आदी शक्तीचे कवतुक मोठे भुत्या मज केले
॥धृ॥
पंचभुताचा देहपोत हा त्रिगुणगुणी वळला ।
चैतन्याची ज्योत लावुनी प्रज्वलीत केला ।
चित्त स्नेहे प्राणवायुने त्याला स्थिर केले
।।१।।
उदर परडी घेवूनी हाती ब्रह्मांडी फिरवी ।
लक्ष चौऱ्यांशी घरची भिक्षा मागवीली बरवी ।
ज्या ज्या घरी म्या भिक्षा केली तेथे घर रूचले
।।२।।
सकाम कर्मे कवड्यांची या माला मम कंठी ।
कर्म फळांचा कुंकूम मळवट माझ्या लल्लाटी ।
पीडा बाधा शकुन सांगुनी लोका भुलवियले
।।३।।
आदी शक्तीचा असा मी भुत्या नाम वासुदेव ।
मागुनी जोगवा सद्गुरू चरणी धरला दृढभाव ।
आदी शक्ती ही मजला वळली भूतेपण नेले
।।४।।
卐 卐 卐 卐 卐