।। ॐ संकल्प ।।

गुरू तुझे श्री पदवारी धारा । धुवो सदा कायिक दोष सारा ।
सदैव माझे मन वाणी शुद्ध। करो तुझे नाम पवित्र सिद्ध ।।

ॐ श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यैः ।
श्री कुलदेवतायै नमः।श्री गुरुभ्यो नमः।

श्रीपाद श्रीवल्लभ श्री नरसिंह सरस्वतीः श्री गुरुदत्तात्रेयाय नमः।
नरदेहाचे होण्या सार्थक। श्रीगुरू देती मजलागी संकल्प ।।

गुरुतत्वाचा होण्या बोध। करा गुरुचरित्र सारामृताची पारायण ।।

वाचक संख्या एक हजार आठ। ऐसी करा अकरा पारायण ।।

महाराष्ट्र देशी भिन्न भिन्न ग्रामांतरी। संकल्प आहे महा कठिण ।।

करता सारासार विचार। परी सद्‌गुरू चरणी अर्पूनी भाव ।।

हाती घेतला हा संकल्प। करता करवीता श्रीगुरुदत्त ।।

निमित्य मात्र केले हो पामरास। कळे ना हो त्यांच्या मनीचा ठाव ।।

काय होईल पुढे पुढे। नाही अधिकार नाही ओळख नाही राजसत्तेचे छत्र ।।

कोण भेटेल विभिन्न गावी। योजण्या हे मंगल पर्व ।।

गणिताची नाही जुळली नाळ। जमा खर्चाचे नाही मज ज्ञान ।।

येईल कैसे सारे जुळुनी। आहे हा यक्ष प्रश्न ।।

सांप्रत कालीचा करूनी विचार। लिहिले गेले गुरुचरित्र सारामृत ।।

गुरुतत्त्वाचा मुख्य तो बोध। ध्यानी येण्या सर्वासी ।।

गुरु तत्त्व ते येता ध्यानी। ठाई दिसती श्रीगुरू मूर्ती ।।

गुरू जाणीजे तत्त्व रूपाने। आदि अंती एक असे ।।

श्री गुरु आज्ञेचे करण्या पालन। म्हणूनी योजीला हा महायज्ञ ।।

त्यांचे कार्य करतील तेच। निमित्य करती भक्तासी ।।

या महामंगल कार्यात। मज होईल लाभ थोर ।।

वाचक श्रोता दाता रूपाने। दिसतील ठाई ठाई दत्त ।।

आदरे करतो तुम्हास वंदन। तुम्हीच माझे श्रीगुरूदत्त ।।

नाव लावा पैलतीरी। मार्ग दावा मजसी सत्य ।।

करेन कसोशीने प्रयत्न। श्री गुरू कार्य करण्या अर्पिला हा देहपोत ।।

गुरु तत्वाची महती। ध्यानी येण्या सर्वांसी ।।

योजना करूया कार्याची। गावो गावी महाराष्ट्र देशी ।।

गुरु तत्वाचा चेतवू प्रदीप। करण्या लक्ष दिव्यांची आरास ।।

त्याने होईल दर्शन। लक्ष रुपे श्रीगुरुंचे।।

ग्रंथ छपाई कारणे। लाभले बहू योगदान ।।

करतो वंदन तुम्हा ठाई। दत्त स्वरूप आपणासी ।।

ऐसेच द्यावे योगदान। या कार्यासी पुढे पुढे ।।

ग्रंथ छपाई कारणे लाभले विशेष सहकार्य। श्रीदासगणू प्रतिष्ठान गोरटे यांचे ।।

श्रीदासगणू महाराज दत्त। घेतील इच्छा करूनी पूर्ण ।।

त्यांच्या मनीची आहे हे निश्चित। निमित्य करूनी भक्तासी ।।

श्री अखंडानंद गुरू महाराज। करते करवीते तुम्हीच दत्त ।।

करूनी घ्या हो सेवा गोड। अन्य नको मज काही ।।

सेवा करता न्यावे सावरूनी। सहा रिपूंची सुटो संगती ।।

गुरु सेवेची अखंडित ओढी। लाभो ऐसा वर द्या ।।

संदिपकाचे करूनी स्मरण। मकरंद मागतो तुम्हासी दान ।।

विष्णु दत्त तुम्हीच सत्य। द्या हो देवा वर द्या ।।

नाही गुरू प्रेम जयास चित्ती। न गाय वाचे गुरू नाम किर्ती ।
घडेची ना सद्‌गुरू पाद सेवा। त्यांचा आम्हा संग कधी न व्हावा ।।

सद्गुरू चरणरज
मकरंद अनंत वैद्य
पिठाधीपती, श्री क्षेत्र दत्तधाम, परभणी.