।। अध्याय नववा ।।

।। श्रीगणेशाय नमः ।।

हे चंद्रभागातटविहारा। मायबापा रुक्मिणीवरा। ओंकार स्वरूपा उदारा। प्रसीद प्रसीद विठ्ठले
।।१।।

सिद्ध म्हणे नामधारकासी। दांपत्य बसलें श्रीगुरुपाशीं। तया गाणगापुर-ग्रामासी। भीमा-अमरजा संगमाला
।।२।।

तें सावित्री जोडून कर। श्रीगुरुस विनवी वरच्यावर । कृपाकरून आम्हांवर। कांहीं तरी व्रत सांगा
।।३।।

ज्या व्रताच्या आचरणें। परमार्थी रत होतील मनें। तैसी उभयतांची अन्तःकरणें। स्थिरावतील तुमच्या पदी
।।४।।

स्वामी बोलले त्यावर। सर्व व्रतांत व्रत थोर । एक आहे सोमवार। आचरण्या अधिकार सर्वांशी
।।५।।

कथा ते विषयींची। सांगतों मी एक साची। सीमंतिनी नावाची। असे एक नृपकन्या
।।६।।

चित्रवर्मा नामें नृपवर । होऊन गेला साचार । शुचिवर्तनी उदार । सर्व वैभवें संपन्न तो
।।७।।

त्याची कन्या सीमंतिनी। सुहास्यवदना सौंदर्यखनी। दुजी दमयंती वा हिमनंदिनी। अवतरली वाटे भूमीस
।।८।।

कन्येचें जातक वर्तावया । द्विज आणविले तया ठाया। ग्रहमाना पाहुनिया। भाकित सांगू लागले
।।९।।

राया ही तव कन्यका। भोगील कीं सर्व सुखा। भाग्यवान तुजसारिखा। आम्ही न कोणी पाहिला रे
।।१०।।

परी एक होता द्विज त्यांत। तो उठून बोलला सभेत । चौदावें वर्षी इजप्रत। वैधव्य येईल म्हणूनी
।।११।।

तें ऐकतां जनक जननी। गेली दुःखित होऊनी। आकांत वर्तला तया स्थानीं। किती सांगू बाळे तुला
।।१२।।

सुज्ञ म्हणती राजा ऐक। ऐसा न करावा शोक । वैधव्यपणाचा कलंक। येईल उपायें घालवितां
।।१३।।

ऐसा राजास देउनी धीर। निघून गेले द्विजवर। सिमंतिनी झाली थोर। खेळू लागली मैत्रिणीसवें
।।१४।।

सप्त वर्षे झाली। तिला ही गोष्ट समजली। कीं वैधव्य आहे आपुल्या भालीं। चौदावे वर्षी न टळें तें
।।१५।।

म्हणून कन्या चिंताक्रांत । कोठे न मन लागत। तिनें आपुल्या सदनाप्रत। मैत्रेयीसी बोलाविले
।।१६।।

याज्ञवल्क्यकांता मैत्रायणी। व्रत सांगे तिजलागुनी। म्हणे बाळे न भ्यावे मनीं। व्रत करावें सोमवार
।।१७।।

या व्रताचें ऐसें फळ । सौभाग्य ते स्थिरावेल। प्रत्यक्ष भेटी होईल। गौरीहराची तुजलागी
।।१८।।

प्रत्येक येतां सोमवार। पूजावा पार्वती-परमेश्वर। जो जगाचा जगदुद्धार। नीलकंठ पशुपती
।।१९।।

प्रभातीं करावें स्नान। स्थिरसें घालुनी आसन । भावचित्ती ठेवून । उपोषण करावें
।।२०।।

दिव्यांबरा नेसावे । शंकरासी स्थापावें । बेलफुलांस आणावें । शंकरासी वाहावया
।।२१।।

अभिषेक धूप दीप दक्षिणा। देऊनी करावी प्रदक्षिणा । उत्तम पक्वान्नें भोजना। घाली द्विजाकारणें
।।२२।।

ऐसें सांगून मैत्रायणी । गेली असे निघूनी । व्रत आचरे सीमंतिनी । न पाडितां खंड पहा
।।२३।।

असो लग्ना योग्य झाली बाला। नृपें वर शोधिला। नलराजाच्या कुलांतला। इंद्रसेननंदन पहा
।।२४।।

चित्रांगद ज्याचें नांव। जो मदन दुसरा अभिनव । लग्न सोहळा अपूर्व। केला नृपानें निजशक्ती
।।२५।।

वऱ्हाड अवघे परत गेलें। स्वस्थानाकारणें भलें। जामाता ठेवून घेतले। चित्रवर्यांनें निजगृहीं
।।२६।।

एके दिनी यमुनेत। क्रीडा करावया जामात। गेला सैनिकां-सहित। तैसेच आणखी मित्र त्याचे
।।२७।।

नौका नदीत लोटली । ती डोहांत बुडाली । कालिंदीच काळ झाली । तया चित्रांगदाते
।।२८।।

ही अशुभ कळतां मात। आली सीमंतिनी धांवत। आपुल्या जनकजननीसहित। कालिंदीच्या तटाका
।।२९।।

यमुना अवधी शोधली। परि न नौका सांपडली। अवघी मंडळी बुडाली। दुःख सागरी परियेसा
।।३०।।

पुत्राची कळतां मात। इंद्रसेन आला धावत। सुनेस पाहून करित। दुःख आपुल्या मानसीं
।।३१।।

सीमंतिनी म्हणे हे हरा। भाललोचना कर्पूरगौरा। कां रे वैधव्यसागरा। मज बुडविलें दयानिधे
।।३२।।

तुझें सोमवारव्रत केलें। त्याचेंच काय हें फळ आलें। दयाळूपण कोठें गेले। तुझें देवा मजविषयी
।।३३।।

मैत्रायणीचे वचनावर। विश्वास ठेवूनियां फार। व्रत आचरिले सोमवार। परी तें झालें व्यर्थ कीं
।।३४।।

आतां नको हे जीवित। मी प्राण देते यमुनेत। तैं चित्रवर्मा नृपनाथ। धरिता झाला करा तिच्या
।।३५।।

बाळे जीव देशील। तरी ती आत्महत्या होईल । तुलाहि पाप लागेल। याचा विचार करावा
।।३६।।

पतिप्रेत सांपडल्या विना। सहगमन घडेना। एक वर्ष आपुल्या सदना। स्वस्थ कीं बसावें
।।३७।।

ते सीमंतिनीसी मानवलें। लोक सारे निघून गेले। सीमंतिनीने न सोडले। व्रत आपुले सोमवार
।।३८।।

पुत्रविरहें इंद्रसेन। परम दुःखी झाला जाण। दायादांनीं हिरावून। राज्य घेतलें तयाचें
।।३९।।

इन्द्रसेन पत्नीसहित । ठेविला कारागृहांत। आतां इकडे तक्षकलोकांत। काय झालें ते ऐका
।।४०।।

राजपुत्र चित्रांगदासी। नागकन्यांनीं अति हर्षी। नेलें तक्षकलोकांसी। पाताळातें अवधारा
।।४१।।

तें तक्षकाचें पाताळनगर। सकळ वैभवें संपन्न थोर। अमृताचे निर्झर । जेथें वाहती चहूंकडे
।।४२।।

एकफणी पंचफणी। शतफणी सहस्रफणी। ऐसे वासुकी-सभास्थानीं। विराजमान जाहले
।।४३।।

सिंहासनीं तक्षक । सर्पराज असे देख । त्यापुढें हा सुरेख । चित्रांगद उभा ठेला
।।४४।।

तक्षका नागकन्या म्हणती। हा सुस्वरूप आहे अती। म्हणून आम्ही भूपती। येथें त्यासी आणिलें
।।४५।।

चित्रांगदा तक्षक पुसे। कोठें तुमचे राहणें असे। ये स्थानीं कोणत्या मिषें। आलां तें कथन करा
।।४६।।

चित्रांगदें वर्तमान। अवघे तक्षका कथिलें जाण। मी यमुनेंत गेलों बुडून। तो नागकन्येनें धरिलें मला
।।४७।।

माझा जन्म नळवंशीं। इंद्रसेनाचे कुशीं। राहिलों सासुरवाडीशी। कांहीं दिवस तक्षका
।।४८।।

चित्रांगद नाम माझें। सीमंतिनी कुटुंब साजे। नदींत बुडाल्यामुळे तुझें। चरण हे म्यां पाहिले कीं
।।४९।।

आमुच्या कुळींचे दैवत। मदनदहन उमानाथ। त्याविण इतराप्रत । आम्हीं न जाणतों तक्षका
।।५०।।

तो अवघ्या देवांचा देव। म्हणूनी नांव महादेव। ज्यावीण नाहीं रिता ठाव। कोठेंही या जगत्रयीं
।।५१।।

ज्याचे रजांशें ब्रह्मा झाला। सत्वांशें निर्मिले विष्णूला। तमांशें रुद्रगणाला। ज्यानीं तक्षका निर्मिले
।।५२।।

जो दयेचा सागरू। पदनताचा कल्पतरू । तो भगवान शंकरू। आराध्य दैवत माझें पैं
।।५३।।

ऐसें ऐकतां तक्षक। चित्ती संतोषला देख। म्हणे वत्सा न मानीं दुःख। स्वस्थ रहा ये स्थानीं
।।५४।।

चित्रांगद बोले यावरी। येथें दुःख नाहीं जरीं। बुद्धी न माझी घेते खरी। येथे स्थिर होण्यास
।।५५।।

म्हणून कृपाकरून मला। पाठवावें भूमितला। माझी सीमंतिनी वेल्हाळा । दुःख करीत असेल कीं
।।५६।।

शोकाकुल जनक जननी। झाली असतील तक्षका जाणी। म्हणून मजला परतूनी। तुम्ही पाठवा यमुनातटा
।।५७।।

फार बरें म्हणून। पारितोषिकें देऊन । संगें देऊन सैनिकगण। चित्रांगद धाडिला यमुनातटा
।।५८।।

सोमवार होता त्या दिवशीं। सीमंतिनी आली स्नानाशी। स्नान होतां जलासी। ऐसें तिनें पाहिलें
।।५९।।

बैसूनिया वारूवर। संगें सैनिक अपार। ऐसा कोणी एक जलावर। सुंदर पुरुष येतसे
।।६०।।

निरखून पाहू लागली। तों पतीची स्मृती झाली। म्हणे ऐसाच भाग्यशाली। पती बुडाला येथे मम
।।६१।।

तोच वाटे परतून। आला भेटण्या मज कारण। परी वर्षे झालीं तीन । आतां पती कशाचा
।।६२।।

काहींतरी भ्रम झाला। मजकारणें येधवा भला। किंवा हा वेष धरून आला। यक्ष राक्षस कोणी तरी
।।६३।।

चित्रांगदा सख्या पुसती । तुम्ही कोण कोठील निश्चिती। हे सांगा आम्हाप्रती। न करा अनमान यत्किंचित
।।६४।।

चित्रांगद बोले त्यावर। मी मृत्युलोकींचा आहे नर। बुडालों जलीं साचार। तीन वर्षामागे मी
।।६५।।

माझी कांता सीमंतिनी। चित्रवर्त्यांची नंदिनी। माझा इन्द्रसेनापासुनी। नलवंशी जन्म झाला
।।६६।।

ऐसें वचन ऐकतां। सीमंतिनीचिया चित्ता। ओळख पटूं लागली तत्त्वता। म्हणे हाच असावा पती मम
।।६७।।

मी सोमवारचें केलें व्रत। मग त्या अशुभ कोठुनी प्राप्त। काय आम्रवृक्षाप्रत। कवठें येती जगामध्यें
।।६८।।

चित्रांगदें आपुली भार्या। ओळखलीसे तया ठाया। परी मौन धरूनिया। राहता झाला बळेंच
।।६९।।

वरपंगी बोले सख्यांस । म्यां सीमंतिनीच्या पतीस । पाहिलें नागलोकास। हें तुम्ही सत्य माना
।।७०।।

सोमवारव्रतप्रभावें। पतीस जीवविलें सदाशिवें। हैं न असत्य मानावें। माझें वचन तुम्ही कदा
।।७१।।

ऐसें त्यासी बोलून । गेला चित्रांगद निघून । निजनगरीकारण । तक्षकपुत्रा बरोबरी
।।७२।।

त्यासी पुढें पाठविला। दायादा समाचार कळविला। कीं चित्रांगद स्वयें आला। पाताळाहून येथे पुन्हा
।।७३।।

त्या चित्रांगदबलापुढें। तुमचें बल थोकडें। गरुडासन्मुख कोंबडे । हीनताच पावणार
।।७४।।

म्हणोनी इंद्रसेनासी। तुम्ही पुनरपि बैसवावा राज्यासी। नातरी तक्षक तुम्हासी। जबर शिक्षा करील
।।७५।।

त्यानें चित्रांगदा कृपा केली। बनविला नवनागसहस्रबळी। तो तुमची क्षणांत होळी। करील हैं ध्यानीं धरा
।।७६।।

तें ते दायाद भ्याले। इंद्रसेना शरण गेले। त्यासी परत बैसविलें । सिंहासनीं समारंभें
।।७७।।

पितापुत्र भेटी झाली । शंका न कांही राहिली । पाताळलोकीची दाविली । वस्त्राभरणें चित्रांगदें
।।७८।।

नगर झालें आनंदित । तो समाचार केला श्रुत । मुद्दाम पाठवून दूत । चित्रवर्मारायाते
।।७९।।

मग काय विचारितां। चित्रवर्मा झाला नाचता। पाचारून आपुली दुहिता। सर्व काही सांगितलें
।।८०।।

बाळें तव व्रतें करून । आला नागलोकाहून । चित्रांगद परतून । आतां दुःख करूं नको
।।८१।।

धन्य व्रत सोमवार। धन्य परमात्मा शंकर। धन्य तूं सीमंतिनी थोर। उद्धरिलें उभयकुळा
।।८२।।

इन्द्रसेन समारंभेसी। आला चित्रवर्त्याचे नगरासी। पुन्हा सोहळा अतिहर्षी। आरंभिला ते ठाया
।।८३।।

सर्व सौभाग्य अलंकार। ल्याली सीमंतिनी सत्वर। लोक करिती जयजयकार । पतिपत्नी भेट होतां
।।८४।।

ऐसें सोमवारव्रत अभिनव । दंपतीसी सांगती गुरुदेव । तुम्ही यावरी ठेवूनी भाव। व्रत नियमें चालवा कीं
।।८५।।

प्रत्यहीं सोमवारीं। प्रदोषसमयीं पारणें करी। पूजा विधानें सारीं। कथन केलीं आहेत तुम्हा
।।८६।।

तें दंपतीनें मानिलें। स्वामीलागीं वंदिले। निजनगरा निघून गेले। माहूरगडा परियेसा
।।८७।।

गुरुकृपे करून भले। पांच पुत्र तिसी झाले। दंपतीनें चालविले। गुरु आज्ञेनें व्रत पहा
।।८८।।

समाराधना करण्यासी। येत होते प्रतिवर्षी। दंपत्य सहपरिवारेसी । गाणगापुराकारणें
।।८९।।

सिद्ध म्हणे नामधारका। ऐसी सोमवारकथा देखा। जो हे व्रत करी तया दुःखा। दे न कधीं शंकर
।।९०।।

व्रत सोमवार ज्याचे घरी। तेथें अष्टसिद्धी दासीपरी। राबतील अखेरी। जाय तो कीं कैलासा
।।९१।।

श्रोते हल्लींच्या काळांत। कोणासी न पटे व्रत । कर्ममार्गाची होत। वृथा टवाळी चोहींकडे
।।९२।।

मनीं असल्या कामना। केलें पाहिजे व्रताचरणा। उगीच ऐकून ब्रह्मज्ञाना। कामना न पुरे कधीं
।।९३।।

प्रत्येक नरासी कांही तरी। इच्छा असते अंतरीं। ती पूर्ण व्हाया खरी। व्रतें कथिली शास्त्रकारें
।।९४।।

कर्माचरण ऐसें करितें। इच्छा त्याची पुरविते । आणि सवेचि दाविते। हैं निरर्थक म्हणूनी
।।९५।।

कां कीं मृत्युलोकींची सुखं। अवघीच आहेत क्षणिक । त्याचें ज्ञात्यासी कौतुक । न वाटे येतुलेहि
।।९६।।

ब्रह्मज्ञान झाल्यावर । सुखदुःख ना साचार। वासनारहित अंतर । त्याचें मुळींच होतसे
।।९७।।

ऐसा अमोल ज्ञानीपणा। न येतसे भक्तीविना । म्हणून दांभिकाच्या वल्गना। खऱ्या न माना लोक हो
।।९८।।

शास्त्रविहित कर्माचरण। हेंच येथें बालपण। उपासनामार्ग तारुण्य। ज्ञानीपणा वृद्धत्व हैं
।।९९।।

जगी बाल झाल्या विना। नये कोणा तरुणपणा। आणि तारुण्यविना येईना। वृद्धत्व तें कोणाहि
।।१००।।

ज्ञानवृद्धाचें बालपण। म्हणजे शुद्ध कर्माचरण। सद्भक्ति हे तारुण्य। हें कदापि विसरूं नका
।।१०१।।

कर्मे चित्त शुद्ध होर्ते। भक्तीनें अनुभवा येतें। ईश तत्त्वाचे सामर्थ्य तें। उगी न करणें शब्दच्छल
।।१०२।।

स्वामीनरसिंहसरस्वतीपरी । आतां न कोणी भूमीवरी। जिकडे तिकडे डोंबारी। बसलेत सोंगे घेऊन
।।१०३।।

कोणी म्हणे ब्रह्म साक्षात । मी सदा आनंद भोगीत। हें सत्य मानून त्याप्रत। दहीदुधानीं न्हाणिती
।।१०४।।

शुद्ध ज्ञान झाल्यावर । जग संपतें साचार। तेथें उपाधीचे प्रकार। मुळीं दृष्टी पडणें नसे
।।१०५।।

महती हिंदुधर्माची। अवघ्या जगत्रयीं थोर साची । म्हणून टवाळी तयाची। कदापिहि करूं नका
।।१०६।।

सांग कर्म आचरावें। विठ्ठलाचे भक्त व्हावें। मग ज्ञानास अनुभवावें। डोलत रहावे निजानंदी
।।१०७।।

जेथें अहंकाराची छटा। तो ब्रह्मज्ञानी मूळ खोटा। तो अभक्तीच्या चालवी वाटा। बुडवी परी आपणास
।।१०८।।

म्हणून हिंदुधर्माला । तुम्ही न न्यावें रसातळा । पाहून वेदशास्त्राला । जनरीतीं वर्तावें
।।१०९।।

तरीच या व्रतादिकांची। महती तुम्हाला कळेल साची। संगत केल्या रात्रीची। सूर्य कोठून दृष्टी पडे
।।११०।।

स्वस्ति श्रीगुरु चरित्रसारामृत। सदा ऐकोत भाविकभक्त । हेंच देवा विनवीत। अती आदरें दासगणू
।।१११।।

।। इति नवमोध्यायः ।। शुभंभवतु ।।

।। श्रीदत्तात्रेयार्पणमस्तु ।। श्रीहरिहरार्पणमस्तु ।।

卐 卐 卐 卐 卐

इति अध्याय समाप्तः