।। ॐ श्री साईनाथाय नमः ।।
श्री गणेशाय नमः ।
श्री सरस्वत्यै नमः ।
श्री सद्गुरूभ्यो नमः।
हे सर्वाधारा मयुरेश्वरा । सर्वसाक्षी गौरीकुमारा ।।
हे अचिंत्या लंबोदरा । पाहिमां श्री गणपते
।।१।।
तू सकल गणांचा आदि ईश । म्हणूनी म्हणती गणेश ।।
तू समंत सर्व शास्त्रात । मंगलरूपा भालचंद्रा
।।२।।
हे शारदे वाग्विलासिनी । तू शब्द सृष्टीची स्वामिनी ।।
तुझे अस्तित्व म्हणुनी । व्यवहार चालती जगताचे
।।३।।
हे पूर्णब्रह्म संतप्रिया । हे सगुणरूपा पंढरीराया ।।
कृपार्णवा परम सदया । तूच माझा दत्त रे
।।४।।
जय जयाजी साईनाथा । पतित पावना कृपावंता ।।
तुझ्या पदी ठेवितो माथा । आता अभय असू दे
।।५।।
तू नरदेहधारी परमेश्वर । तू ज्ञान नभीचा दिनकर ।।
तू दयेचा सागर । भवरोगा औषधी तू
।।६।।
आम्हा व्हावया कृतार्थ । आले पाहिजे तुम्हाप्रत ।।
शरण सर्वदा जोडून हात । का की पवित्रता तुम्हाठाई
।।७।।
म्हणून तुमच्या दिव्य चरणां । मी करितो वंदना ।।
महाराज माझ्या दुर्गुणा । पाहू नका किमपीही
।।८।।
मी हीन दीन अज्ञानी । पातक्यांचा शिखामणी ।।
युक्त अवघ्या कुलक्षणांनी । परि अव्हेर करू नका
।।९।।
माझ्या मधील अवघे दुर्गुण।
आपल्या कृपाकटाक्षे करून ।।
करा करा वेगे हरण । हीच विनंती दासाची
।।१०।।
मला पापी ठेवू नका । आपण हीनत्व घेऊ नका ।।
आपण परिस मी लोह देखा । माझी चाड आपणाते
।।११।।
बालक अपराध सदैव करिते।
परि न माता रागावते ।।
हे आणून ध्यानाते । कृपा प्रसाद करावा
।।१२।।
हे साईनाथ सद्गुरू । तूच माझा कल्पतरू ।।
भवाब्धीचे भव्य तारु । तूच अससी निश्चये
।।१३।।
हे विज्ञानमुर्ती नरोत्तमा ।
हे क्षमाशांतीच्या निवासधामा ।।
हे भक्तजनांच्या विश्रामा । प्रसीद प्रसीद मजप्रती
।।१४।।
फार बोलणे न लगे आता । तूच आम्हा माता पिता ।।
हे सद्गुरु साईनाथा । शिर्डी ग्रामनिवासिया
।।१५।।
असो आता गुरुराया । दीनावरी करा दया ।।
मी तुमच्या लागलो पाया। मागे न लोटा मजलागी
।।१६।।
बहुतेक करून कल्पना । करितो तुमच्या पूजना ।।
तेच पूजन दयाघना । मान्य करा या दासाचे
।।१७।।
आता प्रेमाश्रुकरून । तुमचे प्रक्षालितो चरण ।।
सद् भक्तीचे चंदन । उगाळून लावितो
।।१८।।
कफनी शब्दालंकाराची । घालितो मी तुम्हां साची ।।
प्रेमभाव या सुमनांची माळा । गळ्यात घालितो
।।१९।।
धूप कूत्सितपणाचा । तुम्हापुढे जाळीतो साचा ।।
जरी तो वाईट द्रव्याचा । परि न सुटेल घाण त्यासी
।।२०।।
सद्गुरूविण इतरत्र । जे जे धूप जाळीतात ।।
त्या धूप द्रव्याचा तेथ । ऐसा प्रकार होतसे
।।२१।।
धूप द्रव्यास अग्नीचा । स्पर्श होताक्षणी साचा ।।
सुवास सद्गुण तदंगीचा । जात त्याला सोडून
।।२२।।
तुमच्या पुढे उलटे होते । घाण तेवढी अग्नीत जळते ।।
सद्गुण उरती पाहण्याते । अक्षयीचे जगास
।।२३।।
दिप माया मोहाचा । पाजळीतो मी हा साचा ।।
तेणे वैराग्यप्रभेचा । होवो गुरुवरा लाभ मसी
।।२४।।
शुद्ध निष्ठेचे सिंहासन । देतो बसावया कारण ।।
त्याचे करुनिया ग्रहण । भक्ती नैवेद्य स्विकारा
।।२५।।
भक्ति नैवेद्य तुम्ही खाणे । तद्रस मला पाजणे ।।
का कीं मी तुमचे तान्हे । पयावरी हक्क माझा
।।२६।।
मन माझे दक्षणा । ती तो अर्पितो आपणा ।।
जेणे नुरेल कर्तेपणा । कशाचाही मजकडे
।।२७।।
आता प्रार्थनापूर्वक मात्र । घालीतो मी दंडवत ।
ते मान्य होवो आपणांप्रत । पुण्यश्लोका साईनाथा
॥२८॥
।। श्लोक ।।
शांतचित्ता महाप्रज्ञा । साईनाथा दयाघना ।। जातगोतातिता सिद्धा । अचिंत्या करुणालया ।।
पाहि मां पाहि मां नाथा । शिर्डी ग्रामनिवासीया
।।३०।।
श्री ज्ञानार्का ज्ञानदात्या । सर्व मंगलकारका ।।
भक्तचित्तमराळा हे । शरणगतरक्षका
।।३१।।
सृष्टीकर्ता विरींची तू । पाता तू इंदिरापती ।।
जगत्रया लया नेता । रुद्र तो तूच निश्चिती
।।३२।।
तुजविण रिता कोठे । ठाव ना या महिवरी ।।
सर्वज्ञ तू साईनाथा । सर्वाच्या हृदयांतरी
।।३३।।
क्षमा सर्वापराधांची । करावी हेची मागणे ।।
अभक्ती संशयाच्या त्या । लाटा शीघ्र निवारणे
।।३४।।
तू धेनू वत्स मी तान्हे । तू इंदू चंद्रकांत मी ।।
स्वर्णदीरूप त्वत्पादा । आदरे दास हा नमी
।।३५।।
ठेव आता शिरी माझ्या । कृपेचा करपंजर ।।
शोक चिंता निवारावी । गणु हा तव किंकर
।।३६।।
या प्रार्थनाष्टकेकरून । मी करितो साष्टांग नमन ।।
पाप ताप आणि दैन्य । माझे निवारा लवलाही
।।३७।।
तैसा मी तो दूराचारी । परी आहे तुमच्या पदरी ।।
म्हणुन विचार अंतरी । याचा करा हो गुरुराया
।।३८।।
ऐहिक वा पारमार्थिक ।
ज्या ज्या वस्तूंस मानील सुख ।।
माझे मन हे निःशंक । त्या त्या पुरविणे गुरुराया
।।३९।।
कमीपणा जो जो माझा । तो तो अवघा तुझा ।।
सिद्धांचा तू आहेस राजा । कमीपणा न बरवा तुजसी
।।४०।।
आता कशास्तव बोलू फार । तूच माझा आधार ।।
शिशू मातेच्या कडेवर । असल्या निर्भय सहजची
।।४१।।
असो या स्तोत्रासी । जे जे वाचतील प्रेमेसी ।।
त्यांच्या त्यांच्या कामनेसी । तुम्ही पुरवा महाराजा
।।४२।।
शुचिर्भूत होऊन नित्य ।
त्रिकाळ स्तोत्र करावे पठण ।।
शुद्ध भाव असता मनी ।
नित्यानंद होईल आपुल्या जीवनी ।
।।४३।।
शिर्डी क्षेत्राची वारी करा । पाय बाबांचे चित्ती धरा ।।
जो अनाथांचा सोयरा । भक्तकाम कल्पद्रुम
।।४४।।
यती पुर्णानंदे प्रेरणेकरून ।
हे स्तोत्र केले सारांमृत लेखन ।।
मज पामराहातून । ऐसी रचना कैसी होय
।।४५।।
श्री साईनाथ स्तवनमंजरी सारांमृत ।
पूर्ण झाले तपोवन आश्रमात ।।
पूनीत नर्मदेच्या तीरी । श्री गरुडेश्वर संनिध
।।४६।।
क्षेत्र भले तपोवन आश्रम । झाले तेथे स्तोत्र पूर्ण ।।
शब्दांस वदविले मानसी । श्री साईनाथे शिरूनी मनी
।।४७।।
संत चरणरज कमलाअनंतसूत ।
श्रोत्या करितो सादर नमन ।।
परि दास मी किंकर । सद्गुरू अखंडानंदांचा
।।४८।।
इति श्री साईनाथ स्तवनमंजरी सारामृत ।
तारक हो भवसागरी । हेच विनवी अत्यादरी ।।
नमितो दास हा श्री वासुदेवानंदांचा
।।४९।।
卐 卐 卐 卐 卐