।। शांत हो श्रीगुरुदत्ता ।।

शांत हो श्रीगुरूदत्ता । मम चित्ता शमवी आता ॥धृ॥

तू केवळ माता जनिता । सर्वथा तूं हितकर्ता
तू आप्तस्वजन भ्राता । सर्वथा तूची त्राता
भयकर्ता तूं भयहर्ता । दण्ड धरिता तू परिपाता
तुज वाचुनि नां दुजी वार्ता । तू आता आश्रय दत्ता
।।१।।

अपराधास्तव गुरूनाथा । जरि दंडा धरिसी यथार्था
तरी आम्ही गाऊनी गाथा । तवं चरणी नमवू माथा
तूं तथापि दंडिसी देवा । कोणाचा मग करू धावा
सोडविता दुसरा तेव्हां । कोण दत्ता आम्हां त्राता
॥२॥

तूं नटसा होऊनि कोपी । दंडिता ही आम्ही पापी
पुनरपिहि चुकता तथापि । आम्हांवरी नच संतापी
गच्छतः स्खलनं क्वापी । असे मानुनी नच हो कोपी
निजकृपा लेशा ओपी । आम्हांवरी तूं भगवंता
।।३।।

तव पदरी असता ताता । आडमार्गी पाऊल पडतां
सांभाळुनि मार्गावरता । आणिता न दुजा त्राता
निजबिरूदा आणुनि चित्ता । तूं पतित पावन दत्ता
वळे आतां आम्हांवरता । करूणाघन तूं गुरूनाथा
।।४।।

सहकुटुंब सहपरिवार । दास आम्ही हे घरदार
तंव पदी अर्पू असार । संसारा हित हा भार
परिहरिसी करूणा सिंधो। तूं दीनानाथ सुबंधो
आम्हां अघलेश न बाधो । वासुदेव प्रार्थित दत्ता
।।५।।

卐 卐 卐 卐 卐