
।।८।।
हेंच पदर पसरून। आहे तुशीं मागणें जाण । तें तूं उदार होऊन । देई मशी पांडुरंगा
।।९।।
असों सिद्ध म्हणे नामधारकासी। भद्रसेनगृहा पराशर ऋषी। येते झाले काश्मीरदेशीं। हें त्वां मागें ऐकिलें
।।१०।।
सुधर्मा आणि तारकाचे। वृत्त पूर्वजन्मीचें। कथन करुनिया साचें। रुद्राक्ष महिमा सांगितला
।।११।।
पराशर म्हणती रायास । हे सगुणांचे सागर खास। शिवभक्तीनें जन्मास । येते झाले राजगृही
।।१२।।
भद्रसेन म्हणे गुरुराया। कृपा करूनियों सदया। याचें पुढील ऐकावया। भाकित माझें मन इच्छी
।।१३।।
तें आपण सांगावे। मजला सुखी करावें। ब्रह्मवेत्यास अवघे ठावें। ऐसें आम्हा शास्त्र सांगे
।।१४।।
ऐसें ऐकता पराशर । देई राजासी उत्तर। भाकीत यांचे कथल्यावर । तुम्ही दुःखी व्हाल कीं
।।१५।।
हे पुत्र सगुणी जरी। अल्पायुषी आहेत परी। बहू काळ या भूमीवरी। नृपा न हे राहतील
।।१६।।
ऐसें ऐकता भद्रसेन। करिता झाला म्लान वदन। यासी उपाय असल्या कथन। करा मजसीं स्वामिया
।।१७।।
ऐसें ऐकता ऋषी म्हणती। उपाय प्रत्येक गोष्टीप्रती। कथन केलेत निश्चिती। शास्त्रकारांनी बापा रे
।।१८।।
आयुष्य या दोघांचे। वर्षे बारा आहे साचें। तें अवघे सरेल साचें। आणखी सात दिवसांनी
।।१९।।
ऐशा ऐकून भाकिताला। दुःखी राजवाडा बुडाला। नृप-स्त्रियांनी आकांत केला। लोळू लागल्या भूमीवरी
।।२०।।
भद्रसेन म्हणे ऋषीस। याचें वाढावें आयुष्य। ऐशा करून उपायास। सुखी करा मजलागी
।।२१।।
ऋषी म्हणती नृपवरा। यासी उपाय एक खरा। रुद्रानुष्ठानें पार्वतीवरा। मृत्युंजया भजावे
।।२२।।
तो रुद्राध्याय वेदांत । कथन केला आहे सत्य। त्याच्या पुढें न टिकत। कोणाचीहि प्रतिष्ठा
।।२३।।
विधाता जो चतुरानन। त्याच्या दक्षिणमुखापासून। यजुर्वेद झाला निर्माण। त्यांत हा अध्याय असे कीं
।।२४।।
तो रुद्राध्याय मरीच्यादिका। विधाता स्वयें बोधी देखा। या रुद्राध्यायासारिखा। आन कोणी तारक नसे
।।२५।।
एकदां यमाचे गण । रुद्राध्याय ऐकून । करिते झाले पलायन । यमलोकांकारणे
।।२६।।
यमालागी गण म्हणती। रुद्राध्यायाची थोर महती। त्यापुढे आमुची गती। सहज कुंठीत धर्मराजा
।।२७।।
ऐसें ऐकता यम गेला। ब्रह्मलोकालागी भला। नमन करून विधात्याला। बोलता झाला दक्षिणाधिपती
।।२८।।
ब्रह्मदेवा भूमीवरी। रुद्राध्याय माजला भारी। त्याच्या जपें बोहरी। होत अवघ्या पातका
।।२९।।
यामुळे यमलोक। माझा पडला ओस देख। मम गणासी निःशंक। रुद्राध्याय वर्ज्य असे
।।३०।।
विधाता बोले त्यावरी। यमधर्मा विचार करी। रुद्राध्यायाची सरी। ये न बापा कोणा रे
।।३१।।
जे सद्भावे करून। करिती रुद्राध्याय-पठण। ते साक्षात उमारमण। होतील या अनुष्ठानें
।।३२।।
जे दांभिक दुर्मती। भावरहित जप करिती। त्यासी नोहे फलप्राप्ती। या जपाची बापा रे
।।३३।।
त्यासीं तुम्हीं आणावे। कर्माप्रमाणे शासन द्यावे। सद्भक्तास सोडावे । हें मात्र विसरूं नको
।।३४।।
पूर्व जन्मींचा असल्या दोष। तो रुद्रानुष्ठानें जाय खास। अल्प असल्या आयुष्य। वाढेल या रूद्राने
।। ३५।।
म्हणून ब्राह्मण शत एक। आणावें त्वां शुचिर्भूत। शंभर मांडून कलश येथ। रुद्रानुष्ठान सुरू करा
।।३६।।
रायें तत्काळ तैसें केले । रुद्रघोषं शिवा भलें । प्रथम स्नान घातिलें । रुद्रपाठ करूनीं
।।३७।।
मग अभिषेकाचें वारी। ओती पुत्राचें अंगावरी। ऐशी क्रिया चालली खरी। सात दिवस पर्यंत
।।३८।।
उगवतां सातवा दिन। बालक पडले निश्चेष्ट जाण। तें पराशरें पाहून। मंत्रित जल सिंचलें
।।३९।।
त्यायोगे सजीव झाला। राजपुत्र उठून बसला। हीच गती पुत्राला । झाली असे प्रधानाच्या
।।४०।।
सजीव झाले किशोर। टळलें त्यांचे गंडांतर। वर्षे दहा हजार। आयु शिवकृपे प्राप्त झाले
।।४१।।
तो इतुक्यांत नारदऋषी। आला तया स्थानाशीं। बोलला भद्रसेनासी। राजा तूं धन्य खरा
।।४२।।
तुझ्या पुत्रा-कारण। न्यायासी आले यमगण। तों शिवगणें ताडिलें पूर्ण। त्या यमाच्या किंकरा
।।४३।।
यम वीरभद्राकडे गेला। समाचार त्या विचारिला। शिव-गणाचा काय केला। आम्ही ऐसा अपराध
।।४४।।
राजपुत्र अल्पायु म्हणून। आणाया गेले माझे गण। तों त्या शिवदूतांनी ताडून। परत की रे पाठविलें
।।४५।।
यमा वीरभद्र म्हणे । अरे या रुद्रानुष्ठानें । राजपुत्रा नाहीं मरणें । दशसहस्त्र वर्षे पहा
।।४६।।
चित्रगुप्ता पुसल्याविना । तूं कां आपल्या दूतांना । पाठविलेस तया स्थाना। राजपुत्र आणण्यास
।।४७।।
यम चित्रगुप्ता विचारी। तों हकिगत कळली सारी। रुद्रानुष्ठानें वाढली खरी। आयुष्याची मर्यादा
।।४८।।
ऐसें पाहून यम गेला। वंदून वीरभद्राला। तो मीं चमत्कार पाहिला। नारद म्हणे कैलासीं
।।४९।।
नारदवचनें करून। अवध्याचें आनंदले मन। अभिषेकाचे ब्राह्मण। नृपवरें सुखी केलें
।।५०।।
गंडांतरांची भीति । रुद्रानुष्ठाने सर्व जाती। अल्पायुषी होती। दीर्घायू या अनुष्ठानें
।।५१।।
पराशरकृपें करून । सुखी झाला भद्रसेन । गंडांतर गेलें चुकोन । सुधर्म-तारकांचें
।।५२।।
ऐसा रुद्राध्याय महिमा। भिणें नको मुळीं यमा। म्हणूनि साधकें पूर्ण-प्रेमा। ठेवणे रुद्राध्यायावरी
।।५३।।
भद्रसेनें सत्कार। अवघ्यांचा करून थोर । बोळविला ऋषि पाराशर। स्वस्थाना कारणें
।।५४।।
सुधर्म तारक शतायु झाले। अपार सुख भोगिले। ऐसे स्वामी बोलले। गाणगापुरी दंपतीसी
।।५५।।
असो पुढे विनंती करी। श्रीगुरुची ती विप्रनारी। स्वामीया मज कांहीतरी । मंत्र तुम्ही सांगावा
।।५६।।
ज्या मंत्रे करून। होईन मी पावन। ऐसें सद्भावे म्हणून । लोळू लागली पायावरी
।।५७।।
स्वामी-नृसिंह सरस्वती। जे केवळ दत्तमूर्ती । ते बोलले येणे रीति । तया विप्रस्त्रियेला
।।५८।।
बाळे स्त्रियांकारण । एक पतिसेवेवांचून । मंत्र नाही दुजा आन । हें ध्यानी असूं दे
।।५९।।
स्त्रियालागीं उपदेशितां। मंत्रचि होतो जाण वृथा। ये विषयीची ऐक कथा। एक तुला सांगतो
।।६०।।
पूर्वी शुक्राचार्य म्हणून। होता राक्षसांचा गुरु जाण। त्यानीं करून अनुष्ठान। संजीवनी सिद्ध केली
।।६१।।
ज्या संजीवनीचा। प्रभाव लोकोत्तर साचा। संभार तो राक्षसांचा। मृत होतां सजीव करी
।।६२।।
म्हणून दिवि देवांना । यश कदापि येईना त्यांनी आपले उमारमणा। दैन्य कथिले जाउनी
।।६३।।
तेणे कोपला महेश। आज्ञा करी नंदीस। जा आण शुक्राचार्यास। मजपुढें येधवां
।।६४।।
शिवाज्ञेनें नंदी गेला। तोंडी धरिलें शुक्राला। नेऊन कैलास भुवनाला। उभा केला शिवापुढे
।।६५।।
शिवें शुक्रास उचलून। मुखी आपुल्या घातला जाण। दिला असे ठेवून । निजोदरी सदाशिवें
।।६६।।
तो मूत्रमार्गे बाहेर पडला । भार्गव नाम पावला । त्या असुरगुरु शुक्राला । कन्या होती देवयानी
।।६७।।
इकडे शिवोदरांतून । सुटला हे पाहून । पुरंदर गेला घाबरून । या शुक्राच्या मुक्ततेनें
।।६८।।
देवगुरु बृहस्पती। ज्यालागी येत नव्हती। संजीवनी विद्या ती। म्हणून देव रागावले
।।६९।।
गुरु व्हावयालागून। योग्य शुक्राचार्य धन्य। तूं न त्याच्या समान। म्हणूनि येत अपेश आम्हां
।।७०।।
गुरुपद न हा पोरखेळ। अंगी पाहिजे अतुल बल। तेणे चित्ती खळबळ उडाली बृहस्पतीच्या
।।७१।।
बृहस्पती म्हणे इंद्राला। शुक्र संजीवनीला । निर्बली करणें आपणाला । आहेच कीं अवश्य
।।७२।।
कचनामें माझा पुत्र। आहे परम पवित्र। तो संजीवनी शिकण्या प्रीत्यर्थ । धाडितों मी शुक्राकडे
।।७३।।
षट्कर्णी मंत्र होता। सामर्थ्य जाईल तत्वतां । तुम्ही न करा कांही चिंता। ते मीं सर्व साधितों
।।७४।।
ऐसें बोलून कचाला। शुक्रसदनासी पाठविला। तो समित्पाणि होऊन भला। शरण गेला शुक्रास
।।७५।।
कच परम सुंदर। दुसरा मदन साचार। देवयानीचें त्यावर । प्रेम जडलें सहजचि
।।७६।।
समित्पाणि होऊन आला। म्हणून शुक्रे ठेवून घेतला । शिष्यानें गुरुगृहाला। सेवा करणें धर्म त्याचा
।।७७।।
कच नव्हता कुचर। कामावेळी न तिळभर। सबब सांगे साचार। ऐसा तन्निष्ठ असे कीं
।।७८।।
समिधा दर्भ आणावया। कच गेला कानना ठाया। तें राक्षसांनीं पाहोनियां । काननीं वधिलें कचासी
।।७९।।
अस्तमानापर्यंत भली। कचाची वाट पाहिली। मग देवयानी बोलली। निज पित्याकारणे
।।८०।।
अहो तात तुमचा शिष्य। कां न आला गृहास। वाटतें माझ्या मनास। विपरीत कांही जाहलें
।।८१।।
शुक्रे समाधी लाविली। तों तया कळून आली। गोष्ट जी कां असे केली। राक्षसांनी काननांत
।।८२।।
जप करून संजीवनीचा । कच केला सजीव साचा। पुन्हा राक्षसांनी तयाचा। वध केला आवर्जुन
।।८३।।
ऐसें बहुत वेळां जाहलें। शुक्रे कचा सजीव केलें। राक्षस अवघे कंटाळले। अखेर केलें यापरी
।।८४।।
एकादशीचें दिवशीं। कच मारून काननासी। चिता रचून तयासी। दहन केलें वैरभावें
।।८५।।
त्याची रक्षा पेयांत। पाजिली शुक्राचार्याप्रत । कच-विरहें दुःखित । झाली कन्या देवयानी
।।८६।।
देवयानीनें बापाची। कच उठविण्या केली साची । विनंती ती नम्रतेची । तवीं शुक्र बोलले
।।८७।।
बाळे माझ्या शिष्यांनी। म्हणजे या राक्षसांनी। कच टाकिला जाळुनी। आणि पाजिली राख मला
।।८८।।
आतां कचातें उठवितां । मृत्यु मज ये तत्त्वतां। ऐसें ऐकून बोलली दुहिता। आचार्यास येणेंपरी
।।८९।।
तुम्हांस येते संजीवनी। तुम्ही कचाते उठवोनी। शिष्या विषयीचें प्रेम जनीं। करा प्रकट तातराया
।।९०।।
तोच मंत्र संजीवनी। मज ठेवा शिकवूनी । म्हणजे मी तुम्हा लागूनी। मृत्यू येता उठवीन
।।९१।।
शुक्र मुलीच्या भिडेस पडला । कन्येस मंत्र सांगितला। तोच कचाने ऐकिला। राहोनियां उदरात
।।९२।।
येणें रीतीं षटकर्णी। मंत्र शुक्राचा झाला जाणी। शुक्रे जपून संजीवनी। कचालागीं उठविले
।।९३।।
तयीं शुक्रासीं मृत्यू येता। ती त्या उठविती झाली दुहिता। कच घाली दंडवता। गुरु शुक्राचार्यासी
।।९४।।
आपण कन्येलागी भली। संजीवनी बोधिली। ती गुरुराया मी ऐकिली। राहून आपुल्या उदरांत
।।९५।।
तेणें माझे काम झालें। संजीवनीं हे रत्न लाभलें। आतां कृपा करून गुरुमाउलें। आज्ञा द्यावी जावया
।।९६।।
शुक्र बोलला तस्थास्तु। तो देवयानीने आपुला हेतू। प्रगट करूनि धरिला हातू। म्हणे भार्या करी मला
।।९७।।
कच बोले त्यावर। मी झालो तुझा सहोदर। तूं भगिनी माझी साचार। झालीस की सुशीलें
।।९८।।
बहीण मुलगी नात पुतणी। हें लग्न होण्या न योग्य कोणी। शास्त्रवचन मानोनि। चालणें आहे आपल्याला
।।९९।।
ऐसें बोलोन नमस्कार। केला गुरुसी अखेर। निजसदनी जाण्या साचार। कच सिद्ध जाहला
।।१००।।
देवयानीनें कचाला। ऐशा शाप दिधला। जरी न वरिसी कचा मला। तरी व्यर्थ होईल विद्या ती
।।१०१।।
हें कचानें ऐकिलें। उलट देवयानीस शापिलें। ब्रह्मकुला विरहित भलें। लग्न तुझें लागेल
।।१०२।।
तेंच पुढें झालें सत्य। ययातीनें वरिलें तिजप्रत। शुक्राचार्य झाला बलहत। गेलें सत्व संजीवनीचें
।।१०३।।
स्त्रियांस मंत्र दिधला। म्हणून तो निष्फळ झाला। उगीच भलत्या हट्टाला । ज्ञानी पुरुषं मानू नये
।।१०४।।
देवयानीस संजीवनी। शिकविली शुक्रे म्हणूनी। ती निष्फळ गेली होउनी। शिवाय षटकर्णी झाली असे
।।१०५।।
म्हणून सावित्री स्त्रियांप्रत। मंत्र सांगणे ना उचित। पहा शुक्राचा झाला घात। कन्येस मंत्र बोधिल्यानें
।।१०६।।
स्त्रियांलागी पतीवीण। मुळींच नाही दैवत आन। पतिपदांचे चिंतन। करणें हाच धर्म तिचा
।।१०७।।
ऐसें प्रत्यक्ष श्रीगुरु। करते झाले विस्तारू । हल्लींचे जे पोटभरू। ते विरुद्ध करणी करितात
।।१०८।।
दत्तावतार आपणा म्हणविती। लोकांच्या स्त्रिया मागती। आणि तेहि ज्ञानांध अर्पण करिती। केवढा हा अनाचार
।।१०९।।
आपुल्या झोपड्यांचे भोवतीं। शिष्यगणांना फिरविती। आणि मुखें म्हणा म्हणती। धन्य हो प्रदक्षिणा
।।११०।।
वाडी गाणगापूरचे विधी करावे। आपण बळेंच दत्त व्हावें। पैसे उकळण्यासी स्थापावे। दत्तपादुका कोठेंतरी
।।१११।।
स्वतःचें पाहात वर्तन। सत्वगुणी नरालागुन । येईल कीं अती घाण। नरकाहून आगळी
।।११२।।
मोटारींत बसून फिरती। योगयोगेश्वर म्हणविती। आपुली दावण्या विरक्ति। पोर्ते लाविती उगीच वर
।।११३।।
श्रोते ऐशा भोंदूंचे। प्रस्थ जगीं माजता साचें। कोठून गुरुचरित्राचे। यावें सांगा प्रत्यंतर
।।११४।।
या भोंदूंचा व्यापार। अवघा कर्मबाह्य साचार। भक्तीचा पाहतां प्रकार। तो मृगजलापरी असे
।।११५।।
मींच ब्रह्म हैं त्यांचें ज्ञान। शिष्य तुकविती मान। शिष्यिणी तन्मय होऊन। नाचू लागती पथांतरी
।।११६।।
कोणी दत्तावतार म्हणविती। इस्तरीचे कपडे लेती। शर्यती सिनेमा पाहाती। खेळ तैसे नाटकांचे
।।११७।।
पोषाख ते अन्य अन्य। दिवसांतून करिती तीन। हें कां वैराग्याचे लक्षण। हाय हाय रे दुर्देवा
।।११८।।
कां विचारितां। हा आमचा राजयोग सर्वथा। ऐसें सांगती आपुल्या भक्ता। लोक तेहि मानती
।।११९।।
प्रथमतः पाहिजे आचार। सद्भक्ति ती नंतर । सगुण साक्षात्कार झाल्यावर। ज्ञानास होतो अधिकारी
।।१२०।।
ते अवधेंच मावळलें। धूर्त संत भोंदू झाले। म्हणून कुटाळां फावले। कुटाळ्या त्या करण्यास्तव
।।१२१।।
असो या भाकड कथेसी। नाहीं प्रयोजन आपणासी। सोन्याचें वर्णन करण्यासी। पितळ लागते सामन्याला
।।१२२।।
स्वामीनृसिंहसरस्वती। वैराग्यसागर निश्चिती। केवढी त्यांची अगाधशक्ति। सजीव केलें प्रेताला
।।१२३।।
फिरावया कारण। वाहनें न ज्या लागली जाण । छाटी लंगोटी वांचून। नव्हतें कांहीं संग्रहा
।।१२४।।
ऐसे वैराग्यभरित गुरु। तेंच भवार्णवीचें तारूं । उपाधियुक्त पोटभरू । हें न निश्चयें समजावें
।।१२५।।
असो यापुढील कथा। पुढील अध्यायी तत्त्वता। सांगेन मी भाविकभक्ता। अवधान द्यावे त्याकडे
।।१२६।।
स्वस्तिश्रीगुरुचरित्रसारामृत। सदा ऐकोत भाविक भक्त। हेंच विनवी जोडोनी हात। सदा सर्वदा दासगणू
।।१२७।।
।। इति अष्टमोध्यायः ।। शुभंभवतु ।।
।। श्रीदत्तात्रेयार्पणमस्तु ।। श्रीहरिहरार्पणमस्तु ।।
卐 卐 卐 卐 卐
इति अध्याय समाप्तः